आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:भयंकराच्या दुसऱ्या दारात...

राहुल बनसोडे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१७ नोव्हेंबर २०१९ या दिवशी चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला आता वर्ष झालं... वर्षभरातच कोव्हिड-१९ या विषाणूवर प्रभावशाली लस शोधण्याचे प्रयत्न जवळपास यशस्वी झाले आहेत. ही लस उपलब्ध झाल्यानंतर करोनावर नियंत्रण मिळविणे सोपे होईल आणि काही महिन्यांत त्याचा पुर्णतः बिमोडही करता येईल अशी खात्री असली तरी इथे लशीची आत्यंतिक निकड आपल्याला एका मोठ्या धोक्यापासून अंधारात ठेवते आहे. करोना विषाणू लॅबमध्ये जरी बनला नसला तरी पुढचा विषाणू लॅबमधूनच येण्याची शक्यता जास्त आहे, जो असे विषाणू बनवू शकतो तो लसही तयार करु शकतो. कोव्हीड-१९ नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे डीएनए आणि आरएनएच्या जनुकीय संशोधनात माणसाने प्रचंड प्रगती केली आहे, तो कदाचित आता नवा जीव जन्माला घालून देव बनू शकतो किंवा एखादा नवा विषाणू जन्माला घालून सैतानही बनू शकतो. माणसाने ह्या दोन्ही गोष्टी करु नयेत ह्यासाठी आता देवाची प्रार्थना करुन उपयोग नाही, आता आपल्याला माणसांचीच प्रार्थना करावी लागेल.

वर्षभरापूर्वी मानवी इतिहासात अनेक अंगानी उलथापालथ करणारे दशक संपत आले होते. जगभरात लोकशाही व्यवस्थांवरती प्रश्नचिन्हे उभी राहू लागली होती, पर्यावरणाचे प्रश्न गंभीर होत होते आणि वैज्ञानिक प्रगती वायुच्या वेगाने पुढे सरकावत होती. "जिवन म्हणजे काय?' हा अध्यात्मिक प्रश्न माणसाला किमान तीस हजार वर्षांपासून पडतोच आहे पण हाच प्रश्न वैज्ञानिक पातळीवर पाहताना अनेक नव्या गोष्टी समोर येत होत्या. ह्या पृथ्वीवरचे पशुपक्षी, वनस्पती, सर्व जिवंत गोष्टी पेशींपासून बनलेल्या आहेत आणि त्या पेशींचे कार्य आणि स्वरुप हे त्यांच्यात असलेल्या डीएनए आणि आरएनए मुळे ठरत असते. जीवन जर एखादी इमारत असेल तर डीएनए त्या इमारतीच्या पायाच्या आणि भिंतीच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या विटा आहेत. ज्याला विट समजली त्याला इमारत समजली. जीवनाची सगळी भिडस्त ही ह्या डीएनएच्या विटांवर अवलंबून असल्याने कुठली विट कुठल्याप्रकारे काम करते आणि अशी विट प्रयोगशाळेत तयार करता येईल का ह्यावर दशकभर अनेक संशोधने चालू होती, त्यातूनच पुर्णतः कृत्रिम जीवन बनविण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञांनी सुरु केले होते. तीन वर्षांपूर्वी ह्याच महिन्यात कॅलिफोर्नियातल्या क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये संशोधन करणारे फ्लॉईड रोमेजबर्ग हे प्रयोगशाळेत कृत्रिम जीवन जन्माला घालण्याच्या बरेचसे जवळ पोहचले होते आणि पुढच्या टप्प्यात लवकरच कृत्रिम जीवन जन्माला घालता येईल असा विश्वास काहींना वाटू लागला होता. ज्या दिवशी माणूस फक्त रसायनांचा वापर करुन हलती बोलती जिवंत गोष्ट तयार करेल त्यादिवशी अनेकांच्या मनात असलेली "देव' नावाची संकल्पना मोडून पडेल अशी भीती आज काहींना वाटते तर माणूस त्याच्या कल्पनेतल्या परमेश्वराला रिटायर करुन त्याची जागा घेण्यासाठी आतुर झाला आहे असेही काहींचे म्हणणे आहे. पण तरीही गेल्यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत तर माणसाला कृत्रिम जीवन तयार करण्याची पद्धत पुर्णतः सापडली नव्हती.

