आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:पोलादी पडद्याआडचा लाल तारा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया, उर्फ नॉर्थ कोरिया.

संकल्प गुर्जर

डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया, उर्फ नॉर्थ कोरिया. अर्थात, यातील डेमोक्रसी, पीपल, रिपब्लिक हे शब्द केवळ नावापुरतेच. प्रत्यक्षात सगळा कारभार हुकूमशाही स्वरूपाचा. एक-दोन नव्हे सात दशकांपासूनचा. ही हुकूमशाही कशी, तर कम्युनिझमच्या नावाखाली जनतेला मुठीत ठेवणारी. एकचालुकानुवर्ती. विरोधकांचा खात्मा करणारी. दीन-दुबळ्यांवर अत्याचार-बलात्कार करणारी. गुन्हेगारांना तुरुंगरूपी छळछावण्यांमध्ये सडवणारी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला इंचभरही जागा न ठेवणारी. आणि एका पाठोपाठ एक अण्वस्त्रांच्या चाचण्या घेऊन शेजारच्या दक्षिण कोरियासह अमेरिकेसारख्या महासत्तेला धमकावणारीही...

२०११ चा डिसेंबर महिना. उत्तर कोरियाच्या पँगयाँग शहरावर बर्फाची जाडसर चादर पसरली होती. हाडं गोठवणाऱ्या त्या थंडीत लाखो पँगयाँगवासी रस्त्याच्या कडेला दुतर्फा माना खाली घालून उभे होते. कारण, दहा दिवसांपूर्वी मरण पावलेल्या हुकूमशाह किम जोंग इलची भव्यदिव्य अंत्ययात्रा सुरू झाली होती. लांबसडक काळ्या रंगाच्या लिमोझिन कारसोबत गोलमटोल शरीराचा त्याचा वारसदार मुलगा किम जोंग उन झपझप चालण्याच्या प्रयत्नांत होता. ही यात्रा जसजशी शहराच्या ऐतिहासिक कुमसुसान मेमोरिअल पॅलेसजवळ उभ्या असलेल्या लोकांच्या नजरेपुढून जाऊ लागली, तसतसा दु:खावेग वाढून आक्रोश सुरू झाला. सुरक्षा रक्षकांना न जुमानता तरुणी-वृद्ध बायका-तरणे पुरुष धाय मोकलून रडू लागले. एका बाजूला जनतेला शोक आवरत नव्हता, तर दुसऱ्या बाजूला उत्तर कोरियन सैनिकांच्या तुकड्या शिस्तबद्धरीत्या संचलन करत लष्करी सामर्थ्याचं दर्शन घडवत  होत्या...

अंत्यसंस्कारसमयी जनतेला दु:ख होणं समजण्यासारखं, पण वियोगदर्शनातला अतिभडकपणा आणि लष्करी शक्तीचं प्रदर्शन हे जितकं विचित्र तितकंच विसंगतही. या विसंगतीचा स्पष्ट निर्देश पोलादी पडद्याआडच्या नियंत्रित आणि बंदिस्त व्यवस्थेकडे. आता व्यवस्थेचे कठोर नियंत्रण आहे, म्हटल्यावर संशय आणि भयाचेही वातावरण आहे.  

हे भयाचे वातावरण अधोरेखित करणारा हा एक प्रसंग. किम जोंग इल यांनी अमेरिकेल्या हॉलीवूडला प्रत्युत्तर म्हणून शिंग संग ऑक नावाच्या एका दक्षिण कोरियन दिग्दर्शकाचे हाँगकाँग येथून अपहरण करवले. त्याला हॉलीवूडच्या "गॉडझिला'चा रिमेक करण्याचे फर्मान सोडले. सोबत उत्तर कोरिअन फिल्म इंडस्ट्री वसवण्याचे कडक आदेशही दिले. त्याने दहशतीच्या वातावरणात कसाबसा पुल्गासारी नावानं सिनेमा बनवला. पुढे तब्बल आठ वर्षांनी देशातून पळून जाण्यात त्याला यश आले. हा प्रसंग खरा की खोटा, यावर मतभेद. पण आग आहे म्हणूनच तर धूर दिसणार, असा जाणकारांचा होरा.

