आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"सीएचबी'च्या कथा अन व्यथा...:मी एमए, बीएड, सेट, नेट, एमफिल, पीएचडी... पण

प्रज्ञा सुधाकर भोसलेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

"सीएचबी' (clock hours basis) म्हणजे घड्याळी तासिका तत्त्वावर नेमलेले कंत्राटी प्राध्यापक. राज्यात सुमारे दहा हजारच्या आसपास असलेले कंत्राटी प्राध्यापकांसाठी सीएचबी म्हणजे शैक्षणिक आदर्शाला दिलेली सगळ्यात मोठी शिवी आहे. "शिक्षणसम्राट' नावाचा जो शोषकवर्ग जन्माला आला त्याने शासनाच्या संगनमताने सुरू केलेली ही कैक वर्षांपासूनची पिळवणूक... या कंत्राटी प्राध्यापकांमध्ये साहित्य अकादमी आणि राज्य पुरस्कारप्राप्त नामवंत साहित्यिकांपासून ते अगदी आदिवासी समाजातील उच्चशिक्षितांचा समावेश... या शोषणाविरुद्ध आता राज्यातील सगळे कंत्राटी प्राध्यापक आंदोलनाच्या भूमिकेत शिरले आहेत. "दिव्य मराठी रसिक'ने "सीएचबी'च्या कथा आणि व्यथा मांडण्यासाठी राज्यभरातून या विषयावरचे अनुभव गोळा केले. यातील काही निवडक आणि विदारक अनुभव "रसिक'च्या वाचकांसाठी...

एम. ए, बी. एड, सेट, नेट, एम. फिल, पीएच. डी. एवढ्या लांबलचक डिग्ऱ्यांच्या चळतीसह नाव घेताना मला अभिमान वाटायला पाहिजे, परंतु तो यत्किंचितही वाटत नाही. उलट या शिक्षण व्यवस्थेने माझ्या मनात शरमेची भावना निर्माण केली आहे. "तुमचं काय तुम्ही तर प्राध्यापक आहात बुवा' असे कुणी म्हणाले तर शिवी दिल्यासारखी वाटतं. माझ्या नावाअगोदर लावलेला प्रा. हा टॅग तर निव्वळ आशावादी फुगा आहे, तो कधीही फाटकन फुटू शकतो. तो दूरवरच्या हवेत तरंगतो आहे तोवर बरं वाटतं, परंतु माझ्या हाती लागेल की नाही याबाबत कसलीही निश्चिती नाही.

एम. ए झालं आणि मी सेट, नेट पास झाले. त्यादरम्यान वातावरण उत्साहाचं होतं. सगळे मुलाखतीला जायचे आणि सीएचबीच्या पोस्टवर एखाद्या माॅलमध्ये ७०% सूट असणारा सेलच लागला आहे अशा पद्धतीने तुटून पडायचे. मी ही त्यांच्यातलीच एक असल्याने तिथे हजर असायचे. तिथलाच एक किस्सा... एका नामांकित संस्थेत उत्साहाने मुलाखतीला गेले. माझ्यासोबत तिथे मुलाखतीला मलाच शिकवणारे एक प्राध्यापक आले होते. त्यांना पाहून मात्र मी अस्वस्थ झाले. माझ्याकडे बघताना त्यांच्या डोळ्यांतील आणि हसण्यातील लाचारी पाहून, उद्याची मी अशीच असेल का? हा प्रश्न आतून पोखरत राहिला. मुलाखती झाल्या, सिलेक्शनही झालं. पण त्यानंतर प्राचार्य बाईंनी केबीनमध्ये घेऊन शांत स्वरात समजावून सांगितलं. "तू राहायला पुण्यात आहेस, काॅलेजला यायला जास्त खर्च होणार नाही, शिवाय तुला स्टायपेंडही मिळतोय, आई-वडिलांसोबत राहत असल्याने बाहेर राहण्याखाण्याचा खर्चही नाही. तर तू हे पद स्वीकार. तुला "नॅक'चा अनुभव घेता येईल, खूप काही शिकता येईल, जे तुला भविष्यात कामी पडेल." याचा अर्थ "बाई तू आमच्याकडे फुकटात राब,' असंच म्हणायचं होतं त्यांना. प्राचार्यांना फुकटात काम कर असं सांगणं जरा "लो स्टँडर्ड' वाटत असल्याने त्यांनी भली मोठी गिरकी घेऊन फुकटची प्राध्यापकी अॉफर केली होती.

