आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:'ऑस्कर'मध्ये जे घडतयं, ते भारतात घडू शकेल?

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला हा खऱ्या स्वातंत्र्याचा ‘बालेकिल्ला’ आहेे. सांस्कृतिक स्वातंत्र्य हा राजकीय स्वातंत्र्याचा गाभा आहे. कलाकार कलेतून अनेक शक्यतांचा शोध घेत असतो. कला ही शोषित समूहांना त्यांच्या दु:खानुभवांचे विरेचन करण्यासाठी अवकाश उपलब्ध करून देते. एका अर्थाने हे माध्यमच आहे, कोणत्याही प्रकारचा पारतंत्र्यातील अनुभव व्यक्त करण्याचे... असेच एक माध्यम म्हणजे सिनेसृष्टी... खरं तर जात आणि वर्ण नावाची ही ‘बिनपायऱ्यांंची इमारत’ हॉलीवूड तसेच बॉलीवूडच्या मोठ्या कॅमेऱ्यांच्या रक्तात पूर्णपणे भिनलेली आहे. अलिकडच्या काळात मात्र या इमारतीला पायऱ्या कशा बांधता येतील यावर सातत्याने विचारविनिमय सुरू आहे आणि त्याच प्रयत्नातून हॉलीवूडमध्ये ऑस्करने तर बॉलीवूडमध्ये "मसान'फेम राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक नीरज घायवानने काही ठोस पावले उचलायला सुरवात केली आहे.

स्वातंत्र्याची आस कायम राखण्याचे काम कलेची ऊर्मी करत असते. कला हा खऱ्या स्वातंत्र्याचा ‘बालेकिल्ला’ आहे, हे अनेकांना मान्य होते. सांस्कृतिक स्वातंत्र्य हा राजकीय स्वातंत्र्याचा गाभा आहे. कलाकार कलेतून अनेक शक्यतांचा शोध घेत असतो. कला ही शोषित समूहांना त्यांच्या दु:खानुभवांचे विरेचन करण्यासाठी अवकाश उपलब्ध करून देते. एका अर्थाने हे माध्यमच आहे, कोणत्याही प्रकारचा पारतंत्र्यातील अनुभव व्यक्त करण्याचे... असेच एक माध्यम म्हणजे सिनेसृष्टी... खरं तर जात आणि वर्ण नावाची ही ‘बिनपायऱ्यांंची इमारत’ हॉलीवूड तसेच बॉलीवूडच्या मोठ्या कॅमेऱ्यांच्या रक्तात पूर्णपणे भिनलेली आहे. अलिकडच्या काळात मात्र या इमारतीला पायऱ्या कशा बांधता येतील यावर सातत्याने विचारविनिमय सुरू आहे आणि त्याच प्रयत्नातून हॉलीवूडमध्ये ऑस्करने तर बॉलीवूडमध्ये "मसान'फेम राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक नीरज घायवानने काही ठोस पावले उचलायला सुरवात केली आहे.