एरवी फाळणी म्हटले की भारत, जर्मनी, व्हिएतनाम आणि कोरिया ही चार मुख्य उदाहरणे नजरेसमोर येतात. त्यापैकी जर्मनी आणि व्हिएतनाम एकत्र झाले आहेत. भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आणि उत्तर कोरिया मात्र स्वतंत्र देश म्हणून गेली सत्तर वर्षे अस्तित्वात आहेत. ज्याप्रमाणे पाकिस्तानला भारताशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही, तसेच उत्तर कोरियाचे आहे. दक्षिण कोरियाशिवाय उत्तर कोरियाला स्वतंत्र अशी ओळख नाही. जे जे दक्षिण कोरियात आहे, त्या सगळ्याचा विरोध करणे आणि आपण कसे फसवले जात आहोत असे जगाला सांगणे, उत्तर कोरियाला आवडते. मात्र उत्तर कोरिया भौगोलिक स्थान आणि राजकीय उपद्रवमूल्य या दोन्हींबाबत पाकिस्तानच्या तुलनेत बराचसा दुबळा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जितके महत्त्व पाकिस्तानला मिळते, तितके उत्तर कोरियाला दिले जात नाही. ईशान्य आशियाच्या राजकारणात मात्र उत्तर कोरिया ही एक कायमची डोकेदुखी आहे.

मुळात, दोन्ही कोरियांची निर्मिती दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली. त्यापूर्वी संयुक्त कोरियावर साम्राज्यवादी जपानचा अंमल होता. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यावर कोरियाचा ताबा रशिया आणि अमेरिका यांच्याकडे गेला. शीतयुद्धाच्या प्रारंभाच्या त्या काळात कोरियाला एकत्र आणण्याबाबत अमेरिका आणि रशियाचे एकमत झाले नाही. सरतेशेवटी दोन्ही महासत्तांनी आपापल्या ताब्यातील प्रदेशात सरकारे स्थापन केली. रशियाच्या ताब्यातील उत्तर कोरियात कम्युनिस्ट सरकार आले, तर अमेरिकेच्या ताब्यातील दक्षिणेत कम्युनिस्टांना कट्टर विरोध करणारे सरकार अस्तित्वात आले. दोन्ही कोरियाची ताबा घेताना, विभागणी ३८व्या अक्षांशावर झाली होती. तीच त्यांच्यातील सीमारेषाही ठरली.

मात्र, विभाजनाच्या प्रारंभीच उत्तर कोरियाने १९५०मध्ये दक्षिणेवर हल्ला केला. कम्युनिस्ट अमलाखाली सर्व कोरिया एकत्र करावा, असा त्यामागील राजकीय हेतू होता. उत्तरेकडील कम्युनिस्टांना रशिया आणि चीन या दोन्ही शेजारी कम्युनिस्ट सत्तांचा उघड पाठिंबा होता. युद्धात अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून दक्षिणेच्या बाजूने हस्तक्षेप केला. हे युद्ध तीन वर्षे चालले. युद्धाचा कोणताही निर्णायक निकाल लागला नाही. दोन्ही देशांची प्रचंड हानी झाली. तेव्हापासून उत्तर कोरिया हा देश ही आंतरराष्ट्रीय राजकारणातील  कायमची भळभळणारी अशी एक जखम होऊन बसला. शीतयुद्धाला धग देण्याचे अनेकांपैकी एक महत्त्वाचे कारण ठरला.

उत्तर कोरियामध्ये तेव्हापासून आजतागायत कम्युनिस्ट शासन आहे. उत्तर कोरियाच्या शेजारी उत्तरेला कम्युनिस्ट रशिया होता, तर पश्चिमेला कम्युनिस्ट चीन. दक्षिणेला दक्षिण कोरिया, पूर्वेला थोड्या अंतरावर जपान. दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ ठोकलेले. त्यामुळे उत्तर कोरियाचा एकत्रित विचार करताना, या सगळ्या सत्तांचे हितसंबंध आणि उत्तर कोरियातील अंतर्गत परिस्थिती विचारात घ्यावीच लागते.

