आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

परिघाबाहेरची माणसं...:एक पत्थर तो तबियत से उछालो यारों...

प्रा. नारायण भोसले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरा विजय बाबर या सध्या कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये तुरुंगाधिकारी आहेत. कोणत्याच प्रकारची शिक्षणाची परंपरा नसलेल्या आणि भिक्षेची प्रथा पाळणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातीतील त्या पहिल्याच तुरुंगाधिकारी आहेत. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

मीरा विजय बाबर या सध्या कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये तुरुंगाधिकारी आहेत. कोणत्याच प्रकारची शिक्षणाची परंपरा नसलेल्या आणि भिक्षेची प्रथा पाळणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातीतील त्या पहिल्याच तुरुंगाधिकारी आहेत. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

तसे मीराचे सांगायचे गाव बामणी, ता. सांगोला जि. सोलापुर. भटक्या जमातीत सर्वात मागास असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी जमातीत त्यांचा जन्म झाला. या जमातीचा मुख्य व्यवसाय भीक मागणे हाच राहिलेला आहे. या अशा सतत भिक्षेकरी असलेल्या व भारतभर आयुष्यभर भटकणाऱ्या कुटुंबात शिक्षण घेणे तसे मोठे अवघड आणि अशक्य काम. पण शिक्षणावर प्रेम करणाऱ्या वडिलांच्या मदतीने आणि परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या भावाच्या मदतीने त्या इथवर येऊन पोहचल्या. पण हे इतके सहज घडले नाही, त्यासाठी मीराला स्वतःला वारंवार सिद्ध करावे लागले. मुलगी असल्याने तर जास्तच... सिद्धतेच्या परिक्षा द्याव्या लागल्या. फार गंभीर स्वरुपाची कहाणी मीराच्या वाट्याला आली.

मीराचे वडील रामचंद्र बाबाजी भोसले यांचे बिऱ्हाडाचे अन्य बिऱ्हाडाशी तंटा झाल्याने फुटून उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या रस्त्याने चालले होते. या इलाख्यात बारा कोसाला वस्ती होती. सोबत दुसरीही काही बिऱ्हाडं होती. रोज दहा-पंधरा किलोमीटरचा प्रवास होई. इतक्या भल्या मोठया ओझ्याला एकच गाढव होते. तिची आई सखुबाई नऊ महिन्यांची गरोदर होती. कधीही बाळंतीण होऊ शकते अशी शक्यता असताना बिऱ्हाड थांबायचे नाव घेत नव्हते. असेच एका सकाळी बिऱ्हाड उठले. आईला रस्त्यातच बाळंत कळा सुरू झाल्या. काही बिऱ्हाडकरणी बायांनी लुगड्याचा आडोसा केला. विनासायास आईचे बाळंतपण झाले आणि मीराचा जन्म झाला. तिथेच मिळेल त्या साधनाने नाळ तोडली.

बिऱ्हाडासोबत भटकताना अनेक जिवावरच्या प्रसंगांना सामोरे जाणे आले. मीराच्या वडिलांचे बिऱ्हाड ओडिशापासून बिहारला चाललं होतं. मध्ये सरगुजाचे कित्येक किलोमीटरचे भयाण जंगल होते. तीन बिऱ्हाडं, पाच-सात गाई, गाढवावर पाल, काठी, पाण्याची फुटकी घागर आणि चार-पाच वर्षाची मीरा असा हा काबिला होता. खांद्यावर घेऊन-घेऊन थकल्याने वडिलांने तिला गाढवावर बांधली. भयाण श्वापदाचा जंगलचा रस्ता. आता तर अंधारही पडला होता. चोहोबाजूंनी जंगलाची काळी-काळी छाया भीती दाखवत होती. डोंगराच्या कडा-कपारी स्थितप्रज्ञ राहिल्या नव्हत्या, त्यांचे बिऱ्हाडाच्या खुजेपणाला वाकुल्या दाखवणं चालूच होतं. अशात अचानक वाघाच्या डरकाळीचा आवाज आला, तसे गाढव उधळले. बुजलेल्या गाढवावर बसलेल्या चार-पाच वर्षाच्या मीराचा तोल गेला व गाढवावर बांधलेल्या फुटक्या पत्र्याच्या घागरीत तिचा पाय अडकला. मीरा गाढवापेक्षा जास्त घाबरली. मीरा पडली नाही, प्रसंगावधान साधून ती तशीच गोणीला धरून लोंबकळत राहिली. धीराची मीरा मदतीसाठी "अण्णाव' म्हणून आर्त किंकाळी देऊन ओरडली. तिच्या अार्त किंकाळीने झाडावरील पक्षी फडफडले. बिऱ्हाडकऱ्यांच्या कानावर आदळलेला हा आवाज एका मोठ्या संकटाची जाणीव करून देणारा होता. वडिलांनी प्रसंगावधनाने गाढव धरले. मीरा चिरचिर ओरडत होती. तिच्या पिंडरीच्या मांसाचा गोळा लटकू लागला होता. रक्त चिळकांड्या मारत होते. वडिलाने लगोलग तिला गाढवावरुन खाली उतरविले. गोळा पिंडरी बरोबर दाबला. डोक्याचे मुंडासे सोडून पायाच्या पिंडरीला बांधला. भळभळ रक्त वाहत होते. मिरा रडत होती. बिऱ्हाडं जीव मुठीत धरून तो रात्रीचा जंगल प्रवास करत होतं. रस्ता संपत नव्हता. भीत-भीत, देवाचा धाया करत, नवस करत बिऱ्हाडाने नेहमीप्रमाणे जंगली इलाखा कसाबसा पार करत आणला.

