आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरस्तू:"धपकी'ने घेतला ध्यास स्वयंसहाय्यतेचा...

प्रा. नारायण भोसले2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘उदरनिर्वाहाची पारंपारिक साधने त्यागल्याशिवाय नव्या उत्पादनाच्या साधनावर मालकी हाक्क सांगता येत नाही’ हे आंबेडकरी सूत्र धपकी गावाला पटलेले होते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार या मुलभूत गरजा भागाविण्यासाठीची या गावाची धडपड वाखाणण्याजोगी आहे. आता या धपकी गावातील भटके भीक मागत नाहीत तर त्यांनी स्वयंसहाय्यतेचा ध्यास घेतला आहे.

    धपकी ता. सेलू, जि. वर्धा हे गाव अनेक अर्थाने महत्वाचे आहे. तसे हे गाव छोटेच आहे. ते शंभर वर्षाचे जुने असले तरी त्या जुन्या काळापासून येथील विशिष्ट समुदायाचे लोक भिक्षेकरी आणि भटके होते. गावातील क्यानलने गावाचे दोन भाग केले आहेत. क्यानाच्या एका बाजूस संखेने जास्त असलेले एकाच जमातीचे भटके लोक राहतात व दुसऱ्या बाजूस भटकेतर स्थिर लोक राहतात. २७२ कुटुंब आणि १३९५ लोकसंख्या असलेलं हे गाव. ६९२ पुरुष ७०३ स्त्रिया आहेत. महाराष्ट्राचे सरासरी लिंग गुणोत्तर ९२९ असताना या गावाचे लिंग गुणोत्तर १०१६ असे आहे. ५८.२४ साक्षरता प्रमाण आहे त्यात ७०.९ पुरुष व ४६.७८ स्त्री साक्षरता आहे. ७६४ कष्टकऱ्यात ५०६ मुख्य श्रमिक असून २५८ हे स्थलांतरित कष्टकरी आहेत. हे सांगण्याचे करण म्हणजे  या संपूर्ण गावात विशेष करून भटक्या प्रवर्गातील भराडी जमातीचेच लोक राहतात. 

जगण्यातली शेवटची लाचारी म्हणजे भिक मागणे. ही लाचारी एका आर्थिक-सामाजिक समाजव्यवस्थेच्या विपन्नावस्थेतून  येत असते. उदासी या पंथाचे लोक साधारणत: भिक्षेवर जगतात. कुडमुड्या जोशी हे भिक्षेकरी वर्षभर भविष्य सांगत गावोगाव फिरून भिकच मागतात. कुर्मुडा हे भिक्षेकरी पहाटे भिक्षा मागायचे काम करतात आणि भिक्षा स्त्रीच्या हातूनच घेत असत. बैरागी हे  तोंडाला राख फासून हातात कमंडलू घेऊन भिक्षा मागणाऱ्यापैकी एक समाज आहे. भराडी भुत्या हे देवीचे भक्त गावोगाव फिरत दान मिळवतात. वाघ्ये आणि मुरळ्या हजेजुरीच्या खंडोबाचे भक्त गावोगाव फिरून खंडोबाची गाणी म्हणत भिक्षा मागतात. वासुदेव हा अगदी पहाटे पहाटे गाणी ऐकवून लोकांना झोपेतून उठवणारा एक भिक्षेकरीच होय. जगण्याच्या भौतिक साधनाच्या अभावातून असे भिक्षेकरी जीवन स्वीकारण्यात येत असते, स्कीलच्या नाकारलेपणातून येत असते, एखाद्या समाज गटावर दाखवलेल्या अविश्वासातून येत असते. अशा अवस्थेत भटक्या-विखुरलेल्या समुदायाकडून या लाचारीला सहजासहजी तिलांजली दिल्याची उदाहरणे अपवादानेच सापडतील. कुपोषण, अस्वच्छता, अज्ञान, अंधश्रद्धा, प्रचंड कष्ट, पिण्याच्या पाण्याची कमतरता, सांडपाण्याच्या व्यवस्थेचा अभाव, स्वच्छतागृहाची कमतरता इत्यादी कारणामुळे अशा प्रकारच्या पालात व अस्थिर वस्त्यात विविध रोगांनी ठाण मांडलेले असते. 

भटक्या वर्गातील भराडी प्रवर्गात मोडणाऱ्या जमाती ज्या गावात राहतात अशी खूपच गावे असतील. तशी या भराडी जमातीच्या बाळ संतोषी, किंगरीवाले, नाथबाबा, नाथ जोगी, गारपगारी, नाथपंथी डवरी गोसावी, नाथ, जोगी, नाथपंथी, डवरी अशा दहा पोट जमाती आहेत. खरेतर या दहा स्वतंत्र जमाती आहेत, त्यांची भिन्न-भिन्न वैशिष्ट्य आहेत. या गावात लोकांच्या जाती भराडी अथवा नाथ जोगी अशा लावण्यात आल्या आहेत. ही जमात त्या नावाप्रमाणे  भटकी आणि भिक्षेकरी आहेत. ही मंडळी जमेल तसे विविध राज्यात भटकतात आणि मिळेल त्या साधनावर भिक्षा मागतात. या गावातील भराडी हे लोक चेहरा पाहून भिक मागणे, राशी भविष्य सांगून भिक मागणे, देव-देवीच्या मुर्त्यांवर भिक मागणे, देव-देवळाच्या बांधकामासाठी निधी गोळा करण्याच्या नावावर भिक मागणे, दयेवर भिक मागणे असे जीवन जगत होते. 

