आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक:विशेष संपादकीय: स्वप्नांची लस घेऊन आलो आहोत, तुमच्या अंगणात!

4 महिन्यांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

२०२० आलं, तेव्हा खूप उमेद होती. नवी आशा होती. एपीजे अब्दुल कलामांपासून अनेकांनी या वर्षावर कधीचीच पैज लावून ठेवली होती. त्यामुळं, हे वर्ष खास असणार अशी अपेक्षा होती. झालं मात्र भलतंच. 'कोरोना' नावाचा विषाणू घेऊन हे वर्ष दाखल झालं आणि त्यानं जगण्याचं परिमाण बदलून टाकलं. आशा-अपेक्षांसह माणसं तळघरात कोंडली गेली. हातावरचं पोट असणारी माणसं आपापल्या घरट्याकडं परतताना मृत्युमुखी पडली. मरणाचं तांडव घेऊन हे वर्ष आलं. भीतीनं सगळं आयुष्य व्यापून टाकलं. अंधारानं त्याची दहशत वाढवली. प्रकाशानं साथ सोडली. जगाच्या इतिहासातलं काळंकुट्ट पर्व नोंदवलं गेलं. माणसं माणसांपासून दुरावली. तोंड बंद झालं. जगणं ठप्प झालं. आता कधी सगळं पूर्वपदावर येणार, या प्रश्नानं सारंच साशंक झालं.

पण, जाता-जाता या वर्षानं पुन्हा प्रकाशाचा किरण दाखवला. सगळंच संपलं नाही, अशी खात्री दिली. गेल्या अनेक वर्षांत जगासमोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नांवर काही उत्तरं दिली. आणि, तमाच्या तळाशी पुन्हा दिवे लागले. 'कोरोना'वर मात करत जग पुढे झेपावले.

भारतातल्या वातावरणाचा अन्वयही नव्याने लागू लागला. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणानं साजरी केलेली दिवाळी, यावर्षी जागतिक संदर्भात पुन्हा भेटीला आली. आणि, सगळंच संपलं नसल्याची जाणीव जगाला झाली. सामान्य माणसाच्या हातातून चाललेली व्यवस्था पुन्हा त्याच्या हातात आली.

ज्या अमेरिकेत १९०१ मध्ये राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन या कृष्णवर्णीय अभ्यासकाला 'व्हाइट हाऊस'मध्ये डिनरला बोलावलं, म्हणून हलकल्लोळ माजला होता. 'व्हाइट हाऊस'मध्ये ब्लॅक! 'व्हाइट हाऊस' धुऊन काढण्याचे सल्ले तर तेव्हा दिले गेलेच, पण त्यानंतर पुढची तीस वर्षं 'व्हाइट हाउस'नं अशी 'चूक' कधीच केली नाही. त्या व्हाइट हाऊसमध्ये जाणारा राष्ट्राध्यक्षच 'ब्लॅक' असणं, म्हणजे 'येस, वी कॅन' हेच तर होतं! बराक ओबामांनी २००८ मध्ये ते घडवलं होतं. बारा वर्षांनंतर कमला हॅरिस यांच्या तोंडी आता तीच आशा आहे. तीच भाषा आहे. तेच स्वप्न आहे. विजयानंतर बोलतानाचं त्यांचं उत्फुल्ल 'स्माइल'ही अगदी ओबामांशी नातं सांगणारं आहे. इतिहास पुन्हा घडतो आहे, याची खात्री पटावी, असा हा अमेरिकेचा ताजा निकाल आहे. असंही म्हणायला हवं, 'बराक ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जग विसरू लागलं होतं. तो पुन्हा सापडू लागला आहे. बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामान्य माणसाचं हे सक्षमीकरण पुन्हा अधोरेखित झालं.

माणूसपणाचीच नव्यानं फेरमांडणी व्हावी, असा हा उमेदीचा काळ आहे. 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' नव्हे, तर 'सर्व्हायव्हल ऑफ द फ्रेंडलिएस्ट' हे आता अभ्यासक मान्य करू लागलेत. तशी 'थिअरी' मानववंशशास्त्रज्ञ मांडू लागले आहेत. माणूस प्राणी आपण समजतो, तसा नि तेवढा दुष्ट नाही. 'स्पर्धा आणि स्वार्थ' हा जगाचा मूळ स्वभाव नाही. 'सहजीवन, सर्वसमावेशकता, संवाद आणि सहकार्य' यावर आपलं जग उभं आहे. हे सोपं जग आपण अवघड करून टाकलंय. विखार ही नव्या जगाची मातृभाषा होत असताना, माणूस नावाचा प्राणीच त्यामुळं संकटात आला आहे. अशावेळी जगाची होत जाणारी ही फेरमांडणी नवे बळ देणारी आहे.

