आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ग्रंथार्थ:पाण्यारण्य : विश्वव्यापी तृष्णा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पी. विठ्ठल

दिनकर मनवर यांनी म्हटल्याप्रमाणे "पाण्यारण्य  ही केवळ दोन शब्दांची संधी नाही हे खरे. पाण्यारण्य हे जगण्याचे एक मिथक आहे. अनाकलनीय मिथक.  भावभावना, श्रद्धा अश्रद्धा आणि 'सार्वभौम वस्तूममानाचे' असंख्य ध्वनी त्यात आहेत. असं असलं तरी ही काही पाण्याची कविता नाही. या कवितेत अनेक व्याकुळ कहाण्या आहेत. निर्मितीचे, भावभावनांचे असंख्य प्रदेश आहेत.

"पाण्यारण्य' ही काही केवळ पाणी आणि अरण्य या शब्दांची संधी नाही. तसेच हा कोणत्याही विशिष्ट भाषेतला एखादा शब्दही नाही. हे एक मिथक आहे,  जे माझ्यातून उगवून आलं आहे. या मिथकात प्रकृती आणि पुरुष आहे. एकमेकांबद्दल ओढ आहे, प्रेम आहे, आकर्षण आहे, जाणीव नेणिवेचा टकराव आहे, एकमेकांबद्दलच्या भेटीची असोशी आहे,एकांत आहे, वाळवंट आहे, मृगजळ आहे, मृगतृष्णा आहे... आणि ह्या सगळ्यामुळे आपल्या वाट्याला येणाऱ्या जगड्व्याळ दुःखाच्या कारणांचा शोध म्हणजे हे पाण्यारण्य आहे. 

कवी आणि स्वतंत्र शैलीचे चित्रकार अशी ओळख असलेल्या दिनकर मनवर यांच्या "पाण्यारण्य' या कवितासंग्रहाच्या प्राक्कथनातला हा प्रारंभीचा मजकूर. दिनकर मनवर हे मराठी कवितेतील एक  ठळक नाव.  वेगळी सौंदर्यदृष्टी आणि अनुभवाचा वेगळा  आविष्कार करणारा हा कवी प्रसिद्धीपासून सतत दूर राहत आला आहे. तरीही अत्यंत व्रतस्थपणे कवितेत गुंतलेला हा संवेदनशील माणूस मागच्या दोन चार वर्षापूर्वी  "पाणी काय असतं?'  या कवितेने एकदम चर्चेत आला होता. कवितेचे निर्बुद्ध वाचक त्याच्यावर तुटून पडले होते आणि मग  हताश होऊन या कवीने नाईलाजाने माफीनामा वगैरे लिहून दिला होता. खरं तर एखाद्या कवीवर अशी वेळ यावी ही खूप दुःखद घटना असते;  पण आपल्या समृद्ध (!) सांस्कृतिक पर्यावरणात तसे घडले खरे. तर ते असो...

"दृश्य नसलेल्या दृश्यात' आणि "अजूनही बरंच काही बाकी' या कवितासंग्रहाने  मराठी कवितेत स्वतःचे  स्थान निर्माण करणाऱ्या मनवरांचा 'पाण्यारण्य'  हा नवा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. दिनकर मनवर यांची कविता स्वतःच्या अंत:स्वरूपाला साक्षेपाने समजून घेणारी आणि अत्यंत संवेदनशील असा एक मानसिक अनुभव देणारी कविता आहे.  "दुःख हे कविता लिहिण्याचे प्राचीन कारण' असे मानणाऱ्या या कवीची कविता कधीही कालबाह्य न  होणाऱ्या निरीश्वरवादी, मानवतावादी आणि समतावादी असलेल्या बुद्ध तत्त्वज्ञानाच्या जवळ जाणारी आहे. प्रज्ञा, शील आणि करुणा या तत्वांची शिकवण हा धर्म देतो.  मोहमायेच्या आदिम आसक्तीपासून दूर ठेवणारा आणि मानवी नात्यांची पुनर्रचना करणारा हा विचार जगण्याच्या भ्रमक समजुतींना दूर ठेवणारा आहे. मनवर यांची समग्र कविता या तत्त्वज्ञानाच्या अंगाने वाचली तर या कवितेतली रचनातत्वे आणि आशयसूत्रे आपल्याला समजून घेता येतात. अर्थात अशा एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून विचार करून कविता समजून घेता येते का?  हा प्रश्नच असतो;  पण तरीही अर्थाचे काही संभाव्य अंदाज आपल्याला नक्कीच बांधता येतात. कवितेच्या अंतर्रचनेचा शोध घेता येऊ शकतो. 

