आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Shekhar Deshmukh Rasik Article | Traditionalist's Gun On The Shoulder Of 'Revolver Queen'!

रसिक स्पेशल:‘रिव्हॉल्वर रानी’च्या खांद्यावर परंपरावाद्यांची बंदूक!

शेखर देशमुखएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येपश्चात बॉलिवूडला लक्ष्य करत परिवारवादावरून वादंग माजवले गेले. चित्रपटसृष्टीतल्या घराणेशाहीने आजवर कित्येक गुणवंतांना छळले, प्रसंगी आयुष्यातून उठवले, हे एका पातळीवर खरेच. परंतु सध्या कंगना राणावतसारखे काही आक्रस्ताळी कलावंत एका बाजूला घराणेशाहीला विरोध करतानाच आपल्यासारख्याच परंतु, सत्तेला विरोध करणाऱ्या ‘उपऱ्या’ कलावंतांच्या नावाने ज्या प्रकाराने शंख करताहेत ते पाहता, राजकीय सत्तेवर ताबा ठेवून असलेल्या परंपरावाद्यांनी ‘परिवारवादविरोधी आंदोलना’च्या आडून इंडस्ट्रीतल्या घराण्यांवर तसेच विरोधीविचारांच्या कलावंत-तंत्रज्ञांवरही नेम धरल्याचे उघड आहे. टेलिव्हिजन मीडिया-सोशल मीडियात खेळला गेलेला हा खेळ सध्याच्या राजकीय-सामाजिक संस्कृतीला साजेसा आहे…

रोहित वेमुला आठवतोय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तसबीर घेऊन होस्टेलबाहेर पडतानाचा बघणाऱ्याला नकाराची, परकेपणाची भावना देणारा त्याचा तो फोटो आठवतोय ?

खरं तर रोहित आणि त्याचा संघर्ष आपल्या इव्हेंट-प्रिय समाजाच्या विस्मृतीत गेला असल्याचीच शक्यता अधिक, त्यामुळे पुन्हा एकदा सांगायला हवे, रोहित हा हिंदुत्ववादी, जातिवादी व्यवस्थेविरोधात दोन हात करणारा हैदराबाद युनिव्हर्सिटीमधला विद्यार्थी नेता होता. सत्ताधारी व्यवस्थेने केलेल्या छळाला कंटाळून २०१६ मध्ये या उदयोन्मुख तरुणाने आत्महत्या केली होती. रोहितने त्याच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, ‘मला लेखक व्हायचेय, कार्ल सगानसारखा अवकाश विज्ञानाचा लेखक व्हायचंय...’असं म्हटलं होतं…

गेल्या जून महिन्यात सुशांतसिंग राजपूत नामक उगवत्या ताऱ्याने जगण्यातले ताण-तणाव असह्य होऊन आत्महत्या केली. दुर्देवी योग असा, दलित समाजातून आलेल्या रोहित वेमुलाप्रमाणेच उच्चवर्णीय सुशांतलादेखील अवकाश विज्ञानाचे ग्रह-ताऱ्यांचे प्रचंड आकर्षण होते. अवकाशभौतिकीत त्याला रस होता. त्यासाठी अमेरिकेतली अवकाश संशोधन संस्था ‘नासा’मध्ये जावून प्रशिक्षण घेण्याचा त्याचा इरादा होता.

रोहित वेमुलाने केली ती आत्महत्या नव्हती. सरंजामवादी, जात्यांध व्यवस्थेने घडवून आणलेली ती खुलेआम हत्या होती. आताही सुशांतसिंग राजपूतने केली ती आत्महत्या नक्कीच नव्हती, तर (नातेसंबंधांचा गुंता जमेस धरुनही) बॉलिवूडमधल्या सरंजामी मनोवृत्तीच्या परंपरावादी, अहंकारी व्यवस्थेने संगनमताने केलेली ती उघड हत्या ठरावी. वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशभरातल्या समतावादी, जातविरोधी समुहांनी प्रस्थापित सत्तेविरोधात एकच आवाज उठवला होता. आज सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचे निमित्त साधून बॉलिवूडमधल्या वर्चस्ववाद्यांच्या एका गटाविरोधात बॉलिवूड बाहेरचा दुसरा एक प्रस्थापित परंपरावाद्यांचा गट उतरला आहे.

