आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रसिक स्पेशल:इच्छाशक्ती, वडील आणि साहेब...!

संतोष आंधळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

"काळजी घेण्याची गरज आहे, पण घाबरून जाऊ नका…आम्ही तुमच्यासोबत आहोत'' असा वारंवार दिलासा देणारं राजेश टोपे हे नाव आता घरघरात पोहचलयं. मोजक्याच शब्दांत राज्याच्या स्थितीवर भाष्य करणाऱ्या टोपेंच्या याच व्यक्तिमत्वाचे आणि मुद्देसूद, आकडेवारीच्या आधारे माहिती देण्याचे त्यांच्या कामाच्या शैलीचं कौतुक व्हायला लागले आहे. एक संवेदनशील, कार्यक्षम, अभ्यासू, विनम्र, लढाऊ आणि तरीही संयत कर्तृत्वाचा नेता असलेल्या राजेश टोपेंना कोरोनाविरुद्धच्या या लढाईशी दोन हात करताना हे बळ नेमकं कुठुन मिळतं याचा उलगडा त्यांनी गुरु पोर्णिमेनिमित्त खास "दिव्य मराठी रसिक'शी बोलताना केला.

जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त "कोरोना आणि त्यासंदर्भातील उपाययोजना' हा ध्यास घेऊन काम करणारे आणि कोरोनाची भीती लोकांच्या मनातून घालविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे... राज्यातील एकही कोरोनाबाधितांचा असा 'हॉटस्पॉट' नाही की राज्यातील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तेथे हजेरी लावली नसेल. हा किमान एकच माणूस आहे ज्याने जिथे कोरोनाची संख्या वाढत आहे तेथे थेट त्याठिकाणी  प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची चाचपणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. बरं दिवस कमी पडतो की काय मध्यरात्री "पंचतारांकित' महागड्या रुग्णालयांना भेटी देऊन आपल्याच विभागाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहून थेट कारवाई सुद्धा केली. भले-भले लोकं  कोरोना काळात थेट मैदानात उतरत नसताना बिनधास्तपणे रुग्णांच्या आणि प्रशासनच्या व्यथा ऐकण्यासाठी महाराष्ट्रात विविध भागात फिरण्याचं आणि या बड्या रुग्णालयांना शिंगावर घेण्याचं बळ येतं कुठून तर त्यावर त्यांचे एकचं उत्तर, "इच्छाशक्ती, वडील आणि साहेब...

"तुमची फक्त काम करण्याची इच्छा पाहिजे, मग ते काम कितीही अवघड असले तरी ते आपण पूर्णत्वाला नेऊ शकतो याची मला पूर्णपणे खात्री आहे. यापूर्वी मी उच्च, तंत्रशिक्षणमंत्री होतो त्यावेळी सुद्धा आम्ही चांगले निर्णय घेतले होते. महाराष्ट्रात खासगी विद्यापीठाचा कायदा हा माझ्या काळातच झाला. माझे वडील स्वर्गीय अंकुशराव टोपे यांनी पूर्ण आयुष्य सामाजिक कामासाठी वाहून घेतले. माझे वडील कडक शिस्तीचे होते आणि कायम समाजोपयोगी काम करत राहा असे ते आम्हाला सतत सांगायचे. त्यांचे संस्कार आणि विचार घेऊनच मी वाढलो. माझे वडील स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जायचे. असं असूनही त्यांनी आपल्या या स्वभावाने कुणाची मनं दुखावली जाऊ नयेत याची काळजी घेतली. टोपे या नावामागं उभं असलेलं जनतेचं पाठबळ हे त्याचंच फळ आहे. त्यांच्यामुळे अनेकांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला. त्यांची प्रतिमा परिसरात एक कुटुंबप्रमुख म्हणून निर्माण झाली. वडलांचा हाच वारसा चालवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय.... राजेश टोपेंच्या बोलण्यात वडिलांबद्दल प्रचंड आत्मियता दिसून येते. 

आणि म्हणूनच ते पुढे म्हणतात की, आज मी जे काय करतोय त्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एखादा निर्णय घेण्याची क्षमता मी ठेवतो त्याचं कारण म्हणजे माझे वडील... नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना कधीही घाबरायचे नाही, अशी शिकवण त्याकाळात त्यांनी आम्हाला दिली. त्यांचा वारसा पुढे चविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. ते देखील खासदार, आमदार होते. परंतु ना त्यांच्या कारकिर्दीत ना माझ्या कारकिर्दीत एकदाही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत ही मी माझ्या राजकीय कामाची पावती समजतो.'