आधी म्हटल्याप्रमाणे मनवर हे चित्रकार आहेत. त्यांची चित्रे गूढ  आणि अज्ञात अनुभव देतात. कोणत्याही  चित्रांना ना जात असते ना धर्म. कोणत्याही कलेच्या बाबतीत हे म्हणता येईल.  मनवरांची चित्रेही रंग रेषातून नवा कलात्मक आविष्कार घडवतात. अगदी गणितीय भाषेत जसा चित्रांचा अर्थ शोधता येत नाही, तसेच कवितेचाही तंतोतंत अर्थ लावता येत नाही. चित्रकार असलेल्या कवीची कविता तर विशिष्ट अशा अनुभवाचे व्याकरणच उलगडून दाखवते. आपल्या रूढ समजुतींवर संस्कार करते. वाचक म्हणून आपल्याला या संवेदनशीलतेशी  एकरूप होता यायला हवे. कवीचे चित्रकार असणे या गोष्टीलाही इथे महत्त्व आहे. 

खरंतर समकालीन मराठी कविता ही भाषिकदृष्ट्या खूप बदलत चालली आहे. तिच्यात आकृतीबंधासह वेगवेगळे प्रयोग होत आहेत. ती अधिकाधिक गद्य आणि विधानात्मक होत आहे. तंत्रज्ञानयुक्त काळाचे संदर्भ तिला टाळता येत नाहीत. म्हणजे आजच्या पुष्कळच तांत्रिक आणि माध्यमप्रणित काळाचे ध्वनी त्यात उमटत आहेत. म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणात अशी कविता लिहिली जात असताना दिनकर मनवर यांच्यासारखा कवी मात्र माणसाच्या अंतर्विश्वाचे,  त्याच्या एकूणच समकालीन स्थितीगतीचे एक अनोखे आणि अर्थवाही भावचित्र वाचकांसमोर ठेवत आहे, ही गोष्ट अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. माणसाच्या जीवनाचं, त्याच्या संस्कृतीचं एक सत्वशील दर्शन ही कविता घडवते.  मानवी जाणिवेला व्यापून टाकणारा हा आविष्कार वाचकाला उत्कट अनुभव देतो. माणसाच्या अर्थशून्य जगण्याचा तळ ढवळून काढतो. भाषेच्या प्रवाहाला निरंतर वाहतं  ठेवून अनिश्चित अशा जगण्याची संगती लावू पाहतो. मनवरांची कविता ही वास्तवाची असंख्य रूपे घेऊन अवतरते. आधुनिक प्रतिमांचा कोणताच उथळ अतिरेक न करताही किंवा शब्दांचे कोणतेच शाब्दिक खेळ न खेळताही जगण्याचा कोलाहल किती समजूतदारपणे मांडता  येतो हेच कवीने या संग्रहातून दाखवून दिले आहे.