अर्थातच, उत्तर कोरियातील कम्युनिस्ट शासन म्हणजे एकट्या किम घराण्याचे शासन आहे. घराण्याचे संस्थापक आणि उत्तर कोरियाचे पहिले सत्ताधारी किम इल संग यांनी १९४८ ते १९९४ अशी तब्बल ४६ वर्षे सत्ता उपभोगली. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा किम जोंग इल सत्तेत आला. त्यांनी १९९४ पासून २०११ पर्यंत म्हणजे सतरा वर्षे राज्य केले. तर २०११ पासून त्यांचा २८ वर्षांचा मुलगा किम जोंग उन सत्तेत आहे.

आपली सत्ता निर्धोक, निरंकुश राहावी, यासाठी या नव्या सत्ताधीशाने एकेक करून आपल्या वडिलांच्या काळातील सल्लागार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पद्धतशीरपणे दूर केले आहे. अनेकांना तर थेट नरकसमान असलेल्या तुरुंगात पाठवले. २०१३मध्ये या नव्या किमने त्याच्या आत्याचा नवरा आणि देशातील अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेल्या आपल्या काकाची क्रूरपणे हत्या घडवून आणली. या हत्येची बातमी बाहेर आली तेव्हा, या कृतीने सारे जग हादरले. मात्र, नव्या उत्तर कोरियात खरी सत्ता कोणाची आहे, याचा मेसेज यातून दिला गेला. पुढे या नालायक ठरलेल्या काकाची चित्रे ज्या ज्या फोटोंत होती, त्यामधून त्याला हटवले गेले. त्याच्या विरोधात २७०० शब्दांचे पत्रक काढून, त्याच्या अपराधांची यादी त्यात दिली गेली. उत्तर कोरियासाठी अर्थात हे नवे नव्हते. क्रूर पद्धतीने केल्या जाणाऱ्या हत्या हे तिथे नित्याचे दृश्य. गेल्या वर्षी उत्तर कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांना महत्त्वाच्या लष्करी बैठकीदरम्यान डुलकी लागल्याच्या कारणावरून आधी पदावरून दूर करण्यात आले. या संरक्षणमंत्र्यांचे वय बरेच होते. परंतु त्यांच्या या कृत्याबद्दल माफी वगैरे काही नाही. थेट मृत्युदंडच. अँटी एअरक्राफ्ट गनचा वापर करून त्याला यमसदनी पाठवण्यात आले.

असा हा हुकूमशाही राजवट असलेला उत्तर कोरिया १९९१पर्यंत बाकी जगापासून तुटलेला राहिला. त्यामुळे उत्तर कोरियात नेमके काय चालते, तो देश कसा आहे, याविषयी फारच थोडी माहिती जगाला उपलब्ध झाली. अलीकडच्या काळात काही वेळा उत्तर कोरिया स्वतःहून ‘बीबीसी’सारख्या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांच्या प्रतिनिधींना आमंत्रण देऊन बोलावून घेऊ लागला. त्यांना अगदी मर्यादित स्वरूपाचा प्रवेश दिला जाऊ लागला. मात्र त्यांनी कोणाशी बोलायचे, यावर पूर्णतः नियंत्रण सरकारचे राहिले. उत्तर कोरिया कसा बदलत आहे, तिथले जीवन कसे सुंदर आहे, अशा स्वरूपाचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न या भेटीत हटकून केला गेला.

