आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:"मंडूवाडीह'च्या आडचे वास्तव !

समीर गायकवाड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्तात मिळणारी बाई कुणाला नको असते? मंडूआडीहचे नाव बदलले जाईल मात्र त्याची मूळ ऐतिहासिक ओळख असणाऱ्या वेश्यांच्या अस्तित्वाच्या डंखाचे काय? हा डंख त्या बायकांनाच होत असल्याने समाजाला याची विषबाधा होत नाही. राजकारणी गेंड्याच्या कातडीचे असतात असं म्हणून आपण नाहक गेंड्याची बदनामी करत असतो. त्यांना सत्तेत बसवणारे तर आपणच असतो. गेंड्याच्या कातडीहून निबर आणि बधिर तर आपण आहोत ज्यांना कधीच हे भवतालचे शोषण दिसत नाही. मग तो मुंबईचा कामाठीपुरा असो, की पुण्याची बुधवार पेठ, की नागपूरची गंगाजमुना असो की असो शिखर तीर्थक्षेत्र बनारसच्या मंडूवाडीहमधले शिवदासपूर! आपल्याला फक्त यांची ओळख नकोशी आहे मात्र यांचं अस्तित्व हवं असतं हे कडवं असलं तरी सत्य आहे.

अलाहाबादचे "प्रयाग' नामकरण होऊन आता बरेच दिवस उलटून गेलेत. याच अलाहाबादमध्ये मीरगंज मोहल्ला नावाचा एक छोटासा भाग आहे. इथे वेश्यावस्ती होती आणि अजूनही आहे. याच मीरगंज मोहल्ल्यात पंडीत जवाहरलाल नेहरूंचा जन्म झाला होता. जन्मानंतर नेहरू इथेच दहाच दिवस होते. १९३१ मध्ये त्यांचा जन्म झालेली इमारत पाडली गेली. तरीदेखील या भागातील वेश्या वस्ती हटवण्यासाठी नेहरूंच्या नावाचा सतत आधार घेण्यात येत होता. या बायका बधत नाहीत हे लक्षात आल्यावर इथून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या शाळेचा आधार घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असणारे धनंजय चंद्रचूड तेंव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयातले मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांनी कायद्यावर बोट ठेवत मार्च अखेर पर्यंत ही वस्ती हटवण्यात यावी असा आदेश दिला. मात्र यासोबतच मीरगंजमध्ये चालणाऱ्या सज्ञान नसलेल्या कोवळ्या मुलींच्या विक्री व्यवहाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तेंव्हा उत्तरप्रदेश सरकारने मीरगंज मोहल्ला ही बेकायदेशीर वेश्यावस्ती असल्याचं शपथपत्र न्यायालयात दाखल केलं. वस्ती थोडीफार हटली. मात्र तिथल्या घरात बायका शोधणारी गिधाडं फिरू लागली. बायका पुन्हा आल्या. त्यांचे पत्ते बदलले मात्र व्यवसाय तोच राहिला. नंतर अलाहाबादचं प्रयाग झालं मात्र शहराचं काय? शहरांतल्या लोकांचं काय? लोकांच्या मानसिकतेचं काय? असो. हे प्रश्न विचारायचे नसतात. हे सर्व आता इतक्या दिवसानंतर उपस्थित करण्याचं कारण म्हणजे मंडूवाडीह!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वाराणसी शहराचं संसदीय प्रतिनिधित्व करतात तिथे आहे हे मंडूवाडीह. उत्तरप्रदेशचे आताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसापूर्वी या मंडूवाडीह रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बनारस रेल्वे स्टेशन असं नाव दिलं. रेल्वे प्रशासनाने आणि काही स्थानिक राजकीय व्यक्तींनी तशी मागणीही केली होती. सरकारकडून आजवर देशातील बऱ्याच शहरांची, ठिकाणांची, रस्त्यांची, स्थानकांची नावे बदलून झाली आहेत. यातली बहुतांश जुनी नावे ऐतिहासिक संदर्भ असलेली वा धार्मिक संदर्भ असलेली होती. मंडूवाडीह याला अपवाद होते. तरीही त्याचं नाव बदललं गेलं. याचा संदर्भ काशीशी असल्याने हे महत्वाचे ठरते. जगातील प्राचीन शहरांपैकी एक असा लौकिक असलेल्या काशीचेच दुसरे नाव वाराणसी आहे.

