आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:‘पैसा फंडा’ची अनोखी कहाणी

नितीश गोवंडे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योग-व्यवसायांमध्ये अलीकडच्या काळात ‘क्राउड फंडिंग’चा बोलबाला सुरू आहे. पण, साधारण शंभर वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात ‘पैसा फंडा’ने ही संकल्पना रुजवली होती. त्यातून पुण्याजवळ तळेगाव येथे देशातील पहिला काच कारखाना उभा राहिला. मात्र, पैसा जमवायचा आणि कारखाना काढायचा एवढी संकुचित भावना त्यामागे नव्हती. परकियांवर अवलंबून न राहता, स्वत:च्या हिमतीवर तंत्रज्ञान शिकून स्वदेशी माल तयार करू आणि देश स्वावलंबी बनवू, अशी तळमळ या पुढाकारात होती. हा फंड स्वदेशी, स्वदेशाभिमान आणि स्वावलंबन यांचे प्रतीक होता. गांधी युगात जसे चरख्याला, तसे टिळक युगात ‘पैसा फंडा’ला महत्त्व होते.

ही कहाणी आहे विसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी माणसांनी उद्योग विश्वात केलेल्या अनोख्या प्रयोगाची. देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची गुलामी झुगारण्याचे प्रयत्न एकीकडे सुरू होते, पण आर्थिक परावलंबित्वाच्या बेड्या तोडण्याची मानसिकता समाजात येत नव्हती. याच काळात लोकमान्य टिळकांनी स्वदेशीची हाक दिली. तिला प्रतिसाद म्हणून, त्यांच्याच प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाने काही अंताजीपंत काळे यांच्यासह काही ध्येयवादी लोकांनी ‘पैसा फंड’ नावाचा एक आगळा उपक्रम हाती घेतला. लोकांकडून पै पै गोळा करुन निधी उभारायचा आणि त्यातून स्वदेशी उद्योग उभा करायचा, ही त्यामागची संकल्पना. सन १९०० च्या मार्चमध्ये सातारा येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक अधिवेशनात हजारो लोकांसमोर सर्वप्रथम ती मांडण्यात आली. पण, त्याला लोकांचा प्रतिसाद अत्यल्प होता. लोकांकडून पैसा गोळा करून सहकारी तत्त्वावर उद्योग सुरू करण्याची कल्पना त्या काळात तशी आव्हानात्मकच होती. पण, अंताजीपंतांनी त्यासाठी पुढाकार घेतला. वासुकाका जोशी यांच्यासह फंडाच्या कोअर कमिटीने या फंडातून काच कारखाना उभारण्याची योजना आखली. फंडाची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवून पैसे गोळा करण्यासाठी अंताजीपंतांनी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश कर्नाटकातील २२५ पेक्षा जास्त गावांत मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी पायी फिरून सभा घेतल्या. पण, पैशांच्या रुपात लोकांचा प्रतिसाद निराशाजनक होता. लोकसहभागातून स्वदेशी आणि आर्थिक स्वावलंबनाची ही धडपड निष्फळ ठरु नये, यासाठी लोकमान्य टिळकांनी २७ डिसेंबर १९०४ ला खास सभा घेतली. अंताजीपंतांनी केलेल्या कार्याचा गौरव करुन लोकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याला प्रतिसाद देत लोकांनी पैसा जमा करायला सुरूवात केली. १९०६-०७ मध्ये १४ हजार रुपये आणि १९०७-०८ मध्ये २२ हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली.

पैसा फंडातून काच निर्मिती कारखाना उभारण्याचे निश्चित झालेच होते. मग त्यासाठी लागणाऱ्या जागेचा शोध सुरू झाला. पुण्याजवळ तळेगाव येथील समर्थ विद्यालयाने आपल्या ६५ एकर जागेतील १५ एकर जागा काच कारखान्यास देण्याचे मान्य केले. आता प्रश्न होता, तो काच भट्टी उभारण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक ज्ञानाचा. जपानमधील ओसाका कारखान्याच्या धर्तीवर काच भट्टी तयार करण्याचे ठरले. त्यासाठी जपानचे तीन कामगार तळेगाव येथे बोलवण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर मार्च १९०८ मध्ये पैसा फंडाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. नानासाहेब देशमुख यांच्या हस्ते या काच कारखान्याचे उद्घाटन झाले. काचेच्या बांगड्या, चिनी मातीच्या बरण्या, भांडी अशा उत्पादनांपासून झालेली सुरूवात कंदील व रेल्वे सिग्नलच्या काचा, थर्मास फ्लास्क, परफ्युम बॉटल्स, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अशी विकसित होत गेली. भारतातील तरुण वर्ग धडपडत का होईना, पण स्वत:चे औद्यौगिक अस्तित्व उभे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यांनी हा कारखाना बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १९१० मध्ये कारखाना परिसरातील समर्थ विद्यालय बेकायदेशीर ठरवून बंद केले. पण, टिळकांच्या मार्गदर्शनाखाली अंताजीपंत, वासुकाका जोशी तसेच नानासाहेब देशमुख, ईश्वरदास वार्ष्णेय यांनी खंबीरपणे कारखाना नावारुपास आला.

