आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:बाई नग्न होते तेव्हा....

शर्मिष्ठा भोसले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक बाई नग्न होते तेव्हा कपडे खरंतर समाजपुरुषाच्या अंगावरून उतरतात. एक बाई नग्न होते तेव्हा कित्येक पुरुषांसह स्त्रियांच्याही नजरांमधले "मेल गेझ' असे मस्त एक्स्पोज होतात. भारत नावाच्या आपल्या कॉम्प्लेक्स देशात हा समाजपुरुष, हे मेल गेझ सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, अनादी अनंत. बिकिनीतल्या हॉट बेबपासून पायघोळ बुरख्यातल्या बानोपर्यंत कुणीच या मेल गेझमधून सुटू शकत नाही.

'तू पॉर्न स्टार आहेस का?', 'आता तुला रेट विचारतील बघ लोक तुझा', 'हे आपल्या मराठी संस्कृतीला शोभत नाही.' 'तुझ्या अभिनय खूप आवडायचा, आता मनातून उतरलीस.' अभिनेत्री वनिता खरात हिनं "बॉडी पॉझिटिव्हिटी चळवळीतलं योगदान' या भूमिकेतून स्वतःचा काढलेला नग्न फोटो एक जानेवारीला समाजमाध्यमांवर टाकला. भरभरून कौतुक करणाऱ्या कमेंट्ससह या शब्दात "टीका' करणाऱ्या कमेंट्सही तिथं आल्या.

एक बाई नग्न होते तेव्हा कपडे खरंतर समाजपुरुषाच्या अंगावरून उतरतात. एक बाई नग्न होते तेव्हा कित्येक पुरुषांसह स्त्रियांच्याही नजरांमधले "मेल गेझ' असे मस्त एक्स्पोज होतात. भारत नावाच्या आपल्या कॉम्प्लेक्स देशात हा समाजपुरुष, हे मेल गेझ सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, अनादी अनंत. बिकिनीतल्या हॉट बेबपासून पायघोळ बुरख्यातल्या बानोपर्यंत कुणीच या मेल गेझमधून सुटू शकत नाही. एसटीतला धक्का, चौकातला नाका किंवा एखाद्या आलिशान रेस्टॉरंटमधला कोपरा असेल, हे मेल गेझ तुम्हाला गाठतातच गाठतात. कमालीच्या अनअपोलोजेटिक आणि बेदरकार शैलीत स्कॅन करत राहतात आतबाहेरून. दोनच पर्याय, पूर्ण दुर्लक्ष करा किंवा समोरच्याची तंद्री तुटेल अशी नजरेला नजर भिडवा. या मेल गेझचा मालक असलेल्या समाजपुरुषाला हवं असेल तेव्हा हव्या त्या मापातली बाई न्याहाळायला, हाताळायला लागते. तिच्या हवंहवंसं असण्या-नसण्याचे निकष तिच्या सहमतीविना काटेकोर ठरवले गेलेले असतात. त्या निकषांच्या डिशमध्ये स्वतःला सजवत तिनं पेश केलं की समाजपुरुष खुश होतो.

कमालीची हॉट दिसत, आवाजात आव्हान पेरत "चोली के पीछे क्या है?' असं तिनं तब्बल तीन दशकांपूर्वी विचारलं तेव्हाही हा समाजपुरूष असा चिडला नव्हता, उलट गालातल्या गालात खुशीत हसत रोमँटिक झाला होता. कारण तिचं तसं विचारणं त्याच्या रंजनासाठी होतं, भंजनासाठी नाही. मात्र त्याची इच्छा आणि मर्जी नसताना तिनं ती चोळी अशी काढणं नाहीच पचत, नाहीच पटत समाजपुरुषाला. मात्र हा पॉवर गेम इथंच थांबत नाही. इथल्या बाजारव्यवस्थेशी समाजपुरुषाची नफेखोर युती होते. तेव्हा समाजपुरुष आसपासच्या उपलब्ध बायांमधून निवडक जणींना उचलत त्यांचं बाजारमूल्य ठरवतो. बाजार आणि समाजपुरुषाची ही युती बाईला प्रॉडक्ट म्हणूनही विकते आणि प्रॉडक्टसोबतही खपवते. शेविंग रेझर पासून ते अगदी कारपर्यंत सगळं विकताना बाईला स्टेपनी म्हणून बिनदिक्कत वापरते. बाई स्वतः एक प्यादं असताना भागीदार असल्याच्या भ्रमात या गेममध्ये सामील होत, डावावर लागत राहते. सालोसाल हेच कुणाच्या कसल्या तक्रारीविना सुरू राहतं.

हरेकाच्या हातात मावणाऱ्या डिजिटल युगात "हॉट न्यूड्स'चं सतत तेजीत असलेलं ऑनलाईन मार्केट पाहिल्यावर अनेकांना वाटूनही जाईल, की खुलेआम दृष्टिसुखासाठी उपलब्ध असलेल्या नग्नतेत इतका गहजब माजवण्यासारखं काय आहे? किंवा तिला आवर्जून साजरं तरी का करायचं कुणी? पण मेख इथंच आहे सगळी. ती नग्न कधी, कुठं, कुणासाठी, कशासाठी होते आहे यावर समाजपुरुषाची प्रतिक्रिया ठरत असते. अर्थात "समाजपुरुष' असं संबोधलं गेलं असलं तरी त्यात स्त्रियाही आल्याच. कारण समाजपुरुष ही कुणी एक व्यक्ती नाही, ती सामूहिक वृत्ती आहे. वनिता खरातलासुद्धा बोल लावण्यासह तिची हेटाळणी करणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबत स्त्रिया आहेतच. ती समाजपुरुषाला आणि विशेष म्हणजे त्यानं घालून दिलेल्या सौंदर्याच्या निकषांनाही बाजूला करत स्वतःचा देह स्वतःशी साजरा करायला नग्न झाली, की समाजपुरुष अक्षरश: बिथरतो. विनाकारण चिथावला जात आरडाओरडा करतो. त्याला एकाएकी जी कुठली त्याची असेल ती संस्कृती, अस्मिता आठवते आणि मग ते दाखले देत तो तिला जाब विचारायला लागतो की कुठाय ती संस्कृती, आणि कुठाय ती अस्मिता? जणू त्यानं तिला पदराच्या टोकात गाठ मारत सांभाळायला दिल्या होत्या आणि तिनं नग्न होताना त्या पदरासोबतच कुठंतरी हरवल्या..!

एक पुरुष म्हणून रस्त्यावरच्या बाईचा देह चवीनं निरखताना घरात येऊन तोच पुरुष बाप, भाऊ आणि नवरा बनला की अनुक्रमे मुलगी, बहीण आणि बायको असलेल्या तिला आपल्याच वाईट नजरेपासून वाचवायला बुरख्यात नसता अंगभर कपड्यात राहण्याचा "सोप्पा' मार्ग सुचवतो. समाजपुरुषाची ही बालिश तारांबळ बघितली की एकीकडं चीड येते अन दुसरीकडं हसू. वनिताच्या चेहऱ्यावरच्या आभाळभर पसरलेल्या हसण्यात तोही एक शेड असावा कदाचित. "बाईचे अंगभर कपडे म्हणजे बाईची इज्जत', अंग झाकलेली बाई शालीन, सोज्वळ, कुलीन, खानदानी आणि अंग दाखवणारी बाई वाईट, कुलटा, वेश्या असं हा समाजपुरुष आग्रहीपणे घोकत असतो तेव्हा त्या निरुपद्रवी सुविचारांचा भयानक व्यत्यास लक्षात येतो का कुणाला? अंगभर कपडे घातलेल्या इज्जतदार बाईला बेइज्जत करायचं असेल तर तिचे कपडे काढा, तिला निर्वस्त्र करत तिची धिंड काढा. तिला बहाल केलेला खानदानी हा खिताब काढून घेत तिला कुलटा ठरवा. असंख्य दलित आदिवासी आणि इतरही बाया या व्यत्यासाचा आजवर बळी ठरत आल्यात. अशावेळी बाई या कपड्यांचं अवडंबरच निकालात काढायला निघाली, स्वतःच राजीखुशीनं नग्न झाली, तर तिला नामोहरम करण्याचा हा सोप्पा पण प्रभावी फॉर्म्यूलाच निकामी होऊन जातो. याचाही राग आला असावा समाजपुरुषाला, कदाचित.

तुमच्या-आमच्या नजरेतून "मेल गेझ' नष्ट होत नाही तोवर अशी "तथाकथित बोल्ड दृश्यं' डोळ्यांसमोर जरूर येत रहावीत. बाईचं शरीर जोवर केवळ "एक शरीर' म्हणून नॉर्मलाईज होत नाही तोवर असे सांस्कृतिक धक्के समाजपुरुषाला मिळत राहावेत. या क्षणी हा रोमँटिसिझम वाटू शकेल, पण जन्मणाऱ्या नव्या माणसाच्या जरा कमी दूषित, जरा कमी भिरभिरणाऱ्या नजरा कदाचित या प्रयोगांमधून निपजतील.

तोवर सांगायचं इतकंच, की बाईचा नग्न देह म्हणजे एक नितळ, शांत तळं आहे. कुणीही आपलं हवंनकोसं रूप बघू शकतं त्याच्यात. या तळ्यात डोकावून बघण्याचं धाडस तू नक्की करत रहा, समाजपुरुषा!

sharmishtha.2011@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

बातम्या आणखी आहेत...