प्राचीन पौराणिक सोळा महाजनपदापैकी एक असणारे हे शहर पुरूरवाचा मूळ पुरुष असणाऱ्या काश राजाने वसवले होते म्हणून त्याचं नाव काशी होतं असा एक प्रवाद रूढ आहे. या महाजनपदाची राजधानी वाराणसी होती. काशीचे मगध, कौशल आणि अंग राज्यांशी तणावाचे संबंध होते असं इतिहासातून स्पष्ट होतं. त्यामुळे इथे सातत्याने अस्थिरता राहिली. त्यामुळे जनपदातील बहुसंख्य लोक राजधानी वाराणसीमध्येच राहू लागले. कालांतराने वाराणसी आणि काशी हे एकच झाले इतके याचे एकजिनसीपण झाले. वरुणा आणि असी नदीच्या ज्या भूमीत एकत्र येतात ती भूमी म्हणजे वरुणासी अशा अर्थाने वाराणसी हे नाव पडलं. वाराणसीची उभारणी होण्याआधी या जनपदाच्या बाह्य भागात जे मूळ रहिवासी होते ज्यांना आता घाटी भोजपुरीया म्हटलं जातं त्यांच्या भाषोच्चारणाची एक नजाकत आहे. यात एक गंमत देखील आहे. ते व चा उच्चार ब करतात. त्यांनी वाराणसीचं बरानसी केलं आणि पुढे जाऊन त्याचाच अपभ्रंश होऊन बनारस हे नाव ही रुढ झालं. वाराणसी, काशी यांचा नामोल्लेख विविध प्राचीन संस्कृत ग्रंथात आढळतो. तिथे बनारस कुठे आढळत नाही. मात्र अवधी, भोजपुरी साहित्यात बनारसचे प्राचीन उल्लेख आढळतात. असो. शतकापूर्वीपर्यंत या बनारसच्या बाहेर एक कसबावजा गाव होतं. मंडूवाडीह त्याचं नाव.

आताच्या भाषेत सांगायचं तर हे बनारसचं उपनगर होतं. या गावाला स्वतःची एक ओळख होती. संत रविदास यांचं जन्मस्थान म्हणून हे गाव प्रसिद्ध होतं. बकाल आणि अस्वच्छ वाराणसीचं अजस्त्र शहरीकरण होत गेलं तसं हा भाग देखील शहरात आला. मात्र याचं नाव कायम राहिलं. संत रविदास जातीने चर्मकार होते. शीखांचे पाचवे धर्मगुरू श्रीगुरु अर्जुन देव यांनी संपादन केलेल्या 'गुरू ग्रंथसाहिब' या शीखांच्या पवित्र धर्मग्रंथात १२९३ व्या पृष्ठावर संत रविदास यांच्या रचनांना स्थान दिलेलं आहे. मेरी जाति कुट बांढला ढोर ढोवंता नितहि बानारसी आस पासा ॥ अब बिप्र परधान तिहि करहि डंडउति तेरे नाम सरणाइ रविदासु दासा ॥३॥१॥ "माझी जात चांभाराची आहे. जो चामडं कसून आणि कापून आणतो. त्यासाठी मेलेल्या पशूला ओढावे लागते. हे सर्व बनारसच्या आसपास आम्ही करतो. मात्र माझं कर्तृत्व पाहून आता मोठे ब्राम्हण देखील मला नमस्कार करतात" असं संत रविदास या अभंगातून सांगतात. रविदास बनारसनजीक राहत होते हेही यावरून स्पष्ट होते.

अमृतलाल नागर यांनी "ये कोठेवालीया' यापुस्तकात तवायफ स्त्रियांचा इतिहास लिहिला आहे. या पुस्तकात पृष्ठ क्रमांक १६१ वर स्पष्ट लिहिलं आहे की मंडूआडीह हे शोषणाचं ठिकाण होतं. इथे बायका आणल्या जात आणि रीतसर त्यांचं शोषण केलं जाई. प्राचीन हिंदी साहित्यात याला संस्कृतीचे मुलामे चढवत नगरवधू परंपरा या भागात अस्तित्वात होती असे उल्लेख आहेत. "अंगुत्तरनिकाय' आणि "संखजातक'मध्येही याचे संदर्भ आढळतात. म्हणजेच या भागात मागासलेल्या जातीतील लोकांची आणि कथित नगरवधूंच्या नावाखाली वेश्यांची वस्ती होती. त्यामुळे या भागातील ह्या स्त्रिया कुठल्या जातीच्या असतील यावर वेगळं भाष्य करायला नको. तर या मंडूआडीहमध्ये समग्र उत्तर भारतातून मुली आणल्या जात असत. विसाव्या शतकात स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला, इथे लोकवस्तीही वाढली तसे या बायकांची अडचण वाटू लागली. यांना हद्दीबाहेर रेटण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यातून जन्म झाला शिवदासपूर रेड लाईट एरियाचा!