ईश्वरदास वार्ष्णेय यांच्या सोबतचा पाच वर्षांचा करार १९१५ मध्ये संपुष्टात आल्यावर पैसा फंडची जबाबदारी काच कारखान्यात शिकलेल्या सहा विद्यार्थ्यांकडे सोपवण्यात आली. या मंडळींनी पुढील २३ वर्षे कारखाना यशस्वीपणे आणि नफ्यामध्ये चालवला. काचेसोबतच चिनी मातीची भांडी, काच वितळवण्यासाठी लागणारे रांजण, आग विटा यांचे यशस्वी उत्पादन सुरू झाले. नवीन यंत्रे आणून उत्पादनाचा दर्जा उंचावण्यात आला. १९३५ मध्ये सर विश्वेश्वरैय्या यांच्या अध्यक्षतेखाली पैसा फंडाचा रौप्य महोत्सव साजरा झाला. तथापि, पुढच्या चार-पाच वर्षांत अडचणींमुळे कारखाना बंद पडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण, १९३९ मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धाने फंडाला वाचवले. महायुद्धामुळे वाढलेल्या मागणीचा आणि त्यातून मिळालेल्या नफ्याचा काच कारखान्याला उपयोग झाला. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हा कारखाना बहरात होता. उत्पादन, उलाढाल आणि नफ्यात वाढ झाली होती. ही घोडदौड पुढे निर्यातीपर्यंत पोहोचली. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया यांसह काही युरोपियन देशांमध्ये फंडाच्या काच उत्पादनांना मागणी होती. पण, ही परिस्थिती जास्त दिवस टिकली नाही. १९५१ चे कोरियन युद्ध, इराणमधील राज्यक्रांती, इंडोनेशियाचा स्वातंत्र्य लढा यामुळे जागतिक तणाव वाढत गेला. परदेशातून येणाऱ्या रसायनांच्या किमती वाढल्या आणि ते मिळण्यातही अडचणी येत राहिल्या. त्यातच सरकारने काच मालासाठी आयात धोरण परवाने दिले. परिणामी काच कारखान्याला १९५२ ते १९५६ या काळात मोठा तोटा झाला. १९५८ पासून काच बरण्या, काचेच्या चिमण्या, ग्लास टेबलर्स या वस्तूंच्या निर्मितीत फारसा फायदा नसल्यामुळे त्याऐवजी निळ्या रंगाच्या बाटल्या, रेल्वेच्या सिग्नल आणि दिव्यांना लागणाऱ्या काचा, ओपल ग्लास आणि अगदी अलीकडे गाड्यांचे हेडलाइट आणि दिल्ली मेट्रोसाठी जांभळ्या रंगाच्या सिग्नलची काच बनवेपर्यंत सुरू होती.

म. गांधींसह अनेक मोठ्या व्यक्तींनी दिली भेट

काच कारखाना पाहण्याची इच्छा अनेक ठिकाणचे लोक व्यक्त करायचे. त्यामुळे पुढे तो लोकांसाठी खुला करण्यात आला. त्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, पं. नेहरू, सुभाषचंद्र बोस, पं. मदनमोहन मालवीय आदी अनेक मोठ्या व्यक्तींनी या कारख्यान्याला भेट दिली होती. इंदिरा गांधींचे शिक्षण सुरू असताना १९३२ मध्ये त्यांच्या शाळेची सहल तळेगावला या कारखान्यात आली होती. तो पाहिल्यानंतर त्यांनी पंडितजींना पत्र लिहिले आणि असा काच कारखाना भारतात असणे हे आपले भाग्य असल्याचे नमूद केले. तेथील सुविधा, कौशल्य आणि तंत्रज्ञान परदेशातील कारखान्यांच्या तोडीचे असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.

सुमारे शंभर वर्षांचा औद्योगिक चढ-उतार अनुभवत या अनोख्या ‘पैसा फंड’ काच कारखान्याने २०१६ मध्ये अल्पविराम घेतला. पाच वर्षांच्या खंडानंतर आता हा फंड आता पुन्हा नवोन्मेषाच्या वाटेवर निघाला आहे. फंडाचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या कारखान्यातून आधुनिक तंत्र आणि तंत्रज्ञांच्या मदतीने टफन ग्लास, सोलरसाठी लागणाऱ्या काचा, लॅमिनेशन ग्लास आणि अन्य नवी उत्पादने बाहेर पडणार आहेत. आजच्या भाषेतील ‘क्राउड फंडिंग’मधून सुरू झालेला हा उद्योग प्रतिकूल परिस्थितीच्या भट्टीत तावून सुलाखून निघाला आहे. लोकांच्या पैशासोबत त्याच्या वापराचे उत्तरदायित्वही येते. द्रष्ट्या, उद्यमशील लोकांनी त्याची जाणीव ठेवत आर्थिक स्वावलंबनाचं हे ‘काचेचं भांडं’ पुढच्या पिढ्यांसाठी इथवर जपून आणले आहे.

nitishgovande21@gmail.com

बातम्या आणखी आहेत...