'माणसं मुळात वाईट आणि स्वार्थी असतात', या आजवरच्या गृहितकाला रत्गर ब्रेग्मन या डच इतिहासकारानं जोरदार तडाखा दिला. त्याचं

Humankind: A Hopeful History हे पुस्तक नुकतंच आलंय. अवघ्या ३२ वर्षांच्या या तरूणानं विचारवंत म्हणून मोठा ठसा जगावर उमटवलाय. अगदी 'फिट' आणि बळकट असणा-या अनेक जाती संपुष्टात आल्या. पण, सहजीवनानं जगणा-या जाती मात्र तगून राहिल्या. 'कुत्रा' हे त्यासाठीचं उत्तम उदाहरण शास्त्रज्ञ देतात. लांडगा अधिक दमदार आणि हुशार खराच. पण, त्याच्या हिंस्त्र लबाडीनं तो एकटा पडला आणि संपत गेला. कुत्रा मात्र त्याच्या 'फ्रेंडली', प्रेमळ स्वभावानं सर्वांच्यासोबत जगत राहिला!

माणूसही इथवर आलाय, ते त्याच्यातल्या स्पर्धेमुळं नाही. सहजीवनामुळं. संवादामुळं. याउलट, आताच्या माणसापेक्षाही तगडा असणारा 'माणूस' (निअंदरथल) संपला तो एकटेपणामुळं. आपला माणूस टिकून राहिला ते द्वेषामुळं नाही, प्रेमामुळं. वाईटपणामुळं नाही, चांगुलपणाची मूलभूत ओढ असल्यामुळं.

'कोरोना'च्या या संकटकाळानं माणसाचं माणूसपण पुन्हा जागं केलंय.

या संकटकाळात, मंदिरं बंद होती, आषाढी वारीही चुकली. पण, कधी डॉक्टर, कधी पोलीस, कधी शिक्षक, तर कधी पत्रकाराच्या रुपात विठूराया भक्तांना भेटत गेला. आणि, माणूसपणावरची ही श्रद्धा अढळ होत गेली. नातेवाईकही आले नाहीत, तेव्हा परक्या धर्माच्या जीवलगांनी अंत्यसंस्कार केल्याच्या बातम्या उमटल्या आणि बुद्धाची करूणा जागी झाली. येशूच्या- गुरू नानकांच्या दयेनं या विषाणूवर मात केली. आणि, पैगंबरांसारख्या प्रेषिताच्या रूपात धावून आलेल्या अनोळखी माणसांनी, 'बुडती हे जन, न देखवे डोळा' या कळवळ्यानं गरजूंना साथ दिली.

उमेद आणखी काय असते?

आम्ही तर या कालावधीत अखंड तुमच्यासोबत होतो. असा एकही दिवस नसेल की आम्ही तुमच्या घरात आलो नाही.

आपण सोबत असणं, हीच तर खरी आशा आहे.

संकटं येतात आणि जातात. मानवी समुदायानं अशा कित्येक आपत्तींवर मात केलीय. आपली अनंत ध्येयासक्ती आणि अनंत आशाच महासागरालाही नमवत असते, हे मानवी समुदायानं या वर्षात अधोरेखित केलं.

आता, आणखी पुढं जायचं आहे. नव्या स्वप्नांसह. 'सबसे खतरनाक होता है, हमारे सपनों का मर जाना!' स्वप्नांची ही लसच कोणत्याही विषाणूचा हल्ला परतवून लावू शकणार आहे.

ही स्वप्नं घेऊन आज आलो आहोत पुन्हा तुमच्या अंगणात. तुमच्या अंतरीचे दिवे उजळून टाकण्यासाठी... 'दिव्य मराठी'चा हा दहावा दिवाळी अंक घेऊन!

हॅपी दिवाळी, सर्वांना.

आमच्या वाचकांना, जो आमचा केंद्रबिंदू आहे. लेखकांना, ज्यांच्यामुळे आमचे खरे लोकशाहीकरण झाले आहे.

जाहिरातदारांना, ज्यांच्यामुळेच ही वाचनसंस्कृती विस्तारत आहे आणि नव्या दिमाखात आपला देश जात आहे.

विक्रेत्यांना, ज्यांच्या अथक परिश्रमामुळेच आम्ही तुमच्या अंगणात रोज सकाळी येऊ शकतो.

आणि, आमच्या सर्व सहका-यांनाही, जे कोरोनाविरोधातले हे युद्ध लढत राहिले, म्हणून आनंदाचे हे पर्व येऊ शकले.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना, सन्मित्रांना खूप शुभेच्छा!

येस, वी कॅन!

बातम्या आणखी आहेत...