आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ग्रंथार्थ:स्थानबद्ध ‘रोबोटिक’ समाजाचे डोळस चित्र-चरित्र

शेखर देशमुख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गापासून बचावाचा उपाय म्हणून मार्च महिन्यापासून देशात कडकडीत लॉकडाऊन जाहीर झाला. या काळात एका पातळीवर जसे आत्मप्रेमात बुडालेल्या समाजाचे दर्शन घडले, तसेच कोणीही वाली नसलेल्या कामगार वर्गाचे बेदखल जगणेही जगापुढे आले. या दोन टोकाच्या अवस्थांमध्ये पुढे सरकत गेलेल्या समाजाने दीर्घकालीन विचार करता, एक देश म्हणून काय साधले, काय गमावले, याची नवे भान देणारी गोळाबेरीज ‘समकालीन प्रकाशना’चे गौरी कानेटकरलिखित ‘जग थांबतं तेव्हा... लॉकडाऊन काळातल्या नोंदी’ हे पुस्तक मांडतं...

माणसांच्या संवेदनांचा परीघ कोण ठरवतं? किंवा तो कसा ठरतो? संवेदनशीलतेच्या व्याप्ती आणि खोलीवर कुणाचं नियंत्रण असतं? काळ कोणताही असो, हे प्रश्न महत्वाचे ठरतात. कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्याच्या एका दृश्य हेतूने भारतात लागू झालेल्या लॉकडाऊन काळात तर या प्रश्नांनी पिच्छा सोडणं तसंही अपेक्षित नाही. कारण स्पष्ट आहे. या काळात माणसाची माणुसकी जितकी उजळून निघाली, त्याहून अधिक माणसामाणसांतल्या विकार-विकृतींचे आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या अधिकारशाही वृत्तीचे खुलेआम दर्शन घडत गेले.

खरं पाहता, कोरोनामुळे नव्हे तर कोरोना संसर्गाशी लढण्यास देशाची आरोग्य व्यवस्था जराही सक्षम नसल्याने लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे झुंडीत माना मोडून शिरणाऱ्यांपासून ते झुंडींचे उघड-छुपे नेतृत्व करणाऱ्या नेते-धोरणकर्त्यांची भेदमूलक मानसिकता उघड झाली. म्हणजे, या काळात सुस्थापितांमधल्या एका वर्गाने आयुष्यभरात न जमलेल्या क्रिएटिव्हीचे जमेल त्या माध्यमांतून प्रदर्शन मांडले. तर दुसऱ्या अर्थात नाकारल्या गेलेल्या कष्टकरी वर्गाने कुत्र्याच्या मौतीचे जीणे अनुभवले. या सगळ्यात देश लौकरात लौकर आरोग्यविषयक संकटातून सावरावा याहीपेक्षा नेते-धोरणकर्त्यांमध्ये राजकीय डावपेच अधिक उत्साहाने खेळले गेले. हातात असलेली सत्ता अधिकाधिक मजबूत, कडेकोट होण्यासाठी एकमागोमाग कायदे-नियम जनतेवर लादले गेले. जनतेच्या मन-मेंदूवर सर्वंकष ताबा मिळवण्याच्या हेतूने लोकशाहीची नीतीमूल्ये पायदळी तुडवली गेली. झुंडींची सहमती आहे, हे ठावूक असल्यानेच बहुदा विशिष्ट समुदायांना सरकारच्या पातळीवरदेखील लक्ष्य केले गेले. याच रोबोटिक होत गेलेल्या समाजाच्या लॉकडाऊन काळातल्या मनो-भावनिक अवस्था समकालीन प्रकाशनाच्या गौरी कानेटकरलिखित ‘जग थांबतं तेव्हा...लॉकडाऊन काळातल्या नोंदी’ या प्रस्तुत पुस्तकात अत्यंत तपशीलवार नोंदवण्यात आल्या आहेत.