वारंवार मला एक अनुभव आला आहे की,सीएचबीधारकांना त्यांचे कटू अनुभव सांगायचे नसतात, ते सगळं काही साखरेत घोळून सांगतात. नव्याने सेट, नेट पास होणाऱ्याला किंवा होऊ इच्छिणाऱ्याला प्राध्यापक होणं फारच रोमँटिक वाटू लागतं. कालांतराने ही जुनी खोडं थापा मारून आपण कसे खुश आहोत हे मिरवायला लागतात. वेळेवर पगार मिळतो, विद्यार्थी छान आहेत, मान-सन्मानाचं स्थान आहे, अशा पद्धतीने ते वावरत असल्यामुळे नव्या माणसाचीही सीएचबीवर टिकून राहण्याची मनशा मजबूत होते. एकदा का जाॅईन झाला की तोही हेच कित्ते गिरवायला लागतो आणि पुढच्या अनेक पिढ्यांची स्वप्ने ढासळवून टाकायला जबाबदार बनतो.

मुलाखतीला गेल्यावर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो. मुलाखतीला आलेले बरेच सह सीएचबी पदप्राप्ती इच्छुक म्हणतात, "तुम्हा स्त्रियांना कशाला हव्या आहेत नोकऱ्या? तुम्ही एखादा चांगला नवरा शोधला की तुमचं काम झालं... खायला, प्यायला, ल्यायला भेटलं की सुखी जीवन.' अशा प्रकारची एक मानसिकता तयार होत चालली आहे. अशीच मानसिकता पॅनेलचीही होऊ शकते. कारण आपल्याकडे पुरुषीसत्ताक पद्धतीचा वरचश्मा कायमच राहिला आहे. सह मुलाखत देणाऱ्यांच्या तोंडी तुम्ही बाई आहात तुम्हाला काय टेंशन नाही, हे ऐकायला मिळणं अपमानास्पद तर आहेच पण घृणास्पदही आहे. प्रश्न हा पडतो की स्त्रियांच्या बाबतीत हा निकष लोक लावूच कसे शकतात?

जीव तोडून, सकाळी उठून, टाचणं काढून विद्यार्थ्यांसमोर उभं राहायचं आणि आपण जेवढं काही अर्जित केलेलं आहे ते त्यांना बेंबीच्या देठापासून शिकवायचं. हे नित्यनेमाने चालूच आहे. बऱ्याचच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतात. करिअरविषयी ते जेव्हा चौकशी करतात, तेव्हा त्यांना सेट, नेट व्हा असं मी उत्साहाने सांगते. सेट, नेट होऊनही तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत आणि तुम्हीही माझ्याच पंक्तीला उद्या येऊन बसणार आहात, हे सांगण्याचे धारिष्ट्य मात्र माझ्यात येत नाही. उद्या जर का यांनी अॅडमिशन घेणं बंद केलं तर माझ्या नोकरीचं काय? हा प्रश्नही उपस्थित होतो. म्हणून इतरांप्रमाणे मी देखील विद्यार्थ्यांना रंजक स्वप्ने दाखवते.

सीएचबी म्हणजे प्राध्यापक कम कारकून कम चपराशी कम सर्टिफाईड गुलाम अशी नवी व्याख्या करायला हरकत नाही. मग एवढे सगळे प्राॅब्लेम असतानाही मी सीएचबी करते कारण, मला शिकवायला आवडतं. त्यात जो आनंद मिळतो तो मुद्रितशोधन किंवा इतर तत्सम कामांतून मिळत नाही. शिकवण्याची उर्मी मला या पातळीवर आणून सोडते. पण हे कुठेतरी थांबायला हवे. भरती प्रक्रियेतील संस्थाचालकांची एकाधिकारशाही मोडीत निघायला हवी. भरती प्रक्रियेत गुणवत्ता आणि पारदर्शकता आणायची असेल तर केंद्रीय पद्धतीने निवड हाच एकमेव पर्याय आहे. केंद्रीय पद्धतीने निवड पद्धतीचे प्रारूप अंमलात आले तर सीएचबीचा नीतीधैर्य खच्ची करणारा डाग कायमचा नष्ट होईल आणि ज्याच्याकडे गुणवत्ता तोच प्राध्यापक असा नवा आदर्श समाजात रूढ होईल.