तीन वर्षांपूर्वीचा ‘ऑस्कर सो व्हाइट’ हा प्रचंड व्हायरल झालेला हॅशटॅग आणि सध्या जोमात असलेली ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही चळवळ यामुळे एकंदरीतच अमेरिकेत वर्णद्वेषाची विषवल्ली कशी पसरली आहे हे साऱ्या जगासमोर अलिकडच्या काळात सातत्याने समोर येत आहे. या वर्णद्वेषाला पोसणारा सत्तेत असणारा परंपरावादी रिपब्लिकन पक्ष आणि त्यातून ट्रम्प अशा दुहेरी गोष्टीमुळे अमेरिका खदखदतेय. मात्र याच संदर्भात दुसऱ्या बाजूला अतिशय आशादायी चित्र निर्माण केले आहे ते अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेस अर्थात ऑस्करने... सर्वसमावेषकतेचा आम्हीही मान राखतो हे साऱ्या जगाला ठासून सांगताना ऑस्करने आता त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागामध्ये नामांकन मिळवण्यासाठी काही अटी-शर्ती जाहीर केल्या आहेत. अमेरिकी समाजाचे बदलते स्वरूप चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित झाले पाहिजे, ही भूमिका स्वीकारत ऑस्करच्या या नव्या नियमावलीनुसार समाजातील वंचित घटकांना कलाकारांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये अधिक प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे. हे वंचित घटक म्हणजे महिला, वांशिक किंवा वर्णीय अल्पसंख्याक आणि एलजीबीटीक्यू... चित्रपटामध्ये एक तरी आघाडीचे किंवा महत्त्वाची भूमिका असलेले पात्र हे आशियाई, हिस्पॅनिक किंवा आफ्रिकन-अमेरिकन हवे. उर्वरित कलाकारांपैकी किमान ३० टक्के किमान दोन वंचित घटकांपैकी हवेत. शिवाय चित्रपटाची मूळ संहिता किंवा कथा वंचित घटकांवर आधारित हवी. हे तीन निकष मिळून होतो तो, निकषांचा पहिला संच. यापैकी किमान एकाची पूर्तता नसेल तर ऑस्करचे नामांकन मिळणार नाही. याशिवाय इतर तीन निकष-संच हे पडद्यामागील कलाकार, चित्रपट प्रवर्तन आणि विपणन, प्रेक्षकवर्ग विकास यांसंबंधी आहेत. या चारपैकी दोन संचांची पूर्तता आवश्यक आहे. तसे केल्यास ९६व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात नामांकन मिळू शकेल. ही नवीन नियमवाली २०२४ च्या पुरस्कारांपासून लागू होईल.

ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनामध्ये सातत्याने फक्त आणि फक्त श्वेतवर्णीय कलाकारांनाच स्थान मिळत असल्याने २०१६ साली ‘ऑस्कर सो व्हाइट’ हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल झाला होता. यावर बरीच टीका झाली आणि त्याचवेळी ऑस्कर पुरस्कार हे अधिक समावेशक असले पाहिजेत आणि त्यासाठी काय करता येऊ शकेल याची चाचपणी ऑस्करवाल्यांनी सुरू केली. गेल्या आठवड्यात त्यांनी ही जी नवीन नियमावली जाहीर केली हे त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. ऑस्करच्या या नव्या भूमिकेवर हॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद सुरू असले तरी ऑस्कर मात्र त्यांच्या या सर्वसमावेशक भूमिकेवर ठाम आहे.

ऑस्कर वतुर्ळात काहीही घडले की लगेचच आपल्या इथे त्याचे पडसाद उमटतात. म्हणजे पाश्चिमात्य चित्रपटांचे, तिथल्या कलावंताचे अंधानुकरण करणारे आपल्याकडचे कलावंत, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक किंवा लांबलचक समीक्षा लिहिणारे समीक्षक हॉलीवूडच्या सांकृतिक बंडाकडे, शोषित घटकांच्या पाठीशी नेहमीच उभे राहताना दिसले आहे. परंतू आजवर भारतीय समाजाच्या अमानुष जातीव्यवस्थेत भरडून निघत असलेल्या शोषित-वंचित घटकांचे जगणे, त्यांच्या वेदना, त्याच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष, नव्या पिढीच्या समस्या यावर मात्र ते एक चकार काढत नाहीत. हॉलीवूडमध्ये जो ‘व्हाईट सेव्हीयर’ कॉम्प्लेक्स आहे तोच इथे वेगळ्या पद्धतीने ‘सवर्ण सेव्हीयर’ म्हणून आहे. आजवर भारतीय समाजाच्या अमानुष जातीव्यवस्थेत भरडून निघत असलेल्या शोषित-वंचित घटकांचे जगणे, त्यांच्या वेदना, त्याच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष, नव्या पिढीच्या समस्या हा मेनस्ट्रीमने जणू काही वाळीत टाकलेला विषय.