गेल्या वर्षी उत्तर कोरियाने तीन नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आणि बीबीसीच्या काही प्रतिनिधींना बोलावले होते. त्या भेटीच्या दरम्यान बीबीसीच्या प्रतिनिधींनी उत्तर कोरियाची बदनामी करणारा मजकूर लिहिला आहे, असे कारण दाखवून या प्रतिनिधींना भेट संपल्यानंतर उत्तर कोरियातून बाहेर पडायला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यांना विमानतळावर अडवून ठेवण्यात आले. त्यांची थेट चौकशी चालू केली गेली. प्रत्येक दोन तासांनी नवे पथक अशा पद्धतीने वेगवेगळी चौकशी पथके येऊन त्यांची दहा तास प्रश्नोत्तरे केली गेली. प्रश्नांची सरबत्ती आणि खोटे आरोप होत राहिले. अखेर माफीनामा लिहून घेऊन त्यांची सुटका केली गेली. त्यानंतरसुद्धा पुढील दोन दिवस या पत्रकारांना उत्तर कोरियाच्या बाहेर पडता आले नाही.

थोडक्यात, उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट सरकारने इतर कम्युनिस्ट सरकारांप्रमाणेच क्रौर्य, भीती, मृत्यू, गुप्त पोलिस, आयुष्याची अनिश्चितता यांचे एक भयानक विश्व उभे केले आहे. कोणावर कधी नजर ठेवली जाईल, कधी अटक होईल, काय शिक्षा मिळेल, याची कोणतीही शाश्वती तिथे नाही. जंगलराज तरी बरे वाटावे, असा सगळा हा प्रकार. जीवनाची काहीच खात्री नाही. न पेक्षा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर काय भाव आहेत आणि कोण नेमके काय करते, याविषयीचे समग्र पोलिसी अहवाल उत्तर कोरियात लिहिले जातात. सर्वत्र गुप्त पोलिसांचा वावर असतो. देशाचे सत्ताधीश दुसरे किम (जोंग ईल) गेल्यानंतर प्रत्येक नागरिकाला केवळ दुःख झाले इतकेच पुरेसे नव्हते, ते दिसणेसुद्धा गरजेचे होते. त्यामुळे सार्वजनिकरीत्या डोळ्यांतून अश्रू येणे आणि ते इतरांनी पाहणे फारच आवश्यक होते. त्यामुळे खोटे रडणे आणि खोटे अश्रू दाखवणे हे त्या काळात उत्तर कोरियन जीवनाचे आवश्यक घटक बनले होते. पुरेसे दुःख झाले नाही, हे कारण दाखवून कधी कोणाला मारले जाईल, याची शाश्वती नव्हती.

आता जे सरकार आपल्या नागरिकांवर कठोर नियंत्रण ठेवते, ते सरकार परदेशी प्रतिनिधींनासुद्धा मुठीत ठेवू पाहते. कुणी कुणाशी बोलायचे, हे सरकार ठरवते. निवडलेल्या लोकांना खास पढवले जाते. जीवनाचे एक छान चित्र उभे राहावे, असा प्रयत्न केला जातो. आपले खरे स्वरूप उघडे होऊ नये, याची काळजी घेण्याचा सरकार अतिशय आटोकाट प्रयत्न करते. पण निसटून आलेल्या नागरिकांच्या कहाण्या, तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या परदेशी कैद्यांच्या हकिगती जगापुढे येतात आणि त्या ऐकताना अंगावर काटा येतोच येतो.

त्या ऐकल्या की ऐकणाऱ्याची खात्री पटते की, लोकशाही, कायद्याचे राज्य, मानवी हक्क, संविधान, न्यायालये, माध्यमे वगैरे शब्दांना उत्तर कोरियात काहीही अर्थ नाही. शासनाने आपल्याच नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे कसे नियंत्रणात ठेवता येईल, याचे उपाय शोधले आहेत. छळछावण्या, गुलामगिरी, राजकीय कैद्यांचा छळ वगैरे प्रकार तिथे नित्याचे आहेत. एखाद्या व्यक्तीविषयी संशय आला तर केवळ ती व्यक्तीच नव्हे तर तिचे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब, नातेवाईक यांनासुद्धा छळछावण्यांरूपी तुरुंगात पाठवले जाऊ शकते. या छळछावण्यांत अमानुष वागणूक दिली जाते. आरोपीस पुरेसे खाणे आणि झोप मिळू दिली जात नाही. कायद्याची प्रक्रिया, कैद्यांचे हक्क वगैरे गोष्टींना इथे महत्त्व नसते. एकदा आत गेल्यावर कधी बाहेर येऊ, याची शाश्वती नसते. जगण्यापेक्षा मरण बरे, इतके असह्य जिणे या कैद्यांना जगावे लागते. ‘निष्ठा’ हा शब्द उत्तर कोरियात अतिशय महत्त्वाचा असतो. कोरियन शासनाविषयी, कम्युनिस्ट पक्षाविषयी, किम घराण्याविषयी नागरिकांनी निष्ठा दाखवणे फारच गरजेचे असते. नाही तर कधी रवानगी तुरुंगात होईल, याची खात्री नसते.

