आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मला काय वाटतं सांगू?:अंतरावर मी अंतरातील मी...

प्रसाद कुमठेकर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांप्रत कोरोनेत्तर कालखंडात मीचं अस्तित्व टिकवण्यासाठी मी ला ती, तो, ते या सर्वांपासून अंतर ठेवण्यास, विलगीकरणात (physical distancing) राहण्यास सांगितलं.  आणि इथेच मी चा प्रचंड घोळ झालेला आहे. तुम्हीआम्हीसामान्यगुणीजनानीसुद्धा आता मी ला काही अंतरावरच  ठेवलेलं आहे. दुसऱ्यांना कायम अंतर देत असलेल्या मी ला आता बाकी जगापासून स्वतःला वेगळं तोडून घेउन राहताना वेदना  होतायत. त्याला जाणवायला लागलेलं आहे की ती, तो, ते असले तरच मी ला अर्थ आहे.

मीच्या मते ‘अंतर’ असणे मानवी जीवनासाठी आत्यंतिक महत्वाची आणि अनिवार्य गोष्ट आहे. अंतर असणं हे नेहमी फायद्याचंच असतं. या  अंतराच्या फायद्याचं उदाहरण देत असताना मी दोन हातातल्या, दोन पायातल्या, दोन डोळ्यातल्या,पाच बोटातल्या अंतराचंच उदाहरण नेहमी देतो. आणि मग सांगतो जर दोन्ही हातात अंतर नसले असते तर? हाताची सर्व  बोटे एकसारखी आणि एकसाथ झाली असती तर? असे नेमके प्रश्न टाकत टाकत अंतराचं महत्व अधोरेखित करणारा मी हात, हाताची बोटे आणि पाय एकत्र जोडतो. बोलते ओठ घट्ट मिटतो. पाहते डोळे मिटतो. मीचं हे ध्यान पाहत असलेला समोरचा बोलत नाही त्यामुळे कानातल्या अंतराचा विषय कधी निघतच नाही.  मी मग स्वतःच्या एकत्र केलेल्या अवयवांची मुरकुंडी वळवून घेऊन सेकंदभर दगडासारखा पडून राहतो. अगदी अहिल्येच्या शिळेसारखा निश्चेष्ट.  मग मी क्रमश: सर्व अवयवातलं अंतर वाढवत नेत नॉर्मल पोश्चरवर येतो. आणि पुन्हा अंतराचं महत्व ओठातलं अंतर वाढवत, समोरच्याच्या तोंडासमोर हात नाचवत विषद करतो. 

मी च्या मते अंतर असल्याशिवाय प्रगती नाही, विकास नाही. थोडक्यात मीला अंतर ठेवलेलं मनापासून आवडतं. त्यामुळे मी समोरच्यापासून सतत अंतर ठेवूनच वागत आलाय. समष्टीकडून मी कडे जाणाऱ्या मीच्या मते फक्त कामासाठी एकत्र या, काम झालं की अंतर कायम करा हिच क्रिया सुयोग्य आहे. याचं उत्तम उदाहरण देताना ज्याने आपल्याला निर्माण केलंय तो भगवान, अल्लाह, रब, God सुद्धा आपल्या डोळ्यांच्या, डोक्याच्या रेंज बाहेर लांब अंतरावर स्वर्गात हेवनमध्ये कुठेतरी राहतो. मग? आपल्या कर्त्याकरवित्याचंच असं आहे मग मी पामराने त्यात ढवळाढवळ का करावी? असं म्हणत भूतकालीन मी ने एकाचे अनेक करत त्या कर्त्याकरवित्यालाच अंतरा अंतरावर ठेवलेलं आहे. आणि वर्तमानात मीला कुणीतरी सांगितलेली  मी आणि मी मधल्या  अंतराची ही थेअरी मी ला सहज पटणारीच होती, आहे. तसंही मीला माणसं अंतरावर असलेली आणि विशेषत: त्याच्या खालच्या पायरीवर उभी असलेली आवडायची, आवडतात. मीचं अन मीच्या वरच्या पायरीतलं अंतर कमी नाही झालं तरी चालेल पण खालच्या पायरीवरील व्यक्तीतील त्याचं अंतर अबाधित किंवा वाढलेलंच हवं असाच मीचा अट्टाहास असतो. त्यामुळेपण मी माणसांना अंतरावरच ठेवायचा, ठेवतो. आणि या अशा ‘अंतर’ प्रेमातूनच मी ने लिंग, वर्ण, धर्म, जात, भाषा, वय, अर्थ इत्यादी गोष्टींच्या सहायाने माणसा माणसात अंतरे निर्माण केली. आणि ‘मी’नेच निर्मिलेली ती अंतरे मी ने आत्तापर्यंत कसोशीने जपलीसुद्धा. ती अंतरे मीला जपता आली कारण मीची ‘अंतर वाढवा, स्वतःला घडवा’ ही थेअरी समोरच्यानी आनंदाने किंवा मुकाट स्वीकारली म्हणूनच. मीच्या अशा वागण्याने वाढता वाढता सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक सगळीच अंतरे भराभर भारंभार वाढली वाढत गेली. अंतर वाढवून वाढवून केंद्रस्थानी आलेल्या मी ने मग बाकीच्यांना परीघावरच ठेवलं. अशीच वर्षामागून वर्ष गेली. शतकामागून शतकं गेली. राज्य आली राज्य गेली. नं मावळणारे सूर्य मावळले. नव्या ज्ञानाचे दिवस उगवले. अपरिहार्य तो बदल झाला. परिघावरचे आवाज  बुलंद झाले. त्या बुलंद आवाजांनी केंद्रावरच्या मी ला खडखडून हलवलं. मी चांगलाच हादरला. परिघावरचे विद्रोही आवाज केंद्राजवळ आले. आणि मी झाले. तात्पर्य एकच मी अजूनही केन्द्रीच आहे. आणि परिघावरचे आवाजसुद्धा  तसेच वाढतायत. ते पुन्हा वाढतील. पुन्हा केंद्र हलवतील. केंद्राजवळ येतील. आणि कदाचित पुन्हा मीचं मध्यकेंद्री  होईल. तसंच होतं. अंतर तसंच अक्षय राहतं हाच मीचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. थोडक्यात एकच, अंतर वाढलं, वाढवलं की नंतर नंतर मी मी मी हा एकच शब्द कानी पडतो आणि आपल्यातला मीच फक्त उरतो. त्यामुळेच सर्वातीत मी, मै इच भगवान हे  डायलॉग या ‘मी’ ची  सोशलस्टेटस आहेत. आणि त्यासाठी स्वतःच्या उक्ती आणि कृतीत सुद्धा मी नं अंतर राखलेलं आहे. मी ची ही अंतर जपण्याची  आंतरिक इच्छा इतकी अचाट आणि अफाट आहे  की तंत्रज्ञानाने दळणवळणाची, संपर्काची साधने आणून जितक्या ताकदीनिशी माणसा- माणसांमधील भौगोलिक अंतर कमी करून मार्शल माक्लुहानने म्हटल्याप्रमाणे ‘जगाचं वैश्विक खेडे’ करत  अवघे विश्वची मीचे घर केले. तरीही  या सर्वावर कडी कुरघोडी करत मी ने बाह्य अंतर कमी होत आहे असे पाहून आंतरिक अंतर प्रचंड वाढवलं.  आणि ‘मी’ ला ‘तू’  च्या जवळ आणणारा तंत्रज्ञानाचा प्रयत्न सपशेल हाणून पाडला. आज ही माणसा माणसांमध्ये असणारं अंतर तसंच कायम ठेवलं, जपलं, वाढवलं. आणि या कृतीबद्दल मी ला मीचं प्रचंड कोडकौतुक आहे. 