या सगळ्या पार्श्वभूमीवर "मसान'चा दिग्दर्शक नीरज घायवान याने मात्र भारतीय सिनेमातील सर्वसमावेशकता यावर अतिशय प्रभावी आणि रोखठोक मतं मांडली आहेत. नीरज म्हणतो, अमेरिकेमध्ये आफ्रिकन-अमेरिकन समूहाची संख्या जवळपास १३ टक्क्यांच्या आसपास आहे मात्र तरीही आपण त्यांच्या अनेक दिग्गज गायक, गीतकार, संगीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची नावं चटकन सांगू शकतो ज्यांनी जागतिक सिनेमामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. आपल्याकडे दलित-आदिवासींची टक्केवारी साधारणपणे २६ टक्के इतकी आहे, ओबीसी ४३ टक्क्यांच्या आसपास आहेत. याचाच अर्थ या देशाच्या एकूण लोकसंख्येचा ७० टक्क्यंाहून अधिक भाग जर अशा वंचित घटकांनी व्यापलेला असेल आणि तरीही त्याचे प्रतिबिंब भारतीय सिनेमात उमटत नसेल तर माफ करा हॉलीवूडशी तुलना करण्याच्या आपण लायकीचेही नाही आहोत. सर्वसमावेशकता तर सोडूनच द्या आपण त्यांच्यापासून कित्येक शतके मागे आहोत. आपल्याकडे तुम्ही चटकन किमान पाच दलित किंवा आदिवासी अभिनेत्याचे नाव सांगू शकाल काय? हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यापाठी एकही मान्यताप्राप्त दलित-आदिवासी कलाकार नसावा ही आपल्या भारतीय सिनेमाची शोकांतिका आहे. दलित-आदिवासीही सोडून द्या गेल्या काही वर्षात जरी महिला दिग्दर्शक, लेखिका आणि निर्मात्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी महिला संबंधित कथानकाला कुठे फारसे स्थान मिळत आहे?

बनारसमधील "डोम' या वंचित समूहाच्या नायकाला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून "मसान'हा अत्यंत नावाजलेला चित्रपट करणारा नीरज घायवान गेल्या वर्षी त्याच्या एका ट्विटमुळे प्रचंड चर्चेत आला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या दिग्दर्शकाने त्याच्या आगामी चित्रपटासाठी ट्विटरवर एक जाहिरात दिली. सहाय्यक दिग्दर्शक आणि सहाय्यक लेखकसाठीची ती जाहिरात होती. मात्र अट एकच, ती म्हणजे या कामासाठी फक्त आणि फक्त दलित-बहुजन-आदिवासी समूहाच्याच इच्छुकांचा विचार केला जाईल. नीरजच्या या ट्विटमुळे फक्त बॉलीवूडमध्येच नव्हे तर सबंध भारतीय सोशल मीडियावर गदारोळ उडाला. नीरजच्या या सर्वसमावेशक भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले परंतू त्यापेक्षा अधिक त्याला ट्रोल करण्यात आले. "" हे ट्विट काही मी अचानक एका रात्री उठून केले असातला भाग नाही. खुप सखोल विचार करूनच ते पाऊल मी उचलले होते. भारतीय सिनेमामध्ये विविधता कशाप्रकारे आणता येईल याचा विचार करूनच मी तशी जाहिरात दिली होती, आणि त्याचा सोशल मीडियावर मला सामना करावा लागणार याचीही मला पुरेपूर कल्पना होती. ट्रोलिंगबाबत माझा फारसा आक्षेप नाही, मात्र आक्षेप आहे तो इथल्या बॉलीवूडवाल्यांवर. जातीय व्यवस्थेवर चर्चा करायला अजूनही इथली फिल्म इंडस्ट्री तयार नाही.''

