आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कारगिल'च्या निमित्ताने...:ए मेरे वतन के लोगो...

रसिक टीम3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज "कारगिल विजय दिन'... २१ वर्षांपूर्वी ताशी नामग्याल नावाच्या एका मेंढपाळाने सर्वात अगोदर सीमेवरच्या पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली टिपल्या आणि सैन्याला सर्तक केले म्हणूनच हा दिवस आपण आज पाहू शकलो. भारतीय सैन्याचे कान-नाक आणि डोळा म्हणून ओळखला जाणारा हा सीमेवरचा मेंढपाळ अर्थात भटका समाज... मग ती सीमा काश्मीरलगतची असो वा लेह-लडाखची, या समुहाचे प्रश्न वेगळे आहेत, मागण्या वेगळ्या आहेत. युद्ध मग ते १९६२ चे असो वा अगदी अलिकडे घडलेले गलवाान खोऱ्यातील असो... सीमेवरच्या या मेंढपाळ समुहाने कायमच भारतीय सैन्याला मदत केली आहे. परंतू बदल्यात या समाजाला काय मिळालं...? कारगिलच्या या आजच्या शौर्य दिनानिमित्त सीमेवरच्या या भटक्या समुहांची कैफियत...

""जर तो माझा नवीनच विकत घेतलेला याक नसता तर मी इतक्या उंचीवर त्याला शोधायला गेलोच नसतो. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही १२ हजार रुपये जमवून मी तो याक घेतला होता. आणि जेव्हा तो हरवला तेव्हा मात्र मी धास्तावलो. साधारणपणे याक चरायला कितीही लांब अथवा उंचीवर गेले तरी सायंकाळी ते परत येतातच. मात्र हा नवा याक होता आणि म्हणूनच त्याला शोधायला मी एकेक डोंगर पालथे घालायला सुरूवात केली. अखेर याक तर मला सापडलाच परंतू त्याच्यासोबतच मला आणखी काही आढळले...''

कारगिलपासून साठ किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या किनारी असलेल्या "ताशी गोरखून' गावात राहणारा ५६ वर्षांचा मेंढपाळ ताशी नामग्यालला आजही ती घटना जशीच्यातशी आठवते. काही वर्षांपूर्वी संजय नहार यांच्या "सरहद' संस्थेतर्फे ताशी नामग्यालचा पुण्यात सत्कार करण्यात आला होता. ताशीच्या स्टॅनझीन दोर्जे या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ‘सरहद’ने उचलली होती. सत्काराला उत्तर देताना ताशी त्याची ती विलक्षण रोमांचकारी कथा सांगत होता.

"बाल्टिक सेक्टरमध्ये बर्फात याकचा शोध घेत होतो, तेवढ्यात मला समोर जुबारहिलमधील बर्फाच्या डोंगरात पाऊलवाट तयार झालेली दिसली. ही पाऊलवाट याक या प्राण्याची नव्हती. ती माणसांची असावी, असा संशय मला आला आणि सरळ पुढे गेलो. समोरचे दृश्य पाहून थबकलो. सलवार कमीज घातलेल्या सहा जणांच्या हालचाली सुरू होत्या. त्या बाजूला आमच्या गोरखून अथवा जवळच्या गावातील कोणी जाणे शक्य नव्हते. बर्फ वितळायला एक दीड आठवड्यातच प्रारंभ होणार होता. ही नक्कीच शत्रूची माणसे असणार. याक तर मला सापडला होताच... मी लगेचच माझ्या गोरखून गावात परतलो. ‘तीन पंजाब’ या लष्करी तुकडीतील काही जवान बटालिक या ठिकाणी तैनातीला होते. त्यांपैकी हवालदार बलविंदरसिंग याला भेटून माहिती दिली. बलविंदरसिंगने वरिष्ठांना फोन लागत नसल्याने पायी चालत जाऊन खबर दिली. तो दिवस होता २ मे १९९९. काहीतरी गंभीर घडत असल्याचे मला जाणवत होते… दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन मे रोजी मला बोलावण्यात आले. माझ्या बरोबर जवानांची एक टीम देण्यात आली. तेथील कमांडर बक्षीसाहेब मला म्हणाले, की ‘तुझी माहिती खरी असेल, तर तुझा सन्मान होईल. मात्र, त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.’

