आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:तुर्की खरचं आपला शत्रू आहे...?

साजिद इनामदार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानने तुर्कीच्या राष्ट्रपतींची भेट घेतली आणि भारतीय सोशल मीडियावर एकच "दंगल' सुरु झाली, #तुर्की_भाग_आमिर_खान असा हिणकस हॅशटॅग चालवून त्याच्या विरोधात लाखांवर ट्विटरचा पाऊस पाडण्यात आला.पण हे काय आमिरसाठी नवीन नाही फक्त यावेळी राष्ट्रीय राजकारणातील या संदर्भासोबतच आमिरविरोधी टीकेला आता परराष्ट्रीय घडामोडींची देखिल किनार लावली गेली आहे.

नुकत्याच आपल्या "लाल सिंग चढ्ढा' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने तुर्कस्तानात गेलेल्या आमिर खानने राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्या पत्नी एमीन अर्दोआन यांची भेट घेतली. आमिरच्या चित्रपटांच्या चाहत्या असलेल्या एमीन यांनी हे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केल्यानंतर त्यावर भारतातील समाजमाध्यमांमध्ये एकच काहूर उठवले गेले. आमिरला पुन्हा एकदा ‘अँटी नॅशनल’ पदवी बहाल करून आणि #तुर्की_भाग_आमिर_खान असा हिणकस हॅशटॅग चालवून त्याच्या विरोधात लाखांवर ट्विटरचा पाऊस पाडण्यात आला. उजव्या विचारधारेच्या एकूणच इकोसिस्टमकडून आमिरला मिळालेल्या या प्रतिक्रियेमागे नवीन असे काहीच नाही. समाजमाध्यमांवर वावर असणाऱ्या नेटकऱ्यांना याची साधारण कल्पना असेलच की आपल्या विरोधी विचारांच्या व्यक्ती/संस्था यांना या ट्रोलधाडी कशाप्रकारे लक्ष्य करतात.

आमिरला अशाप्रकारे लक्ष्य करण्यामागे त्याने २०१५ साली "इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती मध्ये देशातील वाढत्या असहिष्णुता आणि मॉब लिन्चींगच्या घटनांबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ होता. राष्ट्रीय राजकारणातील या संदर्भासोबतच आमिरविरोधी टीकेला काही परराष्ट्रीय घडामोडींची देखिल किनार लावली गेली.

तुर्कीमध्ये २००२ पासून अर्दोआन आणि त्यांची जस्टिस अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट पार्टी (एकेपी) सत्तेत आहे. अर्दोआन यांनी भारताच्या काश्मीरमधील भूमिकेविरोधात फक्त ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामी देशांच्या समुहामध्येच नव्हे तर संयुक्त राष्ट्रात(यु. एन) देखील सातत्याने आवाज उठवला आहे. अर्दोआन सत्तेत आल्यापासून तुर्की आणि पाकिस्तानच्या संबंधांना देखील अधिकच उभारी मिळाली आहे. तसेच मागील काही वर्षांपासून अर्दोआन जागतिक पटलावर सुन्नी-मुस्लीम राष्ट्रांचा अघोषित पुढारी असणाऱ्या सौदी अरेबियाची जागा घेण्यासाठी आणि त्याचबरोबर आधुनिक तुर्की राष्ट्राला गतकाळातील ऑटोमन साम्राज्याचा उत्तराधिकारी भासवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

या सर्व घडामोडींचा विचार करता त्या देशातील बदलत्या सामाजिक आणि राजकीय स्थित्यांतराचा आणि त्याचा द्विराष्ट्रीय संबंधांवर उमटणाऱ्या पडसादाचा आढावा घेणे आवश्यक ठरते. नकाशातील तुर्कीचे भौगोलिक स्थान बघता या भूभागाचे जागतिक राजकारणात असणाऱ्या महत्वाविषयी आश्चर्य नसावे! पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याच्या पाडावानंतर मुस्तफा केमाल पाशा ‘अतातुर्क’ याच्या नेतृत्वाखाली १९२३ साली आधुनिक तुर्की राष्ट्राची स्थापना झाली. या स्थापनेत पुढाकार असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या दृष्टीकोनातून ऑटोमन साम्राज्याचा ऱ्हास हा युरोपियन सामाजिक आणि राजकीय आधुनिकता नाकारल्यामुळे झाला होता. आणि त्यामुळेच आधुनिक तुर्की राष्ट्राचा पाया घालताना त्यांच्या समोर युरोपियन राष्ट्रांचा आदर्श होता. स्वतः केमाल अटातुर्क पहिल्या महायुद्धापूर्वी युरोपात काही काळ वास्तव्यास होते आणि तेथील सामाजिक, सांस्कृतिक, आणि मुक्त वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर होता.

