आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पंतप्रधान माेदींचे राष्ट्राला आवाहन : लाॅकडाऊन पाळा, अन्यथा 21 वर्षे मागे जाऊ

aurangabad6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साेशल डिस्टन्सिंग पंतप्रधानापासून ते गावातल्या नागरिकापर्यंत

भारत आज त्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे, जेथे कृतीच निश्चित करेल की, काेराेनाचा प्रभाव आम्ही किती कमी करू शकताे. आपला निर्धार अधिक मजबूत करण्याची ही वेळ आहे, संयम बाळगण्याचा हा काळ आहे. लक्षात ठेवा, ‘जान है, ताे जहान है’

प्रिय देशवासीयांनाे,
मी आज पुन्हा एकदा ‘काेराेना’ या वैश्विक महामारीच्या मुद्द्यावर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलाे आहे. २२ मार्च राेजी जनता कर्फ्यूचा जाे संकल्प केला हाेता, ताे पूर्णत्वास जाण्यासाठी एक राष्ट्र या नात्याने प्रत्येक भारतीयाने पूर्ण संवेदनशीलतेसह, अगदी जबाबदारीने आपले याेगदान दिले. आबालवृद्ध, गरीब-मध्यम आणि सर्व समाजघटकातील लाेक प्रत्येकाने या कसाेटीच्या क्षणी साथ दिली. जनता कर्फ्यूला प्रत्येक भारतीयाने यशस्वी ठरवले. देशावर जेव्हा संकट आेढवते, मानवतेवर जेव्हा संकट आेढवते तेव्हा आम्ही सारे भारतीय कशा पद्धतीने त्याचा मुकाबला करताे हे एक दिवसाच्या जनता कर्फ्यूच्या निमित्ताने दाखवून दिले आहे.
‘काेराेना’च्या निमित्ताने साऱ्या जगभर जी स्थिती निर्माण झाली आहे ती आपण पाहत आहात, वाचत आहात. आपणदेखील पाहत आहात की, जगातील संपन्न, समर्थ देश या महामारीने कसे असहाय बनले आणि हबकून गेले आहेत. या देशांनी काहीच प्रयत्न केले नाहीत किंवा त्यांच्याकडे साधनसामग्री नाही असे मुळीच नाही, परंतु काेराेना इतक्या वेगाने प्रसार पावला की सारी तयारी आणि सारे प्रयत्न सुरू असतानाही या देशांसमाेरील आव्हान वाढतच राहिले. या साऱ्या देशांच्या दाेन महिन्यांच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष हाती आला आणि तज्ञही हेच सांगत आहेत की, साेशल डिस्टन्सिंग हाच या जागतिक महामारीवरील एकमेव परिणामकारक पर्याय आहे. साेशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून विलगीकरण. आपल्याच घरात स्थानबद्ध असणे. काेराेनापासून बचाव करण्यासाठी याशिवाय अन्य मार्ग नाही. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखायचा असेल तर त्याच्या संसर्गाची साखळी ताेडली पाहिजे. काही लाेक या गैरसमजात आहेत की, साेशल डिस्टन्सिंग हे केवळ रुग्णांसाठी आवश्यक आहे. हा विचार अत्यंत चुकीचा आहे. 

प्रत्येक नागरिकासाठी, कुटुंबासाठी ते गरजेचे आहे. कुटुंबातील प्रत्येकासाठी आवश्यक आहे. स्वत: पंतप्रधानांसाठीदेखील. काही लाेकांची बेफिकिरी, चुकीचा समज आपणास, आपल्या कुटुंबीयांना, मुले, आई-वडिलांना, मित्र आणि पर्यायाने साऱ्या देशाला माेठ्या अडचणीत लाेटू शकतो. जर हा निष्काळजीपणा सुरूच राहिला तर भारताला याची माेठी किंमत माेजावी लागू शकते आणि त्याची किंमत किती माेठी असू शकेल याचा अंदाज बांधणेदेखील मुश्कील आहे. गेल्या दाेन दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. राज्य सरकारांचे हे प्रयत्न अतिशय गांभीर्याने घेतले गेले पाहिजेत. आराेग्यतज्ञ आणि अन्य देशांचा अनुभव लक्षात घेता देश आज एक महत्त्वाचा निर्णय घेत आहे. आज (दि. २४ मार्च) मध्यरात्री १२ वाजेपासून सारा देश लाॅकडाऊन हाेत आहे. भारताला या महामारीच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी, देशातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आपणावर आणि आपल्या परिवारावर रात्री १२ वाजेपासून घराबाहेर पडण्यास पूर्ण मज्जाव करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्हा, गाव, गल्ली, वस्ती लाॅकडाऊन केली जात आहे. काेराेनाविरुद्धच्या निर्णायक संघर्षासाठी हे पाऊल खूप आवश्यक आहे. या लाॅकडाऊनची आर्थिक किंमत नक्कीच या देशाला माेजावी लागणार आहे, परंतु एकेका भारतीयाचे प्राण वाचवणे, आपला आणि कुटुंबीयांचा बचाव करणे ही माझ्या भारत सरकारची, देशातील प्रत्येक राज्य सरकारची, स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्वात माेठी प्राथमिकता आहे. म्हणूनच माझी सर्वांना हात जाेडून विनंती आहे की, आपण या क्षणी देशात जेथे काेठे असाल तेथेच थांबा. सध्याची स्थिती विचारात घेता देशात २१ दिवस अर्थात तीन आठवडे लाॅकडाऊन राहील.

