आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फिरस्तू:नट-डोंबारी का तयार होतात?

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा. नारायण भोसले

समाजातील काहींच्याच वाट्याला का असं जीवन येतं? कोण चोरतं यांची भाकरी? कोण यांना दोरीवरून चालायला लावतं? जेमतेम एका फुटाच्या लोखंडी कडीत संपूर्ण शरीर अडकवायला यांना कोण लावतं? कशी होणार यांची सुटका? असे प्रश्न आपणाला कधी पडले का? विषवेश्वराच्या मंदिरात आपसूकच लाखो-कोटींचा गल्ला जमा होत होता, पंडेच्या हातात रोज लाखोंचा गल्ला येत होता मात्र या नट जमातीच्या हाती काय मिळत होते?

मी भटका असल्याने भटकत राहतो, आसपास पाहत राहतो, मला दिसतात ही भग्न माणसं! अशा माणसांचं जगणं बघत राहतो, त्यांच्या जगण्यासाठीच्या कसरती टिपत राहतो, बोलतो त्यांच्याशी त्यांच्या भाषेत, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं असणं तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं जगणं जगत राहतो, कधीमधी लिहतो त्यांच्यावर!

काशीला गेलो असताना विश्वेश्वरमंदिराच्या परिसराच्या जवळ एक घटना घडत होती. वीस-पंचवीस फूट दोन उंच बांबूच्या वरच्या टोकाला दोरी बांधलेली, त्या बांबूवर बांधलेली दोरीची उंची जवळच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यापेक्षा उंच होती! जवळच इलेक्ट्रिकचा खांब व डीपी. डीपीवर खतरा (डेंजर्स) असं स्पष्ट लिहिलेलं! दोरीवर सात-आठ वर्षाचा मुलगा, अनवाणी, हातात सात-आठ फुटी बांबू, बहुदा आई असलेली एक स्त्री काळजीने काळवंटलेला चेहरा घेऊन दोरीवरून चालणाऱ्या मुलाकडे बघत असलेली, बहुदा बाप असलेला एक मध्यमवयीन मनुष्य दोरी ढिल्ली-टाईट करत होता, मध्येच स्पीकर वाजत होता, स्पीकरवर गाणं वाजत होतं "गरिबोंकी सुनो । वो तुम्हारी सुनेगा। तुम एक पैसे दे दो वो दस लाख देगा।"

ठिकाण गर्दीने खचाखच भरलेलं! पण बहुतेक सारी गर्दी विश्वेश्वर मंदिराकडे चाललेली. या घडत असलेल्या घटनेकडे कोणाचेच लक्ष्य नाही. नाही म्हणायला काही मध्यमवर्गीय लोक या घटनेचे फोटो काढत होते आणि पुढे जात होते. आम्ही त्या माणसांशी बोलण्याचा प्रयत्न केला. धंद्याचा वेळ असल्याने तो मनुष्य बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता! पण तो शेवटी आमची चिकाटी व भाव ओळखून बोलला! जे बोलला ते काळजाला भिडणारे होते.

"आम्ही नट जमातीचे, असला खेळ करणे हाच आमचा मुख्य व्यवसाय, खतऱ्याचे खेळ करणं, जीव पणाला लावणं, असे खेळ आम्ही लहानपणापासून मुलींना शिकवतो. पण मला मुलगी नाही याचे दुःख आहे, काय करणार! मुलगा झाला, त्याला दुसऱ्या-तिसऱ्या वर्षांपासून दोरीवरून चालायला शिकवतो, लहान मुलं खेळाचा प्रकार म्हणून ते शिकतात, खूपदा त्यांना दमदाटी करावी लागते, जेवण बंद करावं लागतं, भितीने गांगरून जातात ही मुलं, भिती मारण्यासाठी भितीच दाखवावी लागते, उपाशी ठेवावं लागतं, त्याचा त्रास आम्हालाही होतोच, पण काय करणार, यावरच आमचं पोट भरतं... पोट भरण्यासाठी पोटच्याला मारावेच लागतं, पोटाच्या गोळ्यांचा जीव टांगणीला टांगावा लागतो साहेब! असा खेळ करणाऱ्या हजारो लोकांचा अामचा समाज आहे, इथे विश्वेश्वरय्याच्या परिसरात गर्दी असते, खेळ पाहून मिळतात शे-दोनशे रुपये, करतो असे चार-पाच खेळ तास-दोन तासाचे, कित्येक पिढ्या करत आल्या तसे आम्हीही करतो, जाऊद्या साहेब धंदेका टाईम हैं!'