आधुनिक तुर्कीच्या राजकीय व्यवस्थेवर पुढील अनेक दशके ‘केमालीझम’ चा अर्थात अटातुर्कच्या विचारांचा प्रंचड पगडा होता. आणि हा प्रभाव अगदी विसाव्या शतकाच्या अखेर पर्यंत कायम होता. केमालीझमचा पाया हा प्रामुख्याने सेक्युलॅरिझम आणि प्रखर तुर्की राष्ट्रवाद यावर आधारलेला होता. आधुनिक तुर्की राष्ट्राचे पहिले राष्ट्रपती बनल्यानंतर अतातुर्क यांनी जाणीवपूर्वक तुर्कीला आपल्या अरब-इस्लामी प्रभावापासून दूर आणि युरोपियन आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने त्यांनी अनेक कठोर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक निर्णय घेतले. १९२४ सालापर्यंत फक्त नाममात्र शेष असलेली ऑटोमन ख़िलाफ़त बरखास्त करून टाकली. ‘फेज’ या पारंपारिक ऑटोमन पोशाखावर बंदी घालून युरोपियन हॅट घालण्यास प्रोत्साहन दिले. धार्मिक वक्फ संस्था, सुफी दर्गा आणि तेथील दर्विश यांवर अनेक बंधने लादली गेली. पुरुष आणि महिलांमध्ये लिंगाधारित भेदभाव, बुरखा पद्धती यावर बंदी घालण्यात आली आणि महिलांना देखील मतदानाचा हक्क (१९३०) बहाल करण्यात आला. नमाज आणि कुराण पठन तुर्की भाषेत करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले. अरबी लिपीचा त्याग करुन रोमन लिपी अंगीकारण्यात आली, कॅलेंडर बदलण्यात आले आणि धर्माधारित शरिया कायदा नाकारून स्वित्झर्लंडच्या धर्तीवर नागरी कायदा आणण्यात आला. तुर्कीच्या एका पूर्व सैन्यप्रमुखाच्या शब्दात सांगायचे झाल्यास, रेनेसाँ (पुनरुज्जीवन ) काळाचे जे महत्व युरोपसाठी आहे त्याच प्रकारचे महत्व अशा सांस्कृतिक बदलांचे तुर्कीसाठी होते, आणि हे बदल राबवण्यात सैन्याची भूमिका महत्त्वाची होती.'

मात्र तुर्कीमध्ये राज्यव्यवस्थेकडून राबवण्यात आलेल्या या सांस्कृतिक क्रांतीला सामाजिक क्रांतीची जोड नव्हती. येथे युरोपियन आधुनिकतेचा प्रभाव पडलेला वर्ग संख्येने कमी पंरतु समाजाचा अभिजात वर्ग असलेल्या लष्कर-नोकरशाही आणि प्रामुख्याने शहरी भागात मर्यादित राहिला. सामान्य जनतेमध्ये या मुल्यांचा म्हणावा तसा शिरकाव झाला नव्हता. आणि त्यामुळेच व्यक्तीशः अतातुर्क जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय असले तरी त्याने केलेल्या सांस्कृतिक बदलांना म्हणावा तसा जनाधार भेटला नाही. तुर्कीमध्ये सैन्याची भूमिका अतिशय महत्वाची राहिली आहे. सैन्याने नेहमीच केमालिझम आणि प्रजासत्ताक राज्यव्यवस्थेचा रक्षणकर्ता म्हणून स्वतःस पाहिले आहे. आणि त्यामुळेच ज्यावेळी या मुल्यांवर मर्यादा येत आहे असे वाटले तेव्हा सैन्याने वेळोवेळी बंड करून सत्तेत हस्तक्षेप केला आहे(१९६०,१९७१, १९८०, १९९७ आणि आता २०१६).

