आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करोना... कॅमेरा.. अॅक्शन:साथ...

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करोना व्हायरस... अनेक घटना अन् अनेक कहाण्या... याच विषयावर चित्रपट काढण्यासाठी सध्या जगभरात चढाओढ सुरू आहे

राजकुमार तांगडे

करोना व्हायरस... अनेक घटना अन् अनेक कहाण्या... याच विषयावर चित्रपट काढण्यासाठी सध्या जगभरात चढाओढ सुरू आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आघाडीचे दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांनी लिहिलेली ही खास ‘पटकथा’ ‘दिव्य मराठी रसिक’च्या वाचकांसाठी...

सीन पहिला

स्थळ- शेतशिवार

पात्र –संजू, त्याची बायको कोमल आणि दहा आकरा वर्षाची रेवा...

""पप्पा, आजीनं अंकलला फोन करायचा सांगीतलाय पटकन...'' हा आवाज शिवारभर पसरतो...परिसरात कुठे फवाऱ्याचा, मळनीयंत्राचा, ट्रँक्टरचा आवाज येतोय.. बैलाच्या गळ्यातल्या घंट्याचा आवाज येतो..बैला पुढे बांदावर लाल टमाट्याचा ढिग पडलेला आहे... त्याच ढिगावर एक टोपले ठेवलयं. संजू टोपले घेऊन वळतो..तशी त्याची बायको कोमल आणि मुलगी रेवा बेदरकारपणे माळवं उपटताना, तोडताना दिसतात... जवळ जवळ सर्व शेत उद्ध्वस्त होताना दिसतं....

सीन दुसरा

स्थळ- शेतावरची कोप...

पात्र- सात-आठ वर्षाचा शुभम आणि बाजेवर पडलेली म्हातारी आजी, टमाट्यावर ताव मारणारी गाय..

परत तोच आवाज येतो...परत गळ्यातल्या घाटीचा आवाज.. गोठ्यातल्या दावणीत गाय माळवे खाताना दिसते.. तीच्या हलणाऱ्या जबड्याकडे शुभम एकटक पहातो... क्षणभर आजीचे हात-पाय दाबायचे विसरतो. बाजेला खिळलेली आजी त्याला कण्हत आवाज देते... आजी -आरे शुभ्या झोपला का काय...? तसा तो हात पाय दाबायला लागतो... शुभम - व्हय गं आजी... गाईला टमाटे आंबट लागत असतेनं?.. आज्जीला बोलताना खोकला येतो.. शुभम- आज्जी खोकताना तोंडावर पदर लावना... आजी- मला काही रोग येत नाही...कटाळा आलाय जगायचा.. देवबी कुठं लपुन बसलाय कनु...... हात पाय दाबतानाच तो फ्लॅशबॅकमध्ये जातो.

सीन तिसरा

स्थळ -मंदीर...

पात्र-पुजारी, एक पोलीस आणि शुभमसह डोकावून पाहाणारी काही मुलं...

शुभम आणि इतर काही मुलांसमोर पुजारी गावातील मंदिराला कुलूप लावतो. समोर एख भिकारी बसलाय, त्यालाही तिथून हुकसावतो आणि मंदिराच्या भिंतीला नोटीस चिकटवतो... इतक्यात पोलीसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज ऐकू येतोे...मुलं पळतात...

सीन चौथा

स्थळ- शेतातली कोप... पात्र -आजी आणि शुभम ..............

हात पाय दाबतानाच शुभम भानावर येतोय शुभम -आजी देवाला कोंडून टाकलय पंचवीस तारखी पस्तोर.. मंग देव कसा कोन्हाला नेईन. आजी- रोगच तसा हेना.. देव तरी काय करीन कुठं कुठं पुरनं...? शुभम -आजी देव काय काय कामं करतय... आजी - सगळचं करतु आपल्याला...जन्म देतु, खावु घालतो, नेहतु बी... शुभम- म्हणजी मला आई-पप्पानं नाही देवानं जन्म देला...? आजी -आई पप्पा देवच असतेत.. शुभम -मंग ते मंदिरात कामुन नाही राहात..? आजी -आपलं घरचं मंदिर असतय... शुभम (कोपीकडे न्याहाळत)- मंग ते कुडाच कामुन हे...? गावातल्या देवाचं दगडाच हे...आत फरशी हे... आजी- ते लोकानं बांधून देलय... शुभम - मंग आपल्या पप्पाला कामुन नाही बांधून देल..? आमच्या वर्गातल्या कलीमच्या अल्लाला तर लाईस्पिकर देलय लोकायनं...आपल्या देवाला मंडप देलाय सरकारनं..व्हय आजी आपल्यालाबी मंडप देला असता सरकारनं त् काकाबी गावातच राहीला असता.... आजी - काकाला फोन तरी लाव...लेकरू कुठं आडकल काय माहीत. शुभम जागे वरूनच आरोळी देतो..पप्पा अंकलला फोन लावा... 

सीन पाचवा

स्थळ- माळव्याचं शेत.. कुटुंबाचे माळवं उपटण्याचे काम सुरूच आहे. शुभमच्या आवाजाने संजय वाकलेल्या अवस्थेतून उभा राहतोय. ताठलेलं शरीर कडाकडा मोडायला कमरेत वळवतो तर त्याची नजर पांदीच्या वाटाकडे जाते. पांदीच्या वाटेनं दोन लेकरं, काही मानसं आणि तीनचार बाया... त्यात एक पोटुशी, डोक्यावर पिशव्या घेऊन रस्ता तुडवताना दिसतात...मळणी यंत्राच्या धुराळ्यामुळे थोडं अंधुक दिसतं. तो काही क्षण एकटक पहातो..ते जवळ जवळ आल्या नंतर नीट दिसतात .. संजय - मला आधी वाटलं आपला राजूचं हाई कनु... त्या दोघी कुठं म्हणून कावऱ्या-बावऱ्या होवून ऊठून पहातात...त्यांची नजर रस्त्यावर जाते...तशी रेवा तोंडाला टॉवेल बांधते....

सीन सहावा

वाटेने येणारे गलीतगात्र झालेले आहेत...डोक्यावरच्या पिशव्यांनी मोठ्यांना तर पायाला आलेल्या फोडांनी लहानांना पाय उचलत नाही... चप्पला-बुटं हातात घेतलेले आहेत.. खुप दिवसाचे उपाशीपण व पायपीट त्यांच्या चेहऱ्यावर दिसते...लहान मुलांना मोठी मानसं चला जवळ आलं म्हणून पळायला बळ देताहेत... एक मुलगा वाटेत गळून मटकन बसतो... मुलगा - ये दादा, आठ दिवस झाले रातन् दिवस चालतोय. तु नुस्त जवळ आलं आलंच म्हणतूस..पाचशे किलोमिटर झालं असनं... वाटसरू - आता बस...आता दोनीकशे राहीलं आसनं....

सीन सातवा

मुलगा बोलत बोलत पांदीवर चढतो..त्याला संजू दिसतो. ते पाणी मागतात..तो अंतरावरुन पाणी देतो...सगळेच येऊन बसतात... मुलांची नजर टोमँटो-काकड्या खाणाऱ्या बैलावर पडते... दुसऱ्या क्षणाला ती मुलं त्याच्यावर खायला तुटून पडलेली दिसतात... थोड्या वेळाने मोठी माणसं पण खायला लागतात...

सीन आठवा

वाटसरू बाई दगडाची चुल मांडताना दिसते झाडाखाली..एक बाई उपट जात्यावर ज्वारी भरडते... विहीरीवर एकजण कमी पडलेल्या चऱ्हाटाला रूमाल बांधून पाणी शेंदताना दिसतोय.. कुणी पाट्यावर वाटणं वाटतयं..कुणी सरपण मोडताना दिसतयं...संजूची बायको त्यांना मदत करते... संजू लेकराच्या पायाला हिरव्या पाल्याचा रस लावताना दिसतोय.

संजू - हे बघा सगळं इथच हे.. तुम्ही सोनं म्हणतान त्...ते बी मातीतच निघतयं..पोट भरनं अवघड नाही हो..त्याच्यासाठी हजार कोस जायची गरज नाही, त्यांनी जिथल्या तिथंच तयार करून ठुलयं...आमचा भाऊ बी (रानाकडं हात दाखवत) हे पडीत ठुन पोटभरायला गेलाय पुण्याला...बरं पोट भरायला म्हणतान तर तुम्ही इथं आल्यावर मला सिमीट,लोखंड माघीतलं का ?...वावरात पिकणारं अन्नच मागीतल ना ?...मी नकू जावू म्हणीत होतो..आता म्हतारीन सारखा धोशा धरलाय... आजीनं अंकलला फोन लावायचा सांगितला. शुभम ओरडत संजूकडे पळत येतो

सीन नववा

सगळे पंगत धरूण केळीच्या पानावर कन्या घेऊन खाताहेत. बाजूला बसलेला संजू  भावाला फोन लावतो. राजूभैय्या या नावाकडे एकटक पहातो. फोनवर आपण ज्या ग्राहकाशी संपर्क करत आहात तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे किंवा बंद आहे...म्हणून रट लावतो...

सगळ्यांची तोंड खाताना एक सुरात ऐकायला येतात...

बातम्या आणखी आहेत...