आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंत्रज्ञान:‘आराेग्य सेतू अॅप’ ठरू शकते सरकारी नियंत्रणाचे शस्त्र

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एेच्छिक नसणे, डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि जनतेवर नियमित पाळत ठेवण्यावरून प्रश्न उपस्थित

पंतप्रधान  नरेंद्र माेदींनी १४ एप्रिल राेजी ‘आराेग्य सेतू’ अॅप डाऊनलाेड करण्याचे आवाहन जनतेस केले. आपण काेविड-१९ संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात तर आलेला नाहीत ना? याविषयीची कल्पना हे अॅप देणार आहे. २९ नाेव्हेंबर राेजी सरकारने एक परिपत्रक काढून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हे अॅप सक्तीचे केले. याशिवाय बुधवारी ४८.५३ लाख कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की, त्यांनी तत्काळ हे अॅप डाऊनलाेड करावे आणि जर त्यांचे स्टेटस ‘सेफ’ येत असेल तरच कार्यालयात हजर व्हावे. कर्मचारी मग ताे सरकारी असाे अथवा खासगी, त्या साऱ्यांसाठी हे अॅप अनिवार्य असल्याचा निर्वाळा माेदी सरकारने दिला. मात्र, काेणत्या आधारावर हे अॅप खासगी कर्मचाऱ्यांसाठी सक्तीने लागू करण्यात येत आहे, हे स्पष्ट केले नाही. नाेएडाने तर यामध्ये एक पाऊल पुढे टाकले. ज्याच्याकडे हे अॅप असणार नाही त्यास दंड आकारण्याची घाेषणाच करून टाकली. मनुष्यबळ विभाग मंत्रालयाने तर शाळांना बजावले की, विद्यार्थ्यांच्या पालकांना हे अॅप डाऊनलाेड करण्यास सांगा. झाेमॅटाे, स्विगी आणि अर्बन कंपनीनेदेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना अॅप डाऊनलाेड करण्यास सांगितले. जेव्हा विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची माेहीम सुरू झाली तेव्हा आराेग्य सेतू अॅप डाऊनलाेड करण्यास त्यांनाही भाग पाडले गेले. अशा पद्धतीने एक लहानसे अॅप अल्पावधीतच काेविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी सरकारचे एक शस्त्र बनले.

सुमारे ९ काेटी भारतीयांनी हे अॅप डाऊनलाेड केले. परंतु, यामध्ये काही अडचणी आहेत. हे अॅप एेच्छिक नाही, डेटा सुरक्षेची पुरेशी सुविधा यामध्ये नाही आणि सरकार तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकते. या साऱ्यांवर कडी म्हणजे फ्रान्समधील इथिकल हॅकर एलियट एल्डरसन यांनी अवघ्या ४५ मिनिटांत ट्विट करून सरकारला सांगितले की, सुरक्षाविषयक दाेष मला सापडला असून हे अॅप अजिबात सुरक्षित नाही. हे अॅप वापरणाऱ्या व्यक्तीचे वय, पत्ता, प्रवासाचा तपशील, धूम्रपानाचा इतिहास, लक्षणे आणि लाेकेशनची विचारणा करते. इतकेच नव्हे तर ब्ल्यूटूथच्या माध्यमातून एखाद्या संसर्गित व्यक्तीच्या निकटवर्तीयांमध्ये गणना करते. तमाम जनतेवर सतत पाळत ठेवते आणि आपल्या आसपासच्या किती लाेकांची तपासणी पाॅझिटिव्ह ठरली आणि किती लाेक प्रत्यक्ष आजारी आहेत, याची माहिती देते. अशा प्रकारच्या अॅपसाठी काेणतेही जागतिक मापदंड नाहीत, परंतु चीन, हाँगकाँग, सिंगापूर आणि अनेक युराेपीय देशांनी काेराेना विषाणूवर देखरेख ठेवण्यासाठी असे अॅप बनवले आहेत. या देशांमध्ये अशा अॅपचा वापर पूर्णत: एेच्छिक आहे. आराेग्य सेतू अॅप केवळ सक्तीचेच नव्हे, तर अधिक आक्रमक आहे. ब्ल्यूटूथ, जीपीएस आणि माेबाइल टाॅवरद्वारे माहिती संकलित करण्यासाेबतच डेटा साठवण्यासाठी विदेशी सर्व्हरवर अवलंबून आहे.

या अॅपमध्ये आणखी त्रुटी आहेत. ‘नेचर’ या नियतकालिकाच्या मते असे अॅप प्रभावी ठरल्याचे काही माेजके पुरावे उपलब्ध आहेत. यामध्ये धाेका असा आहे की, जर एखादी व्यक्ती तुमचा फाेन घेऊन गेली किंवा तिने हाताळला तरी चुकीचा इशारा, संदर्भ देऊ शकते. यातील सर्वात महत्त्वाचा दाेष म्हणजे हे अॅप फारच कमी लाेकांकडे असेल. या समस्येच्या संदर्भातील लाेकशाहीवादी समाधान म्हणजे या अॅपविषयी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा लागेल, परंतु हे अॅप प्रत्येकासाठी सक्तीचे बनवून हे आव्हान माेडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा अर्थ असा की, नव्या फाेनमध्ये हे अॅप प्री-इन्स्टाॅल्ड असेल. नजीकच्या काळात जर तुम्हाला मेट्राे किंवा अन्य सार्वजनिक वाहनांतून प्रवास करायचा असेल तर हे अॅप दाखवल्याशिवाय प्रवास करता येणार नाही. सरकारकडील विद्यमान डेटाबेसशी जुळवून घेत हे अॅप युजरच्या प्रत्येक हालचाली दर्शवेल. 

देशात आजही डेटा संरक्षण कायदा अस्तित्वात नाही, म्हणून मी आणि इतर काहींनी संसदेत अशा स्वरूपाचा कायदा आणण्याची मागणी केली. भारतात काेणत्याही कामाच्या देखरेख, निगराणीविरुद्ध कायदा नाही. आता सरकार काेराेना विषाणूचा वापर जनतेवर पाळत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करत आहे. लेखिका अरुंधती राॅय यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले हाेते की, काेराेनापूर्वी आम्ही निगराणी करणाऱ्या देशात झाेपेत चालत हाेताे, परंतु आता एका सुपर निगराणी करणाऱ्या देशात भयगंडाने ग्रासून धावत-पळत आहाेत.’ आराेग्य सेतू अॅपचे युजर अॅग्रीमेंट म्हणते की, डेटाचा वापर भविष्यातील महामारी नियंत्रणाशिवाय अन्य कारणांसाठी सरकारी यंत्रणेला करता येऊ शकेल. आता माेदी सरकारने तमाम साधने आपल्या हाती एकवटली आहेत, अशा स्थितीत आराेग्य सेतू अॅप सरकारच्या कठाेर नियंत्रणाचे एक प्रभावी शस्त्र ठरू शकते. तथापि, सरकारी कर्मचाऱ्यांनी आराेग्य सेतू अॅप इन्स्टाॅल न केल्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अद्याप काेणाला शिक्षा झालेली नाही, परंतु आपल्याला तसा इशारा तर देण्यात आलेला आहे.

शशी थरूर, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार

Twitter : @ShashiTharoor

बातम्या आणखी आहेत...