इथल्या शाळा-कॉलेजांत ज्ञानसंवर्धन नव्हे तर मानवी यंत्रे तयार करण्याचे काम चालते. शिक्षण संपल्यानंतर तुम्ही काय काम करायचे, हे सरकारच ठरवते. त्या-त्या माणसाला आयुष्यभर पुढे सरकारने नेमून दिलेले काम करावे लागते. ही एक प्रकारे सरकारपुरस्कृत वर्गव्यवस्थाच असते. उत्तर कोरियन शासनाला कायमच पैशांची विशेषतः आंतरराष्ट्रीय चलनाची गरज भासते. त्यामुळे शासन स्वतःच आपल्या नागरिकांना सक्तीने कामासाठी परदेशी पाठवते. कामगार परदेशी गेले तर त्यांच्या देशातील कुटुंबाला सुरक्षित ठेवले जाईल, अशा प्रकारची आश्वासने सरकार देते. परदेशी गेलेल्या कामगारांना अक्षरशः गुलामगिरीचे जिणे जगावे लागते. आफ्रिका, पश्चिम आशिया, पूर्व युरोप, रशिया आणि चीन अशा ठिकाणी हे गुलाम कामगार पाठवले जातात. कामाच्या ठिकाणी अपुरे अन्न, अफाट श्रम वगैरे प्रकार सर्रास चालतात. या कामगारांना कोणतेही संरक्षण नसते. उलट कामाचे थेट पैसे न देता उत्तर कोरियन सरकारला ते दिले जातात. सरकार ते कामगारांच्या कुटुंबाला न देता स्वतःकडे ठेवून घेते. अशा परदेशात गेलेल्या कामगारांना बहुतेक वेळा कामाचा कोणताही मोबदला दिला जात नाही. सरकारच आपल्या नागरिकांना अशा प्रकारे गुलामगिरीत ढकलते.

उत्तर कोरियातील असह्य जगणे लक्षात घेता, त्या देशातून चीनमध्ये किंवा दक्षिण कोरियात मानवी तस्करी करण्याचा धंदा इथे तेजीत असतो. त्यातून अनेकदा स्त्रियांना वेश्याव्यवसायातसुद्धा ढकलले जाते, त्यांची विक्री केली जाते. याविषयी अनेक अहवाल प्रकाशित होतात, अनेक संस्था या समस्येवर काम करतात. मात्र जोपर्यंत उत्तर कोरियन सरकार आपले धोरण बदलत नाही, तोवर हे प्रश्न सुटणे निव्वळ अशक्य आहे.

उत्तर कोरियात इंटरनेट आहे, पण उच्चवर्गीयांपुरते मर्यादित. सरकारने लिनक्सवर आधारलेली स्वदेशी ‘रेड स्टार’ इंटरनेट सेवा सुरू केली आहे. अर्थातच सामान्य नागरिकांसाठी ती नाही. तसेच उत्तर कोरियात जाणे अजिबातच सोपे नाही. एकदा आत गेल्यावर परत बाहेर येणे त्याहून सोपे नाही. सामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय सिनेमे, संस्कृती, संगीत, साहित्य, खेळ वगैरे कशाचाही अॅक्सेस उत्तर कोरियात नाही. त्यामुळे जागतिकीकरण, मुक्त व्यापार, उदारीकरण वगैरे कल्पना उत्तर कोरियाबाबत अर्थहीन आहेत. आपण आपल्या जगात ज्या गोष्टी नॉर्मल समजून चालतो, त्या उत्तर कोरियात फारच दुर्लभ आहेत. खरे तर नैसर्गिक रीतीने, स्वत:च्या घरी, कोणताही छळ न होता मृत्यू येणे हीसुद्धा उत्तर कोरियन नागरिकांबाबत आश्चर्य वाटावी अशी गोष्ट आहे!