१९८०च्या दशकापासून तुर्कीने नव-उदारमतवादी आर्थिक धोरणांचा स्वीकार केल्यापासून कालांतराने आर्थिक संपन्नता लाभलेला नवमध्यम वर्ग तयार झाला. प्रामुख्याने तुर्कीच्या अ‍ॅनाटोलियन ग्रामीण भागातून शहरी भागात येऊन स्थायिक झालेल्या आणि आपल्या धार्मिक अस्मितांच्या अधिक जवळ असणाऱ्या या वर्गाने पूर्वीच्या युरोपियन आधुनिकतेचा आणि केमालीझमचा प्रभाव असणाऱ्या अभिजात वर्गासमोर आव्हान उभे केले. आणि त्यामुळेच एकीकडे राजकारणात सैन्याचा हस्तक्षेप नको असलेला आणि आपल्या धार्मिक अस्मितांच्या अधिक जवळ असणारा नवमध्यम वर्ग अर्दोआन आणि त्यांच्या एकेपी पक्षाला सत्तेत पोहचवण्याचे एक प्रमुख कारण ठरला. आजचा तुर्की, आधुनिक युरोपाधारीत अंगिकारलेली ओळख की अधिक जवळ वाटणारी अरब-इस्लामी धार्मिक-सांस्कृतिक अस्मिता या व्दंद्वात सापडलेला दिसतो.

भारत आणि तुर्की यांच्यातील द्विपक्षीय संबंधाकडे पाहायचे झाल्यास, मागील काही वर्षांत दोहों मधील सबंध काहीसे 'हॉट एंड कोल्ड' या प्रकारात मोडणारे राहिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जरी काश्मीरबाबत अर्दोआन यांनी वेळोवेळी वक्तव्य केले असले तरी आपणही त्यास वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. जसे २०१७ साली अर्दोआन यांच्या भारत भेटीच्या (३० एप्रिल - १ मे) अगदी काही दिवसांपूर्वी आपण सायप्रसच्या राष्ट्रपतींना अधिकृत भेटीवर बोलावले (२५-२९ एप्रिल २०१७) आणि दुसरीकडे त्यावेळचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अर्मेनियाच्या भेटीवर गेले आणि त्यांनी तेथील अर्मेनियन नरसंहार स्मरकास देखील भेट दिली(२४-२६ एप्रिल २०१७). सायप्रस आणि अर्मेनिया यांच्या बरोबरच्या आपल्या भेटीगाठी म्हणजे तुर्कीला दिलेला एक सूचक इशाराच होता. कारण हे दोन्ही देश म्हणजे तुर्कीची दुखरी नस! त्याचबरोबर मागील वर्षी देखील अर्दोआन यांच्या संयुक्त राष्ट्रात केलेल्या काश्मीरसंबंधी व्यक्तव्यामुळे पंतप्रधान मोदींनी तुर्कीची आपली दोन दिवसीय भेट रद्द केली होती.

असे सर्व असले तरी काश्मीरसारख्या वितुष्ट आणणाऱ्या मुद्यांना विलग (डीहायफनेट) करून द्विपक्षीय व्यापार, शत्रास्त्र निर्मिती, पर्यटन, फार्मा आणि इतर अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांचा भर राहिला आहे. आणि त्यामुळेच यावर्षी मार्च महिन्यात भारताने तुर्की सोबत १५,००० करोड रुपयांचा युद्धनौका बांधणी प्रकल्पाचा करार केला आहे. परराष्ट्र सबंध फक्त "ब्लॅक अँड व्हाईट' प्रकारात मोडणारे नसतात आणि त्यास अनेकाविध पैलू आणि "ग्रे झोन' असतात. बॉलीवुड ही भारताची "सॉफ्ट पॉवर' आहे आणि इस्लामी जगताचे एक टोक असलेल्या मोरोक्कोपासून तुर्की पर्यंत आणि दुसरीकडे अगदी चीनमध्ये सुद्धा बॉलीवुड चित्रपटांची आणि पर्यायाने आमिरची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच "कीबोर्ड वॉरीयर्स'च्या आमिर विरोधी लाखभर ट्विट्सने भारतातील धार्मिक उन्माद वाढण्यास कदाचित मदत होत असली तरी परराष्ट्र धोरणांवर याचा फारसा फरक पडत नाही. आमिरच्या या भेटीवर पडदा टाकण्यास, तुर्कीमधील भारताचे राजदूत संजय पांडा यांनी आपल्या अधिकृत ट्विटद्वारे आमिरच्या भेटीचे केलेले स्वागत आणि त्याचा भारताचा "सांस्कृतिक राजदूत' अश्या शब्दात केलेला गौरव यातच सर्व काही आले!

sajidinamdar@outlook.com

संपर्क- 9503139313