आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Sandesh Kudkarkar Rasik Article On "Abu": Interesting Documentation Of Stressful Relationships

थर्ड आय:"अबू' : तणावपूर्ण नात्यांचं रंजक डॉक्युमेंटेशन

संदेश कुडतरकर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"अबू' हा माहितीपट केवळ एका गे फिल्ममेकरची, एका पाकिस्तानी मुस्लिम कुटुंबाची, एका धर्ममार्तंड पित्याची गोष्ट न राहता रक्तामांसाच्या माणसांची गोष्ट होऊन जातो आणि आपल्याला आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी देऊन जातो. अशा कलाकृती नकळत आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तर देतच असतात, पण आपले पाय जमिनीवर ठेवण्याचंही काम करत असतात. स्वतःचा नव्याने शोध घ्यायला भाग पाडत असतात.

पाकिस्तानी - कॅनेडियन दिग्दर्शक अर्शद खान याचा "अबू' हा माहितीपट मुबी या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर नुकताच रिलीज झालाय. ऐंशी मिनिटांचा हा माहितीपट न चुकवण्याची असंख्य कारणे आहेत. फाळणीपूर्व भारतात वाढलेल्या आणि नंतर पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या एका मुस्लिम पित्याच्या आणि त्याच्या मुलाच्या (स्वतः दिग्दर्शकाच्या - अर्शदच्या) नात्याची ही गोष्ट. पण माहितीपट म्हटलं की, जवळजवळ सर्वच प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर जे एका रटाळ, संथ मुलाखतींचं, निवेदनाचं क्लिशेड चित्र उभं राहतं, त्याला हा माहितीपट यशस्वीपणे छेद देतो. "अबू'ची सुरुवातच अ‍ॅनिमेशनने साकारलेल्या अर्शदच्या एका भयाण स्वप्नाने होते. त्यानंतर हळूहळू तो आपल्या वडिलांच्या आयुष्याविषयी सांगू लागतो. डबल ग्रॅज्युएट असलेले, सैन्यामध्ये देशसेवेसाठी वाहून घेताना लग्न न करण्याचा चंग बांधणारे अर्शदचे वडीलच त्यांच्या मित्रांमध्ये सर्वांत आधी लग्न करतात. त्यांचं पाचवं अपत्य असलेल्या अर्शदला त्याच्या सहा भावंडांत बहीण अस्मा सर्वांत जवळची वाटते. आपली मुलं आणि मुली अफाट बुद्धिमत्तेची आहेत, याची जाण असलेल्या अर्शदच्या अबूंना पक्की खात्री आहे की, ती आपल्या कुटुंबाचं नाव प्रसिध्दीस तरी आणतील किंवा त्याला काळिमा तरी फासतील.

अर्शदच्या बालपणाचा प्रवास दुःखांनी भरलेला आहे. वयाच्या चौथ्या वर्षी मित्राने केलेला अतिप्रसंग, नंतर घरातल्या नोकराने केलेला अत्याचार, त्यातही याबद्दल कुणाला सांगता न येणं, पहिल्या चुंबनाचा अनुभव, नंतर चौदाव्या वर्षी वरच्या वर्गातल्या टारगट मुलाबरोबर अनुभवलेलं पहिलं हळुवार प्रेम, नंतर प्रेमभंग झाल्यावर बदललेला गाण्यांचा चॉईस हे सगळं स्क्रीनवरही तितक्याच तीव्रतेने येतं. तारुण्यात आपण समलैंगिक नाही आहोत, हे स्वतःलाच खोटं खोटं समजावत चौकटीत कोंबून घेण्याचा त्याचा प्रयत्न, पुढे कॅनडाला स्थलांतरित झाल्यावर अधिकच प्रकर्षाने जाणवणारा भेदभाव, तिथे एका मित्राने आऊट होण्याचं बळ दिल्यावर स्वतःचा स्वीकार आणि तरीही घरात राहून वाद वाढू नयेत म्हणून मॉन्ट्रियलला फिल्म स्कूलमध्ये जाणं, हा प्रवासही सोपा नाहीच. मुस्लिम, पाकिस्तानी, ब्राऊन, गे, फिल्म शिकणारा अशी असंख्य लेबल्स घेऊन जगणाऱ्या अर्शदचं आयुष्य पाहिलं की नकळत आपण स्वत:त डोकावून पाहतो आणि कितीतरी बाबतींत आपण सुखी आहोत, याची जाणीव होते. अर्शदच्या कुटुंबात साजऱ्या झालेल्या वाढदिवसाच्या पार्ट्या, लग्नसमारंभांचे, सहलींचे व्हिडिओज या माहितीपटात जागोजागी दिसतात. मात्र एका ठिकाणी येणारं हे वाक्य वेगळंच काही सांगून जातं - "The videos capture the facades of happiness. Our sorrows remain undocumented." म्हणजेच "व्हिडिओज फक्त आनंदाच्या इमारतींचे दर्शनी भाग दाखवतात. आमच्या दु:खांचं मात्र कुठेही दस्तावेजीकरण केलेलं नाही."