सरत्या दशकाला निरोप देणारा डिसेंबर २०१९ महिना तसा फार आशादायी नव्हता. सोशल मीडियातून धार्मिक लोकं इतर धर्माच्या लोकांवर आरोप-प्रत्यारोप करीत होते, माध्यमाचा वापर करुन हुकूमशाही सरकारे अधिक बळकट होत होती, मध्यपूर्वेतले संघर्ष टोकाला गेले होते, कोट्यवधी निर्वासित लोक आश्रयासाठी देशोदेशीच्या सीमांवर भणंगपणे फिरत होते, लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन निवडून आलेली बहुसंख्यांकवादी राष्ट्रे धार्मिक आणि जातीय दंगलीच्या सावटाखाली जगत होती आणि धर्माधारीत राष्ट्रवाद आपली जागा आणखी पक्की करीत होता. हे बदल इतक्या वेगाने होत होते की इतक्या पटकन इतक्या साऱ्या गोष्टी कशा बदलू शकतात ह्यावरच काहींचा विश्वास बसत नव्हता तरीही परिस्थिती वेगाने बदलत होती खरी. पण ह्या सगळ्या गोष्टी लहान वाटाव्यात अशी एक घटना चीनच्या वुहान शहरात आकार घेत होती. डिसेंबर म्हटले की कॉर्पोरेट आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांचे फिरस्तीचे दिवस. निरनिराळ्या देशांत जाऊन तिथे असणऱ्या आपल्याच कंपनीच्या ब्रॅचला भेट देणे, नवी शहरे पहाणे, आपल्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांशी चर्चा करणे, आणि ह्या शहरांमध्ये असलेल्या थीम पार्क्समध्ये जाऊन फोटो काढून घेणे हा ह्या लोकांचा आवडता क्रम त्या दिवसांतही व्यवस्थीत चालू होता. डिसेंबरच्या शेवटी मात्र सिंगापूर, मलेशिया वा थायलंडसारख्या शहरात फिरायला गेलेल्या लोकांना मात्र काही वेगळे अनुभव येत होते. ह्या देशांच्या विमानतळावर चेकींग प्रचंड वाढले होते पण विमानतळावरचे कर्मचारी प्रवाश्यांचे सामान तपासण्याऐवजी प्रवाशांच्या शरीराचीच तपासणी जास्त करीत होते. अनेकांना ही नेहमीची प्रोसेस वाटत होती तर काहींना ही गोष्ट खटकू लागली होती. सिंगापूरच्या वैद्यकीय वर्तुळातील खाजगी चर्चा ह्या काळजीने भरलेल्या होत्या, चीनवरुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची शारिरीक तपासणी करावी असे काही वैद्यकीय अधिकारी म्हणू लागले होते.

