आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचे राष्ट्राला संबोधन:लोकलसाठी आपल्याला व्होकल व्हावे लागेल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संकटात लोकलनेच आपल्याला वाचवले, याला आता जीवनमंत्र करावे लागेल

साऱ्या देशवासीयांना आदरपूर्वक नमस्कार,

काेराेनाचा मुकाबला करता-करता चार महिन्यांहून अधिक काळ लाेटला आहे. या दरम्यान जगभरातील ४२ लाखांहून अधिक लाेक काेराेनामुळे बाधित झाले आहेत. पावणे तीन लाखाहून अधिक लाेकांचा दु:खद मृत्यू झाला. भारतातील अनेक जण स्वजनांना अंतरले. मी सर्वांविषयी संवेदना व्यक्त करताे. एका विषाणूने साऱ्या जगाला हतबल करून टाकले आहे. तथापि, थकणे, पराभूत हाेणे, काेलमडून जाणे हे मानवाला मंजूर नसते.

मित्रहाे, गेल्या शतकापासून आपण एेकत आलाे आहाेत की, २१ वे शतक हे भारताचे आहे. काेराेनाच्या प्रादुर्भावानंतर देखील जगभरात जी स्थिती निर्माण झाली आहे, ती आपण सतत पाहात आहाेत. जेव्हा आपण या कालखंडाकडे भारताच्या दृष्टीकाेनातून पाहू लागताे तेव्हा वाटते की, २१ वे शतक हे भारताचे ठरावे हे केवळ आमचे स्वप्न नव्हे तर साऱ्यांचीच जबाबदारी आहे. परंतु, यासाठी नेमका मार्ग काय असावा? आजच्या जागतिक स्थितीचा विचार करता ती एकच मार्ग दाखवते ताे म्हणजे- ‘आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत’. आपल्या शास्त्रांमध्ये देखील उल्लेख आढळताे- ‘एष: पंथा:’ म्हणजे आत्मनिर्भर भारत हाच ताे मार्ग आहे.

या अनुषंगाने एक मुद्दा येथे साेदाहरण मांडताे. जेव्हा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत हाेता, तेव्हा भारतात एकही पीपीई किट बनत नव्हती. एन-९५ मास्कचे भारतात माेजके उत्पादन हाेत असे. आज स्थिती अशी आहे की, दरराेज २ लाख पीपीई किट आणि २ लाख एन-९५ मास्कचे उत्पादन हाेत आहे. भारताने आपत्तीला इष्टापत्ती मानल्यामुळे हे करणे शक्य झाले. आज जगभरात आत्मनिर्भर या शब्दाची व्याख्या बदलली आहे. ग्लाेबल वर्ल्डमध्ये त्याचा अर्थही बदलला आहे. अर्थकेंद्रित जागतिकीकरण विरूद्ध मानव केंद्रित जागतिकीकरणाची चर्चा विस्ताराने हाेत आहे. जगासमाेर भारताचे मुलभूत चिंतन, आशेचा किरण ठरते आहे. भारत जेव्हा केव्हा आत्मनिर्भरतेचा मुद्दा पुढे रेटताे तेव्हा आत्मकेंद्रित व्यवस्थेचा पुरस्कार करीत नाही. भारताच्या आत्मनिर्भरतेमध्ये जगाचे सुख, सहकार्य आणि शांतीची चिंता दडलेली असते. भारताची भूमिका इंटरनॅशनल साेलर अलायन्स, ग्लाेबल वाॅर्मिंग विराेधात आहे. आंतरराष्ट्रीय याेग दिनाचा प्रारंभ हा मानवी जीवनाला तणावमुक्त करण्यासाठीची जागतिक भेट आहे. जीवन-मृत्युशी संघर्ष करीत असलेल्या जगात भारतीय आैषधे नवी आशा घेऊन जात आहेत. या पवित्र्यामुळे भारताची जगभरात भरपूर प्रशंसा हाेत असून, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही बाब आहे. भारत खूपच चांगले काही करू शकताे असा साऱ्या जगाला विश्वास वाटताे आहे. प्रश्न असा आहे की, अखेर कसे? या प्रश्नाचेही उत्तर आहे,  १३० काेटी देशवासियांचा आत्मनिर्भर हाेण्याचा संकल्प. या शतकाच्या प्रारंभीच्या काळात Y2Kचे संकट उद्भवले हाेते. भारतीय तंत्रज्ञांनीच साऱ्या जगाला या संकटातून बाहेर काढले हाेते, ही घटना आठवा.