कहाणी अर्शद आणि त्याच्या अबूंच्या नात्याची असल्याने अर्थातच त्या दोघांच्या आयुष्याचे तुकडे आपल्याला दिसत राहतात. पॅकेज्ड पाण्याचा धंदा करणारे अबू त्याला उतरती कळा लागल्यानंतर नाउमेद होतात आणि याउलट पाकिस्तानात कधीही स्वतःची मिळकत नसणारी अर्शदची आई कॅनडाला गेल्यावर मात्र स्वतःच्या पायांवर उभी राहते. स्थलांतर माणसाच्या जगण्यावर कसं परिणाम करत असतं, ते या अशा प्रसंगांतून ठळकपणे दिसतं. स्वतंत्र विचारांच्या अस्माचं लग्न आणि त्यामुळे अर्शदचं मोडून पडणं, अस्मावरही लैंगिक अत्याचार होणं आणि त्याबद्दल तिने आईला सांगूनही आईने त्यावर काहीच न म्हणणं, प्रवासाला जाताना आपला मुलगा गे आहे, हे माहीत असूनही अबूंनी कारमध्ये 'इस्लाममध्ये समलैंगिकता पाप मानलं जातं' हे सांगणाऱ्या टेप्स लावणं, आईने स्वतःच्या बालपणीच्या फोटोंमध्ये स्वतःचा चेहरा रंगवणं, स्वतःच्या आईवडिलांच्या नात्याबद्दल न बोलणं, या अशा अनेक प्रसंगांतून धर्म, पुरुषसत्ताक व्यवस्था, पुरुषी इगो, समाजमनाची भीती या सगळ्या क्रूर गोष्टी एका कुटुंबातील सदस्यांच्या परस्पर नातेसंबंधांवर नकळत कसा प्रभाव टाकत असतात, हे स्पष्ट दिसतं. त्यात जागतिक, प्रादेशिक राजकारणाचाही अर्शदच्या जडणघडणीवर पडलेला प्रभाव दिसतो.

माहितीपट ज्या फॉरमॅटमध्ये आपल्याला दिसतो, तो अर्शदने कथा सांगण्याचा निवडलेला फॉरमॅटही निव्वळ अप्रतिम आहे. जुने फोटो, फॅमिली गेट-टुगेदरचे व्हिडिओज यांच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाची कथा साकारताना निसटलेल्या जागा काही ठिकाणी ‍अ‍ॅनिमेशनने भरल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी जिथे नाट्यमय प्रसंग आहेत, तिथे हिंदी चित्रपटांतील गाण्यांची, चित्रपटातल्या प्रसंगांची केलेली चपखल मांडणी, गंभीर प्रसंगांचं या चित्रपट दृश्यांच्या मदतीने नर्मविनोदी शैलीत केलेलं कथन हा या माहितीपटाचा यूएसपी म्हणावा लागेल. एका ठिकाणी अबूंच्या आततायी स्वभावाचं वर्णन करताना अर्शद त्यांच्याच फोटोग्राफीच्या छंदाचा रूपकात्मक वापर करतो. "स्मार्टफोनमधून फोटो काढताना अबू नेहमी फोन व्हर्टिकली धरून फोटो काढत. मी त्यांना फोन आडवा धरण्याचं कितीकदा सुचवून पाहिलं जेणेकरून जास्तीचं जग त्यांच्या दृष्टिपथात येईल", असं तो म्हणतो. चित्रपटांवर निरतिशय प्रेम असणाऱ्या माणसांचं चित्रपट प्रेम नेहमी वाट फुटेल तिथे ओसंडून वाहत असतं, ते असं. माहितीपट दाखवण्याची शैली अशी मिश्र असूनही ते कुठेही केवळ जागा भरण्यासाठी लावलेलं पॅचवर्क वाटत नाही. उलट प्रेक्षकांसाठी ती एक रोलर कोस्टर राईड होऊन जाते.

हा माहितीपट महत्त्वाचा ठरतो तो आणखी एका कारणासाठी. अर्शदची वेगळी लैंगिकता कधीही न स्वीकारलेल्या अबूंचे विचार अर्शदला पटत नसले, तरी त्यांच्या मृत्युसमयी तो भावुक होतो. स्वतःबद्दल आपल्या वडिलांच्या मनात काही वैषम्य नाही ना, याची खात्री करून घेतो. वडील मुलाला माफ करतात. मुलगा वडिलांना माफ करतो. इथेच हा माहितीपट केवळ एका गे फिल्ममेकरची, एका पाकिस्तानी मुस्लिम कुटुंबाची, एका धर्ममार्तंड पित्याची गोष्ट न राहता रक्तामांसाच्या माणसांची गोष्ट होऊन जातो आणि आपल्याला आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी देऊन जातो. अशा कलाकृती नकळत आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तर देतच असतात, पण आपले पाय जमिनीवर ठेवण्याचंही काम करत असतात. स्वतःचा नव्याने शोध घ्यायला भाग पाडत असतात.

msgsandesa@gmail.com

बातम्या आणखी आहेत...