आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:लव्ह जिहाद आणि प्रेमाच्या मेमरी सेल्स...

प्रदीप आवटे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिहाद हा अरेबिक शब्द आहे तर लव्ह हा इंग्रजी. दोन वेगवेगळ्या भाषांनी हात हातात घेतले म्हणून हा शब्द जन्माला आला आहे आणि आपल्याला तर प्रेमात भिजलेली कोणतीच भाषा कळत नाही. आपल्याला बंदूका कळतात, बॉम्ब समजतात.आपल्याला कोवळी हिरवळ करपत जाणारी प्राईम टाईंमवाली चॅनली भाषा कळते, हे कोणते रिपब्लिक आपण स्थापन करु पाहतो आहोत, जिथं प्रेम करतानाही ॲफिडिव्हीट करावे लागेल. जिथं माणसांच्या रक्तपेशीवर जात-धर्माची मोहर लागलेली असेल आणि प्रेम करणेच गुन्हा असेल.

…त्याने पुन्हा रुप बदललं आहे. लंडनच्या गल्लीबोळात पसरणारा विषाणू हा म्युटेट झालेला नवा विषाणू आहे. लंडन पुन्हा लॉक डाऊन झालं आहे. गजबजलेला ऑक्सफर्ड स्ट्रीट ओस पडला आहे… तो माणसांची वाट पाहतोय. या रस्त्यावर माणसं होती कधी काळी.. हाडामांसाची माणसं…रडणारी, हसणारी, भांडणारी, कधी बोचकरणारी, कधी एकमेकांना उत्कटतेने बिलगणारी, कधी येतील पुन्हा…रस्ता विराणी गात राहतो.

म्युटेट झालेला हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पसरतो आहे. अशावेळी घराबाहेर पडणं फारसं हितावह नसतं. कुठे आणि कसा हा विषाणू गाठेल याची काय खात्री द्यावी? पण बेरखेडयासारख्या छोटया गावात वाढणाऱ्या अठरा वर्षाच्या सोनूला आणि त्याच्या मैत्रीणीला हे काहीच माहित नव्हतं. चौथीपासून एका वर्गात वाढणारी ही टीन एजर पोरं. एकमेकांना बोलावं, भेटावं वाटतं आहे पण मनातलं बोलायला, या हृदयीचे त्या हृदयी ओतायला जागा कुठंय? अवकाश किती आक्रसत चाललाय. मग रात्री घरापासून दोन-चार किलोमीटरवर असणाऱ्या गावात शेताच्या कडेने दोघे फिरत राहतात. सोनूने दोघांसाठी पिझ्झा आणलाय पॅक करुन. पश्चिमेच्या गावातून पॅक करुन आणलेला पिझ्झा ठिकाय पण म्हणून तिकडचे सगळेच इकडे कसे चालेल? पोरांची समज ती किती? शेताजवळच्या मंदिरात बसून दोघे पिझ्झा खात असताना कुणीतरी गावकरी त्यांना पाहतो. आणि क्षणार्धात त्यांचा ‘ चांद के पार ’ जाणारा रस्ता पोलिस स्टेशनमध्ये येऊन पोहचतो. सोनू गजाआड जातो. सोनू मुस्लिम आहे. पोलिस त्या दलित मुलीच्या बापाला एफ.आय. आर. नोंदवायला सांगतात, त्यांना हवा तसा. तो गरीब माणूस हादरुन जातो. पोलिस सांगतील त्या कागदावर अंगठा उठवतो. चौथीपासून एकत्र असणाऱ्या आणि घरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या सोनूचा धर्म आपल्याला माहित नव्हता, ती पोर लिहून देते. सोनूवर उत्तर प्रदेश धर्मांतर प्रतिबंध अध्यादेश २०२० नुसार गुन्हा दाखल होतो, मुलगी दलित असल्याने ॲट्रोसिटीचे कलमही लावले जाते. हाथरसमधील रेप झालेली पोरगी शहराबाहेर रचलेल्या चितेवर एकाकी जळत जाते. पण मग आम्ही शहरांची नावे बदलत जातो. आपल्याला कळतच नाही की,