सर्वत्र भीतीने व्यापलेल्या त्या वर्तमानाला मीराने वेळीच आवरले. अशा समजदार असतात भटक्यांच्या मुली. ..असाच प्रवास करतात ही बिऱ्हाडं... जंगली जनावरांना घाबरत एकमेकांसोबत राहतात ही बिऱ्हाडं... कधीकधी झाडी-जंगल यांच्या सावलीत शूद्र प्राण्याची शिकार बनतात ही बिऱ्हाडं... बिऱ्हाड संपत नाहीत ना दुःख संपत नाही, जगण्याची आसही संपत नाही. कशी संपतील ही बिऱ्हाड? माणसं संपली तरी संपत नाहीत... काय असतात ही बिऱ्हाड? त्यात माणसं असतात का?

शिक्षणाची परंपरा नसतानाही मीराने शिकण्याचा चंग बांधला. सर्व प्रकारच्या अडचणींवर मत करत गावी आंधळ्या आजीजवळ राहून प्राथमिक शिक्षण त्या वयात मीराने हाताने स्वयंपाक करत या पूर्ण केले. पुढचे शिक्षण अप-डाऊन करत तालुक्याच्या गावाला केले. पुढे सोलापूरच्या बोर्डिंगमध्ये शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. काही काळ भावांच्या मदतीने पुण्याला शिक्षण घेतले. बारावी सायन्स पास केले. फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताची पदवी मिळवली. या जमातीत एवढं शिकलेली ती पहिलीच मुलगी असावी. एमपीएससीचा अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न तिने आधीच ठेवले होते. तशात वय वाढत चालले होते. इतकं शिक्षण घेतलेल्या व एवढ्या वयाच्या मुलीचे लग्न करणे आवश्यक वाटल्याने पालकांनी तिचे लग्न लाऊन दिले.

लग्नानंतरही मीराने अभ्यासात खंड पडू दिला नाही. स्पर्धा परीक्षा देतच राहिली आणि तलाठी पदाची माळ तिच्या गळ्यात पडली. अवघ्या दहा दिवसाचं बाळ घेऊन मीरा तलाठी म्हणून एका खेड्यात रुजू झाली. अभ्यासात खंड पडू दिला नाही. जेलर पदाच्या जाहिरातीला सकारात्मक घेत सर्व परीक्षा पास केल्या पण त्याचा निकाल अजून लागला नव्हता. सासरचे घरकाम सांभाळत रात्र-रात्र अभ्यास सुरूच ठेवला आणि एके दिवशी जेलरपदाची ऑर्डर तिच्या हाती पडली. नाथपंथी डवरी गोसावी जमातीची पहिली तुरुंगाधिकारी... तेथेही त्यांनी वेगवेगळ्या जबादाऱ्या सांभाळल्या.

‘कष्टकऱ्यांना नियतीही विजयाच्या माळा घालते, फक्त तिच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवा’, असे मीरा आपल्या भाषणात कायम सांगत आल्या आहेत. कोण्या शाहिराने म्हटले आहे, कौन कहता है आकाश में छेद नही गिरता? एक पत्थर तो तबियत से उछालो यारों’...

hosalenr@gmail.com

लेखकाचा संपर्क - ९८२२३४८३६१