"पाण्यारण्य'  वाचकाला समृद्ध अनुभव देणारी  रचना आहे. इथे कारुण्याचे असंख्य पदर आहेत. इथे तृष्णेचा ओला काठ आहे. तृप्तीची उत्कट जाणीव आहे. दुःखाची आणि वेदनेची अदृश्य सल आहे. निर्मितीचे आडाखे आधीच डोक्यात ठेवून रचलेली ही रचना नाही. तर हा एक अत्यंत वेगवान,  प्रवाही आणि मनोज्ञ असा काव्याविष्कार आहे. ही  कविता एखाद्या सुंदर चित्रासारखी आहे. असं चित्र जे प्रेक्षकाला एकाच बिंदूवर कधीही स्थिर होऊ देत नाही. "पाण्यारण्य'  ही अशी  दीर्घरचना आहे जी मानवी प्रज्ञेच्या मुळापर्यंत माणसाला घेऊन जाते. जगण्याच्या क्षणभंगुर आशयाची जाणीव करून देते. माणसाला व्यापून असणाऱ्या अनंत भौतिक अवकाशाचा अर्थ समजावून सांगते. या कवितेत विचार आहे. तत्त्वज्ञान आहे. गती आहे. संवेदना आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यात  अंतर्मुख करणारा मन:संवाद आहे. उत्कट भावानुभव आहे. अपरंपार अशा भावसंबंधाचे हे एक विस्तृत असे अरण्य आहे. ज्यात सफल- विफलतेच्या,  नैतिक- अनैतिकतेच्या,  प्रेमानुभवाच्या असंख्य  नद्या वाहत आहेत. भाषेचे, मानवी वर्तनाचे,  मूल्याचे  अनेक उच्चार यात एकवटले आहेत.

"पाण्यारण्य' ही एक अशी संहिता आहे, जी आपल्या पारंपरिक धारणांची चिकित्सा करते. पावित्र्य आणि तत्सम सामाजिक  संकेताना ती स्वतःच्या दृष्टिकोनातून समजून घेते.  म्हणून या कवितेचे वाचन खूप सलग घडते.  एका कवितेतून दुसऱ्या कवितेत आणि दुसऱ्या कवितेतून तिसऱ्या- चौथ्या, शंभर- सव्वाशेव्या कवितेपर्यंत वाचक म्हणून आपला प्रवास इतका सहज होतो की, आपण आपली तथाकथित पाशवी आस्था या रचनेत विसर्जित करून टाकतो. मोहमायेच्या असोशीपासून आपण कळत नकळत दूर होत जातो. पाण्याची अनंत रूपं  इथं वाहत राहतात. ही कविता समजून घेण्यासाठी कोणत्याही शब्दकोशात डोकावण्याची गरज पडत  नाही. "पाण्यारण्य' ही एक विश्वव्यापी जाणीव आहे. माणसाचे आदिम जन्मसूत्र आहे. या जाणीवेशी एकरूप व्हायला वेळ लागत नाही. मानसिक, भावनिक अवस्थांच्या आणि रूपांतराच्या अनेक मितीतून ही कविता वाहत राहते. जगण्याला प्रतिसाद देत राहते. नातेसंबंधाच्या दृश्य- अदृश्य बाजूंना पृष्ठभागावर आणून ठेवते. इथे दुःख आहे. दुःखाचे चिंतन आहे. स्त्रीपुरुषातले भावनिक विभ्रम आहेत. या विभ्रमाचे विश्लेषण आहे. म्हटलं तर  हा  स्वतःच  स्वतःशी केलेला निरामय संवाद आहे. कुण्या अज्ञात अपर्णेला सहेतुक  किंवा निरर्थक मारलेली  हाक आहे.

