अग्रलेख : ऑलिम्पिक ज्योत विझणार...

  • ऑलिम्पिक ज्योत विझणार...

दिव्य मराठी

Mar 26,2020 10:18:00 AM IST

जागतिक व्यासपीठावर होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांनाही कोरोनाचे ग्रहण लागले. टोकियो ऑलिम्पिकच्या काउंडाऊनचे ठोके अखेर बुधवारी थांबले. टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी घेतला. अाता पुढील वर्षभरात काय होईल याची कुणालाही कल्पना नाही. मात्र साऱ्या जगभर जगण्याची धडपड सुरू आहे. यापूर्वी १९१६, १९४० आणि १९४४ च्या ऑलिम्पिक स्पर्धा विश्वयुद्धामुळे रद्द झाल्या होत्या. मात्र आजची समस्या अधिक विश्वव्यापी आहे. विश्वयुद्धाचे नियंत्रण त्या वेळी मानवाकडे होते तरीही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकवर काेरोनाचे सावट आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू भीतीच्या वातावरणात सराव करीत होते. कॅनडा, ऑस्ट्रेलियापाठोपाठ अमेरिकेनेही माघार घेण्याची भाषा सुरू केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जपान ऑलिम्पिक आयोजन समितीसमोर स्पर्धा पुढे ढकलण्यावाचून पर्यायच नव्हता. ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन हे केवळ क्रीडा सोहळा एवढ्यापुरते मर्यादित नसते, तर संबंधित देशांची अर्थव्यवस्था पणास लावली जाते. पर्यटनापासून देशाच्या अन्य उत्पादनांची बाजारपेठ जगासमोर मांडण्याची संधी प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धा यजमानांना देत असते. ऑक्टोबर २०१९ ला जपानने वाढवलेल्या कॉम्पेनसेशन टॅक्सच्या समस्येवरचा टोकियो ऑलिम्पिक हा जालीम उपाय होता. जपानमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग करणाऱ्या कंपन्यांची गुंतवणूक तूर्त तरी पाण्यात गेली आहे. जपानच्या ऑलिम्पिक समितीला ६०३ बिलियन जपानी येन इतके नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय चलनात ही रक्कम ४१६ अब्ज रुपये इतकी होते. भारत सरकारच्या एका वर्षाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा ही रक्कम ३८८ अब्जने अधिक आहे. भारत सरकारचे या वर्षाचे बजेट २८ अब्ज २६ कोटी इतके होते. जपानची राजधानी टोकियो आणि ऑलिम्पिकच्या मुख्य स्टेडियमसाठी ५९७ बिलियन जपानी येन इतके नुकसान होणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम ४११ अब्ज इतकी होते. एकंदरीतच स्पर्धा रद्द झाल्यामुळे स्पर्धा झाली नाही तर जपानला ३४८ बिलियन जपानी येन (जवळपास २४० अब्ज) इतका तोटा होणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने सामील होणाऱ्या साऱ्यांचे मिळून एक ऑलिम्पिक कुटुंब बनते. या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे आयओसीचे आद्यकर्तव्य ठरते. निकोप, भयमुक्त वातावरणात स्पर्धांचे आयोजन करून दाखवणे हे जपानचे कर्तव्य आहे, त्याच कर्तव्यदक्षतेला अनुसरून “ऑलिम्पिक चार्टर’नुसार स्पर्धा लांबणीवर टाकण्यात अाल्या अाहेत.

X