१ जानेवारी २०२० उजाडला त्यादिवशी जग बरेचसे मागच्या पानावरुन पुढे जात आहे असे अनेकांना वाटत होते. चीनच्या वुहान शहरात मात्र परिस्थीती आलबेल नव्हती. एरव्ही माणसांच्या गर्दीने गजबजलेल्या मच्छीबाजाराचा परिसर त्यादिवशी सील करण्यात आला होता. पीपीई किट घातलेले काही लोक तिथल्या अनेक वस्तुंच्या पृष्ठभागावरुन काही नमुने गोळा करीत होते. वुहानमध्ये एका विचित्र आजाराने ग्रासलेल्या लोकांना झालेला आजार हा विषाणूंमुळे झालेला असुन त्याचा उगम हा वुहानचा मच्छीबाजारात झाला आहे अशा एक निष्कर्षाप्रत चीनचे शास्त्रज्ञ पोहचले होते. ह्या रोगाला वुहान न्युमोनिया असे नाव देऊन चीनमधल्या लोकांनी समाजमाध्यमात चर्चाही सुरु केल्या होत्या ज्यावर तिथल्या सरकारने तातडीने प्रतिबंध लादले. दरम्यान हाँगकाँग, सिंगापूर, तैवान ह्या देशांनी चीनवरुन येणाऱ्या लोकांची कडक तपासणी सुरु केली. आठवड्याभरात ह्या आजाराला कारणीभूत असलेला विषाणू हा माणसासाठी नवा असल्याचा निष्कर्ष बाहेर आला. ह्यानंतर चारच दिवसांनी वुहानवरुन थायलंडमध्ये गेलेल्या ६१ वर्षीय प्रवाशाला हा रोग झाल्याचे निष्पण्ण झाले. वुहानमध्ये सुरु झालेला व्हायरस आता जगातल्या इतर भागांमध्ये पोहचायला सुरुवात झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेने ह्या परिस्थीतीवर अभ्यास करायला सुरुवात केली होती, येत्या आठवड्यात नवीन पेशंट न सापडल्यास ही साथ संपून जाईल अशा आशेवर काही संशोधक आले होते,पण ही आशा निराशेमध्ये बदलली. लवकरच ह्या रोगाचे दोन नवीन पेशंट सापडले आणि हा रोग संसर्गजन्य असल्याच्या शक्यतेला बळकटी मिळू लागली. वीस जानेवारी रोजी वुहान शहरात ह्या रोगाचे १३९ रुग्ण होते, चीनमध्यल्या बिजींग आणि शांघाईमध्येही हा रोग पसरु लागला होता आणि अमेरीका, दक्षिण कोरीया आणि जपानमध्येही पोहचला होता. दुसऱ्या दिवशी वुहानच्या इस्पितळांमध्ये गर्दी वाढू लागली होती. ३१ जानेवारी रोजी वुहानच्या शहरात सुरु झालेल्या साथीने २००३ मध्ये आलेल्या सार्सच्या साथीचे उच्चांक मोडले होते. ह्या आजाराने आत्तापर्यंत ११००० लोकांना बाधीत केले होते तर २५८ लोकांचा बळी घेतला होता. एव्हाना जगभर चीनमध्ये असे काही घडते आहे ह्याची बातमी पोहचली होती, अनेक देशांमध्ये बातमीच्या सोबत करोनाव्हायरसही पोहचला होता.

जगभरातल्या शहरांमध्ये करोना व्हायरस पोहचल्यानंतर तिथे वुहान शहरात झालेल्या गोष्टींचीच आवृत्ती पुन्हा सुरु झाली. सुरुवातीला काही शे, मग काही हजार आणी मग लाखो लोक बाधित झाले. लाखो लोक बाधित झाल्याने हजारो लोक मृत्युमुखीही पडू लागले. ह्या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी काही देशांनी लॉकडाऊनचा मार्ग पत्करला पण त्यावेळी कुठलेही विशेष औषधोपचार उपलब्ध नसतांना वा कुठलीही लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यता नसतांना लॉकडाऊनचा निर्णय नेमका का घेतला गेला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही कारण लॉकडाऊन एक ना एक दिवस उठवावाच लागणार होता आणि त्यानंतर लोक एकत्र येणारच होते आणि संसर्गही वाढणारच होता. ह्या रोगांपासून आजचे मरण उद्यावर ढकलण्यास व्यवस्थांना यश आले तरी उद्या उगवतोच. ज्या देशांनी लॉकडाऊन करण्यास नकार दिला वा तिथल्या लोकांनी लॉकडाऊनला सहकार्य केले नाही तिथे करोनाबाधितांची संख्या वाढत राहिली, लॉकडाऊनमध्ये गेलेल्या देशांना रोगाशी लढा देण्यासाठी पूर्वतयारी करण्यात निश्चितच वेळ मिळाला, ह्या वेळात काही देशांच्या वैद्यकीय व्यवस्थांना तात्पुरती मोठी हॉस्पिटल्स जरी उभी करता आली तरी संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी ह्या लॉकडाऊनचा विशेष उपयोग झाला नाही. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाले, लाखों लोकांचे रोजगार गेले, अनेकांना आपल्या प्रॉव्हिडेड फंडातून पैसे काढावे लागले, आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर भयंकर परिणाम झाला. ज्या अतिव काळजीने लॉकडाऊन करण्यात आला होता त्याच्या उलट बेफिकरीने लॉकडाऊन संपविण्यात आला आणि संसर्गाचे प्रमाण वाढूनही लोकांनी ह्या रोगाला गांभिर्याने घेणे सोडून दिले. सप्टेंबर महिन्यांत अनेक देशांमध्ये कोव्हीडची पहिली मोठी लाट येउन संसर्ग होणाऱ्यांचे प्रमाण काही लाखांत गेले. ह्याच काळात पूर्णतः प्रभावी तर म्हणता येणार नाही पण बरीचशी उपयोगी ठरतील अशी काही औषधे बाजारात उपलब्ध झाली. लाखो लोक जसे बाधीत होत होते तसे लाखो लोक रिकव्हरही होऊ लागले. ज्यांच्या ओळखीतले लोक असे सहज रिकव्हर झाले त्यांना ह्या रोगाची विशेष भीती उरलेली नाही पण ज्यांच्या ओळखीतले वा कुटुंबातले कुणीतरी ह्या रोगाचे बळी गेलेत त्यांच्या मनात ह्या रोगांविषयी भीती अजुनही शिल्लक आहे.

ह्या महिन्याच्या सुरुवातीपासून भारतात करोनाबाधितांची संख्या चमत्कारीकरित्या प्रचंड वेगाने कमी होतांना दिसत आहे. हा रोग कोट्यवधी लोकांना आधीच होऊन गेलाय आणि त्यांना ते समजलेलेही नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये कदाचित प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे असे काही तज्ञांचे म्हणणे आहे तर काहींच्या मते प्रचंड दुषित पाणी प्यावे लागत असल्याने भारतीय लोक आधीपासूनच अशा रोगांशी लढण्यास सक्षम आहेत. अनेकांमधली करोनाची भीती आता पूर्णतः संपली असुन त्यांनी मास्क घालणे सुद्धा बंद केले आहे आणि असे असूनही बाधितांची संख्या आटोक्यातच आहे. दिवाळीच्या काळात खुपसे लोक घराबाहेर पडले असून भेटीगाठीही वाढल्या आहेत त्यामुळे कदाचित संसर्ग पुन्हा वाढू शकेल पण तो नेमका किती वाढेल ह्याबद्दलही तज्ञांमध्ये एकमत नाही. लॉकडाऊनच्या काळात लोकांना भीतीमुळे ह्या रोगावर लवकर लस यावी असे वाटत होते तर सप्टेंबरमध्ये मृतांचे प्रमाण वाढू लागले तेंव्हा लशीविषयी प्रचंड आशा निर्माण झाली होती. पण आता रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने लोकांना पुढे लस मिळाली तरी ती ते घेतीलच ह्याची लसनिर्मीती करणाऱ्या कंपन्यांना खात्री नाही. अर्थात हे चित्र सगळ्यांच ठिकाणी सारखे आहे असेही नाही. कोव्हीडची दुसरी आणि तिसरी लाट हरयाणा आणि दिल्लीसारख्या ठिकाणी परत आली असून तिने पुन्हा लाखो लोकांना बाधित करण्यासाठी सुरुवात केली आहे, अशीच मोठी लाट देशाच्या इतर भागांमध्ये येण्याची शक्यता आत्ताही नाकारता येत नाहीच आणि समजा भारतात दुसरी लाट आली नाही तरी जगाच्या इतर भागांत करोनाचा कहर अद्याप थांबलेला नाही. सध्या अमेरीका, रशिया, इंग्लड मध्ये करोनाची दुसरी लाट आलेली असून ती पहिल्या लाटेपेक्षाही जास्त भयंकर आहे आणि तिथली हॉस्पिटल्स पुर्णतः भरुन गेल्याने हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. ह्या देशांच्या सगळ्या आशा आता लशीभोवती केंद्रीत झालेल्या असून गेल्या आठवड्यात फायजर आणि मॉडेर्ना ह्या कंपन्यानी केलेल्या चाचण्यांमधल्या लशी ९५% यशस्वी असल्याचे अहवाल दिले आहेत. ही लस लोकांना उपलब्ध झाल्यानंतर करोनावर नियंत्रण मिळविणे सोपे होईल आणि काही महिन्यांत त्याचा पुर्णतः बिमोडही करता येईल असे आपल्याला वाटू शकते पण इथे लशीची आत्यंतिक निकड आपल्याला एका मोठ्या धोक्यापासून अंधारात ठेवते आहे.