मी आपणास काही मागण्यासाठी आलाे आहे. आगामी २१ दिवस प्रत्येक नागरिकासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. आराेग्यतज्ञांच्या मते, काेराेनाच्या संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी २१ दिवसांचा काळ अतिशय महत्त्वाचा, निर्णायक आहे. जर हे २१ दिवस हुकवले तर देश आणि आपले कुटुंब २१ वर्षे मागे लाेटले जाईल. तसेच आपण जर स्वत:ला सावरू शकलाे नाही तर अनेक कुटुंबे कायमची उद््ध्वस्त हाेतील. ही बाब मी पंतप्रधान या नात्याने नव्हे, तर तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य या नात्याने सांगत आहे. त्यामुळे बाहेर पडणे काय असू शकते हे २१ दिवस विसरा आणि एकच काम करा... घरीच राहा.आजच्या निर्णयाने देशव्यापी लाॅकडाऊनने आपल्या घराच्या दरवाजावर एक लक्ष्मण रेषा आेढली आहे. आपणास हे लक्षात ठेवायचे आहे की, घराबाहेर पडणारे आपले एक पाऊल काेराेनासारख्या गंभीर महामारीला आमंत्रण देऊ शकते. काही वेळा काेराेना संसर्गित व्यक्ती प्रारंभी स्वस्थ वाटू लागते. त्यास संसर्ग झाल्याचे लक्षात येत नाही. म्हणूनच खबरदारी बाळगा, घरातच राहा. जे लाेक घरी मुक्कामी आहेत ते साेशल मीडियावर नव्या पद्धतीने ही बाब समजावून सांगत आहेत. त्यापैकी एक कल्पना मला आवडली. ती म्हणजे काे- काेई, राे-राेडपर, ना- ना निकले.

आज जर एखाद्या व्यक्तीमध्ये काेराेनाच्या विषाणूने प्रवेश केला तर त्याची लक्षणे दिसण्यास अनेक दिवस लागतात, असे तज्ञांचे मत आहे. यादरम्यान संबंधित व्यक्ती ही संपर्कात येणाऱ्या प्रत्येकास संसर्गित करीत राहते. जागतिक आराेग्य संघटनेच्या अहवालानुसार या महामारीचा संसर्ग झालेली एक व्यक्ती केवळ आठवडा किंवा १० दिवसांत शेकडाे लाेकांच्या संपर्कात येते. म्हणजेच ही आग विलक्षण गतीने पसरते. जागतिक आराेग्य संघटनेचा एक आकडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. काेराेना संसर्गित लाेकांची संख्या १ लाखावर पाेहाेचण्यास पूर्वी ६७ दिवस लागले हाेते. मात्र केवळ ११ दिवसांत १ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. आता ही बाब यापेक्षाही धक्कादायक आहे की, दाेन लाख बाधितांवरून ३ लाखांवर ही संख्या पाेहाेचली ती अवघ्या चार दिवसांत. यावरून आपण अंदाज बांधू शकता की काेराेना किती वेगाने प्रसार पावताे. जेव्हा त्याची लागण सुरू हाेते त्या वेळी त्यास प्रतिबंध घालणे मुश्कील हाेऊन बसते. म्हणूनच चीन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इराणसारख्या अनेक देशांमध्ये जेव्हा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत गेला तेव्हा स्थिती नियंत्रणाबाहेर गेली हाेती. इटली असाे की अमेरिका... या देशातील आराेग्य सेवा-सुविधा, रुग्णालये, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि सुसज्ज आहेत तरीही ते काेराेनाचा प्रभाव कमी करू शकले नाहीत. प्रश्न असा आहे की, आशेचा किरण काेठे आहे? उपाय किंवा पर्याय काय आहे? या साऱ्या देशांकडून मिळालेला अनुभव हाच आशेचा किरण आहे, ज्यामुळे काेराेनाला काही मर्यादेपर्यंत राेखता येऊ शकते. काही आठवडे तेथील नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी सरकारी आदेशांचे १०० टक्के पालन केले. त्यामुळेच काही देश या महामारीच्या विळख्यातून बाहेर येत आहेत. त्यांचाच मार्ग अनुसरणे हाच आपल्यासमाेर एकमेव पर्याय आहे.