पाकिस्तानी शत्रूच्या अस्तित्वाची व प्रत्यक्ष हालचालींची माहिती देताना ताशी नामग्यालला आपण किती मोठी कामगिरी करीत आहोत याचा अंदाज नव्हता. काल ज्यांना पाहिले ते आज दिसतील का? ती पाऊलवाट बर्फामुळे नष्ट तर झाली नसेल ना… अशा अनेक शंका मनात घेऊन लष्करी ठाण्याला नोंद करून ताशी नामग्याल पुन्हा बाल्टिकच्या त्या पाकिस्तान सरहद्दीवर पोचला आणि त्याच्या आणि भारतीयांच्या नशिबाने आदल्या दिवशी दिसलेले सहा जण त्या ठिकाणी संशयास्पद हालचाली करीत होते. लष्करी तुकडीने आणि अधिकाऱ्यांनी ताशी नामग्यालला शाबासकी दिली आणि म्हणाले, ‘खूप महत्त्वाची बातमी तू दिली आहे. तुझा योग्य तो सन्मान केला जाईल.’

या घटनेनंतर १८ हजार फुट उंचीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ साली कारगिलचे युद्ध घडले आणि आजच्याच दिवशी म्हणजे २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने कारगिलवर विजयाचा तिरंगा फडकवला.

भारतीय सैन्याचे कान, नाक आणि डोळे असलेला सीमेवरचा ताशी नामग्याल आणि त्याच्यासारखा शेकडो लोकांचा हा मेंढपाळ समाज... मग सरहद कोणतीही असो.. जैसलमेर, काश्मीर अथवा लेह-लडाख... जेव्हा जेव्हा युद्धसदृश परिस्थिती उद‌्भवते, तेव्हा लष्कराला सर्वतोपरी मदत करणारे लोक हे सीमावर्ती भागातील मेंढपाळच असतात. सामान, दारूगोळा, रसद इ. वाहून नेणे, रात्री-अपरात्री रस्ता दाखवणे, अन्य आनुषंगिक कामे, शत्रूच्या हालचालींची खबर देणे, अशा अनेक गोष्टींकरता यांचीच गरज लष्कराला भासते. किंबहुना, त्याशिवाय त्यांना लढणे शक्यच होत नाही.

मात्र बदल्यात या लोकांना काय मिळतं...?

कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर बीबीसीचा एक प्रतिनिधी ताशी नामग्यालच्या घरी दाखल झाला होता. घराच्या भिंतीवर अनेक सन्मानचिन्हे आणि प्रशस्तीपत्रके... ताशीच्या शौर्याची गाथा सांगणारी... ताशीला मात्र आता हे सन्मानचिन्ह बघून बघून वीट आला आहे. तो म्हणतो,"अनेकांनी मला खुप आश्वासने दिली, मात्र पूर्ण कोणीच केली नाहीत. मला एकूण चार मुलं आहेत, मात्र एका मुलाच्या शिक्षणाचा अपवाद सोडता कोणीही त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी पुढे आले नाही.'

त्याच गावात राहणारी ताशी पुंचोक गावाच्या विकासाबद्दल खंत व्यक्त करताना म्हणते की, आम्ही स्वत: उपाशी राहिलो मात्र भारतीय सैनिकांच्या खाण्या-पिण्याची आबाळ होऊ दिली नाही. आमच्यासाठी मात्र कुणीच काही केले नाही.

लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी तर लोकसभेतच या गावची विदारक अवस्था सांगितली होती. सबंध देश कारगिल शौर्य दिवस साजरे करत असताना ताशी नामग्याल या लढवय्याच्या गावात मात्र बेसिक सुविधादेेखील नाहीत. साधे पिण्याचे पाणीदेखील त्यांना मिळत नाही. कारगिल ऑपरेशनअंतर्गत त्यावेळी या गावकऱ्यांची शेती आणि कुरणे सैन्याने ताब्यात घेतली होती जी आजपर्यंत या गावकऱ्यांना परत दिली गेलेली नाहीत.

भारताची नियंत्रण रेषा आणि घुसखोरांना रोखण्यासाठी उभारण्यात आलेले काटेरी कुंपण या दरम्यान धेरी, धाराती, सोहाला, भारुती, बालाकोट, डाब्बी, पंजानी, रामलुता, गालुता, सासुता, चाप्पर धरा, कांगा, डटोत, बसुनी फारवर्ड ही १४ गावे वसलेली आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा सर्वाधिक फटका यांना बसतो. सततच्या या कुरापतीना गावकरी कंटाळले आहेत. त्यांना शांततेने सुरक्षित जीवन जगावयाचे आहे.

अलिकडेच घडलेल्या लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या गावांची स्थिती तर याहून अधिक भयंकर आहे. १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धात येथील "चंगपा' या भटक्या समाजाच्या मेंढपाळांनी भारतीय सैन्यासाठी मार्गदर्शक दलाचे काम अत्यंत चोखपणे बजावले होते. समुद्रसपाटीपासून १४ ते १८ हजार फुट उंचावरच्या या भागात अनेक ठिकाणी गाड्या जाऊ शकत नाहीत. अशावेळी स्थानिक अनेक प्रकारे मदत करू शकतात. या भागात जेव्हा जेव्हा युद्धसदृष्य स्थिती उद्भवते तेव्हा हे मेंढपाळ जखमी जवानांना नेण्यापासून धान्य पोहचवण्यापर्यंतची मदत करतात. मुख्यत्वे "पश्मिना'चा व्यवसाय करणारा हा समुह ज्या बोलीभाषेचा वापर करतो तीच भाषा चीनसंबंधी गोपनिय माहिती देण्यास उपयुक्त ठरते.

भारत आणि चीन यांच्यातील वादात गुरं चरण्याची आपली कुरणं नेमकी कोणाच्या हद्दीत जातील हा त्यांच्यासमोरचा महत्वाचा प्रश्न आहे. लडाख थंड वाळवंट म्हणून ओळखलं जातं. इथे सामान्य वातावरणातही गुरांसाठी चारा शोधणं अवघड असतं. त्यामुळे स्थानिक लोक आपल्या गुराढोरांसाठी त्या कुरणांवर अवलंबून आहेत जिथे सध्या दोन्ही देशांचे सैन्यजवान समोरासमोर उभे ठाकलेत. चीन दरवर्षी कुरणं आपल्या ताब्यात घेत चालल्याने आमच्या जनावरांच्या चरण्याची जागा कमी होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. युद्धजन्य वातावरणामुळे मेंढपाळांना नेहमीपेक्षा अधिक उंचीवरची कुरणे शोधावी लागत आहेत. मात्र जवळपास उणे ३४ अशा हाडे गोठवणाऱ्या थंडीची जनावरांनाही फारशी सवय नसल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक संख्येने वाढत आहे. या वर्षभरात जवळपास तीन लाख मेंढ्यांच्या कळपामध्ये प्रजननाच्या काळात तब्बल ८५ टक्के नवजात मेंढ्यांचा मृत्यू झाला. याच मेंढ्यांपासून दर वर्षी साधाारणपणे ४५ टन लोकर निघते ज्यातूनच जगप्रसिद्ध पश्मिना शॉल आणि इतर लोकरीचे कपडे तयार होतात ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात हजारो डॉलर्स इतकी किंमत आहे. जर भारताने या समाजाकडे पुरेसे लक्ष दिले नाही तर अर्थव्यवस्थेला तर फटका बसेलच शिवाय सैन्याचे नाक-कान-डोळेदेखील शिल्लक राहणार नाहीत.

सध्याचा वाद पूर्व लडाख भागातील गॅलवान खोरं आणि पँगॉन्ग तळ्याजवळ उफाळला आहे. याच पँगॉन्ग तळ्याच्या जवळच असलेल्या मनेराक गावचे स्थानिक "बीबीसी'शी बोलताना म्हणाले की, पूर्वी आम्ही आमचे याक आणि घोडे गवताळ मैदानात सोडायचो. मात्र, आता ते परत येत नाहीत आणि त्यांना शोधण्याची आम्हाला परवानगी नाही. आमची बरीचशी कुरणं चिनी सैन्याने ताब्यात घेतली आहेत आणि उरलेलीही ताब्यात घेतील, अशी भीती आहे. आमच्या जनावरांच्या चरण्याच्या जागा गेल्या तर आमच्या लोकांची जीवनरेषाच संपणार आहे. तसं झाल्यास इथे राहण्याचं कारण उरणार नाही.

सीमेवर कुठलीही अडचण असेल तेव्हा सर्वांत आधी इथली संपर्काची साधनं बंद केली जातात. गावातल्या लोकांसाठी ही मोठी समस्या आहे. या भागात फक्त बीएसएनएल काम करतं. काही अघटित घडलं तर संपर्क साधण्यासाठी 70 किमी दूर कोरजोक या गावाला जावं लागतं.

सीमेवीर गावे अत्यंत संवेदनशील असतात. दहशतवाद्यांचे पहिले लक्ष्य असतात. त्यामुळे तिथे उद्योगधंदे, व्यवसाय यांना अजिबात चालना मिळत नाही. उद्योग नाही म्हटल्यावर कुठल्याही सोयी नाहीत. जे काही आहे, ते लष्कराच्या अस्तित्वामुळे आणि त्यापुरतेच. तातडीने वैद्यकीय मदत लागली, तर लष्कराचे व निमलष्करी दलांचे डॉक्टर किंवा लष्करी वाहन उपलब्ध नसल्यास त्या रुग्णाचे काय होत असेल, याची कल्पनाही करवत नाही. काही सरकारी संस्थाही ही परिस्थिती ओळखून कामे करतात, पण हे प्रयत्न फारच त्रोटक ठरतात. नीट, ठोस व्यवसाय वा उत्पन्न नसल्यामुळे गरिबी पाचवीलाच पुजलेली. मग या लोकांनी करायचे काय? जीवनशैलीला आकार द्यायचा तरी कसा? कदाचित त्यामुळेच असेल; पण या गावांना जे काही थोडेबहुत साहाय्य मिळते, ते लष्कराकडून अथवा राज्यशासनाकडूनच. त्या अर्थी ही गावे जास्त करून लष्करावरच अवलंबून राहतात.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी नद्या, तळी किंवा बर्फाळ डोंगर आहेत. या ठिकाणी सीमा निश्चित झालेल्या नाहीत. मात्र असे असतानाही इथला समुह हा मनाने आणि शरीरानेही आम्ही भारतीय असल्याचे अभिमानाने सांगतात. नुसते सांगत नाहीत तर प्रत्यक्ष ते सिद्ध करून दाखवतात. आता जर त्यांच्याच उपजिविकेचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न उपस्थित होत असेल तर फक्त असले शौर्य दिवस साजरे न करता या समाजासाठी काही ठोस कृती करावी लागेल, अन्यथा हा समुह जर इथून निघून गेला तर नाक-कान आणि डोळ्यांशिवाय आपली काय अवस्था होईल याचा विचार केला तरी थरकाप उडेल...

divyamarathirasik@gmail.com

(सौजन्य : बीबीसी, सरहद संस्था)