आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कसल्याही सत्तेच्या विरोधात बोलणं किंवा न बोलणं ही राजकीय कृतीच असते. बोलण्याची ही कृती साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त विख्यात हिंदी कवी मंगलेश डबराल जाणिवपूर्वक, निरंतर करत राहिले. रियल आणि व्हर्च्युअल दोन्ही जगात. त्याची किंमतही अर्थातच मोजत राहिले. चार दिवसांपूर्वी कोव्हिडची लागण झाल्याने डबराल यांचे निधन झाले. मंगलेश डबराल नावाच्या कवीला वाचता-वाचता तुमच्या आतल्या हावी होण्यासाठी धडपडणाऱ्या सैतानाला तुमच्याच आतला माणूस पुन्हा एकदा हरवतो, म्हणून त्यांच्या कविता कालजयी आणि श्रेष्ठ ठरतात.
सर्वकाळात सर्वप्रकारचे कवी-कलावंत जगात असत आलेत. तीन मुख्य. एक, सत्तेची प्रत्यक्षाप्रत्यक्ष खुशामत करत तिच्या वळचणीला सगळे लाभ मिळवणारे. दुसरे, कुंपणावरची चलाख भूमिका घेऊन दोन्हीकडचे लाभ पदरात पाडून घेणारे आणि तिसरे, सर्वशक्तीमान असल्याचा भ्रम झालेल्या सत्तेला खडे बोल सुनावत जनसामान्यांनाही शब्द-कृतीतून जागतं ठेवणारे. आता लौकिकार्थानं आपल्यात नसलेले कवी मंगलेश डबराल तिसऱ्या प्रकारात मोडणारे. आणि ‘सत्तेला बोल सुनावणं यात’ केवळ राजकीय नाही, तर सर्व प्रकारची सत्ता आली. सांस्कृतिक, सामाजिक आणि भाषिकही...
कसल्याही सत्तेच्या विरोधात बोलणं किंवा न बोलणं ही राजकीय कृतीच असते. बोलण्याची ही कृती मंगलेशजी जाणिवपूर्वक, निरंतर करत राहिले. रियल आणि व्हर्च्युअल दोन्ही जगात. त्याची किंमतही अर्थातच मोजत राहिले. गेल्या वर्षी फेसबुकवर त्यांनी लिहलेल्या एका पोस्टवर बराच हंगामा झाला होता. ‘हिंदी में कविता, कहानी, उपन्यास बहुत लिखे जा रहे हैं, लेकिन यह सच है कि इन सबकी मृत्यू हो चुकी है हालांकी ऐसी घोषणा नहीं हुई और होगी भी नहीं क्योंकी उन्हे खूब लिखा जा रहा है।’ लेकिन हिंदी में अब सिर्फ ‘जय श्रीराम’, ‘बन्दे मातरम’ या ‘मुसलमान का एकही स्थान, पाकिस्तान या कब्रिस्तान’ जैसी चीजें जीवित है। इस भाषा में लिखने की मुझे बहुत ग्लानी है। काश, मैं इस भाषा में न जन्मा होता!’ या पोस्टवर हिंदुत्ववाद्यांसह अनेकांनी त्यांना भयंकर ट्रोल केलं. पण त्यांनी शब्द मागे घेतले नाही. यासंदर्भात ‘न्युजक्लिक’वर सविस्तर भूमिका मांडताना ते बोलले होते, की ‘ये एक व्यंजना है। भाषा दुषित करनेवाले नारों का और वैसी मानसिकता का प्रतिकार आज का हिंदी साहित्य नहीं कर रहा। मूल रूप से ये चिंता उस पोस्ट में है। क्षोभ, क्रोध और दुख है। हमारी भाषा को हम सभ्य और मानवीय भाषा बने रहने दें। उसे घृणा और नफरत की भाषा न बनाएं।’ द्वेषपूर्ण राजकीय व्यवहारातून होत चाललेली भाषेची आणि पर्यायानं ती बोलणाऱ्या माणसाची अवनती मंगलेशजींना कशी अस्वस्थ-उद्विग्न करायची, त्याविरूद्ध ते कशी भूमिका घ्यायचे, याचं हे उदाहरण.