कोरोनाचे संकट उंबरठ्यावर आले, तसे मार्च महिन्यातल्या एका रात्रीत संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाला. या अकस्मात बसलेल्या धक्क्यातून सावरायला काही तास, काही दिवस गेले खरे, पण त्यानंतर दिसले ते अधिक धक्कादायक ठरत गेले. म्हणजे, सुस्थापित, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय जनता आपापल्या घरादारांत सुरक्षितता अनुभवते झाले आणि हातावर पोट असणारे कामगार-मजूर रस्त्यांवर बेवारस अवस्थेत टोकाचे त्रासभोग सहन करत राहिले. किंबहुना, हा विरोधाभास, ही विसंगती संबंध लॉकडाऊन काळाचे व्यवच्छेदक लक्षण होऊन सोबत करत राहिली. यात एका बाजूला दरदिवशी संसर्गग्रस्तांची उलटसुलट आकडेवारी, सरकारी आदेशांचा अविरत मारा, त्या आदेशांची अमलबजावणी करण्याच्या नावाखाली पोलीस यंत्रणेने राबवलेली दंडुकेशाही, शेकडो-हजारो मैलांचा लाखो स्थलांतरितांचा झालेला कमालीची वेदनादायी प्रवास, या प्रवासादरम्यान स्थलांतरितांचे घडून आलेले दुर्दैवी मृत्यू, आरोग्य यंत्रणेतली अनागोंदी, भ्रष्टाचार, रुग्ण आणि त्यांच्या दिशाहिन नातेवाईकांचे आक्रोश, बळेबळेच सकारात्मकतेची झूल पांघरून सारे काही आलबेल असल्याचा आभास निर्माण करणारी सत्ताधारी यंत्रणा, करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची सततची वाढती संख्या आणि दुसऱ्या बाजूला आज ‘मग केक’ बनवायचा की ‘प्लम केक’, आज ‘चिकनी चमेली’वर डान्स करायचा की, ‘साकी साकी’ वर, आज ‘झुश्शिनी पर्मेसन’ची रिसिपी व्हायरल करायची की ‘कॅरामल-पिकन चिजकेक पाय’वर जास्त हिट्स मिळवायचे, या वंचनेत असलेला सुस्थापित वर्ग. एका बाजूला, करोनामुळे पाच-पन्नास लाख मेले, तर तेवढाच देशावरचा भार हलका होईल, असं म्हणत सोशल मीडियावर लाइक मिळवणारे महाभाग, तर दुसरीकडे अख्खा कष्टकरी वर्ग संकटात असताना ‘वंदे भारत मिशन’, ‘श्रमिक एक्स्प्रेस’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’ अशा उत्सवी घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेणारं देशाचं सरकार. या आणि अशा अनेक विसंगतींची, नोंद घेत ही डायरी पहिल्या पानापासून आकार घेत जाते. स्वतःमध्ये न रमता, आसपासच्या जगातल्या घडामोडी डोळसपणे टिपत राहते. टोकदार निरीक्षणं, उद्वेग, हतबलता, अस्वस्थता, प्रसंगी समाधान आणि सहवेदना शब्दांतून व्यक्त करत जाते. त्या अर्थाने स्वतःपलीकडच्या, नजर जाई तिथवरच्या व्यापतापाविषयीच्या जगाबद्दल लेखिका या डायरीच्या माध्यमातून प्राधान्याने अभिव्यक्त होत जाते. वैयक्तिक तपशील नावापुरतेच डोकावतात. यातले एखादे निरीक्षण, एखादी कॉमेंट, एखादा उपरोधिक सवाल समाजाच्या मनोवस्थेचे वर्णन करण्यास पुरेसा ठरतो. यात जसे लॉकडाऊन काळातल्या सामाजिक-राजकीय बदलांचे सूचन येते, तसे देश पातळीवर झुंडशाहीला आकार देणारे रचनाशास्त्रही उलगडत जाते. यातून लेखिकेच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडतेच, पण व्यवस्थेने डकवलेली उत्सवी झालर बाजूला सारून आसपासच्या घटना-प्रसंगांकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहण्याची क्षमताही आकळते. यातूनच कुटुंब, समाज, देश अशा स्तरांवर नागरिकांच्या बदलत्या नात्यांचे अर्थ नव्या परिप्रेक्ष्यात ताडून पाहण्याची गरजही अधोरेखित होते.

‘बरंच झालं, लॉकडाऊन लागू केला. या निमित्ताने लोकांना शिस्त तरी येईल’ अशी भाबडी आशा अनेकांनी या काळात बोलून दाखवली. पण, जातीजातींमध्ये दुजाभाव राखण्यातून आपल्याकडे सर्व स्तरांत सूक्ष्म पातळीवर सूडप्रवृत्ती पेटती राहिली, त्याचीच प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून शिस्तभंगाला, भ्रष्ट वर्तणुकीला उद्युक्त करणारी गुणसूत्रे सक्रीय होऊन प्रत्येक नव्या पिढीत संक्रमित होत गेली, हे या भाबड्यंना कधी लक्षात आलं नाही. लॉकडाऊन काळातल्या शिस्तभंगाच्या, भ्रष्ट वागणुकीच्या अनेक कहाण्यांनी या सनातन सत्यास दुजोरा दिल्याचे दिसले, त्याचेही दाखले पुरेशाने या नोंदीत आले आहेत. एरवी, सत्य हे खऱ्या आणि खोट्याच्या मध्ये अधांतरी तरंगत असतं. त्या, नजरेतून सुटून जाणाऱ्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी या नोंदी मोलाची भूमिका बजावतात.

