आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:पक्ष्यांवर संक्रांत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘द रुक सिट्स हाय, व्हेन द ब्लास्ट स्वीप्स बाय, राइट प्लीज्ड वुइथ हिज सी-सॉ’... अशी एक इंग्रजी कविता आहे. त्यात कावळ्याप्रमाणे असणाऱ्या एका पक्ष्याचे वर्णन आहे. रूक हा पक्षी राकट, विषम स्थितीत, हवामानातही तग धरुन रहाणारा आहे. जेव्हा वाऱ्याचा मारा होतो, झाडांच्या फांद्या झोडपून निघतात, तेव्हा हा पक्षी झाडाच्या शेंड्यावरती झोक्याची मजा घेता असतो, असे कवी म्हणतो. अनेक संकटांत तग धरुन राहणाऱ्या या पक्ष्यांवर आज ‘बर्ड फ्ल्यू’चे संकंट आले आहे. गेल्या काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि केरळमध्ये जवळपास ८५ हजार पक्ष्यांचा बळी बर्ड फ्ल्यूने घेतला आहे. सध्या महाराष्ट्राला त्याचा धोका नसला तरी १४-१५ वर्षांपूर्वी राज्यानेही हा अनुभव घेतला आहे. गेले वर्षभर समस्त मानव जात कोरोनाचा सामना करते आहे. लसीच्या रूपाने कोरोनावरील विजय दृष्टिपथात आला असतानाच पक्ष्यांवर एच ५ एन १ या एव्हियन एन्फ्ल्यूएन्झा नामक विषाणूंचे संकट आले आहे. सध्याचा बर्ड फ्ल्यू मुख्यत्वाने स्थलांतरित पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर युरोपातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. मात्र, तेथून स्थलांतरित होणारे पक्षी विषाणूग्रस्त असतील तर त्यांना रोखायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच काळजी घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ अंमलात आणणे, हे पर्याय आपल्या हाती आहेत. याची बाधा माणसाला होऊ नये, यासाठी बर्ड फ्ल्यूग्रस्त पक्षी मारण्याची राक्षसी कृती करावी लागते आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि पक्षितज्ज्ञांच्या मते, स्थलांतरित पक्ष्यांमुळे हवेतूनही एच ५ एन १ विषाणूचा फैलाव होण्याचा धोका आहे. या आधी कोरोनामुळे आणि आता बर्ड फ्ल्यूमुळे अंडी, मांस खाण्याविषयी भीती निर्माण झाली आहे. यासाठी केंद्राच्या पशुसंवर्धन खात्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यावर अंमल न केल्यास पक्ष्यांवरील संक्रांत माणसांवरही येण्याची शक्यता आहे. या मार्गदर्शक सूचना पाळण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाय योजून योग्य काळजी घेतल्यास हे संकट टळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...