करोना व्हायरसच्या संसर्गाची सुरुवात चीनमध्ये झाल्याने आणि त्या देशाने ह्या रोगावर बरेचसे नियंत्रण आणल्याने हा व्हायरस चीननेच 'बनविला' आहे अशा कॉन्स्पिरसी थिअरीज अनेकांनी वाचल्या असतील, कित्येकांच्या गप्पांमध्येही हा विषय आलाच असेल. काहींनी व्हायरस चीनमध्ये सुरु झाला तरी तो दुसऱ्या देशांनी तिथे सोडला असावा असाही संशय व्यक्त केला आहे. तज्ञांनी मात्र हा व्हायरस निसर्गात असलेल्या इतर करोना व्हायरसचेच एक रुप असल्यासे स्पष्ट केले असून केवळ आधी हा व्हायरस माणसांपर्यंत पोहचला नव्हता म्हणून तो अस्तित्वातच नव्हता असे म्हटलेले नाही. हा व्हायरस कदाचित वटवाघूळ किंवा अशाच प्राण्यांपासून आलेला असून लॅबमध्ये तयार केला गेलेला नाही आणि त्याच्यावरती असलेल्या मुकुटाच्या आवरणावर असलेल्या टोकांचे काम हे बरेचसे खेळण्यातल्या बंदुकीतल्या कपाटाला चिकटणाऱ्या गोळीतल्या सक्शन पंपप्रमाणे आहे. अशीच काहीशी साधने तुम्ही कपडे लावण्याच्या हँगरवर वा काचेला धरुन ठे‌वणाऱ्या साधनांवरही पाहिली असतील. करोना व्हायरस इतका प्रभावी असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्या आवरणावर असलेले हे सक्शन पंप जे माणसाच्या पेशीला घट्टपणे चिकटतात आणि मग त्या पेशीमध्ये शिरकाव करतात.

करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तसा त्यामुळे होणाऱ्या कोव्हीड-१९ ह्या रोगांवर औषध शोधण्यासाठी आणि त्यावर लस बनविण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या होत्या ज्यासाठी त्यांनी ह्या व्हायरसची इत्यंभूत माहिती मिळविली होती. ह्या व्हायरसच्या आरएनएची संपूर्ण माहिती डिसेंबरमध्येच उपलब्ध होती आणि त्या माहितीच्या आधारे ह्या व्हायरसवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी हा व्हायरस लॅबमध्ये कृत्रिमरित्या पुन्हा जन्माला घालण्याचे प्रयत्न सुरु केले होते. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियातल्या आणि मार्चमध्ये स्विडनमधल्या शास्त्रज्ञांनी ह्या कामात आपल्याला यश आल्याचे जाहिररीत्या सांगितले होते, ह्याशिवाय अनधिकृतरीत्याही अनेकांनी हा व्हायरस सिंथेटीक मार्गाने बनविल्याची शक्यता नाकारता येत नाही. रसायने वापरुन काहींनी जसा हा व्हायरस पुन्हा तयार केला तसे अशाच काही तंत्रांचा वापर करुन काहींनी ह्या व्हायरसचे पार्टही तयार केले, ज्यात त्या काटेरी मुकुटावर असलेल्या सक्शन पंपासारख्या भागाचाही समावेश होतो. व्हायरसच्या आरएनए मधला हा पार्ट एकदा कृत्रिमरित्या तयार करता आला तर मग त्या पार्टला तोडणारे तंत्रही विकसित करण्यात येऊ शकते. माणसाला