त्या बाईकडे पाहिले, काही पैसे मिळतात का ते ती पाहत होती. आमच्याशी बोलण्यात तिला वेळ नव्हता, तिच्या पोटचे  पोर आयुष्याशी झुंजत होते. मुलाकडे पाहिले, तो तोल सांभाळत पैशाच्या गल्ल्याकडे एक डोळा करून पाहत होता, एकाग्रतेने दोरीवरून चालत होता तो! जीवाची कालवाकालव होत होती. आम्ही गल्ल्याकडे पहिले तर अगदीच पाच-पन्नास रुपये असतील!

समाजातील काहींच्याच वाट्याला का असं जीवन येतं? कोण चोरतं यांची भाकरी? कोण यांना दोरीवरून चालायला लावतं? जेमतेम एका फुटाच्या लोखंडी कडीत संपूर्ण शरीर अडकवायला यांना कोण लावतं? कशी होणार यांची सुटका? असे प्रश्न आपणाला कधी पडले का? विषवेश्वराच्या मंदिरात आपसूकच लाखो-कोटींचा गल्ला जमा होत होता, पंडेच्या हातात रोज लाखोंचा गल्ला येत होता मात्र या नट जमातीच्या हाती काय मिळत होते? 

डोंबारी समाजाचा इतिहास फारसा मिळत नाही... कसा मिळेल? भग्न समुदायाचा इतिहास लिहिण्याची व तो शिकवण्याची गरज कोणत्या शासनास आहे? या जमातीचा जो इतिहास मिळतो तो साधारण सुलतान-मोगल काळाच्या आसपासच्या काळातला. महाराणा प्रताप यांच्या शेवटच्या लढाईत डोंबारी त्यांच्या सोबत असल्याचे काही लेखी पुरावे मिळतात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासात डोंबारी समाजाचे उल्लेख सापडतात. महाराष्ट्रात कोल्हाटी जमातीची उपजमात म्हणून नोंद असलेली डोंबारी जमात राजस्थानमधून भटकत आल्याचे बोलले जाते. कसरतीचे नाना प्रकार दाखवून शरीराला पीडा देणं, एक फूट रिंगमधून शरीर बाहेर काढणे, तारेवर बांबू घेऊन चालणे,कोल्हाट उड्या मारणे, डोळ्यात सुई पकडणे, केसाने दहा-वीस किलोचा दगड उचलणे असे नानाप्रकारचे साहसी व धाडसी खेळ या भटक्या जमातीकडून दाखवले जातात. या सगळ्या प्रकारांमुळे त्यांच्या आरोग्यावर फार दूरगामी परिणाम होतात. भोक्त राहण्याने कुपोषित होतात ही लोकं, डोळ्याच्या पापणीने सुई उचलणाऱ्या काही स्त्रियांचे डोळे जातात, एक फुट कडीतून संपूर्ण शरीर घालवावे लागत असल्याने पुढे त्यांना पाठीचे आजार होतात, दोरीवरून चालताना अनेकांना जायबंदी व्हावे लागते... 

नट किंवा डोंबारी ही संपूर्ण भारतात विखुरलेली भटकी जमात आहे. ‘नट’ या शब्दाचा अर्थ नाचणारा असाही आपण घेऊ शकतो. नृत्य-गायनात ही जमात आघाडीवर आहे, पण त्यांच्या या कलेचे वरकडात रूपांतर होत नाही, कसरत करत सर्कस मधेही काहींनी काम मिळवले असेल त्यांनी, हातचलाखीचे खेळ ही काही लोक करतात, पण ते जादूगार नव्हेत... नानाप्रकाराच्या  कला सादर करून लोकांची करमणूक करणे हा नट-डोंबारी जमातींचा परंपरागत व्यवसाय होय. विभागवार वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जमातींचे मूळ निश्चित नसले तरी ‘डोम’ या जातीचा हा विस्तार आहे असे समजले जाते. पण "डोम' ही वेगळी जात आहे, त्याचा संबंध प्रेत जाळण्याशी आहे. हा व्यवसाय करणाऱ्या गटास वेगवेगळ्या ठिकाणी डोमार, डोंबार, डोंबारी, बाजीगर, ब्रिजवासी नट, बजानिया नट, भांमती नट (मती गुंग करणारे), राज नट, भाटनट, कबुत्रीनट, पुरवानट, पेरणानट, गुलगुलिया, डंकचिघा, खेळकरी, इ. नावाने ओळखले जाते. ते प्रादेशिक भाषेतूनच लोकांशी संवाद साधतात. पण यांच्याशी कोण संवाद साधतात? "केला इशारा जाताजाता' या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचे "नाचतो डोंबारी' हे १९६५ मधील गीत आपण ऐकले असेल. त्यात या जमातीच्या जगण्याचे फार रोमँटिक वर्णन केले आहे. पण यांचे जगणे याहून भयानक असते, याची आपणाला कल्पना आहे काय?

bhosalenr@gmail.com
लेखकाचा संपर्क - ९८२२३४८३६१