उत्तर कोरियात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र जगाशी जाणीवपूर्वक संबंध तोडलेले असल्याने शेती उत्पादन फारच मर्यादित होते. शेती उत्पादन वाढावे, यासाठी शासन खूप प्रयत्न करते. मात्र एका मर्यादेच्या पलीकडे ते कधीच वाढू शकत नाही. लष्कराच्या गरजांना प्राधान्य असल्याने सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा कायमच तुटवडा भासतो. त्यामुळे चीनच्या सीमेकडून वस्तूंची बेकायदेशीर पद्धतीने आयात केली जाते. उत्तर कोरियात उद्योगधंदे फारसे विकसित झालेले नाहीत. म्हणूनच देश जगाच्या तुलनेत बराच मागासलेला आहे. विजेचा तुटवडा ही उत्तर कोरियासाठी फारच सवयीची बाब आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मदत जेव्हा कधी येऊ दिली जाते, तेव्हा ती अन्नधान्य, औषधे, तेल अशा स्वरूपाची असते.

उत्तर कोरियाची सध्या लोकसंख्या सव्वा दोन कोटी. त्यापैकी दहा लाखांहून अधिक नागरिक सैन्यात आहेत. म्हणजे, सव्वाशे कोटींच्या आणि अवाढव्य पसरलेल्या भारताचे जेवढे लष्करी मनुष्यबळ आहे, साधारणतः तेवढेच सैन्य उत्तर कोरियाचे आहे! दक्षिण आणि उत्तर कोरिया यांच्यातील सीमारेषा ही जगातील सर्वात धोकादायक सीमारेषा मानली जाते. उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात १९५३मध्ये केवळ युद्धबंदी करार झाला आहे, शांतता करार झालेला नाही. त्यामुळे दोन्ही देश तांत्रिकदृष्ट्या पाहता अजूनही युद्ध स्थितीत आहेत. उत्तर कोरियाला दक्षिण कोरियाच्या आर्थिक सुबत्तेची आणि लष्करी ताकदीची भीती आणि असूया वाटते. त्यामुळे उत्तर कोरिया आपल्या लष्कराला सज्ज ठेवण्यासाठी खूपच प्रयत्न करत असतो. पण सर्व जगापासून तुटलेला असल्याने याही बाबतीत त्यांच्यावर खूपच बंधने येतात.

मात्र उत्तर कोरिया हा अण्वस्त्रसज्ज देश आहे. अण्वस्त्रांचा दर्जा संशयास्पद असला तरी उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत, ही काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही. २००६पासून आतापर्यंत उत्तर कोरियाने सहा वेळा अणुचाचण्या केल्या आहेत. याच वर्षी दोन वेळा चाचण्या झाल्या आहेत. याला कारण, अमेरिका हल्ला करून कधीही इराकचे सद्दाम हुसेन आणि लिबियातील गद्दाफी यांच्यासारखी आपली अवस्था करेल, अशी धास्ती उत्तर कोरियन सत्ताधाऱ्यांना वाटत राहते. त्यामुळे अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे तंत्रज्ञान चोरून मिळवणे आणि त्याचा सतत विकास करत राहणे, याला अग्रक्रम असतो. उत्तर कोरिया, चीन, पाकिस्तान, इराण हे देश अणुतंत्रज्ञान चोरट्या मार्गाने विकणे, हस्तांतरित करणे वगैरे उद्योगांत गुंतलेले असतात.

