आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:इतना तो करो ना !

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संकटाचे अस्तित्व नाकारणे म्हणजे पराभवाच्या गर्तेत पहिले पाउल टाकणे...

संजय भास्कर जोशी

संकटाचे अस्तित्व नाकारणे म्हणजे पराभवाच्या गर्तेत पहिले पाउल टाकणे... प्रदीर्घ मानवी इतिहास अनेक प्रकारच्या दु:ख आणि संकटांनी भरलेला आहे. आणि तरीही माणसाने दु:खावर आणि संकटांवर प्रतिहल्ला करून सुखा-समाधानाची शिखरे गाठल्याच्या कहाण्या काही कमी नाहीत. इतर अनेक व्यवसायांप्रमाणे ग्रंथव्यवसायावरही मोठे संकट कोसळले जरी असले तरी चाणाक्षपणे नियोजन करून आणि योजनेची काटेकोर अंमलबजावणी करून संकटातून मार्ग काढणे आवश्यक आहे. यानिमित्ताने नेमके काय करता येऊ शकेल यासाठी ग्रंथव्यावसायिक आणि ग्रंथप्रेमींनी लेखातील मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करावा.

दु:ख आणि संकटे या काही कोरोनाने जगाला दिलेल्या देणग्या नव्हेत. प्रदीर्घ मानवी इतिहास अनेक प्रकारच्या दु:ख आणि संकटांनी भरलेला आहे. आणि तरीही माणसाने दु:खावर आणि संकटांवर प्रतिहल्ला करून सुखा-समाधानाची शिखरे गाठल्याच्या कहाण्या काही कमी नाहीत. आव्हाने नेहमीच माणसाला प्रेरणा देत आली आहेत आणि बहुतांश वेळा माणूस ही आव्हाने स्वीकारत आलेला आहे. यातले यश आणि अपयश यांचा हिशेब क्षणभर बाजूला ठेवला तरी एकूण मानवजातीचा इतिहास संकटे आली की हातपाय गाळून बसण्याचा नाही. मग सध्या का बरे पराभूत मानसिकतेने हताशा व्यक्त केली जात आहे भवतालात?

मी अर्थातच सध्या ज्या क्षेत्रात काम करतो त्या ग्रंथव्यवसायाविषयी बोलत आहे. संकटाचे अस्तित्व नाकारणे म्हणजे पराभवाच्या गर्तेत पहिले पाउल टाकणे हे मी जाणतो, त्यामुळे कोरोनाच्या साथीने उभे केलेले संकट नाकारण्यात अर्थ नाही. खरे तर संकटाचे सर्व पैलू अभ्यासून परिस्थितीचे SWOT करणे ही आजची गरज आहे. चाणाक्षपणे नियोजन करून आणि योजनेची काटेकोर अंमलबजावणी करून संकटातून मार्ग काढणे आवश्यक आहे. यादृष्टीनेच अधिक प्रस्तावना न करता मी ग्रंथव्यावसायिक आणि ग्रंथप्रेमींसमोर काही मुद्दे ठेवत आहे.

१. पहिले म्हणजे परिस्थितीचे अचूक आकलन करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा डेटा जमा करायला हवा. यंदाच्या साहित्यसंमेलानात एकूण ग्रंथविक्री किती झाली याबाबत दोन महत्वाच्या वृत्तपत्रात २ कोटी आणि ४ कोटी असे आकडे दिले गेले होते.  दोन महत्वाच्या वृत्तपत्रांच्या अंदाजात १००% फरक असावा? यासाठी महत्वाचे प्रकाशक आणि विक्रेते यांनी एक व्यापक सर्वेक्षण करून ग्रंथविक्रीबाबत सर्वंकष विदा गोळा करणे आवश्यक आहे. याचा उपयोग करून विक्रीवृद्धीचे नवनवे  मार्ग अनुसरता येतील. विश्लेषण केलेल्या माहितीवर आधारलेले ‘फोकस्ड मार्केटिंग’ हा विक्रीवृद्धीचा उत्तम मार्ग आहे.

२. अनेक वेळा अनेक जणांनी सांगितलेच आहे, की महाराष्ट्रात बरेच जिल्हे असे आहेत, जिथे पुस्तकांची दुकानेच नाहीत. त्यावर नक्कीच उपाय शोधता येईल. प्रदर्शने भरवणे खर्चिक होत आहे असे अनेक विक्रेत्यांचे म्हणणे आहे आणि ते खरेही आहे, कारण बरेचसे हॉल साड्या किंवा गृहोपयोगी वस्तूंची प्रदर्शने भरवतात कारण त्यातून जास्त पैसे मिळतात. यावर मी असा उपाय सुचवतो : अशा भागातल्या जिल्हा परिषदेच्या / पालिकेच्या शाळांमधून रोज संध्याकाळी आणि रविवारी पूर्ण दिवस एक मोठे दालन पुस्तकाच्या प्रदर्शनासाठी नाममात्र दारात उपलब्ध करून दिले जावे. शिवाय स्थानिक ग्रंथप्रेमी आणि त्याच शाळेतील आठवी-नववीच्या निवडक मुलांना तिथे काम करण्याची संधी द्यावी. त्याचबरोबर पोस्ट खात्याने पुस्तकांच्या पार्सलसाठी सवलतीचे दर दिले तर अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचणे शक्य होईल. सांगायचा मुद्दा असे अभिनव उपाय आपण शोधायला हवे आहेत. गावोगावी वाचक पुस्तकांची आतुरतेने वाट बघत आहेत.

