आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:शहाणपण की खेळी ?

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार विधानसभेत काठावर बहुमत मिळालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नेता म्हणून निवड केलेल्या नितीश कुमार यांनी सोमवारी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचा हा विक्रम असला तरी भारतीय जनता पक्षानेही ३४ जागा जिंकलेल्या नितीश यांना ती संधी देऊन एक प्रकारचा विक्रमच केला आहे. कारण भाजपकडे स्वत:चे असे ७४ आमदार आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणे हे भाजपचे शहाणपण आहे की राजकिय खेळी आहे, हे कळायला काही वेळ जाऊ द्यावा लागेल. निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार यांना पुढे केले होते. त्यामुळे भाजपचे यश मोठे असले तरी त्यात नितीश यांच्या नावाचा वाटा आहेच हे कसे नाकारता येईल? शिवाय, बिहारच्या जनतेला दिलेला शब्द पाळला पाहिजे हे भानही भाजपच्या नेतृत्वाने ठेवले आहे, असे म्हणायला सध्या तरी संधी आहे. पण हे करीत असतानाच भाजपचे दोन उपमुख्यमंत्री त्यांच्या आजुबाजूला बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत नितीश कुमार यांना असलेले निर्णयाचे स्वातंत्र्य यापुढे कितपत असेल, हे सांगता येत नाही. किंबहुना ते असण्याची शक्यता कमीच आहे. भाजपने आणखी एक बदल केला आहे. यावेळी सुशिल मोदी हे नाव मंत्रिमंडळात घेतलेले नाही. ही भाजपने त्यांना दिलेली शिक्षा आहे का, या दृष्टीनेही चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयामुळे सुशील मोदी नाराज झाल्याचे दिसते आहे. ‘माझे कार्यकर्ता हे पद तर कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही’ असे विधान त्यांनी समाज माध्यमातून जाहीरपणे केले आहे. याचाच अर्थ त्यांचे इतक्या वर्षापासूनचे उपमुख्यमंत्रीपद त्यांच्यापासून हिसकावून घेतले गेल्याची त्यांची भावना झाली आहे. पण ही नाराजी फार काही टिकण्याचीही शक्यता नाही. राज्य पातळीवर चांगली कामगिरी करून दाखवणाऱ्यांची एक फळी केंद्रात तयार केली जाते आहे. त्यात जसे महाराष्ट्रातील फडणवीस, तावडे, मुंडे ही नावे दिसताहेत, तसेच बिहारमधून हे मोदी असू शकतील. असल्या पदान्नतीने ते समाधानी होतील का, हे कळण्यासाठीही थोडा वेळ थांबवेच लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...