मित्रहाे, मी स्वत:च्या डाेळ्यांनी कच्छच्या भूकंपातील ते दिवस पाहिले. सगळीकडे ढिगारेच ढिगारे हाेते. त्या परिस्थितीत काेणीही विचार करू शकला नसता की, कधी स्थिती बदलू शकेल. परंतु पाहता-पाहता कच्छ कंबर कसून उभा राहिला. विकसित हाेत राहिला. आत्मनिर्भर भारताची विशाल इमारत पाच स्तंभावर उभी असेल. पहिला स्तंभ अर्थकारणाचा असेल, एक अशी अर्थव्यवस्था जी इन्क्रिमेंटल चेंज नव्हे, तर क्वांटम जंप घेईल. दुसरा स्तंभ पायाभूत सुविधांचा, जी आधुनिक भारताची आेळख ठरेल. तिसरा स्तंभ आपली यंत्रणा. जी गत शतकातील रीती-नीती नव्हे, परंतु २१ व्या शतकातील स्वप्नांना साकार करणाऱ्या तंत्रज्ञानाधिष्ठीत व्यवस्थेवर आधारित असेल. चाैथा स्तंभ म्हणजे आपली डेमाेग्राफी, जगातील सर्वात माेठ्या लाेकशाहीतील आमची व्हायब्रंट डेमाेग्राफी आमची ताकद आहे, आत्मनिर्भर भारतासाठी ऊर्जेचा स्राेत आहे. पाचवा स्तंभ म्हणजे मागणी- आपल्या अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठा करणारी साखळी हे जे चक्र असते, जी शक्ती असते त्याचा पूर्ण क्षमतेने वापर हाेण्याची गरज आहे.

मी आज एका विशेष आर्थिक पॅकेजची घाेषणा करत आहे. हे पॅकेज ‘आत्मनिर्भर भारत अभियान’चे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. अलिकडेच सरकारने काेराेनाशी संबंधित ज्या आर्थिक घाेषणा केल्या हाेत्या, जे रिझर्व्ह बॅन्केचे निर्णय हाेते आणि आज ज्या आर्थिक पॅकेजची घाेषणा हाेत आहे ते सारे एकत्रित केल्या सुमारे २० लाख काेटी रुपयांचे पॅकेज हाेईल. भारताच्या जीडीपीच्या सुमारे १०% हे पॅकेज असेल. २० लाख काेटी रु.चे हे पॅकेज २०२० मध्ये राष्ट्र विकासाच्या प्रवासाला, आत्मनिर्भर भारत अभियानला एक नवी गती देईल. आत्मनिर्भर भारताचा संकल्प तडीस नेण्यासाठी या पॅकेजमध्ये जमीन, मनुष्यबळ, लिक्विडिटी आणि कायदा या सर्वांवर भर देण्यात आला आहे. हे आर्थिक पॅकेज आमचे कुटीराेद्याेग, गृहउद्याेग, लघु आणि मध्यम उद्याेग तसेच एमएसएमई करीता आहे. जे काेट्यवधी लाेकांच्या उपजीविकेचे साधन आहे, जे आत्मनिर्भर भारताच्या आमच्या संकल्पाचा मजबूत आधार आहेत. हे आर्थिक पॅकेज कुठल्याही परिस्थितीत, प्रत्येक ऋतूत देशवासीयांसाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या देशाच्या श्रमिकांसाठी आहे, प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या, देशाच्या विकासात यागदान देणाऱ्या मध्यमवर्गासाठी आहे. हे आर्थिक पॅकेज भारताच्या आर्थिक सामर्थ्याला शिखरावर नेण्यासाठी संकल्पित असलेल्या भारतीय उद्योग जगतासाठी आहे. 

उद्यापासून सुरुवात करून येत्या काही दिवसांत अर्थमंत्र्यांकडून तुम्हाला या  ‘आत्मनिर्भर भारत अभियान’पासून प्रेरित या आर्थिक पॅकेजची सविस्तर माहिती देण्यात येईल. सहकारी मित्रांनो, स्वावलंबी भारत बनवण्यासाठी ठळक सुधारणांची वचनबद्धतेसह आता देश पुढे जाणार यात काही शंका नाही. गेल्या ६ वर्षांत ज्या सुधारणा झाल्या त्यामुळे आजच्या या संकटकाळातही भारताची सुव्यवस्था अधिक सक्षम, अधिक समर्थ दिसत आहे, हे आपण अनुभवले आहेच. अन्यथा कुणी विचारही करू शकत नव्हते की, भारत सरकार जो पैसा पाठवते तो संपूर्ण गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या खिशात जाऊ शकेल. परंतु, हे झाले आहे. शेतकरी सशक्त व्हावेत आणि भविष्यात कोरोनासारख्या कोणतेही संकट आल्यास कृषी क्षेत्रावर कमीत कमी परिणाम व्हावा, यासाठी शेतीशी संबंधित पूर्ण पुरवठा साखळीत या ठळक सुधारणा होतील. या सुधारणा मजबूत वित्तपुरवठा प्रणालीच्या निर्मितीसाठी होतील. ते व्यवसायाला प्रोत्साहित करतील, गुंतवणूक आकर्षित करतील आणि  मेक इन इंडियाच्या आमच्या संकल्पाला सशक्त करतील.