‘ शहराचे नाव बदलून बदलत नाही शहर,

की मंदिर-मस्जिद बांधल्याने बदलत नाही शहराचे चारित्र्य

धर्माचा ठेका घेतलेले बुभूक्षित लांडगे,

झोडत राहतात प्रवचने,

म्हणून शहराला मिळत नाही,

आईला लुचणाऱ्या लहानग्याच्या ओठावर रेंगाळणारा

वत्सल मोक्ष!’

पण सोनूची केस ही एकमेव केस नाही. विषाणू पसरत जातो तेव्हा तो पकडत जातो दिसेल त्या प्रत्येकाचा गळा. नोव्हेंबरमध्ये हा लव्ह जिहाद विरोधी अध्यादेश प्रत्यक्षात येतो आणि एका महिन्यात १४ केसेस दाखल होतात, ५१ जणांना अटक होते, ४९ जण गजाआड डांबले जातात. बरेली मधील एक प्रेमी जोडपे लग्न करण्यासाठी राजस्थानला पळून जाते पण पोलिस त्यांना पकडून आणतात आणि तुरुंगात डांबतात. गुन्हा एकच दोघांचे धर्म वेगळे.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता सिमरन आणि शमीम एकमेकांजवळ येतात. पण मग आयुष्य़च स्पर्धा परीक्षा होऊन जाते. सिमरनला घरच्यांकडूनच मारहाण होते, शमीमला धमक्या येऊ लागतात. शहाजहांपूरच्या या सिमरन आणि शमीमला दिल्लीला पळून जावे लागते. दिल्ली हायकोर्टाकडून संरक्षण मिळवावे लागते. लग्न हा एक व्यक्तीगत निर्णय. त्यात शासनाने पडावे कशासाठी? दोन प्रौढ व्यक्तींनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असेल की अयोग्य, तो त्यांचा निर्णय आहे. समाज म्हणून आपण त्याचा आदर केला पाहिजे. घटनेने हा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. राइट टू प्रायव्हसी, राईट टू पर्सनल लिबर्टी आपण बडबडत राहतो. मुजफ्फरनगरच्या नदीमच्या केसमध्ये अलाहाबाद हायकोर्ट स्पष्ट सांगते, हा दोन प्रौढ व्यक्तींचा व्यक्तीगत मामला आहे, या दोघांनाही आपले हित, अहित कळते. त्यांच्या नातेसंबंधांमध्ये हे न्यायालय दखलअंदाजी करु शकत नाही. सुप्रीम कोर्ट ही वेगवेगळ्या केसेस मध्ये हे स्पष्ट करते. पण तरीही आपल्या डोक्यातून लव्ह जिहाद नावाचा विषाणू निघता निघत नाही.

शंभर वर्षांपासून अधिक काळापासून हा विषाणू आपल्या मेंदूत शिरला आहे. हिंदू समाजातील भोळया भाबड्या मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करुन मुस्लिम धर्मात आणण्यासाठी आणि मुस्लिमांची लोकसंख्या वाढविण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे, यासाठी परदेशातून पैसा येतो, या मुस्लिम मुलांना हिंदू मुली पटवण्यासाठी गाड्या, कपडे पुरविले जातात. दरवर्षी एवढया एवढ्या हिंदू मुली धर्मांतरित झाल्या, अशा एक ना अनेक बाबी कोणत्याही पुराव्याशिवाय माध्यमे पसरवत जातात. नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीला लव्ह जिहादमध्ये तथ्य आढळत नाही, गृहमंत्री तसे उत्तर लोकसभेत देतात पण माध्यमांनी एकदा रेडिओ रवांडाच्या आवाजात बोलायचे ठरवले की परस्पर अविश्वासाचा विषाणू आणखी वेगाने पसरु लागतो. कोणत्याही विमानतळावर तपासणी करुन तो रोखता येत नाही. कोणताही मास्क घालून तो थांबत नाही, कोणत्याही सॅनिटायझरने तो धुतला जात नाही. कारण तो संकुचित विचारांच्या खतपाण्यावर, भेदभावाच्या मातीत आपल्या अंधाऱ्या मनातच जन्माला येतो. आपण आपल्या खिडक्या उघडल्या आणि सारे रोशनखयाल झालोत तरच नवी सूर्यफुले आपल्या अंगणात लगडू शकतात. पण त्यासाठी उगवतीकडे डोळे भरुन पहावे लागते , अंधाऱ्या खोलीत जडलेली कोळीष्टके मनापासून साफ करावी लागतात.