pradnyabhosale236@gmail.com मो. ९७६५४४४२५८

______________________________________________________________________

जातीच्या अस्मिता फक्त मोर्चा आंदोलनापुरत्याच...(डॉ. दैवत सावंत)

मी बुलढाणा जिल्ह्यातल्या डावरगावचा... जातीने मराठा पण, वडील लोकांच्या शेतात मजुरी करायचे. त्यामुळे आम्हा तिघा भावांना शिकता आले नाही. आजही दोन्ही भाऊ मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.माझी शिकण्याची इच्छा असल्याने नातेवाईकांकडे राहून शिकलो. कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले तर कधी रविवारी सुट्टीच्या दिवशी बांधकाम मिस्तरीच्या हाताखाली बिगारी काम केले. आज मी सेट,पीएच.डी,पोस्ट डॉक्टरेटपर्यंत शिक्षण घेतले. एवढे शिकूनही नोकरीसाठी संस्थाचालकांच्या दारोदार भटकावे लागत आहे. बहुतांशी शिक्षणसंस्था मराठ्यांच्या ताब्यात आहेत. पण जातीचा म्हणून ही मंडळी उभाही करत नाहीत. जातीच्या अस्मिता फक्त मोर्चा आंदोलनातच सुरक्षित असतात.

२०१६ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील तीन कॉलेजमध्ये मुलाखतीला गेलो. तिथे ३८ ते ४० लाखांपर्यंत डोनेशनची मागणी केली. हे ऐकून आपण कधीच नोकरीला लागू शकत नाही ही भावना तयार झाली. कारण लाखो रुपये भरून नोकरीला लागण्याची माझी परिस्थितीच नाही. सर्वोच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही. संस्थाचालकांना पोस्ट डॉक्टरल काय आहे हेच मुळात माहिती नाही. त्यांना सांगितले तर ते म्हणतात, आम्हाला फक्त बी प्लस झालेला माणूस नोकरीला घ्यायचा आहे. गेल्या एका वर्षांपासून मराठवाड्याच्या राजधानीत नामांकित असलेल्या संस्थेमध्ये सीएचबी करतोय, तिथेही अत्यंत वाईट अनुभव आले. म्हणजे सीएचबीच्या जागेसाठीहीअगदी आमदारापासून ते मंत्र्यांपर्यंत वशिला लागतो. तेव्हा पूर्णवेळ प्राध्यापकाची जागा असल्यास कशा प्रकारे आटापिटा करावा लागेल याची कल्पनाच न केलेली बरी. तेव्हा सीएचबीसुद्धा करू नये अस वाटू लागतं. कारण रोजंदारीने गेल्यानंतर त्याला दोन दिवसात का होईना मालक पैसे देतो. मात्र सीएचबीचे मानधन वर्षाच्या शेवटी दिले जाते. सीएचबी करण्यापेक्षा गावात जाऊन रोजंदारी केलेली परवडली. सीएचबी प्राध्यापक म्हणजे वेठबिगार झालाय. हे शिक्षणविषयक धोरण बदलणे गरजेचे आहे. जात धर्म आरक्षण या सगळ्या बंडल गोष्टी आहेत.

संपर्क - 9822579631

______________________________________________________________________


अशी कुठे डिग्री असते का राव...? (डॉ. मनोज मुनेश्वर)

मी नांदेड जिल्ह्यातल्या किनवटचा. हा भाग डोंगराच्या कुशीत व अरण्याच्या थंडगार वनराईने नटलेला. पण नक्षलवाद व दुर्लक्षाचा शाप कायम कपाळावर मारलेला. अवघ्या पन्नाससाठ घरांचं माझं गाव "भुलजा'. शिक्षणात मी कच्चा नसलो, तरी आत्मविश्वासाच्या अभावाने कायम बॅकबेंचर होतो. बारावीला कमी मार्क्स पडले. "डीएडला नंबर लागला नाही, की शैक्षणिक कारकीर्द संपली' असं काहीसं तत्त्वज्ञान खेड्यामध्ये रुजलेंलं असतं. घरच्यांना समजावून लाडीगोडी लावून कसाबसा बीएला प्रवेश घेतला, पण प्रथम वर्षाला फक्त ४४ टक्के गुण मिळाले आणि ऍग्रिकेट ५३.

