आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टेेटमेंट:सरसेनापती उद्धव!

संजय आवटे, राज्य संपादकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंचे ‘मेणाहूनि मऊ रूप’ महाराष्ट्र गेल्या काही दिवसांमध्ये बघतो आहे. ‘किंबहुना’ तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. ‘कोरोना’च्या कालावधीत उद्धव ज्या संयमाने संवाद साधत आहेत, तो घरातल्या वडीलधाऱ्या माणसाने करावा, तसा संवाद आहे. ‘मला कोरोनाला पराभूत करायचे आहे. माझ्या महाराष्ट्राला वाचवायचे आहे,’ अशा निरागस हट्टाने ते बोलत असतात. तशा ठामपणे काम करत असतात. राजकीय चर्चा आणि विसंवादात न पडता धीराने कारभार करत असतात.

त्यांच्यावर उदंड हल्ले चढवले गेले. कधी अर्णब गोस्वामीसारख्या पत्रकारांनी त्यांना ललकारले. कंगनासारख्या अभिनेत्रीने एकेरीवर आणले. आदित्य यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण केले गेले. महाराष्ट्र सरकारला मुद्दाम अडचणीत आणले गेले. उद्धव यांनी हिंदुत्व सोडल्याचे सांगत त्यांना डिवचले गेले. पण, उद्धव शांत होते.

किंबहुना, ते तसेच शांत आहेत!

दसरा मेळाव्यात मात्र जे उद्धव दिसले, ते वेगळेच होते. हा मेळावा तसाही ऐतिहासिक होता. एक तर, ‘ठाकरे’ मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा. दुसरीकडे, ‘कोरोना’मुळे नेहमीचा महाकाय नव्हे, तर प्रामुख्याने ‘डिजिटल’ आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे पोहोचणारा हा सोहळा. एका छोट्या सभागृहात पार पडलेला हा मेळावा. पण, त्यापेक्षाही तो गाजला उद्धव यांच्या भाषणामुळे. ‘गाय ही माता आणि तिकडं नेऊन खाता’ किंवा ‘माय मरो आणि गाय जगो’ अशा भोंदू हिंदुत्वावर टीका करताना उद्धव यांच्या रसवंतीला बहर आला होता!

उद्धव ठाकरे हे प्रकरणच अनपेक्षित आहे.

राज ठाकरे यांच्या करिष्म्यापुढे हे कसले टिकतात, असे लोक म्हणत असताना त्यांनी पक्षावर मांड ठोकली आणि पक्ष वाढवत नेला. बाळासाहेबांच्या पश्चात, मोदी लाटेत हे वाहून जातील, असे लोक म्हणत असताना, त्यांनी २०१४च्या निवडणुकीत एकाकी लढत, खणखणीत यश मिळवले. आणि, वर्षभरापूर्वीच ज्यांची फरपट होतेय, असे वाटत होते, ते उद्धव आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विरोधकांना रोज नवे धक्के देताहेत. (विरोधकांनाच काय, सरकारमधील मित्रपक्षांनाही त्यांनी थक्क करून टाकले आहे!)

हिंदुत्वाच्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे अडकत नाहीत, ही भाजपची सगळ्यात मोठी गोची आहे. काँग्रेससोबत सरकार चालवताना उद्धव दररोज गोंधळतील, असा भाजपचा कयास होता. घडते आहे ते उलटेच. भाजपचा गोंधळ वाढत चाललाय आणि उद्धव ठाकरे मात्र अत्यंत सुस्पष्ट मांडणी करताहेत.

दसरा मेळाव्यातील उद्धव यांचे भाषण हा त्याचा पुरावा होता.

कधी सुशांतसिंह प्रकरण, तर कधी कंगना यांच्या आडून महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. अर्णबसारख्या पत्रकारांनी तोच प्रयत्न केला.