पण गेल्या वीस-तीस वर्षापासून या भराडी नाथ जोगी लोकांनी भिक्षेला तिलांजली देत दुसरी कष्टाची वा अंगमेहनतीची कामे करावयास सुरुवात केली. कदाचित ‘उदरनिर्वाहाची पारंपारिक साधने त्यागल्याशिवाय नव्या उत्पादनाच्या साधनावर मालकी हाक्क सांगता येत नाही’ हे आंबेडकरी सूत्र धपकी गावाला पटलेले होते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार या मुलभूत गरजा भागाविण्यासाठीची या गावाची धडपड वाखाणण्याजोगी आहे. म्हणून  आज या गावात आता सत्तर ते ऐंशी टक्के लोक भिक न मागता स्टो दुरुस्ती, छत्री दुरुस्ती, ग्यास दुरुस्ती, शहरात जाऊन मोल-मजुरी, रिक्षा चालवणे, शिलाई मशीन, स्टेशनरी दुकान, पिठाची गिरणी, ट्रक ड्रायव्हर, शेतमजूर, म्हशी पालन अशा कामाच्या स्वरुपात उदरनिर्वाहाची साधने जमवत आहेत. या जमातीतील हा व्यवसायाचा मूलगामी फार महत्वाचा आहे. त्याला सकारात्मकपणे समजून घेणे महत्वाचे आहे. या समुदायाला स्थिर होण्यासाठी एवढी वर्ष लागली पण यांनी आपला हेका सोडला नाही आणि भिक्षेसारख्या लाचारी जीवनाला लाथ मारली. हे सर्व सहज घडले नाही. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. यातून या भराडीच्या जीवनाला स्थिरता आली. नेहमीच होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, जिल्हा परिषदा निवडणुका, विधानसभा-लोकसभा निवडणुका यात मतदानासाठी मतपेटी म्हणूनही काहींनी या कडे पाहिले व काही राजकारण्याने आश्वासने दिली गेली त्यातील काही पाळली गेली व काही पाळली गेली नाही. पण यातून या जमातीच्या स्थिरीकरणाला मात्र सुरुवात झाली. 

या जमातीने छोटे-मोठे कुटिरोद्योग करून मिळालेल्या वरकडातून त्यांनी शेती विकत घेऊन कसायला सुरुवात केली. घेतलेल्या जमिनीत विहीर अथवा ट्यूब वेल करून पाण्याची सोय करून घेतली. जवळच बोर व अप्पर वर्धा धारण आहे. त्या धरणाच्या पाण्याचाही उपयोग यांनी करून घेतला. आज या जमातीकडे विकत घेतलेली चारशे एकरपेक्षा जास्त जमीन आली आहे. त्यात कापसी, सोयाबीन, गहू, हरबरा, ऊस अशी पिके घेण्यात येऊ लागली. त्यामुळे मुले-मुली शाळेत जाऊ लागली. शाळेत नाव कमवू लागली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दाखल होऊन व्यावसायिक प्रशिक्षण घेऊ लागली. टायपिंगचा क्लास करून लिपिक बनून त्या आधारे उदरनिर्वाहाची साधने बनवत आहेत. हीच मुले पुढे छोटे-छोटे व्यवसाय करू लागले. सहकारी बँकामार्फत सुलभ हप्त्याने कर्ज घेऊन व्यावसायिक बनू लागली. काही रिक्षाचे मालक बनले. काही लोकांनी सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ घेत आपली घरकुले बांधली व कायमचा निवारा केला. आता कष्ट करत असलेली ही मुले-मुली, कुटुंबे कधीही भिक्षा मागायला जात नाहीत आणि जे काही थोडेसे लोक भिक्षा मागतात त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न या स्थिर-शिक्षित-कष्टकरी जमातीतून होत आहे. त्या भिक्षिताना धपकीगावाने स्वयंसह्यतेचा ध्यास घ्यावयास लावले. त्यांना आपण बळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे हे पूर्ण गावाचं भराडी जमातीसाठी आदर्श प्रारूप म्हणून पुढे येऊ शकते. या गावातील या जमातीची जातपंचायत ही जातीव्यवस्थाक पितृसत्ताकपणे काम करताना दिसत नाही. खण-मान-वळसवाशीन-दिव्य असले जातपंचायातीचे प्रकार येथे चालत नाहीत. जातपंचायत केवळ नावापुरतीच उरली आहे. काही तंटे-बखेडे झाल्यास या प्रकारच्या चुकीला पोलिसातच तक्रार करण्यात येते. 

भिक्षा प्रतिबंध करताना यांना कोणी त्रास दिला नाही असेही नाही, रोजगार सहज मिळाला असेही नाही, कसब सहज शिकता आले असेही नाही, जमीन विकत घेताना कोणी अटकाव केला नाही असेही नाही, पाईप लाईन करून पाणी आणताना कोणी विरोध केला नाही असेही नाही, बँकाने सहज चक्रा न मारता कर्ज दिले असेही नाही, त्याचे हप्ते वेळेवर भारता आले असेही नाही, दुकानदारी-धंदा व्यवस्थित चालला असेही नाही, गावाचे सरपंचपद सहज मिळाले असेही नाही, संघर्ष तर करावाच लागला आणि स्वतः धपकीलाच स्वयंसहाय्यतेचा ध्यास घ्यावा लागला! यातून एकूणच त्यांच्या तथाकथित गतिमानतेला अटकाव बसला हे मात्र खरे!

bhosalenr@gmail.com

लेखकाचा संपर्क - ९८२२३४८३६१

बातम्या आणखी आहेत...