१९४८ साली उत्तराखंडच्या कापफलपानी गावच्या पहाडांमध्ये जन्मत: पोटासाठी स्थलांतर करून या कवीनं दिल्लीसारख्या महानगरांमध्ये हयात घालवली. त्यामुळंच त्यांच्या कवितेतूनही स्थलांतराचं दु:ख पहाडातून फुटलेल्या मोसमी झऱ्यासारखं वाहत राहतं. पहाडांमधली स्वच्छ हवा निखळ-अस्पर्श रंग, प्रदेश, प्रवास यांचा आकर्षक कोलाज ठिकठिकाणी सापडतो.
‘हम कहीं और चले जाते हैं अपने घरों लोगों अपने पानी और पेड़ों से दूर
मैं जहाँ से एक पत्थर की तरह खिसक कर चला आया
उस पहाड़ में भी एक छोटी सी जगह बची होगी
इस बीच मेरा शहर एक विशालकाय बांध के पानी में डूब गया
उसके बदले वैसा ही एक और शहर उठा दिया गया
लेकिन मैंने कहा यह वह नहीं है
मेरा शहर एक खालीपन है’
आतलं कवीपण ताकदीनं पेलण्यासह मंगलेशजी धकाधकीच्या पत्रकारितेतले प्रयोगशील संपादक आणि देशविदेशातल्या कवींना कौशल्यानं हिंदीत आणणारे अनुवादक म्हणूनही महत्त्वाचं काम करत राहिले. जनसत्ता’, ‘सहारा समय’ अशा माध्यमसंस्थांमध्ये आणि ‘पूर्वाग्रह’, ‘अमृत प्रभात’ अशा साहित्यिक नियतकालिकांचे संपादक असताना त्यांनी अनेक नवंताजं लिहिणारे तरुण वाचकांसमोर आणले. संग्राह्य पुरवण्या काढल्या. मराठीतले काही विशिष्ट साहित्यिक वर्तमानपत्री लिखाणाला मोडीत काढायला तत्पर असतात, त्यांनी यातून बोध घ्यावा. 'नॅशनल बुक ट्रस्ट'मध्येही त्यांनी काही काळ काम केलं. मंगलेशजींनी विविध भाषांमधले कवी-लेखक हिंदीत नेले तसे त्यांच्याही कवितांचे मराठीसह इंग्रजी, रशियन, जर्मन अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेत. ‘पहाड पर लालटेन’, ‘घर का रास्ता’, ‘हम जो देखते है’, ‘नये युग में शत्रू’ आणि शेवटचा 'स्मृती एक दूसरा समय है' असे आणि अजून काही कवितासंग्रह, सोबतच ‘लेखक की रोटी’, ‘एक बार आयोवा’ सारखं गद्यलेखन त्यांच्यातल्या जिव्हाळ, फिरस्त्या कलंदर माणसाशी भेट घालून देतं. ४५ वर्षांच्या लेखन कारकीर्दीत साहित्य अकादमीसह अनेक मोठे सन्मान त्यांना मिळाले, सोबत जगभरातल्या चाहत्यांचं भरभरून प्रेमही.
प्रेम आणि क्रांती एकत्र येते तेव्हा दोघंही एकमेकांना जास्तच सुंदर बनवतात, हे मंगलेशजींची कविता सांगत राहते. ‘तुम्हारा प्यार एक लाल रूमाल है, जिसे मै झंडे सा फहराना चाहता हूँ।' या त्यांच्या ओळी याची साक्ष देणाऱ्या. अर्थात, क्रांतीचा परचम बुलंद करतालाच ही कविता कधी होहल्लेवाली, स्टंटबाज, आवाजी झाली नाही. संयतपणा राखूनही ठाम विधान करण्याची, धारदार बाण नीटच निशाण्यावर मारण्याची खुबी मंगलेशजींना अवगत होती. जगण्यातलं सगळं प्रेम, सौंदर्य, नजाकत, मोह-माया यांचं उबदार कौतुक होतं या कवितेला. पण सोबतच निरंकुश राजवटीला अवघड प्रश्न करण्यासह, शोषकांना जाब विचारत पर्यायी जगाचं तत्वज्ञान मांडत राहण्याचा तोलही सुरेख सांभाळत राहिली ती. 'तानाशाह', 'आदिवासी', 'वर्णमाला'... कितीतरी कविता सांगता येतील. संगीताचेही जाणकार असलेल्या रसिक मंगलेशजींचं कवितावाचन ऐकलं तर अनुभव येईल, कवितेतल्या सगळ्या प्रतिमा डोळ्यांसमोरून सरकत जातात, बायस्कोपसारख्या. त्यात आपल्या जगण्या-भोगण्यातली दृश्यंही मिसळत राहतात. असा चित्रमय अनुभव खूप कमी कवींना ऐकताना येतो. अस्सल जगत ‘लाइफ लाइक’ कविता खूप कमी जण लिहितात, या दुर्मीळ कवींपैकी होते ते, कदाचित म्हणून असेल.
ग्राफिटीसारख्या मनावर कोरल्या जाणाऱ्या ओळी त्यांच्या कवितासंग्रहासह ललित गद्यलेखनातही पानोपानी सापडतात. त्यांनी लिहलेल्या प्रवासवर्णनांसह कवितेतही कथा-किस्से गुंफलेले सापडतात. वाचता-वाचता मध्येच थबकून रहावं, हरखून जावं, अशा कितीतरी जागा कवितेत विखुरलेल्या दिसतात. करुणा, साहस, दु:ख, उल्हास, संघर्ष, अधूरी स्वप्नं, साध्यासुध्या माणसांचं खूप साधंसुधं पण तरी मोहक जगणं ‘बिटवीन द लाइन्स’ पाझरत राहतं.
माणूस म्हणून तुमचं-माझं ‘बेसिक इन्स्टिक्ट’ सतत हिंसा, द्वेष, बेईमानी यांच्या बाजूनं कौल देत राहतं. पण स्वत:च्याच आतून चांगुलपणा, माणुसकीचाही एक आवाज ऐकू येतच राहतो. हे प्राचीन द्वंद्व. अगदी कबीर, तुकाराम, मिर्झा गालिब सगळ्यांनीच याबाबत लिहून ठेवलंय.
मिर्झाजी म्हणतात,
‘ईमाँ मुझे रोके है, जो खींचे है मुझे कुफ़्र
काबा मेरे पीछे है, कलीसा मेरे आगे’
धर्म की अधर्म, इमान की बेइमानी, प्रेम की द्वेष, हिंसा की अहिंसा ही जी रस्सीखेच आदिम काळापासून होत आलीय, ती मांडतांना त्यातून सुटकेचा रस्ताही कवीच सांगतो. मंगलेशजींच्या लिहण्यातही हा रस्ता ओळीओळीत सापडतो. मंगलेश डबराल नावाच्या कवीला वाचता-वाचता तुमच्या आतल्या हावी होण्यासाठी धडपडणाऱ्या सैतानाला तुमच्याच आतला माणूस पुन्हा एकदा हरवतो, म्हणून ही कविता कालजयी आणि श्रेष्ठ म्हणावी वाटते.
‘जो रोटी बनाता है कविता नहीं लिखता
जो कविता लिखता है रोटी नहीं बनाता
दोनों का आपस में कोई रिश्ता नहीं दिखता
लेकिन वह क्या है
जब एक रोटी खाते हुए लगता है
कविता पढ़ रहे हैं
और कोई कविता पढ़ते हुए लगता है
रोटी खा रहे हैं।’
जगण्याविषयी हे असं अपार, अद्भुत कुतूहल घेऊन त्यांनी विचारलेले प्रश्न भूक लागणारा कुणीही, कुठल्याही काळात, स्वत:ला विचारत राहू शकेल असे. कवी हयात असताना आणि नसतानाही. ही कविता वाचताना अनेकदा मन हलकं होतं तसं कित्येकदा उर दडपूनही जातो. या कवितेतलं ओढ लावणारं महान मानवीपण, उदात्त सहवेदना, करुणा विरुद्ध आजचा क्रूर, दुषित, केऑटिक काळ यांच्यातला विरोधाभास मनामेंदुत ठळक होतो. मग कविताच उत्तर घेऊन समोर येते.
‘एक सरल वाक्य बचाना मेरा उद्देश्य है
मसलन यह कि हम इंसान हैं
मैं चाहता हूँ इस वाक्य की सचाई बची रहे
सड़क पर जो नारा सुनाई दे रहा है
वह बचा रहे अपने अर्थ के साथ
मैं चाहता हूँ निराशा बची रहे
जो फिर से एक उम्मीद’
पैदा करती है अपने लिए’
मग्रूर सत्तेला ललकारत फाटका शेतकरी सिंधू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेल्या काळात मंगलेशजींच्या कोव्हिड संसर्गातून झालेल्या अकाली मृत्यूची खबर आली. मात्र त्यांच्या ‘मै चाहता हूँ’ या कवितेतला हा तुकडाच त्यांच्या अमर असण्याची ग्वाही देतोय.
sharmishtha.2011@gmail.com
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.