दुसरीकडे, साक्षात राज्यपालांनी ‘सेक्युलॅरिझम’चा उल्लेख विचित्र पद्धतीने केला. राम मंदिर आणि असा सगळा माहोल तयार होत असताना, उद्धव यांना खिंडीत गाठले गेले. आदित्य यांंना कोंडीत पकडले गेले. पण, उद्धव सगळ्यांना पुरून उरले. दसरा मेळाव्यात तर ते जोरकस बरसले. मुख्य म्हणजे त्यांचा रोख दिल्लीच्या दिशेने होता. भाषा आव्हान देणारी होती. भाजपच्या फसलेल्या आणि त्यांच्यावरच उलटलेल्या खेळींमुळे, विरोधकांना महाराष्ट्र विरोधी ठरवण्यासाठी उद्धव यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार नव्हती.

‘कसलं घंटा वाजवणारं हिंदुत्व तुमचं, आमचं हिंदुत्व हे त्यापेक्षा व्यापक आहे,’ असे सांगत उद्धव यांनी थेट प्रबोधनकारांचा वारसा सांगितला. त्याच्याही पुढे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातच त्यांनी जुंपवून दिली. ‘काळ्या टोपीखाली डोकं आहे की नाही?’ असं विचारत राज्यपालांनाही (त्यांचा उल्लेख न करता!) त्यांनी उत्तर दिलं. सरसंघचालक मोहन भागवतांनी सांगितलेला हिंदुत्वाचा अर्थ भाजपच्या नेत्यांनी समजून घ्यावा, असं मुख्यमंत्री म्हणाले. भागवतांचे विजयादशमी उत्सवातील पूर्ण भाषण ‘सामना’ने सविस्तर प्रसिद्ध करायला हवे, असे सांगून तर मुख्यमंत्र्यांनी उत्तुंग षटकार लगावला.

एरवी, नको तेवढ्या संयमानं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून जे घणाघाती भाषण केले, त्याने कित्येकांच्या तोंडावर मास्क लागेल. मेणाहुनी मऊ वाटणाऱ्या उद्धव यांच्या या वज्राहून कठोर रूपाने भल्या-भल्यांना थक्क केले. ‘जीएसटी’पासून अनेक मुद्द्यांवर उद्धव आक्रमकपणे बरसले. राज्यपाल ते राणे, अर्णब ते कंगना, दानवे ते मोदी, दसरा मेळाव्यात उद्धव यांनी कोणालाच सोडले नाही. मुख्यमंत्र्यांचे तर हे भाषण होतेच, ज्याला शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ही ‘स्पेस’ मिळालेली होती!

‘माझे सरकार पडणार नाहीच, पण तुम्ही मात्र तुमचं केंद्रातलं सरकार सांभाळा. तुमचा पक्ष सांभाळा,’ असं सांगत उद्धव ठाकरेंनी जे थेट ‘नॅरेटिव्ह’ सेट केले आहे, त्यामुळे बरीच समीकरणे बदलणार आहेत.

केवळ एक आक्रमक भाषण एवढेच या भाषणाचे महत्त्व नाही. उद्धव ठाकरे एनडीएतून बाहेर पडल्यानंतरच तिकडे तो संसर्ग सुरू झाला. मग, पंजाबमधून शिरोमणी अकाली दल बाहेर पडले. बिहारमध्ये चिराग पासवानांनी वेगळी भूमिका घेतली. दरम्यान, राजस्थानमध्ये सत्ता ताब्यात घेण्याचा भाजपचा डाव फसला. आता हा संसर्ग महाराष्ट्र भाजपपर्यंत पसरला आहे. अशा वेळी, थेट केंद्राच्या विरोधात लढण्यासाठी उद्धव अन्य राज्यांना आवाहन करतात. बिहारमधील मतदारांना सावध करतात. दिल्लीश्वरांना आव्हान देतात. त्यामुळे, समीकरणे बदलत चालली आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

राजकीय फेरमांडणी करू शकणारी अशी ही समीकरणे असणार आहेत!