म्हणजे, सुशांतसिंग राजपूतवर अन्याय झाला, इंडस्ट्रीत ताबा ठेवून असलेल्या बड्या धेंडांच्या छळाला कंटाळून त्याने स्वतःचा जीव घेतला, हे सारं एक क्षण खरं मानूया. पण या आत्महत्येचं निमित्त साधून जे लोक काहींना धडा शिकवू पाहताहेत, ते लोकही अंतिमतः प्रस्थापित राजकीय, धर्म आणि समाज व्यवस्थेचीच भाषा बोलताहेत. परिवारवादी बॉलिवूडवर हल्ला चढवताना, स्वतःला आउटसाइडर अर्थात उपरी समजणारी कंगना राणावतसारखी ‘लूज कॅनन’ अर्थात, बेलगाम तोफ- इंडस्ट्रीतल्या सोकावलेल्या घराणेशाहीविरोधात आगीचे लोळ उठवते आहेच, पण विद्यमान सत्ताधारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या तिच्याचसारख्या आउटसायडर, ‘नेपोटिझम’चं कवच नसलेल्या कलावंत-तंत्रज्ञांवरही आगपाखड करते आहे. त्यांना अद्वातद्वा बोलतेय, त्यांच्या संघर्षाला, कर्तृत्वाला कमी लेखतेय. ही कंगनाच्या मनातली वैयक्तिक पातळीवरची असूया, द्वेष आहे, की यामागे आणखी वेगळाच गेम प्लान आहे ? त्यामुळे प्रश्न आहे, तो या ‘रिव्हॉल्वर रानी’च्या ( हा कंगनाच्या अप्रतिम अभिनयामुळे २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला, लक्षवेधी चित्रपट.) खांद्यावर बंदूक ठेवून कोण आपला नेम साधतंय ? किंवा कोणाला तसा तो नेम साधायचा आहे?