मित्रांनो, भारत प्रत्येक स्पर्धेत जिंकावा, ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताने महत्त्वाची भूमिका वठवावी, ही आज काळाची गरज आहे. या गोष्टींचे भान ठेवून या आर्थिक पॅकेजमध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे आमच्या सर्व सेक्टर्सची क्षमता वाढेल आणि दर्जाही सुनिश्चित होईल. मित्रांनो, हे संकट इतके मोठे आहे की, मोठमोठ्या अर्थव्यवस्था डळमळीत झाल्या आहेत. परंतु, या परिस्थितीत आम्हाला, देशाला आपल्या गरीब बंधू-भगिनींची संघर्षशक्ती, संयमाचेही दर्शन झाले आहे.  विशेषत: फुटपाथवरील विक्रेते, हातगाडीवाले असे श्रमिक, घरकाम करणारे बंधू-भगिनींनी यादरम्यान मोठी तपस्या केली आहे, त्याग केला आहे. यांची अनुपस्थिती जाणवली नाही, असे कुणी आहे का? आता त्यांना मजबूत करणे, त्यांच्या आर्थिक हितासाठी मोठे पाऊल उचलणे, हे आमचे कर्तव्य आहे.  मित्रांनो, कोरोना संकटाने आम्हाला स्थानिक उत्पादन, स्थानिक बाजारपेठ, स्थामिक पुरवठा साखळीचेही महत्त्व पटवून दिले आहे. संकटकाळात स्थानिक गोष्टींनीच आम्हाला वाचवले आहे. स्थानिक गोष्टींनाच आपला जीवनमंत्र बनवा, असे काळाने आम्हाला शिकवले आहे.

आज तुम्ही जे जागतिक ब्रँड वापरता तेदेखील कधीकाळी असेच लोकल होते. आजपासून प्रत्येक भारतीयाला लोकलसाठी व्होकल बनायचे आहे. स्थानिक उत्पादने केवळ खरेदीच करायची नाहीत, तर त्यांचा अभिमानाने प्रचारही करायचा आहे. आपला देश असे करू शकतो, याचा मला पूर्ण विश्वास वाटतो. मला अभिमानाने एक गोष्ट  जाणवते, मला आठवते जेव्हा मी देशाला खादी खरेदी करण्याचा आग्रह केला तेव्हा खूप थोड्या कालावधीत खआदी आणि हँडलूमची मागणी आणि विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. एवढेच न्ही, तर खादी आणि हँडलूमला तुम्ही एक मोठा ब्रँड बनवले. हा एक खूप छोटा प्रयत्न होता, पण त्याचे फळ खूप चांगले मिळाले.

मित्रांनो, सर्व तज्ज्ञ, शास्त्रज्ञ सांगतात की,  कोरोना दीर्घ काळासाठी आपल्या जीवनाचा एक भाग होणार आहे. परंतु, त्याचबरोबर कोरोनाभोवतीच आपले जीवन फिरत राहील, असेही आम्ही होऊ देऊ शकत नाही. आम्ही मास्क लावू, सुरक्षित अंतराचे पालन करू, पण आमच्या ध्येयाला स्वत:पासून दूर होऊ देणार नाही. म्हणून, लॉकडाऊनचा चौथा टप्पा पूर्णपणे वेगळा, नवीन रूपात आणि नवीन नियमांचा असेल.  राज्यांकडून आम्हाला ज्या सूचना मिळत आहेत, त्या आधारावर चौथ्या लॉकडाऊनबद्दलची माहिती तुम्हाला १८ मेपूर्वी दिली जाईल. मला पूर्ण विश्वास आहे की, नियमांचे पालन करत आपण कोरोनाशी लढू आणि पुढेही जाऊ. 

मित्रांनो, आमच्याकडे असे म्हटले जाते की, ‘सर्वम् आत्म वशं सुखम्’ म्हणजे जे आमच्या नियंत्रणात आहे तेच सुख आहे. स्वावलंबित्व आम्हाला सुख आणि समाधान देण्याबरोबरच सशक्तही करते. स्वावलंबी भारत निर्मितीचा निग्रह करण्यानेच २१वे शतक हे भारताचे शतक बनवण्याची आमची  जबाबदारी पूर्ण होईल. या जबाबदारीला १३० कोटी भारतीयांच्या प्राणशक्तीनेच ऊर्जा मिळेल.स्वावलंबी भारताचे हे युग प्रतेय्क भारतीयासाठी नवी निर्धारही असेल आणि नवीन पर्वही. आता एका नव्या प्राणशक्तीने, नव्या संकल्पशक्तीने आपल्याला पुढे जायचे आहे. आचार-विचार कर्तव्यभावनेने ओतप्रोत असतील,  परिश्रमाची पराकाष्ठा होईल, कौशल्याचे भांडवल असेल तर स्वावलंबी भारत बनण्यापासून कोण रोखू शकतो? आपण भारताला स्वावलंबी बनवणारच, या संकल्पासह, विश्वासासह मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही आपले आरोग्य, कुटुंब आणि आपल्या जवळच्या लोकांची काळजी घ्या. धन्यवाद!

बातम्या आणखी आहेत...