आंतरराष्ट्रीय राजकारणात उत्तर कोरियाला चीन वगळता नाव घ्यावा, असा एकही मित्र नाही. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाशी तर उत्तर कोरियाचे थेट शत्रुत्वच आहे. तसे पाहता चीन उत्तर कोरियाबाबत फारसा आशावादी नाही. परंतु उत्तर कोरिया कधीही पूर्णतः कोसळणार नाही, याची काळजी चीन नेहमीच घेत आला आहे. जर उत्तर कोरिया कोसळला तर लक्षावधी कोरियन निर्वासित चीनमध्ये शिरतील, ही रास्त भीती त्यामागे आहे. तसेच दक्षिण कोरियाच्या नेतृत्वाखाली कोरिया एकत्र होणेही चीनला नको आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेची घनिष्ठ लष्करी आणि आर्थिक मैत्री लक्षात घेता जर तसे झाले तर याचा अर्थ असा की, अमेरिकी फौजा चिनी सीमेवर येतील. त्यामुळे दोन्ही कोरिया एकत्र येण्यात चीनला असलाच तर धोकाच आहे.

अर्थात, भारत आणि कोरिया यांचे नाते १९५०पासूनचे आहे. कोरियन युद्धाच्या काळात नेहरूंची कामगिरी आणि भारताची प्रतिष्ठा उजळून निघाली होती. भारत आणि उत्तर कोरिया हे दोन्ही देश अलिप्ततावादी चळवळीत होते. पुढे १९७३मध्ये भारताने दोन्ही कोरियांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. मात्र उत्तर कोरियाचे एकूण वर्तन आणि व्यवहार पाहता फार काही विशेष सांगावे, असे संबंध नाहीत. आतापर्यंत एकाही भारतीय पंतप्रधानाची किंवा राष्ट्रपतीची उत्तर कोरियाला भेट झालेली नाही. मात्र काही राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक यांनी उत्तर कोरियाला भेटी दिल्या आहेत. भारत उत्तर कोरियाला थोडीफार मदत प्रशिक्षण आणि इतर बाबींत करतो. काही वेळा धान्य आणि औषधेसुद्धा भारताने दिली आहेत. हे उघडच आहे की, उत्तर कोरियावरील आर्थिक निर्बंधांमुळे भारताचा फार व्यापार नाही. बंधने पाळून थोडीफार आयात-निर्यात होत राहते. या तुलनेत भारत आणि दक्षिण कोरिया यांचे एकमेकांशी आर्थिक, लष्करी आणि सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय जवळचे संबंध असून ते उत्तरोत्तर दृढच होत चालले आहेत. मात्र उत्तर कोरियाची एकूण परिस्थिती पाहता तेथील सरकार आपले वर्तन बदलण्याची काही चिन्हे नाहीत.

आदर्श अशी कम्युनिस्ट व्यवस्था उभारावी, अशा हेतूने स्थापन झालेले शासन कधी आपल्याच नागरिकांच्या विरोधी युद्ध पुकारून बसले आणि कधी तेथील आदर्शवाद संपला, हे कोरियन लोकांना कळलेसुद्धा नाही. आता उत्तर कोरियात सर्व प्रकारचे अत्याचार करणारे एक सर्वंकषवादी शासन आहे. या शासनाचा वरवंटा कधी, कोणावर, कसा आणि का चालेल, याची खुद्द वरवंटा चालवणाऱ्यांनाही कल्पना असत नाही.

विसाव्या शतकातला गाजलेला इंग्रजी लेखक आणि कादंबरीकार जॉर्ज ऑरवेल याला कम्युनिस्ट शासन आले तर काय घडू शकते, याचा नेमका अंदाज होता. त्याने ‘अॅनिमल फार्म’ आणि ‘१९८४’ या दोन्ही कादंबऱ्यांतून फॅसिस्ट प्रवृत्तीच्या कम्युनिस्ट राजवटीत काय घडू शकते, याचे तंतोतंत वर्णन केले आहे. आज जॉर्ज ऑरवेल जिवंत असता तर आपल्या कल्पनाशक्तीचा त्याला अभिमान वाटला असता आणि अर्थातच दुसऱ्या बाजूला अपार दु:खही झाले असते!

sankalp.gurjar@gmail.com

(पुर्नप्रकाशित -  दिव्य मराठी दिवाळी अंक २०१६)

बातम्या आणखी आहेत...