आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दृष्टिकोन:आपण चीनला विरोधक मानत नाही, तर तो का मानतो?

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनने एका शांत सीमेला अस्थिर करण्याची जोखीम का उचलली, शेवटी त्याची इच्छा काय आहे?

भारत आणि चीनदरम्यान १५ जूनला झालेल्या चकमकीचा धुरळा दिल्लीत अजूनही खाली बसलेला नाही. या घटनेचे आशियातील दोन मोठ्या देशांच्या संबंधांवर काय परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित होतो. ही दुर्घटना का घडली, असाही प्रश्न पडतो. एका शांत सीमेला अस्थिर करण्याची जोखीम चीनने का उचलली? सीमेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी चिनी सैन्याचे हे सुनियोजित पाऊल आहे, यावर भारतात सर्वसंमती आहे. चिनी सैन्याने केवळ गस्त घालण्याऐवजी चीनने दावा केलेल्या जागेच्या पुढे येऊन कायमस्वरूपी उपस्थिती लावली आहे. गलवान आणि श्योक नदीच्या संगमापर्यंत चिनी सैन्याची उपस्थिती वाढवणे, यामुळे गलवान खोरे भारतीय सीमेबाहेर जाऊ शकेल, असा त्यांचा हेतू आहे. गलवान खोरे नेहमीच चीनचे होते, अशी वक्तव्ये चीनने केली आहेत. चीन युद्ध किंवा एखाद्या मोठ्या लष्करी कारवाईसारख्या नाट्यमय योजना आखण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी, स्थानिक सामरिक हेतूंसाठी छोटी लष्करी अतिक्रमणे करणे, काही चौरस किलोमीटर क्षेत्र ताब्यात घेणे आणि नंतर शांतता घोषित करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. दोन्ही बाजूंनी संकट संपल्याचा दावा करून परस्पर संमतीने समेट जाहीर केला जाईल, परंतु खरे तर त्या वेळी चीनच्या बाजूने पूर्वीपेक्षा चांगली परिस्थिती असेल. एका वर्षात अशा बऱ्याच घडामोडींसह चीन पाहिजे असलेल्या ठिकाणी एलएसीला अधिक बळकट करून घेईल, जेणेकरून जेव्हा जेव्हा सीमा कराराची चर्चा होईल तेव्हा या नवीन वास्तविकता दिसतील आणि करार त्याच्या बाजूने होईल. ही त्याची दीर्घकालीन योजना आहे. चीन नेहमी असे म्हणत आला आहे की, सीमा करार भावी पिढ्यांकडेच ठेवला पाहिजे, कारण हे स्पष्टच आहे की प्रत्येक सरत्या वर्षाबरोबर चीनची आर्थिक, लष्करी आणि भौगोलिक राजकीय स्थिती भारतापेक्षा मजबूत होत आहे. म्हणूनच भारताने एप्रिल २०२० च्या आधीची स्थिती कायम ठेवण्याचा आग्रह धरला पाहिजे. चीन याला सहमती देईल का, हे सांगणे कठीण आहे. दोन्ही देशांनी सीमेवर सैन्य पाठवले असून तेथे बराच संघर्ष होण्याची शक्यता आहे.

गलवान खोऱ्यातील वाद आणि चिनी सैन्याची चाल यामुळे भारतीयांच्या मनात चीनबद्दल संताप उसळला आहे. आता भारताने अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीने चीनविरुद्ध उभे राहिले पाहिजे, असा विचार करणाऱ्या दिल्लीतील लोकांना यामुळे बळ मिळाले आहे. चीनवर विश्वास न ठेवण्याची अनेक ठोस कारणे आहेत. उदाहरणार्थ, चीनने भारताचा कट्टर शत्रू पाकिस्तानशी ‘ऑल वेदर’ उपक्रमात युती केली, ज्यात त्याने कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि चीन नेहमी पाकिस्तानची बाजू घेतो. त्यानंतर भारताच्या शेजाऱ्यांमध्ये, विशेषत: नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि बांगलादेशातही त्यांची मोठी आर्थिक गुंतवणूक, जेणेकरून नवी दिल्लीचा त्यांच्यावरील पारंपरिक प्रभाव कमी होऊ शकेल. याशिवाय, यूएन सुरक्षा परिषद किंवा अणु पुरवठादार गटात भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी चीनचा विरोध हेही कारण आहे. शीतयुद्ध संपुष्टात आल्यावर बीजिंगकडे भारताशी संबंध ठेवण्याचे दोन पर्याय होते : अमेरिकेच्या वर्चस्वाचा वैकल्पिक ध्रुव तयार करण्यासाठी भारताला रशियाचा स्वाभाविक सहयोगी म्हणून पाहणे किंवा आपल्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे संभाव्य विरोधक म्हणून पाहणे. 

भारत आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या मजबूत संबंधांमुळे चीनने भारताला विरोधक मानले आहे, असे दिसते. वास्तवात बीजिंगविरुद्ध अमेरिकेचा मित्रपक्ष होण्यास भारताने नकार दिला आहे आणि चीन भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. चीनच्या या नकारात्मक धारणेची ही कारणे असू शकतात : अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासह क्वाड (चतुष्कोणीय) प्रणालीत भारताचा सहभाग, सोव्हिएत रशियाशी आपल्या जुन्या संबंधांना उजाळा देणे (यात ताजिकिस्तानात भारतीय सैन्याचा तळ उभारणेही समाविष्ट आहे), चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या उपक्रमावर आधी टीका करणे, चीनच्या वर्चस्वाच्या भीतीमुळे आशिया खंडातील प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीतून भारताचे बाहेर पडणे आणि ‘इंडो-पॅसिफिक’ प्रदेशात आणि दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेच्या स्थानाला भारताने समर्थन देणे. परंतु, नवी दिल्ली चीनला विरोधक मानत नाही. भारत ऐतिहासिकदृष्ट्या एक युती न करणारा देश आहे आणि कुणा एकासाठी वेगळी रणनीती आखण्याची भारताची कधी इच्छाही नव्हती. भारताला डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका कधीही विशेष विश्वासार्ह सहकारी वाटली नाही. पंतप्रधान म्हणून पाच वेळा चीनला जाणाऱ्या मोदींनी ‘दोन देशांमध्ये सहकार्याच्या नव्या युगाची ही सुरुवात’ असल्याचे आठ महिन्यांपूर्वीच म्हटले होते.

ते युग ८ महिन्यांतच संपले, असे वाटते. सध्याच्या घटनाक्रमाने नाराज भारत अमेरिकेकडे झुकू शकतो. चीनला कदाचित यामुळे काही फरक पडणार नाही. भलेही विरोधकांच्या असला तरी भारताला त्याची जागा दाखवण्याची जोखीम घ्यायची, असे बीजिंगने ठरवले आहे, असेच दिसत आहे.

शशी थरूर

माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार T

witter : @ShashiTharoor

बातम्या आणखी आहेत...