आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:वाद नको, साद हवी...

Aurangabad3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाद नको, साद हवी...

'कोरोना’ने सारे जगच कह्यात घेतले असून संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक जण शक्य ते उपाय योजत आहे. एकीकडे वेगवेगळे देश, तेथील वैद्यक जगत, तज्ञ संशोधक आदी कोरोना प्रतिबंधासाठी अक्सीर इलाज ठरू शकेल अशी लस वा औषधनिर्मितीचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे प्राप्त परिस्थितीत हा जंतुसंसर्ग कसा रोखता येईल त्या दिशेने सारे काही पडताळून पाहिलेे जात असतानाच परस्पर संघर्षाची स्थिती निर्माण होत आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरिया प्रतिबंधक औषध पुरवठ्याच्या निमित्ताने अमेरिका-भारत यांच्यात निर्माण झालेला तणाव त्याचीच प्रचिती देणारा आहे.  चीनमध्ये साथीला सुरुवात झाली असली तरी त्याचे गांभीर्य लक्षात येईपर्यंत युरोपातील अनेक देशांसह अमेरिकेतील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. भारत आणि अन्य आशियाई देशांमध्ये तुलनेने स्थिती खूपच नियंत्रणात आहे. त्यामागे मुख्य कारण आहे ते प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या देशांचा बेदरकारपणा. तेथील सरकारांनी सुरुवातीपासून हव्या त्या उपाययोजना केल्या नाहीत. परिस्थिती गंभीर बनल्यावर इटलीसारख्या सरकारने हतबलता व्यक्त केली, तर ट्रम्प यांनी स्वभावानुसार त्याचे खापर इतरांवर फोडायला सुरुवात केली. कोरोनाचे नामकरण चायनीज व्हायरस असे करत त्यांनी चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यावरून भारताला एक प्रकारे धमकीच दिली. कोरोनावर अद्याप कोणतीही लस नसली तरी रुग्णांवरील उपचारांत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन बऱ्यापैकी परिणामकारक ठरत असल्याचे निष्कर्ष पुढे येत आहेत. पण, अमेरिकेत त्याचा तुटवडा अाहे. मलेरिया प्रतिबंधक हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचे उत्पादन भारतात मात्र नियमित होत असल्याने त्याचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे. हे लक्षात येताच ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. विशेष म्हणजे, त्यानंतर लगेच भारताने त्याच्या निर्यातीस प्रतिबंध घातले. ते पाहताच ट्रम्प यांचे पित्त खवळले आणि त्यांनी असे असेल तर भारताने भविष्यातील संघर्षासाठी तयार राहावे, अशी धमकीच दिली. त्यावर अशा विषयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगत भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन पुरवण्यात येईल, असे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर शेजारील काही देशांसह कोरोनाग्रस्त अन्य गरजू देशांनासुद्धा त्याचा पुरवठा सुरू राहील, असे सांगून या विषयावर पडदा टाकला. भारताने नेहमीच मानवतेचा पुरस्कार केला. आताही तीच भूमिका कायम असून आमच्या देशातील नागरिकांची गरज भागेल एवढा साठा असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही अगोदर निर्यात निर्बंध घातले, असेही स्पष्ट केले. ही भूमिका योग्यच आहे. पण, अगोदर निर्बंध घालतेवेळीच पुरेशी खात्री करून घेतली असती तर निष्कारण निर्माण झालेला तणाव टाळता अाला असता. भारताच्या सुज्ञपणामुळे हे पेल्यातले वादळ ठरले असले तरी सध्याच्या कठीण काळात सगळ्यांनीच अशा गोष्टींचे भान बाळगायला हवे.

बातम्या आणखी आहेत...