लव्ह जिहाद! आपल्याला ना लव्ह कळते ना जिहाद. ‘बेशक मंदिर, मस्जिद तोडो, बुल्लेशा ये कहता है, पर प्यार भरा दिल कभी ना तोडो,’ अशी गाणी ऐकत आपण वयात येतो पण आपण फक्त रोज नव्या भिंती बांधायला शिकतो. आपण शहराच्या मधोमध रोज नवे मंदिर, रोज नवी मशीद उभा करतो पण प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या प्रत्येक मनात परमेश्वर नांदत असतो, अल्ला उभा असतो, हात उंचावून येशू प्रवचन देत असतो आणि तथागत मुग्ध हसत असतो, हे आपल्या कधीच लक्षात येत नाही. आपल्यातील अवगुण दूर करत आपण अधिकाधिक चांगले होत जाण्याचा निरंतर प्रयत्न म्हणजे जिहाद हे ही आपल्याला उमगत नाही. कारण जिहाद हा अरेबिक शब्द आहे तर लव्ह हा इंग्रजी. दोन वेगवेगळ्या भाषांनी हात हातात घेतले म्हणून हा शब्द जन्माला आला आहे आणि आपल्याला तर प्रेमात भिजलेली कोणतीच भाषा कळत नाही. आपल्याला बंदूका कळतात, बॉम्ब समजतात.आपल्याला कोवळी हिरवळ करपत जाणारी प्राईम टाईंमवाली चॅनली भाषा कळते, हे कोणते रिपब्लिक आपण स्थापन करु पाहतो आहोत, जिथं प्रेम करतानाही ॲफिडिव्हीट करावे लागेल. जिथं माणसांच्या रक्तपेशीवर जात-धर्माची मोहर लागलेली असेल आणि प्रेम करणेच गुन्हा असेल.

मुळात आपल्या धर्माच्या आणि जातीच्या स्त्रिया ही आपल्या ताब्यातील वस्तू असाव्यात, ही पितृसत्ताक आणि पुरुषसत्ताक मनोवृत्ती अवघ्या समाजाला शंभर वर्षे मागे नेणारे कायदे करण्यासाठी कारणीभूत असते. ‘आपल्या घरात एक जिवंत बॉम्ब आहे, त्याचा स्फोट होऊ नये याची काळजी घ्या,’ अशा आशयाची पत्रके २००६ साली गुजरातमध्ये घरोघर वाटण्यात आली होती आणि हा जिवंत बॉम्ब म्हणजे आपल्या घरातील कॉलेजला जाणाऱ्याा तरुण मुली. या मुली मुस्लिमांच्या कटकारस्थानाला बळी पडू नयेत, यासाठी आपण समाज म्हणून काळजी घेतली पाहिजे, असे सांगणारे हे पत्रक. यासाठी कॉलेज, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशनवर ॲटी रोमिओ स्क्वॉड.... मुलगा-मुलगी एकत्र दिसले की त्यावर झडप घालणारी. अनेकदा तर सख्ख्या बहिणभावांनाही संशयाने पकडणारे हे ॲटी रोमिओ स्क्वॉड.. हे सारे मुळात स्त्रियांचा अवमान करणारे आहे, त्यांना कमी लेखणारे आहे. स्त्रियांना स्वतःची अक्कलच नसते आणि ती त्यांच्या समाजातील पुरुषांना मात्र उदंड असते, असे मानणारे आहे. म्हणूनच लव्ह जिहाद ही सुरुवात असते, अखेरीस स्त्रियांवर निरनिराळी बंधने घालणे, त्यांच्या शिक्षणावर, मुक्ततेने फिरण्यावर , कोणते कपडे घालावे यावर ती येऊन थांबते आणि सावित्रीबाई, ज्योतिबा, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे या साऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना विफल करण्याची योजना प्रत्यक्षात येऊ लागते. तालिबानी प्रवृत्ती इथंही डोकं वर काढू लागतात. फक्त विषाणूने रंग बदललेला असतो, गुणधर्म तेच असतात.