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर गेले महिनाभर वादळी चर्चा झाल्या, किंबहुना, त्या जाणीवपूर्वक घडवून आणल्या गेल्या. (सलमान) खान, (करण) जोहर, (आदित्य) चोप्रा, (महेश आणि मुकेश) भट, जावेद-फरहान-झोया अख्तर आदी घराणी टीकेच्या भक्ष्यस्थानी पडली. अजूनही पडताहेत. आम्ही सुशांतचे पाठिराखे आहोत, आम्ही बॉलिवूडमधल्या परिवारवादी व्यवस्थेविरोधात आहोत, म्हणणाऱ्यांचा आवाज टिपेला गेलेला आहे. यात अर्थातच तारस्वरांत आपला आनंद, संताप व्यक्त करण्यात माहीर असलेली कंगना आघाडीवर आहे. तिच्या सोबतीने, तिच्या आडून अनेक जण आपला राग, संताप आणि मळमळ बाहेर काढताहेत. यात बॉलिवूडमध्ये नव्या-जुन्या पिढीतले अनेक कलावंत-तंत्रज्ञ आहेत. यातले सगळ्यात लक्ष वेधून घेणारे नाव आहे, संगीतकार ए.आर. रहमानचे. हा चेन्नईस्थित ऑस्कर विजेता कलावंत यापूर्वी आपल्या संगीताच्या माध्यमातून अभिव्यक्त होत आला आहे. त्यामुळे आपल्याविरोधात चित्रपटसृष्टीतल्या एका उपद्रवी गटाने मोहीम चालवली, हे त्याचे वर्तमानातले वक्तव्य गांभीर्यपूर्वक घेण्यासारखेच आहे. खरे तर, जे लोक चित्रपटसृष्टीचे रागरंग ओळखून आहेत, त्यांच्यासाठी हे जराही गुपित नाही, की दैवी देणगी लाभलेल्या ए.आर.रहमानला ‘रोजा-रंगिला’पासूनच संपवण्याचे कितीतरी प्रयत्न झालेले आहेत. बॉलिवूडने नाकारलेल्या ऑस्कर पुरस्कारविजेत्या, ध्वनि संयोजनकार रसुल पुकुट्टीची कहाणीदेखील तितकीच खरी आहे. पण परत मुद्दा, अपवादाने आपली व्यथा जगजाहीर कलेल्या रहमानला धीर कुणी दिला आहे, हा आहे. रहमानच्या ट्विटवर कोणी प्रतिसाद दिला, तर तो दिग्दर्शक शेखर कपूरने. स्वतः घराणेशाहीचा ( इंडस्ट्रीत मोठे प्रस्थ असलेले दिवंगत एव्हरग्रीन नट देव आनंद यांचा हा भाचा, अशा अर्थाने.) फायदा उठवून एकेकाळी इंडस्ट्रीत शिरकाव केलेल्या या शेखर कपूरने रहमानची बाजू घेणे कौतुकास्पदच आहे. पण, हेदेखील जगाला ठावूक आहे, ते म्हणजे, ‘मासूम’, ‘मि. इंडिया’, ‘बँडिट क्वीन’ यासारखे आशयगर्भ सिनेमे देणारा हा दिग्दर्शक सर्वंकष सत्तेची लालसा असलेल्या, धर्म आणि राजकारणाचा विखारी खेळ मांडत आलेल्या विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांपैकी आपणही एक आहोत, हे वेगवेगळ्या मार्गांनी आजवर सांगत आलाय. रहमानने आपली राजकीय भूमिका कायम गुलदस्त्यात ठेवली असली तरीही, शेखर कपूरने सत्तेशी असलेली जवळिक लपवलेली नाही. याचाच अर्थ, अन्यायापासून सोडवणूक करून शेखर कपूर हा ए.आर. रहमानला परंपरावादी, जातिवादी, पर्यायाने परिवारवादाला मूकसंमती असलेल्या व्यवस्थेकडेच पुन्हा घेऊन जाणार आहे. धोका हा इथे आहे.

हे अगदीच खरे आहे, कंगना राणावत ही गुणांची खाण आहे. आजवरच्या कारकीर्दीत तिने असंख्य वेळा अवहेलना, अपमान सहन केले आहेत. तिला मिळालेले यश बावनकशी आहे. असे असूनही, ती या प्रकरणात कोणत्या बाह्य शक्तींचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिनिधित्व करते आहे, ते अधिक महत्वाचे आहे. कंगनाच्या धर्म, देश आणि राजकारणविषयक कल्पना एव्हाना पुरेशा उघड आहेत. आपले राजकारणातले सध्याचे हिरो कोण आहेत, हेही तिने अनेकदा बोलून दाखवले आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांचा खुलेआम पुरस्कार करणाऱ्यांत ती सदैव आघाडीवर राहिली आहेत. तसे करताना, तिच्यातली एकाचवेळी पुरुषसत्तेविरोधात बंड करून उठणारी आणि परंपरावाद्यांच्या कच्छपी लागलेली स्त्री लपून राहिलेली नाही. म्हणजेच, परिवारवादातून सोडवणूक केलेेल्यांना ती अंतिमतः पुन्हा परंपरावादी सत्तेच्या आश्रयाला घेऊन जाणार आहे, या व्यवस्थेचा परिवारवादाला तात्पुरता विरोध दिसत असला तरीही, परिवारावादाचे भरणपोषण करणाऱ्या संरजामी आणि धर्म व्यवस्थेला परंपरावादी सत्तेचे पूर्वापार समर्थन राहिले आहे. त्यामुळेच धोका हा इथेसुद्धा आहे.