आजपर्यंत माहिती असलेल्या लशीमंध्ये रोगाचा व्हायरस अतिशय दुबळा करुन वा मारुन तो द्रवावाटे माणसाच्या शरीरात टोचला जात असे ज्याच्याशी माणसाच्या रोगप्रतिकारक पेशी लढा देऊन त्या व्हायरसशी कसे लढायचे ते शिकून घेत. त्यानंतर पुन्हा जिवंत व्हायरस जरी शरीरात आला तरी त्याच्याशी कसे लढायचे आहे हे रोगप्रतिकारक पेशींना माहित असल्याने व्हायरसचा बिमोड होई आणि माणसाला त्याचा संसर्ग होत नसे. मॉडर्ना आणि फायजर कंपन्यांचे लशीचे तंत्र मात्र पुर्णतः वेगळे आहे. करोना व्हायरसच्या आरएनएमधून काटेरी आवरणाचा तेवढा भाग तपासून तसान तसा भाग कृत्रिमरित्या तयार करण्यात आला असून तो लशीद्वारे माणसाच्या शरीरात टोचला जातो आहे. प्रत्यक्ष व्हायरसचा ह्यात काहीही संबध नसल्याने ह्या लशी प्रचंड सुरक्षितही आहेत आणि अतिशय यशस्वी देखील. करोनाव्हायरसवर इतर अनेक कंपन्यांनीही लशी बनविल्या असून त्याही कदाचित खूप यशस्वी होतील पण त्या फायझर आणि मॉडेर्नाच्या लशी इतक्या प्रभावी असणार नाहीत.

करोना व्हायरसमुळे अवघे जग बदलून गेले, ह्यामुळे होणाऱ्या प्रचंड वाताहतीतून अनेक देश अजूनही सावरलेले नाहीत आणि काही देशांमध्ये परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. एकदाची ती लस घेऊन टाका आणि मिटवा हे सगळं असे अनेकांना वाटत असेल पण ही लस बनविण्याच्या नादात माणसे आता लॅबमध्ये व्हायरस बनवायला शिकली आहेत, त्या व्हायरसचे नेमके पार्ट शोधून त्यावर लस बनवायला शिकली आहेत. व्हायरस हा फक्त आरएनए बेस्ड असल्याने त्याला पुर्णतः जिवंत जीव म्हणता येणार नाही पण ह्याच विज्ञानातून डीएनएची निर्मिती केली जाऊ शकते ज्यातून माणूस कदाचित कृत्रिमरित्या नवा जीव घडवू शकेल...त्याही आधी करोना व्हायरस सारखेच निरनिराळे व्हायरसही बनवू शकेल आणि त्यावरची लसही बनवू शकेल. करोना व्हायरस लॅबमध्ये जरी बनला नसला तरी पुढचा व्हायरस लॅबमधूनच येण्याची शक्यता जास्त आहे, जो असे व्हायरस बनवू शकतो तो लसही तयार करुच शकतो पण तो लस तयार करीलच असे नाही आणि केली तरी ती सगळ्यांना देईलच असेही नाही. कोव्हीड-१९ नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे डीएनए आणि आरएनएच्या जनुकीय संशोधनात माणसाने प्रचंड प्रगती केली आहे, तो कदाचित आता नवा जीव जन्माला घालून देव बनू शकतो किंवा एखादा नवा व्हायरस जन्माला घालून सैतानही बनू शकतो. माणसाने ह्या दोन्ही गोष्टी करु नयेत ह्यासाठी आता देवाची प्रार्थना करुन उपयोग नाही, आता आपल्याला माणसांचीच प्रार्थना करावी लागेल.

rahulbaba@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser