आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहत इंदौरी:विद्रोहाचा वारसदार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राहत इंदौरी यांनी कधीच कुणाची भीडभाड ठेवली नाही. पुरस्कार वा मानधनासाठी स्वतःच्या भूमिका त्यांनी गहाण ठेवल्या नाहीत. भारतीय समाजाला सत्तेच्या समीक्षकांची गरज असताना त्यांचे जाणे वेदनादायी आहे. सामाजिक विवेकाचा बळी घेणारी महामारी सर्वत्र सुरू असताना ‘वबा फैली है हर तरफ, अभी माहौल मर जाने का नहीं है’ अशा शब्दात ‘मी जाणार नाही’, असेच ते सांगत होते...

उर्दू ही शायरीची भाषा आहे. सौंदर्य हे तिचे वैशिष्ट्य आहे. भाषिक सहिष्णूता ही तिची व्यवच्छेदकता आहे. ही भाषा जीवनाच्या संमिश्रतेचे प्रतिनिधित्व करत असली, तरी विद्रोह हा तिचा आत्मा आहे. जगण्यासाठी जी-जी मूल्ये सौंदर्य देऊ शकतील, त्यांना उर्दूने कवटाळले आहे. गालिब तिचा महाकवी, तर इक्बाल उर्दू काव्याचे तत्त्वज्ञ. गालिब यांनी जीवनातल्या दुःखांना सोबत घेऊन सत्तेच्या मस्तीला धडक दिली, तर इक्बाल यांनी जीवनाच्या जळजळीत सत्याला तिच्या ओंजळीत धरलं. उर्दूला समृध्द करणारे हे दोन शायर उभे राहिले ते भारतीय इतिहासाच्या पटावरच. त्यांनी वारसा म्हणून भारताच्या गंगा-जमनी संस्कृतीला स्वीकारलं. समृध्द इतिहासातून विद्रोहासाठी धैर्य घेत हे दोन पुढे आले. इंग्रजांच्या सत्तेला, त्यातून जन्मलेल्या जुलमाला उर्दू इतका प्रखर विरोध दुसऱ्या भाषेतील काव्याने केला नाही. कारण गरीबांच्या बाजूचा पक्षपाती विचार हा उर्दू शायरीचा केंद्रबिंदू होता. गालिबपासून सुरू झालेल्या विद्रोहाच्या या परंपरेचा वारसदार म्हणून राहत इंदौरी यांच्याकडे पाहिले जाते.

संघर्ष ललाटी बांधलेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत राहत इंदौरींचा जन्म झाला. काही काळ विद्यार्थी चळवळीत घालवलेल्या इंदौरी यांनी गरीबांचं जगणं जवळून अनुभवलं होतं. त्यातला दर्द त्यांनी सोसला होता. म्हणून गरीबांचा प्रतिनिधी म्हणून ते शायरीच्या प्रांतात उभे राहिले. सर्जनशीलता ही त्यांना निसर्गाकडून जन्मजात मिळाली होती. सुरूवातीच्या काळात कुटुंबाच्या आर्थिक हलाखीला दूर करण्यासाठी त्यांनी चित्रकार म्हणूनही काम केलं. आणीबाणीच्या विरोधातला संघर्ष त्यांनी विद्यार्थिदशेत अनुभवला होता.

एकाधिकारशाहीच्या विरोधात लोकशाही मूल्यांचे समर्थन करत त्यांनी केलेलं लिखाण हे त्यांना युवावस्थेत मिळालेल्या अनुभवाचा परिणाम होता. देशात झुंडबळीच्या घटना घडू लागल्यानंतर मनुव्वर राणा, इम्रान प्रतापगढी, राहत इंदौरी या त्रयींच्या राजकीय विद्रोहात्मक शायरीची चर्चा सुरू झाली. मुनव्वर राणा यांनी सत्तेविरोधात आघाडी उघडल्यावर राहत इंदौरी त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. राष्ट्रवादाच्या सांस्कृतिक अन्वयार्थाविरोधात त्यांनी अनेक शेर लिहिले. प्रतिगामी गटाच्या राष्ट्रवादाविषयी आपली भूमिका मांडली. सत्ताप्रणित राष्ट्रवादाला फटकारताना त्यांनी लिहिलं...

जो आज साहिब ए मस्नद हैं कल नहीं होंगे किराएदार हैं जाती मकान थोडी है। सभी का खून है शामील इस मिट्टी में किसी के बाप का हिन्दुस्तान थोडी है। जे आज सत्तेत आहेत, ते उद्या असणार नाहीत. ही लोकशाही आहे, सत्तेवर त्यांची मालकी नाही. हा देश घडवण्यात सगळ्यांचेच योगदान आहे, हेच ते अधोरेखित करत होते. आता जगणं काही साधं राहिलं नाही. संघर्षाकडे पाठ फिरवण्यात काहीच अर्थ नाही, हे ठासून सांगिताना ते लिहितात...

आंखो में पानी रखो होठों पे चिंगारी रखो जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो माध्यमांच्या बदलत्या भूमिकांवरही राहत यांनी कठोर शब्दांत टीका केली. सत्तेच्या समर्थनार्थ सुरू असलेली पत्रकारिता त्यांना मान्य नव्हती. त्यांनी अत्यंत मार्मिक, पण उपरोधात्मक शैलीत म्हटलं...

बनके हादसा बाजार में आ जाएगा जो नहीं वह अखबार में आ जाएगा। चोर उचक्कों की करो कद्र कि मालूम नहीं कौन कब सरकार में आ जाएगा। राहत इंदौरी यांनी कधीच कुणाची भीडभाड ठेवली नाही. पुरस्कारांसाठी किंवा मानधनासाठी स्वतःच्या भूमिका त्यांनी गहाण ठेवल्या नाहीत. सत्तेला शहाणपण शिकवता येत नाही, पण विरोध करून त्याचा अहंकार उतरवता येतो, हे इंदौरी यांनी अनेक वेळा दाखवून दिले. भारतीय समाजाला आज अभूतपूर्व अशी सत्तेच्या समीक्षकांची गरज आहे. अशा काळात राहत इंदौरी यांचे जाणे खूप वेदनादायी आहे. ते देशासाठी भूमिका घेऊन जगणारे कवी होते. सामाजिक विवेकाचा बळी घेणारी महामारी सर्वत्र सुरू असताना...

वबा फैली है हर तरफ, अभी माहौल मर जाने का नहीं है। अशा शब्दात ‘मी जाणार नाही’, असेच ते सांगत होते. ते सोबत नाहीत हे वास्तव स्वीकारून आपल्याला आता विद्रोहाचा नवा प्रतिनिधी जन्मास घालावा लागेल. तीच त्यांच्याविषयीची कृतज्ञता आणि त्यांना वाहिलेली श्रद्धांजली असेल.

सरफराज अहमद
लेखकाचा संपर्क : ९५०३४२९०७६

sarfraj.ars@gmail.com

बातम्या आणखी आहेत...