कोणे एकेकाळी डायरी लिहिणे, हा आत्मसंवाद आणि आत्मचिकित्सेसाठीचा महत्वाचा संस्कार मानला जाई. काळाच्या ओघात जगण्यातला ठहराव संपला, यंत्रमानवीकरण वेगाने घडत गेले, तशी डायऱ्यांची पाने कोरी राहात गेली. तो कोरेपणा घालवत एक समाज म्हणून आत्मभान जागवण्याचा प्रयत्न लेखिकेने या नोंदींच्या माध्यमातून केलेला आहे. या डायरीतल्या नोंदी एका पातळीवर काळाचं गांभीर्य राखत आत्मचिंतनात्मक, आत्मटीकात्मक असल्या म्हणून लेखिकेला लॉकडाऊन काळाल्या, सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या विनोदांचं, चुटकुल्याचं नि उपरोधाचं वावडं नाही, याचेही मासले डायरीत जागोजागी आढळतात. गौरी कानेटकर या पत्रकार-लेखिका आहेत. पण त्याहीपेक्षा त्या संवेदनांचा परीघ मोठा असलेल्या सजग नागरिक प्रथम आहेत, याचं प्रतिबिंब डायरीच्या प्रत्येक पानावर उमटत राहतं.

१८ मार्च ते ३१ जुलै या जवळपास साडेतीन महिन्यांचा पट उलगडणाऱ्या या पुस्तकाला असलेली डॉ. सुहास पळशीकरांची प्रस्तावना, समाजाच्या वर्तनाची चिकित्सा करत, कोरोना संसर्गाच्या काळात, त्यातही लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरच्या काळात आपण काय कमावलं आणि काय गमावलं, याविषयीचं अभ्यासपूर्ण विश्लेषण आपल्यापुढ्यात ठेवते. लेखिकेचे शब्द आणि अन्वर हुसेन यांची मुखपृष्ठापासून नजरेत भरणारी चित्रे परस्परपूरकता राखत असल्यामुळे पुस्तकाचे संग्राह्य मूल्य वाढते. किंबहुना, अनेकदा असेही घडते की, गौरी कानेटकरांचे शब्द अस्वस्थ करणारे चित्र डोळ्यांपुढे उभे करते, तर हुसेन यांची चित्रं डोक्यातले विचारांचे चक्र गतिमान करत जातात. त्यातली लॉकडाऊनमुळे जेरबंद झाल्याने जागीच थिजून गेलेल्या असहाय्य माणसाच्या मेंदूचा भुगा करून परतीच्या वाटेवर असलेली मुंग्यांची रांग, प्रेशर कूकरचा भास देणाऱ्या खुराड्यांमधे दाटीवाटीने तग धरून असलेली कोंडमाराग्रस्त माणसं, अपघातानंतर रेल्वेरुळांवर इतस्ततः विखुरलेल्या भाकऱ्या आणि गतप्राण झालेल्या मजुरांची कलेवरे, डोळ्यांत शून्य भाव, देहबोलीत अगतिकता आणि तोंडावर मास्क असा जिवंतपणी जखडलेपण आलेला एकेकटा इसम आदी चित्रे मन सून्न करतात. पुस्तकाचा आशय-विषय आणि शब्द-चित्र यांच्यात साधलेला मेळ वाचकाला करोना काळातल्या अनन्यासाधारण महत्वाचा आत्मपरीक्षणाचा एक उद्देश सफल झाल्याचे समाधान देतो, आणि आपण नेमके कुठवर पोहोचलो, याची नेमकी जाणीवही. म्हणूनही उपयुक्त संदर्भ ऐवज ठरलेल्या या डायरीरुपी पुस्तकाचं महत्व कायमस्वरुपी मनावर ठसतं.

> पुस्तकाचे नाव-जग थांबतं तेव्हा.. लॉकडाऊन काळातल्या नोंदी

> लेखिका-गौरी कानेटकर

> प्रकाशन-समकालीन प्रकाशन, पुणे

> मूल्य 200 रुपये.

deshmukhshekhar101@gmail.com