काहीही हाेवाे, घराबाहेर पडायचे नाही. साेशल डिस्टन्सिंग. पंतप्रधानापासून ते गावातल्या सामान्य नागरिकापर्यंत सर्वांसाठी असेल. घराची लक्ष्मण रेषा आेलांडली नाही तरच आपण काेराेनापासून बचाव करू शकताे. आपणा सर्वांना या महामारीचा संसर्ग राेखायचा आहे. त्याच्या प्रसाराची साखळी ताेडायची आहे. हा संयम आणि पराकाेटीच्या स्वयंशिस्तीचा काळ आहे. जाेपर्यंत देशात लाॅकडाऊन आहे, आम्हाला आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आपापल्या घरी राहून त्यांचा विचार करा, त्यांच्यासाठी मंगल कामना करा, जे कर्तव्य पार पाडण्यासाठी स्वत: जाेखीम पत्करत आहेत. एकेक जीव वाचवण्यासाठी जे डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचारी दिवस-रात्र रुग्णालयात तळ ठाेकून आहेत. जे लाेक सॅनिटाइझ करण्यात व्यग्र आहेत. तुमच्यापर्यंत खरी आणि याेग्य माहिती देण्यासाठी २४ तास काम करीत असलेले पत्रकार-बातमीदारांचा विचार करा, जे संसर्ग हाेण्याचा धाेका पत्करत आहेत. आपल्या आसपासच्या पाेलिसांचा विचार करा, जे आपल्या कुटुंबाचा विचार न करता तुमच्या रक्षणासाठी दिवस-रात्र ड्यूटीवर आहेत, काही उर्मट लाेकांचा त्रास सहन करीत आहेत. सामान्य जनजीवन काेलमडून पडू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी सर्व उपाय याेजण्यात आले आहेत, यापुढेही केले जातील. 

महामारीमुळे गरिबांसमाेर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. गरिबांचे प्रश्न अधिक वाढणार नाहीत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. त्यास सर्वाेच्च प्राधान्य दिले गेले आहे. आयुष्य जगण्यासाठी जरुरी आहे, त्यासाठी साऱ्या प्रयत्नांसाेबतच जीवन वाचवण्यासाठी जे आवश्यक आहे त्यास प्राधान्य द्यावेच लागेल. त्यासाठी आराेग्य सुविधा उभारण्यात येत आहेत. काेराेनावरील उपायांसाठी केंद्राने आज १५ हजार काेटींची तरतूद केली आहे. यामध्ये तपासणी सुविधा, आयसाेलेशन, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर आणि अन्य आवश्यक साधने खरेदी केली जातील. सर्व राज्य सरकारांनी आराेग्यसेवेला सर्वाेच्च प्राधान्य द्यावे असे सुचवले गेले आहे. या संकटकाळात खासगी क्षेत्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, याचा मला आनंद वाटताे. अशा कठीण प्रसंगात काही अफवा पसरवल्या जातात. विलक्षण गतीने त्या सर्वदूर पाेहाेचतात. काेणत्याही अफवा आणि अंधश्रद्धेला बळी पडू नका. केंद्र, राज्य सरकार आणि वैद्यकीय निर्देशांचे, सल्ल्यांचे पालन करावे, या आजाराची लक्षणे दिसताच डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय काेणतेही आैषध घेऊ नका, अशी विनंती मी करीत आहे. काेणत्याही प्रकारचा असा उपाय आपला जीव धाेक्यात घालू शकताे. देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्या निर्देशांचे पालन करतील अशी मला आशा आहे. २१ दिवसांचे लाॅकडाऊन हा काळ खूप माेठा आहे; परंतु आपल्या जीवितासाठी, आपल्या कुटुंबीयांच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक भारतीय ना केवळ यशस्वी मुकाबला करेल, या संघर्षात सुखरूप असेल आणि विजयी ठरेल.

0