"आता कामधंद्याला लागावं' हा वडीलधाऱ्यांचा सल्लाच योग्य वाटला आणि मी घर सोडलं. पुणे गाठलं, बीए पूर्ण केलेलं असलं तरी तिथं त्याची किंमत शून्य होती कारण विद्यापीठाच्या डिग्रींना आता कुठे किंमत राहिली आहे? एका कंपनीत हेल्पर म्हणून लागलो. मीही तिथलं एक यंत्रच झालो. अशा ठिकाणी भावना मारून जगावं लागतं. जगण्याला कुठलीही सुरक्षा नव्हती. या भयंकराच्या दरवाज्यातून आपल्याला बाहेर पडावे लागेल असे सातत्याने वाटत होते आणि बाहेर पडलो पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी औरंगाबादचं विद्यापीठ गाठलं

शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं. पण आज शिक्षणात भेसळ सुरू आहे. त्यामुळे हे दूध पिऊन वाघ तयार होत नाहीत तर मांजरं तयार होत असताना डोळ्याने पहात होतो. पण तरीही "शिक्षणाशिवाय पर्याय नाहीच' म्हणून मन लावून अभ्यास केला, उपाशी राहून दिवस काढले. अनेक निराशाजनक घटना घडल्या, पण जीवन हे एक चॅलेंज म्हणून मी स्वीकारलं, जिद्द सोडली नाही. इरेला पेटून एम.ए मराठीला प्रवेश घेतला. मराठी या विषयात विद्यापीठात सर्वप्रथम येत सुवर्णपदक पटकावलं. पुढे पहिल्याच प्रयत्नात "नेट' परीक्षाही पास झालो. पीएच.डीसाठी राजीव गांधी नॅशनल फेलोशिप मिळाली आणि या सर्व अकॅडमीक यशामुळे मला "युजीसी'ची पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिप मिळाली आणि मी पोस्ट डॉक्टरलचे संशोधन कार्यही पूर्ण केले.

त्यादरम्यान अनेक महाविद्यालयांमध्ये मुलाखती देऊन आलो, पण पन्नास लाखांची मागणी केली जायची. तेवढे पैसे तर मी कधीच जमवू शकत नव्हतो. शेवटी ग्रांटेड नाही तर निदान कुठे सीएचबी तरी करावी म्हणून मी औरंगाबादच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात मुलाखतीला गेलो. मुलाखतातीत मला प्रश्न विचारला, सध्या काय करता? मी सांगितलं,"पोस्ट डॉक्टरल रिसर्च' केलयं... पोस्ट डॉक्टरल रिसर्च म्हणजे डबल पीएचडी का? पोस्ट डॉक्टरल म्हणजे डी लिट का? की एम फील? असे उपप्रश्न विचारण्यात आले. मी माझ्या पद्धतीने त्यांना पोस्ट डॉक्टरल म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु अशी कुठलीही अकॅडमीक डिग्री नसते यावर त्या सर्वांचं एकमत झाले आणि मी सीएचबीसाठीदेखील अपात्र ठरलो. मी खूप निराश झालो. एवढं शिकून आपण सीएचबीसाठीही पात्र ठरत नाही. एवढा संघर्ष, एवढं शिक्षण... सगळं वाया गेलं, असे एकवेळ वाटले खरे पण मी हे असेच वाया जाऊ देणार नाही. "अशक्य काहीच नाही' हा आत्मविश्वास आता माझ्याकडे आहे आणि तो मला याच शिक्षणाने दिला आहे.

manojbamu@gmail.com

संपर्क – 8552900220

बातम्या आणखी आहेत...