नीरजने "द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितले की, माझ्या चित्रपट निर्मितीमध्ये ५० टक्के महिला असतात आणि हा निकष मी अगदी माझ्या पहिल्या चित्रपटापासून म्हणजे "मसान'पासून पाळत आलो आहे. सुदैवाने माझ्यासाठी फँटम प्रोडक्शन हाऊसने देखील माझ्या या निर्णयावर विश्वास ठेवला. त्यामुळेच चित्रपट निर्मितीत महिलांचा समावेश करणे मला शक्य झाले. परंतु इथे मी वैयक्तिक प्रयत्नातून सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न करत आहे. विचारवंत आणि "कास्ट मॅटर्स'चे लेखक सूरज येंगडे यांची नीरजने याच विषयावर भेट घेतली होती. नीरज म्हणतो की, दुर्लक्षित जातींना भारतीय सिनेमात प्रतिनिधित्व कसे मिळू शकेल, त्यांच्यासाठी तशी स्पेस कशी तयार करता येईल यावर सुरजशी दीर्घकाळ चर्चा झाली. हॉलिवूडमध्ये आफ्रिकन-अमेरिकन चित्रपटकारांनी स्वत:ची जागा कशी तयार केली, कसे काम केले आणि त्यांना संधी दिल्या गेल्या की नाहीत यासाठी एका आयोग नेमण्यात येतो आणि हा आयोग हॉलीवूडमधील सर्वसमावेशकेतवर दरवर्षी त्यांचा अहवाल सादर करतो. आपल्याकडे केवळ प्रतिनिधित्वाचा उल्लेख हा देखील लोकांना अस्वस्थ करतो. ट्विट केल्यामुळे काहींनी माझ्यावर “भेदभाव”करत असल्याचा आरोप करून पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्नही केला होता. बरं गंमत अशी की सिनेमामध्ये जेव्हा मी महिलांना पन्नास टक्के प्रतिनिधित्व मिळायला हवे अशी भूमिका घेतो तेव्हा सर्व स्तरातून मला पाठिंबा मिळतो परंतू हेच चित्र मला दलित-आदिवासी-बहुजनांच्याबाबीत दिसत नाही. तेव्हा मात्र मी ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप केला जातो. प्रादेशिक सिनेक्षेत्रात मात्र बऱ्यापैकी आशादायी चित्र असल्याचे सांगून नीरज म्हणतो की, मी जेव्हा प्रादेशिक चित्रपट सृष्टीकडे पाहतो तिथे हिंदीच्या तुलनेने जास्त जातीनिहाय प्रतिनिधित्व दिसते. म्हणजे मराठी चित्रपटात पाहिले तर निळू फुले, दादा कोंडक सारखे दिग्गज कलाकार हे बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. प्रादेशिक चित्रपटसृष्टीने सामान्यत: सर्वसमावेशकतेसह चांगले काम केले आहे, समाजातून दुर्लक्षित झालेल्या वंचितांच्या कथा पुढे आणल्या आहेत. विशेषत: पा. रंजिथचे उदाहरण घेता येईल. त्याने 'काला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच मेरी सेल्वाराजच्या "परियरियम पेरुमलची'निर्मिती केली, दुर्लक्षित समाजातील महिला आणि ट्रान्सजेंडर फिल्म निर्मात्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला.सिनेमात बहुजनांना प्रतिनिधीत्व देणारे पा.रंजिथ आणि नागराज मंजूळे हे तर माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी ज्या गोष्टी साध्य केल्या आहेत त्या आश्चर्यकारक आहेत.जातीच्या विविध प्रतिनिधित्वाबद्दल बोलण्याचे धैर्य हे मला त्यांच्याकडूनच मिळालयं.