मी नं चिक्कार नातलगांच्या, मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या, गावातल्या, शहरातल्या, ओळखी अनोळखीच्या गर्दीत मिसळूनच या अंतर जपण्याच्या तंत्राला नीट समजावून घेऊन त्यावर आपली हुकुमी मांड बसवली होती.  मीचं स्वतःचं असं अंतराचं वर्तुळ आहे. आणि या वर्तुळात मीला मिळणाऱ्या उपयोग व फायद्याप्रमाणे मीने संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचं बैजवार वर्गीकरण करून त्या त्या व्यक्तीला, व्यक्तीसमुहाला अतिजवळ,जवळ, लांब किंवा अति लांब अशा अंतरा  अंतरावर ठेवलेलं आहे. मीभोवती माणसांचं कोंडाळं आहे, पण मी राहतो अंतर राखूनच.  Infact मी ला गर्दीतच अंतरीचं अंतर जपणं जमायचं ‘बहुदा’.  बहुदा याच्यासाठी कारण मी अंतर राखूनच खुश होता  ही कोरोनापुर्व परिस्थिती. 

सांप्रत कोरोनेत्तर कालखंडात मीचं अस्तित्व टिकवण्यासाठी मी ला ती, तो, ते या सर्वांपासून अंतर ठेवण्यास, विलगीकरणात (physical distancing) राहण्यास सांगितलं.  आणि इथेच मी चा प्रचंड घोळ झालेला आहे. तुम्हीआम्हीसामान्यगुणीजनानीसुद्धा आता मी ला काही अंतरावरच  ठेवलेलं आहे. दुसऱ्यांना कायम अंतर देत असलेल्या मी ला आता बाकी जगापासून स्वतःला वेगळं तोडून घेउन राहताना वेदना  होतायत. त्याला जाणवायला लागलेलं आहे की ती, तो, ते असले तरच मी ला अर्थ आहे.  त्याच्या नकळत कधीतरी पाठ होऊन विसरलेला कबीराचा ‘ मैं मैं बड़ी बलाय है, सकै तो निकसी भागि। कब लग राखौं हे सखी, रूई लपेटी आगि॥‘  हा दोहा त्याला हटकून सारखा सारखा  आठवतोय. आणि छळतोयसुद्धा.  

आता कोरोनामुळे  सेल्फ आयसोलेटेड  झालेल्या ‘मी’ची ही कंडीशन तात्पुरती, काही काळापुरतीच  राहिल  की  ता उम्र,  हे सामोरी आलेलं कोरोनेत्तर युगच ठरवेल. पण आत्तातरी  मी  एकट्यात ढसाळांची

...नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये

नाती न मानण्याचा, आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये

आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत

गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे

चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे.

ही कविता सगळ्या जगाच्या उघड्या कानात तिचे शब्द घुसत जावेत  आणि त्यांच्या  ऱ्हदयात ते घर करून राहावेत इतक्या मोठ्या  आवाजात म्हणतोय. आणि त्याच्या अत्यंत अत्यंत अत्यंत जवळच्या वर्तुळातील लोक ती ऐकतायत. 

prasadkumthekar1@gmail.com

संपर्क - ७९७७८६५६३६

बातम्या आणखी आहेत...