३. तिसरी गोष्ट म्हणजे ग्रंथव्यवसायात स्पर्धा नाही याचे भान बाळगणे. तिकडे जसे  कोलगेट वापरणारा दुसरी पेस्ट वापरतच नाही तसे आपल्या क्षेत्रात नसते. ‘व्यक्ती आणि वल्ली’ वाचले म्हणून ‘मृत्युंजय’ वाचायचे कुणी थांबत नाही आणि इंदिरा संतांच्या कविता कुणाला आवडल्या म्हणून वसंत आबाजी डहाके यांच्या किंवा ढसाळांच्या कविता आवडायच्या थांबत नाहीत. ग्रंथव्यवसाय बेरजेच्या गणिताचा आहे, तो आपण सारे मिळून गुणाकाराचा करू शकतो. एखाद्याने एखाद्या प्रकाशकाचे पुस्तक वाचले किंवा एखाद्या विक्रेत्याकडून पुस्तक विकत घेतले तर तो वाचक आपले पुस्तक विकत घेण्याची शक्यता वाढते हे समजून घ्यायला हवे. त्यामुळे सर्वांनी मिळून केलेले प्रयत्न सर्वांच्याच हिताचे ठरतील.

४.   चौथा मुद्दा म्हणजे ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सचा. करोनाग्रस्त काळात या दोन्हीचा वापर आणि प्रसार वाढणे साहजिक आहे. अनेक प्रकाशक या पर्यायाचा विचार करत आहेत आणि ते योग्यही आहेच. फक्त हा ‘पर्याय’ नसून ‘पूरक व्यवस्था’ आहे हे ध्यानात घ्यायला हवे. साधे उदाहरण घ्या, या काळात वर्तमानपत्र मोबाइल किंवा कम्प्युटरवर वाचावे लागते आहे, ते सुखद आणि सोयीचे आहे का? तर नाही, ती एक तडजोडच आहे. घरी बसून संगीत ऐकणे आणि संगीताच्या मैफलीला जाणे यात फरक आहेच. ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून पुस्तकांचे ‘ट्रेलर’ वाचकांना सादर करून, कुतूहल निर्माण करून पुस्तकांची विक्री वाढवणे हा भविष्यातला उत्तम मार्ग असू शकेल.

५. पाचवा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकार, मोठमोठ्या कंपन्या आणि मोठे सेलेब्रिटी यांनी मिळून वाचनसंस्कृतीचे महत्व ओळखून (एखाद्या प्रकाशक, विक्रेता किंवा पुस्तकाचे नव्हे, तर-) वाचनाचे महत्व अधोरेखित करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार आणि कंपन्यांनी मोठे सेलिब्रिटी हाताशी धरून अतिशय आकर्षक आणि प्रभावी जाहिरात मालिका सर्व माध्यमातून (वृत्तपत्र जाहिराती, टीव्ही, समाजमाध्यामे, रेडीओ, रस्त्यावरील होर्डींग्ज वगैरे) सातत्याने सादर करायला हवी. त्याचबरोबर वृत्तपत्रे आणि माध्यमांनी वाचनाविषयी सकारात्मक बातम्या देऊन हे कार्य पुढे न्यायला हवे आहे. अशा प्रकल्पाचे यश त्वरित विक्रीच्या आकड्यात दिसत नाही तर ते दीर्घकालीन पण निश्चित असते.

करोनाने लादलेल्या एकांताने एक नक्की केले आहे, की सर्वांनाच स्वत:कडे स्वच्छ नजरेने पाहायला भाग पाडले आहे. आपण स्वत:, आपले जग आणि आपले जगणे यांना असे एकांतात न्याहाळताना आधी न दिसलेले कित्येक डाग (शरीरावरचे आणि मनावरचे) दिसायला लागतात. जगणे अधिक समाधानाचे आणि अर्थपूर्ण करण्यासाठी वेळोवेळी असे अवलोकन मोलाचे असते. ग्रंथव्यवसायाने देखील तसे करायला हरकत नाही. खरे तर यातल्या प्रत्येक मुद्यावर दीर्घ लिहायला हवे पण शब्दमर्यादेने ते शक्य नसल्याने हे चिमुकले टिपण त्या आत्मावालोकानाला, आत्मपरीक्षणाला एक निमित्त ठरले तरी पुरेसे आहे.

sanjaybhaskarj@gmail.com

संपर्क - ९८२२००३४११ 

बातम्या आणखी आहेत...