अद्भुताच्या  अरण्यातला,  अनुभवांच्या सानिध्यातला हा आविष्कार आहे. निसर्गाची,  सृष्टीची  अनंत रुपं इथं  एकवटली आहेत. समागमाची भावस्थिती आहे. प्रेयसीची ओढ आहे. 'तुझे अनाघ्रात  आभाळ/  डोक्यावर घेऊन भटकतो आहे' (पृ. 143) किंवा 'सळसळत्या भाषेसारखी/  सहज होऊन ये माझ्याकडं'  अशी एक आर्त,  उत्कट भावजाणीव आहे.  पण त्याचवेळी  'मी काही प्रेम करावी/ अशी सुलभ गोष्ट नाहीये' (पृ. 195) असं बजावून सांगणारा जीवघेणा उच्चारही  आहे. अपूर्णतेचा,  रितेपणाचा,  तृष्णेचा हा एक अध्यात्मिक अनुभव आहे. या अनुभवात अनेक मिथके आहेत. चित्र आणि शिल्पे आहेत. सौंदर्य आहे. वैराग्य आहे. अनुभवाचे विराटपण आहे. भावनिकतेकडून वैचारिकतेकडे जाणारी, अलिप्तपणे काळाला समजून घेणारी ही आत्मशोधाची पायवाट आहे. कवीने प्रारंभी म्हटल्याप्रमाणे, "तृष्णेचं मूळ शोधण्याच्या अपरिहार्य प्रवासातून सापडत गेलेल्या' या कविता आहेत.  कोणत्याही आसक्तीपासून दूर जाणे आणि कर्मबंधनातून मुक्त होणे हा बुद्धविचार आहे. जीवन दुःखमय आहे आणि दुःखाचे मूळ तृष्णा आहे. हा विचार आपण लक्षात घेतला की,  जगण्याविषयीचा एक नवीन दृष्टीकोन आपोआपच आकाराला येतो. निश्चित अशी दिशा समीप येते.  दुःखाच्या स्त्रोतांची जाणीव झाली की,  द्वेषाचा रस्ता संपुष्टात यायला वेळ लागत नाही.

दिनकर मनवर यांची कविता अशा अनपेक्षित आणि दुःखशील चिंतनाचा प्रवास घडवते. तर्कशास्त्राच्या तराजूने  ही कविता समजून घेता येणार नाही. या कवितेचे सौंदर्य तिच्या आशयात सामावले आहे. अनुकूल- प्रतिकूलतेच्या असंख्य लाटा  यात आहेत. पाणी हे विज्ञानाच्या परिभाषेत  मूलद्रव्य असलं तरी ते जगण्याचं एक अपरिहार्य तत्त्व आहे. ती एक विश्वव्यापी जाणीव आहे. पाण्याचे भौतिक गुणधर्म काहीही असले तरी पाणी ही माणसाची अनिवार्य गरज आहे. आणि पाण्याइतकं पवित्र या पृथ्वीवर दुसरं काहीच असू शकत नाही. अरण्य म्हणजे  मोठे वन. निर्जन प्रदेश. जिथे सूर्यप्रकाशालाही सहज प्रवेश करता येत नाही. अरण्यशिवाय सृष्टीची  कल्पना संभवत नाही.  सारांश,  'पाणी'  आणि 'अरण्य' या दोन्ही गोष्टी मानवी संस्कृतीला संपन्न करणाऱ्या उदात्त गोष्टी आहेत. कवीने म्हटल्याप्रमाणे 'पाण्यारण्य  ही केवळ दोन शब्दांची संधी नाही हे खरे. पाण्यारण्य हे जगण्याचे एक मिथक आहे. अनाकलनीय मिथक.  भावभावना, श्रद्धा अश्रद्धा आणि 'सार्वभौम वस्तूममानाचे' असंख्य ध्वनी त्यात आहेत. असं असलं तरी ही काही पाण्याची कविता नाही. या कवितेत अनेक व्याकुळ कहाण्या आहेत. निर्मितीचे, भावभावनांचे असंख्य प्रदेश आहेत. अगतिकता आणि असहाय्यता आहे. तिला उद्देशून केलेला हा एक निकोप आणि भावोत्कट संवाद आहे. या दीर्घ कवितेत सर्वत्र 'ती' आहे. तिचं चेहराहीन अस्तित्व आहे. तिच्याशी होत असलेल्या या संवादात विश्वास आणि कमालीचा जिव्हाळा आहे. तरीही अनिश्चित अशी उदासीही आहे. अटळ मानवी संबंधातील आणि मनातील विषन्नता आहे. जगण्याच्या अनेक संदर्भांना व्यापून असणारं हे दर्शन आहे. किंबहुना 'पाण्यारण्य' हा दुःखाचा आदिबंधच आहे. 

काळाला समजून घेणे ही कोणत्याही कलावंतांची मानसिक गरज असते. किंबहुना ती असायलाच हवी. काळ माणसाला एक विशिष्ट प्रकारचा संवेदनस्वभाव देत असतो. चेहरा देत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळ हा सुखदुःखाचा एक तीव्र अनुभवही देत असतो. त्यामुळेच काळाच्या काठावर उभं राहून काळाचा अन्वयार्थ लावणं आवश्यक ठरतं.  पाण्यारण्य  ही भावनिक कोलाहलाची,  संभ्रमाची, समर्पणाची एक आशयसंपन्न कथा आहे. इथे वासनेचा विकार नाही. क्रौर्य नाही. हिंसा नाही. आक्रोश नाही. अमुक- तमुक 'इझम' नाही. तर दुःख आणि वेदनेला सर्वार्थाने समजून घेण्याचा, त्याला सामोरे जाण्याचा  हा एक  व्यापक आविष्कार आहे.  जो भाषेतून सजीव झाला आहे. 'बघ ना या हातांना/  अजूनही तुझ्या स्पर्शाचा ओलावा/  नाहीये' (पृ. 207) किंवा 'पाणी आणि तहान/  आसक्ती आणि वासना / याच्या कुठल्यातरी काठावर प्रेम आंधळं  होऊन उभं असत'.  (पृ. 90) 

जगण्याच्या  पार्श्वभूमीवरचं  हे एक सार्वकालिक तत्त्वचिंतन आहे.  कवी अशा अनेक अनुभवांना प्रतिमांना संपृक्त करतो. पण ही  कविता म्हणजे तत्त्वज्ञानाची सनातन डायरी नाही. किंवा जन्म- मृत्यूचे  प्रयोजन सांगणारी  प्रार्थनाही नाही. तर हा आहे न संपणाऱ्या तृष्णेचा निरंतर शोध.  कवीनेच  म्हटल्याप्रमाणं, 'आपल्याला सिद्धार्थासारखं सर्वसंगपरित्याग करून या तृष्णेचं मूळ शोधून काढता येणे शक्य नाही.' म्हणजे तृष्णेवर ताबा मिळवल्याशिवाय या चिरंतन दुःखातून आपली सुटका होणार नाहीये. तर अशा आजन्म तृष्णेचा प्रदेश म्हणजे पाण्यारण्य. या  पाण्यारण्यात माणसाच्या जन्म- मृत्यूचे, त्याच्या धर्माचे,  तत्त्वज्ञानाचे,  आवेगाचे,  महत्त्वाकांक्षेचे क्षेत्र सामावले आहे. इथे अतिव आत्मप्रेमही नाही किंवा अहंकारही नाही. आभास आणि सत्यातल्या संभ्रमाचा हा शोध आहे. वेदनेचे निरूपण आहे. सुमारे एकशे छत्तीस कवितांची ही दीर्घ मालिका वसंत आबाजी डहाके यांनी म्हटल्याप्रमाणे 'पाण्याचे उपनिषद आणि तृष्णेचे  सूक्त आहे. अलीकडच्या काळातली ही एक अत्यंत महत्त्वाची कविता आहे. 

▪️पाण्यारण्य (कवितासंग्रह) दिनकर मनवर  प्रकाशक : वर्णमुद्रा पब्लिशर्स  मूल्य : 380 पृष्ठे  : 240

p_vitthal@rediffmail.com
लेखकाचा संपर्क -  9850241332