राजकीय कारकिर्द घडवण्यामागचे श्रेय मात्र टोपे शरद पवारांना देतात... आपल्या राजकीय आयुष्यातील गुरुविषयी माहिती देताना टोपे सांगतात की, शरद पवार साहेब हे माझ्या वडिलांनंतरचे प्रेरणा आणि श्रद्धास्थान... "फ्रंट लाईन ला राहून काम करा' हा मूलमंत्र त्यांनी कायम मलाच नाही तर सर्वच कार्यकर्त्यांना शिकविला. साहेबांची कामाची पद्धत सबंध देशाला माहितीये. कुठे काही आपत्ती आली की ते थेट त्या ठिकाणी पोहचतात. लोकांशी संपर्क असण्यावर त्यांचा कायम भर असतो. आपली नाळ कायम जमिनीशी घट्ट असली पाहिजे हीच  शिकवण त्यांनी नेहमी आम्हाला दिली.  १९९३ चा किल्लारीचा भुकंप सगळ्यांनाच आठवत असेल, त्यावेळी  मी २२ वर्षाचा होतो. जालना जिल्ह्याचा युवक अध्यक्ष या नात्याने वडिलाबरोबर मी घटनास्थळी पोहचलो. माझ्या वडिलांचे आणि साहेबांचे चांगले संबंध... त्याकाळात साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. साहेब अनेक दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकून स्वतः मदतकार्यात कसे सहभागी झाले होते हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे.  प्रशासनाच्या बैठकाही साहेब त्याच परिसरात घेत होते. लोकांना कशा पद्धतीने मदत मिळेल यावर साहेबांची बारीक नजर असायची. मी जेव्हा फिल्डवर काम करतो तेव्हा ते काम करत असताना माझ्यासमोर साहेबांची प्रतिमा साकारत असते. 

आपल्या गुरुंच्या शिकवणीच्या जोरावरच त्यांनी कोरोनाच्या या काळात नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले. कोरोनाबाधित बहुतांश नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि त्यात खासगी रुग्णालयाचे महागडे उपचार या दोन्ही समस्यांनी  नागरिक  हैराण झाले होते. या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून, मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या  शुल्कावर चाप आणि त्याचबरोबर  या  रुग्णालयातील ८०% खाटा सरकारच्या ताब्यात घेणे हा निर्णय आणि  महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयात कोरोनाबाधितांवर मोफत उपचार देण्याचे दिलासादायक निर्णय घेऊन टोपेंनी एक धाडसी पाऊल उचललं. या संदर्भात टोपे म्हणतात की, अनेकजण जे शासकीय व्यवस्थेत टेस्टिंगसाठी येत नव्हते, ते खासगी लॅबमध्ये टेस्टिंग  साठी जात होते. त्यावेळी त्यांना रु. ४५००-४८०० इतका खर्च येत होता मात्र तोच दर आता २५००-२८०० इतका करण्यात आला आहे. तसेच, अनेक तज्ञांनी सुचविलेली आणि  केंद्र सरकाने परवानगी दिलेली महागडी जीवनाश्यक औषध खरेदी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत घेऊन करण्यात आला आहे. त्यामध्ये, प्रामुख्याने, रेमिडीसीवर आणि टॉसिलिजूम्याब या महागड्या इंजेक्शनचा समावेश आहे. आम्ही ही औषधे मोफत देण्याबाबत विचार करीत आहोत. 

कोरोनाच्या या काळात वैद्यकीय शास्त्राचा आधार घेऊन जनतेच्या मनातील प्रश्नाची उत्तरे अगदी सोप्या भाषेत मांडणे हा राजेश टोपे यांचा गुण भल्याभल्या डॉक्टरांना प्रेमात पडतो. पत्रकारांना सुद्धा सर्वच प्रश्नांची उत्तरे आकड्यांसह देणे, नवनवीन उपचारपद्धती सोप्या भाषेत समजून सांगणे, कुठल्याही प्रश्नावर न चिडता शालीनतेने उत्तर देण्याची त्याची ही "स्टाईल' लोकप्रिय होत चालली आहे.  विशेष म्हणजे स्वतःची आई मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमधे अॅडमिट असतानाही एक मंत्री म्हणून लोकांप्रतीचं कर्तव्य पार पाडणारे मंत्री तसे दुर्मीळच म्हणायला हवेत. एकुलता एक मुलगा आज आपल्या आईजवळ थांबून आपलं कर्तव्य पार पाडण्याऐवजी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांवर ती जबाबदारी सोपवतो आणि महाराष्ट्राची काळजी घेत फिरताना दिसतोय. याच गोष्टीसाठी त्यांचं कौतुकही होतंय.

santoshandhale.mmm@gmail.com

(लेखकाचा संपर्क - ९८७०४९०६०३)

0