सत्तर-ऐंशीच्या दशकात नासिरा नावाची एक वेडी पोर आर.सी.शर्मा नावाच्या एका पंडिताच्या प्रेमात पडते आणि नासिरा शर्मा बनते. लेखक-पत्रकार म्हणून त्या काळातल्या हिंसक धर्मांध चळवळी अनुभवणाऱ्या इराण, इराक, अफगाणिस्तानला भेट देते आणि आपले अनुभव शब्दात मांडता मांडता पुस्तकेच तिचा देव होऊन जातात. लेखकाला कोणताच धर्म नसतो, असं म्हणणारी नासिरा शर्मा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवते पण आज तिच्या नात्यातला एक तरुण मुलगा हिंदू मुलीशी प्रेम करताना घाबरतो, हे प्रेम फलद्रूप होईल की नाही याची त्याला भीती वाटते. आपला प्रवास नक्की कोणत्या दिशेने चालला आहे, कोण जाणे! इकडे महाराष्ट्रात शमा पंडित नावाची चळवळी मुलगी हुसेन दलवाई नावाच्या मुस्लिम कार्यकर्त्याच्या प्रेमात पडते, लग्न करते. समीना आणि सुमेध ही तिची दोन मुले.सुमेध चक्क चीनी मुलीशी लग्न करतो तर समीना तेलंगणा मधल्या एका रेड्डीसोबत विवाहबद्ध होते आणि एका नागा मुलीला दत्तक घेते. आज बागेमध्ये असा विशाल वारसा असणारी मुले खेळत राहतात आणि मराठी, इंग्रजी, हिंदी, कोकणी, चीनी, तेलगू भाषेत बोलू लागतात तेव्हा 'वसुधैव कुटुंबकम' या उक्तीला खरा अर्थ येतो. पण आपण पाठांतर करणारे, उक्तींचे जमिनीवरील भाषांतर आपल्याला येत नाही कारण त्यासाठी अंतरीचा कळवळा लागतो. आणि म्हणून आंतरधर्मीय नाते सांगणारी तनिष्कची जाहिरात आपल्याला मागे घ्यावी लागते. तरीही कुठल्याशा मुशायऱ्यात राहत गात राहतो,

"आज हम दोंनों को फुर्सत है,चलो इश्क करें

इश्क दोंनों की जरूरत है, चलो इश्क करें

आप हिन्दु, मैं मुसलमान, ये ईसाई,वो सिख

यार छोड़ो, ये सियासत है, चलो इश्क करें…"

म्हणून हा विषाणू कितीही रूप बदलून येऊ देत, आपल्याला आपल्या इम्यूनो सिस्टीममधील प्रेमाच्या मेमरी सेल्स, या स्मरण पेशी शाबूत ठेवायच्या आहेत. या भयावह पॅंडेमिकच्या,महामारीच्या काळात त्याच आपल्याला माणूस म्हणून जिवंत ठेवतील.

dr.pradip.awate@gmail.com

बातम्या आणखी आहेत...