बँडिट क्वीन, आर्टिकल -१५ सारखे जात वास्तवाची मांडणी करणारे काही चित्रपट जरूर आले असले तरी सवर्णांच्या परिप्रेक्ष्यातून जात हा विषय हाताळण्यात आलाय. पण माझा प्रयत्न हा फक्त बहुजनांच्या प्रतिनिधित्वापुरता मर्यादित नाही तर एकंदरीतच भारतीय सिनेमाची जी सवर्ण भाषा आहे तीच बदलण्याचा प्रयत्न करतोय, असे सांगून नीरज बॉलीवूडच्या जातीय भूमिकेवर सडकून टीका करतो. तो म्हणते,कित्येक वर्षांपासून हिंदी चित्रपट सृष्टीने गरीब- श्रीमंत या विषयांवर भाष्य केलयं,ते पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केलाय. परंतू दारिद्र्य हा जातीव्यवस्थेचा एक परिणाम आहे हे समजून घेण्याचा कधीच प्रयत्न झाला नाही.चित्रपट निर्मातेच जातीची मान्यता नाकारताना दिसतात. "धडक' हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. धडक हा सैराटचा रिमेक... "जात' ही सैराटची मुख्य संकल्पना. मराठीत ती अतिशय प्रभावीपणे मांडली गेली. परंतू जेव्हा हिंदीत त्याचा रिमेक झाला तेव्हा जातीने तडजोड केली. आणि जेव्हा मी या विषयावर चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संपूर्ण ट्रोल गँग मला लक्ष्य करते. याचं मला कधीच आश्चर्य वाटले नाही, पण मला वाईट नक्की वाटले. मी एक चर्चा घडविण्याचा प्रयत्न करतोय पण यातून येणारा प्रतिसाद हा खूपच त्रासदायक आहे.

जोपर्यंत आपण बहुजनांना काम करायची संधी उपलब्ध करुन दिली जात नाही तोपर्यंत आपण जातीकडे गांभीर्याने बघू शकत नाही, असं स्पष्ट मत व्यक्त करून नीज सांगतो की, हे दान नाही. मी याला एक मार्ग समजतो. जिथे शंभर जणांचे टॅलेंट हे समान आहे आणि त्यापैकी ८५ लोकांना संधीचा, प्रवेशाचा विशेषाधिकार आहे आणि ते त्यांच्या आवडीच्या नोकऱ्या मिळविण्यास सक्षम आहेत. माझे लक्ष उरलेल्या त्या १५ जणांवर आहे, जे तितकेच हुशार आहेत परंतु त्यांच्याकडे प्रवेश, संधी, मार्गदर्शन किंवा समर्थन नाही. मला या १५ पैकी किमान २ (माझी आवश्यकता चार व्यक्तींची) व्यक्तींना संधी द्यायची आहे. कारण ८५ इतर लोकांसाठी सबंध समाज व्यवस्था तयार आहे. चित्रपट सृष्टीत मी कधीच माझ्या जातीचा उल्लेख केला नव्हता. विवेक अग्निहोत्रीने जेव्हा माझ्याविरुद्ध ट्विट केले तेव्हाच मला जाहीररित्या माझ्या जातीचा उल्लेख करावा लागला असे नीरजने स्पष्ट केले. "मसान' तयार होत असताना मी माझी जात मुद्दाम सांगत नव्हतो. ज्या बनारसमध्ये मसानचे शुटिंग सुरू होते त्या कालावधीत आजूबाजूचे सगळेच पंडीत माझ्यावर प्रेम करत होते, मला हरप्रकारची मदत करत होते. मात्र मनातून मला सतत ही धास्ती वाटायची की जर त्यांनी माझी जात शोधून काढली तर माझा चित्रपट बनारसमध्ये तयार होऊ शकणार नाही. ही भीती इतकी भयानक आणि अस्वस्थ करणारी होती की इंडस्ट्रीतील माझ्या जवळच्या मैत्रिणींकडेही बोलून दाखवण्याचे माझ्याकडे धाडस नव्हते. परंतु, बरीच वर्षे मी माझी ओळख, जातीव्यवस्थेचे गंभीर परिणाम आणि या समस्येवर उपाय शोधण्यासाठी काय करता येईल यासाठी स्वत: बरोबर सतत संवाद करत असतो. मसानच्या निर्मितीनंतर आणि माझ्या "त्या'ट्विटनंतर अनेक बहुजन लेखक आणि कलाकार माझ्याकडे आले आणि माझ्याबरोबर काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. सध्या मला त्यांच्या मतांवरुन कोणत्या निष्कर्षापर्यंत जायचं नाहीये. मी या सर्व चर्चेच्या किंवा विषयाच्या पलिकडे जाऊन काहीतरी डेटाबेस तयार करण्याच्या विचार करतोय . कदाचित मला याची भविष्यात मोठी मदत होईल.

संकलन : मीनाज लाटकर
divyamarathirasik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...