उत्तरप्रदेशातील एक कुख्यात आणि सर्वाधिक जुना असा हा रेड लाईट एरिया आहे. यात एक मोठा विरोधाभास आहे की जगभरातील हिंदूंचे आस्थास्थान म्हणून काशीला मान आहे आणि इथेच उत्तरेकडील सर्वात प्राचीन व मोठे देहव्यापार केंद्र आहे. याचे कधीच कुणाला वैष्यम्य कसे वाटले नसावे? "यत्र नार्यस्तु पूज्यते'चा इतका सहज विसर कसा पडतो हा प्रश्न इथे तर आणखीनच टोकदार आणि ठळक होतो. पुढे जाऊन देश स्वतंत्र झाला. मंडूवाडीहचे नाव चिटकून राहिले. उत्तरेकडील लोकांना या नावाचा इतिहास ठाऊक असल्याने हा एक निव्वळ देहभोगापुरताच हवाहवासा होता. काहींना यात जातीय अस्मिता दिसत होत्या त्यासाठी ते संत रविदासांच्या नावाच्या कुबड्या वापरतात. मात्र मुळात रविदास यांनीच ब्राम्हणांच्या विरोधात विद्रोहाची मांडणी न करता त्यांनी आपल्याला नमन केल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे या मुद्द्याला फारसं वजन कधीच प्राप्त झालं नाही. त्यामुळेच योगी आदित्यनाथ सरकारने जेंव्हा मंडूवाडीहचं नाव बदलून बनारस केलं तेंव्हा कुणीच फारशी खळखळ केली नाही. काहींनी मात्र याला संत रविदासांची ओळख पुसण्याचे कारस्थान संबोधलं मात्र या युक्तिवादाला जनाधार नगण्य लाभला.

योगी सरकारने नेहमीप्रमाणे ओळख पुसण्यासाठीचं नामी हत्यार म्हणून मंडूवाडीहचे बनारस केलं आहे. मात्र मूळ प्रश्नाचं काय झालं? मंडूवाडीह रेल्वे स्थानकापासून डीएलडब्ल्यूमार्गावर केवळ चार मिनिटांच्या अंतरावर शिवदासपूर हा वाराणसीचा कुख्यात रेड लाईट एरिया आहे. इथेच "चावल की गली' आणि "दालमंडी' या सांकेतिक नावाच्या वेश्यावस्त्यांच्या गल्ल्या आहेत. पहिल्यांदा इथे येणारा माणूस अक्षरशः भांबावून जातो. नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्सच्या (DLW) मैदानावर आतापर्यंत तीन सभा घेतल्या आहेत, या सभास्थानापासून हा भाग अवघ्या काहीशे मीटर अंतरावर आहे हे विशेष होय. बंगाल, बिहार, मध्य - उत्तर भारतातील बायका एकत्र कोंबल्या आहेत की काय असे वाटावे असे इथले चित्र दिसते. अजूनही इथे अल्पवयीन मुलींचे सौदे होतात. त्यांचे शोषण होते. पोलीस सातत्याने रेड टाकत असतात मात्र त्यांचीच आतून फूस आहे की काय अशी शंका यावी असा सगळा माहौल असतो.

जी गोष्ट गेली काही सहस्त्र वर्षे इथे चालू आहे त्याला जनतेने कधी आक्षेप घेतला नाही की आजवरच्या कोणत्याही राजकीय शासनकर्त्याने याबद्दल टाहो फोडला नाही. स्वस्तात मिळणारी बाई कुणाला नको असते? मंडूवाडीहचे नाव बदलले जाईल मात्र त्याची मूळ ऐतिहासिक ओळख असणाऱ्या वेश्यांच्या अस्तित्वाच्या डंखाचे काय? हा डंख त्या बायकांनाच होत असल्याने समाजाला याची विषबाधा होत नाही. राजकारणी गेंड्याच्या कातडीचे असतात असं म्हणून आपण नाहक गेंड्याची बदनामी करत असतो. त्यांना सत्तेत बसवणारे तर आपणच असतो. गेंड्याच्या कातडीहून निबर आणि बधिर तर आपण आहोत ज्यांना कधीच हे भवतालचे शोषण दिसत नाही. मग तो मुंबईचा कामाठीपुरा असो, की पुण्याची बुधवार पेठ, की नागपूरची गंगाजमुना असो की असो शिखर तीर्थक्षेत्र बनारसच्या मंडूवाडीहमधले शिवदासपूर! आपल्याला फक्त यांची ओळख नकोशी आहे मात्र यांचं अस्तित्व हवं असतं हे कडवं असलं तरी सत्य आहे. मंडूवाडीहच्या आड असलेले हे घटक समाजात जेंव्हा सन्मानपात्र होतील तेंव्हा कुठलीही ओळख लपवण्याची गरज पडणार नाही.

sameerbapu@gmail.com

संपर्क - ९७६६८३३२८३

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser