आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीक्षा:मराठी संस्कृती आणि मराठी कादंबरी

रणधीर शिंदे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी कादंबरीला दीड शतकाहून अधिकची परंपरा आहे. कादंबरी संस्कृती वाहक असते. आधुनिक मराठी समाजाचे दर्शन विविध टप्प्यावरील कादंबरीतून झालेले आहे. मात्र मराठी समाज संस्कृतीचे विशाल असा दर्शनबंध मराठी कादंबरीकारांनी साकार केले का असा प्रश्न आहे. एकोणिसावे शतक ते स्वातंत्रपूर्वकाळातील मराठी कादंबरीतील मराठी संस्कृती ही कोणत्या प्रकारची आहे. कादंबरीकारांनी संस्कृतीतले कोणते प्रश्न व दृष्टिकोण साक्षात केले. एकोणिसाव्या शतकात आणि पुढेही नेमाडे यांनी वर्णिल्या प्रमाणे यमुनापर्यंटन, मुक्तामाला व मोचनगड या प्रवृत्ती बळकट व प्रबळ दिसतात.

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘साहित्यसंवाद’ या उपक्रमार्तंगत गेल्या आठवड्यात आभासी माध्यमाद्वारे मराठी कादंबरीवर महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेत नामवंत अभ्यासकांनी सहभाग घेतला. मराठी कादंबरी परंपरेवर काही एक महत्त्वाचा प्रकाश या चर्चेतून पडला. कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या बीजभाषणाने या चर्चेस आरंभ झाला. पठारे यांनी मराठी कादंबरीची परंपरा सामर्थ्ये सांगून लेखक आणि कालस्वर व कादंबरीच्या सर्जनशक्यतेसंबंधी मूलभूत चिंतन मांडले. मराठी कादंबरीला गंभीर समीक्षक नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

प्रत्यक्ष कादंबरीकारांची निर्मिती प्रक्रिया व त्यांच्या दृष्टिबिंदूंची उकल कादंबरीकाराच्या मनोगतातून झाली. लेखकाच्या समाजवाचनाची दृष्टी त्यांनी मांडली. तसेच ‘मराठी कादंबरीची समीक्षा तोकडी आहे का?’ या विषयावरील चर्चेत प्रत्यक्ष कादंबरी आणि तिची समीक्षा यात अतंराय असल्याचे नोंदवले गेले. कादंबरी समीक्षेचे वेगळेपण आणि बव्हंशी तिच्या मर्यादा अभ्यासकांनी नोंदवल्या. ‘समीक्षेला गोमेसारखे अनेक पाय असतात’ या भालचंद्र नेमाडे यांच्या विधानाची आठवण दत्ता घोलप यांनी मराठी समीक्षेतील ज्ञानशाखीय दृष्टीअभाव सांगितला.

‘सांस्कृतिक बदल आणि मराठी कादंबरीतीले स्थित्यंतरे,’ व ‘मराठी कादंबरी जागतिकीकरणाला भिडली आहे का?’ या विषयावर महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेचा समारोप डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या भाषणाने झाला. कादंबरी वाङ्मय प्रकाराचे वेगळेपण सांगून सामाजिक अनुभव कादंबरीत किती घनतेने मांडले जातात, यावर कादंबरीची सरसता अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची मराठी कादंबरी दोन भागात विभागल्याचे त्यांनी सांगितले. परिवर्तनशील स्वरूपाची धारा (मार्क्सवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी) आणि दुसरी पारंपरिक मूल्यव्यवस्थेचे गौरवीकरणाची करणारी कादंबरी परंपरा त्यांनी सांगितली.

या चर्चेत मराठी कादंबरी परंपरा स्थितीगतीवर विविध दृष्टिकोणातून प्रकाश टाकला. मराठी समाज, आधुनिकता, संस्कृती, काळ, भवताल ते आजची कादंबरी संबंधी विविधांगी चर्चा झाली. भालचंद्र नेमाडे यांचे कादंबरीलेखन व विचार प्रभावाची दृश्य-अदृश्य सावली समर्थन-विरोध स्वरूपात अभ्यासकांच्या मांडणीत होती. काही ज्येष्ठ मंडळींचा बोलण्याचा सूर हा आत्मकथनात्मक होता.

या चर्चासत्राने ऑनलाइन माध्यमावरील चर्चेला गंभीर वळण दिले. विशेषतः कोरोना काळात समजमाध्यमावर जे अफाट गाजरगवत उगवले होते, त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा गंभीर झाली. सामूहिक चर्चेत अस्मितावादी खोडसाळ दृष्टीने अडथळे आणण्याचा देखील प्रयत्न झाले. चर्चेसाठी विषयसूत्रे नेमकी व सुसंगत स्वरूपाची होती. सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने काही एक चर्चा होणे अपेक्षित होते. तसेच अभ्यासकांच्या मांडणीत एकंदरीत मराठी कादंबरी केंद्रवर्ती ठेवून सूत्ररूपाचा उच्चार असायला हवा होता. समारोपाकडे येताना एकूण चर्चेचे सार काहीएक मूल्यविधानात्मक स्वरूपात यायला हवे होते. कादंबरीकडे प्रत्येकानी एकेक दृष्टी निश्चित करून मांडणी केल्यामुळे हत्ती आणि सात आंधळ्यांच्या कथेची आठवण होते. ज्याला मराठी कादंबरी जशी वाटली तशी ती त्यांनी मांडली.

मराठी कादंबरी परंपरेचे वाचन का.बा.मराठे, वि.का.राजवाडे, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे व हरिश्चंद्र थोरात यांनी मौलिक स्वरूपात केले आहे. अशा प्रकारच्या चर्चाची फलश्रुती महत्त्वाची असते. ‘नुसते उगवले त्याची चर्चा करुन सांस्कृतिक कार्य होत नाही, तर नीट पेरणे, नीट जोपासणे व विध्वंसक प्रवृत्तीची कीड नष्ट करणे, हे अधिक सांस्कृतिक आहे. तेच अधिक चर्चास्पदही आहे’ या १९८४ सालच्या नेमाडे यांच्या विधानाचे स्मरण या निमित्ताने व्हावे. आधुनिक मराठी कादंबरीचे ‘संशयाचे आणि श्रद्धेचे साहित्यशास्त्र’ या दृष्टिबिंदूतून हरिश्चंद्र थोरात यांनी मराठी कादंबरीचे वाचन केले आहे. तर मराठी कादंबरीत उच्चशिखरे नाहीत या बद्दलची खंत म.द.हातकणगलेकर यांनी व्यक्त केली होती. तसेच मराठीत द्रष्टा कादंबरीकार नसल्याची खंत रा.ग. जाधव यांनी व्यक्त केली होती.

मराठी कादंबरीला दीड शतकाहून अधिकची परंपरा आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर इंग्रज संपर्कातून कादंबरी साहित्यप्रकाराचा उदय झाला. आरंभकाळातच कादंबरी प्रवाहात विविध धारांचा उदय झाला. या दीड शतकातील कादंबरीचा प्रवास मराठी समाजाच्या संस्कृती संदर्भात निष्पन्न झाला. त्यामुळे मराठी संस्कृती अंतरंगाचे दर्शन तीमधून होणे स्वाभाविक आहे. अर्थात हे त्या त्या काळातील कादंबरीकारांच्या मगदुरावरही ते बरेच अवलंबून राहिले. कादंबरी सारख्या प्रकारातून एका अर्थाने संस्कृतीचे दर्शन होत असते. कादंबरी संस्कृती वाहक असते. आधुनिक मराठी समाजाचे दर्शन विविध टप्प्यावरील कादंबरीतून झालेले आहे. संस्कृती या संकल्पना एकरंगी नाही. ती गुंतागुंतीची आहे. एका भाषिक संस्कृतीत विविध उपसंस्कृती नांदत असतात. अशा विशाल समाजाच्या संस्कृती दर्शनाचे अंकन कादंबरी सारख्या दीर्घ लांबीच्या साहित्याप्रकारातून होत असते. मात्र मराठी समाज संस्कृतीचे विशाल असा दर्शनबंध मराठी कादंबरीकारांनी साकार केले का असा प्रश्न आहे. तसेच कादंबरीसारख्या प्रकारातून ऐतिहासिक समकालीनत्वाचे विश्वसार्ह प्रकटीकरण झालेले असते. व्यक्ती आणि समाज यांच्यातील विविध प्रकारच्या आंतरक्रियाचे महाजाळे कादंबरीतून साक्षात झालेले असते. एकोणिसावे शतक ते स्वातंत्रपूर्वकाळातील मराठी कादंबरीतील मराठी संस्कृती ही कोणत्या प्रकारची आहे. कादंबरीकारांनी संस्कृतीतले कोणते प्रश्न व दृष्टिकोण साक्षात केले. एकोणिसाव्या शतकात आणि पुढेही नेमाडे यांनी वर्णिल्या प्रमाणे यमुनापर्यंटन, मुक्तामाला व मोचनगड या प्रवृत्ती बळकट व प्रबळ दिसतात. या प्रवृत्तीचाच कमी अधिक विस्तार पुढे ही दिसेल.

मराठी समाजसंस्कृती वाटचाल, स्थिंत्यतराची रूपे कादंबरीतून साक्षात झाली. दीर्घकाळातील मध्यमवर्गाची उपस्थिती, त्याचा वर्ल्ड व्हयू, प्रभुत्वसंबंध व मराठी समजाची चर्चा मराठी कादंबरीतून साक्षात झाली. गद्य आणि कथनात्मक अवकाशामुळे त्यात कल्पशीलतेचा अधिक स्वातंत्र्यशील आविष्कार झाला. आधुनिक मूल्यव्यवस्था व विविध रूप तत्त्वांनी ती घडली. कुटुंब, विवाहसंस्था, स्त्रियांचे प्रश्न ते विचारदृष्टीचे आविष्कारण झाले. एकोणिसाव्या शतकातील आधुनिक दृष्टी आणि परंपरा यांच्यातील संस्कृती संघर्ष भूमी कादंबरीतून आकाराला आली. तर विसाव्या शतकातील पहिल्या अर्धशतकात विविध विचारसरणीच्या, संस्कृती उपस्थितीचा त्यावर प्रभाव पडला. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील नुकत्याच दाखल झालेल्या सुशिक्षितांच्या वास्तवाचा व त्यांच्या मनोराज्याचा आविष्कार झाला. फडके-खांडेकरांच्या कादंबरीतून समाजशील ध्येयवादाचे आदर्शवादाचे स्वरूप साकार झाला. खांडेकरांच्या कादंबऱ्यांतील भारतीय मानवीयतेचे आवाहकरूप लाभले तर फडक्यांच्या कादंबऱ्यांतून शिक्षित संस्कृतीतील रंजनप्रिय स्वप्नाळू प्रीतबंधनाचा आविष्कार झाला.

साठच्या दशकातील भारतीय समाजाचा अनेक विस्तार केंद्राचे प्रतिबिंब कादंबरीत आले. ग्रामीण संस्कृतीचा बहुविध स्वरूपाचा प्रदेश मराठी कादंबरीने जसा व्यापला तसेच भाऊ पाध्ये सारख्या कादंबरीने महानगरीय संस्कृतीचा अवकाश व्यापला. आधुनिकवादातील विविध केंद्राच्या आविष्काराने कादंबरीचा प्रदेश गजबजला. अस्तित्ववादी तत्त्वज्ञान, मूल्यव्यवस्था, व्यक्तीदर्शनाने मराठी कादंबरीला नवे आयाम प्राप्त झाले. मानवी अस्तित्वशोधाला या संस्कृतिदर्शनाने नवी परिमाणे लाभली. संस्कृती परिघदर्शनाचा झालेल्या विस्तारामुळे अनेक नवे समाजदर्शने कादंबरीतून आली. त्याचे प्रदेश, बोली, मानवी संबंधाचे पैलू साक्षात झाले. त्यास वास्तववादाचा बहुमुखी आलेख लाभला. सपाट, नागर अलंकरणप्रिय कादंबरी पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संस्कृतीचा बहुविस्तार झाला. सत्तरनंतरचा संस्कृतिअवकाश तिच्या विविध तèहेच्या वास्तव रूपाबरोबर आत्मसमूह चिकित्सेच्या अंगाने प्रकटला. महाराष्ट्रीय संस्कृतीतील खाचखळग्यांचे अंतर्विरोधाचे बृहद चित्र आले. सहकार, जातवास्तव व शिक्षणसंस्कृतीचे बहुचित्रणे आली. दलित कादंबरीने जातसंस्कृतीतील सामाजिक वास्तवाचे व शोषणाचे सखोल चित्र मांडले. जोरकस सामाजिक दर्शना बरोबर कादंबरी रूपाचे भान विकीर्ण होत गेले. या पार्श्वभूमीवर ‘पृथ्वीला सोडून जसे मनुष्यत्व नाही, तसे अद्भुताला सोडून कादंबरीत्वही नाही’ हे वि.का.राजवाडे यांचे म्हणणे द्रष्टेपणाचे द्योतक होते.

आधुनिकतावादातील विविध दृष्टीचे चित्रण मराठी कादंबरीतून झाले. अनिल दामले, किरण नगरकर, श्याम मनोहर, मकरंद साठे ते प्रणव सखदेव सारखे लेखक आधुनिकतावादाने प्रभावीत झालेले आहे. दुसऱ्या बाजूला ग्रामीण परिसराचा कादंबरीतील पैसदृष्टी ही भालचंद्र नेमाडे यांच्या देशीवादाच्या मांडणीमुळे बदलली. आणि त्या प्रभावातून मराठी समूहाच्या भूमी संस्कृतीचे विविध पद्धतीचे चित्रण येऊ लागले. त्यामुळे देशीयतेच्या विचार आणि मराठी कादंबरी असे देखील त्यास परिमाण आहे.

इतिहासकथनाचा मराठी संस्कृती संदर्भात विविध पद्धतीने उपयोग झाला. एका बाजूला मराठी समाजाच्या इतिहहासकाळातील पूर्वदिव्यगौरवाचा स्मरणरंजनाच्या अंगाने प्रकटीकरण झाले तर अलीकडच्या हीच इतिहासभूमी चिकित्सा ताटस्थ्य व पर्यायी इतिहासशोधांच्या वाटांनी प्रकटली. नव्वदीच्या दशकात जागतिकीकरणाच्या बदलाने पालटलेल्या परिस्थितीचा प्रभाव कादंबरीवर पडला. त्यामुळे या नव्या काळस्थित्यतंराचे दर्शन मराठी कादंबरीतून होऊ लागलेले दिसते. नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीच्या आरंभ मनोगतात एक विधान आहेत. असे, ‘आजची स्थिती बिघडत जाते आहे असं जे अमूर्त वाटत असतं, ते एका गोष्टींच्या वेणीसारखं व्हायला लागलं. जे घडणार ते नेमकं केव्हा ते माहीत नाही, पण पुढ्यात नक्कीच आहे, असं जास्त जास्त वाटत राहिलं.’ या अस्वस्थ वर्तमानाचे बहुपेडी कथन व भविष्यातील आशंकेचे काहूर आजच्या कादंबरीकारांसमोर आहे. या आव्हानांतून उद्याची कादंबरी घडेल. मराठी संस्कृतीच्या वर्तमानाचा बहुस्वरीय नकाशा ती मधून साक्षात होईल अशी आशा करुया.

randhirshinde76@gmail.com

बातम्या आणखी आहेत...