एकीकडे, कंगना राणावतच्या सूरात सूर मिसळणाऱ्यांमध्ये सत्तासमर्थक, विविध पक्षांचे पुढारी, अंधभक्त, सहानुभूतीदार आणि खूशमस्करेही आहेत. यातल्या बहुतेक सगळ्यांची मागणी थेट सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी आहे. ‘उपद्रवी विद्वान’ अशी ख्याती असलेले भाजप नेता सुब्रमण्यम स्वामींनी तर याकामी वकिलांची फौजच कामाला लावली आहे. त्यांना या प्रकरणाचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत पर्यायाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पोसणाऱ्या पाकिस्तानपर्यंत असल्याचे सुचवायचे आहे. अर्णब गोस्वामीसारखा न्यूज चॅनेलचा आक्रस्ताळी मालक-चालक-संपादक-निवेदक (सध्या पत्रकारितेच्या नावाखाली गोस्वामी जे काही करत असतात, त्याचे वर्णन आमचे मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त पत्रकारमित्र रवीशकुमार ‘गुंडा जर्नालिझम’ असा करतात. पण तो भाग अलाहिदा.) चर्चेच्या नावाखाली एकाचवेळी राज्यातल्या महाआघाडीच्या सरकारलाही उचकावण्याची संधी साधून घेतोय आणि बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या आरोप असलेल्या बड्यांना धमक्या वजा इशारेसुद्धा देतोय. हाच अजेंडा पुढे दामटवत या महाशयांनी सुशांतच्या मैत्रिणीला फूस लावण्यात घराण्यांचा हात असल्याचा फैसला पुढे मागे सुनावला तर आश्चर्य नाही. धोक्याची ही आणखी एक जागा आहे.

वस्तुतः चित्रपटसृष्टीत पिढीजाद दादागिरी करणाऱ्यांबद्दल कंगना राणावत जे म्हणतेय, त्यात तथ्य नाही, असे कुणाचेही, म्हणजे अगदी बॉलिवूडमधल्या सूज्ञ, समंजसांचेही म्हणणे नाही. कारण, जनसामान्य प्रेक्षकांच्या आयुष्यात आनंदाच्या असंख्य जागा निर्माण करणाऱ्या बॉलिवूडची ही दुर्लक्ष न करण्याजोगी अत्यंत काळीकुट्ट अशी ही बाजू आहे. वरवर म्हणायला, बॉलिवूड ही सृजनशीलतेला संधी देणारी जागा असली तरीही, धंदा-व्यवहार-यश-पैसा हीच इथली सर्वोच्च मूल्ये आहेत. इथे यश आणि पुरस्कार सर्रास विकत घेण्याचीही पद्धत आहे आणि यशासाठी नि खासगी तसेच सरकारी मान-सन्मान पदरात पाडून घेण्यासाठी टोकाला जावून सौदा करण्याचीही तयारी राखून असलेल्यांचीही संख्या इथे मोठी आहे. त्याचमुळे सिनेमांमधून उदात्त भावनांचे दर्शन घडवणाऱ्या बॉलिवूडमधल्या प्रस्थापितांचे प्रत्यक्ष वागणे एका पातळीवर अत्यंत निष्ठूर, संवेदनशील माणसांचा घास घेणारे राहिले आहे. चकाचक ग्लॅमरच्या आड इथे जंगलचा कायदा पूर्वीपासूनच आपले अस्तित्व राखून आहे. एखाद्याचे करियर संपवण्यासाठी इथे कारस्थाने रचली गेली आहे. बाकीच्यांचे सोडा, आमिर खानसारख्या घराणेशाहीचे अपत्य असलेल्या नटालाही बड्या बॅनरचा डर हा चित्रपट सोडल्यामुळे कारकीर्दीच्या सुरुवातीला या कारस्थानांचा फटका बसलेला आहे. याचमुळे तोंडावर एकमेकांची तोंड फाटेस्तोवर स्तुती होत असली, गळामिठ्या आणि चुंबनांचा वर्षाव होत असला तरीही, चित्रपटसृष्टीतल्या नटाला वा नटीला विचारले तर त्यांचे इथे जीवलग मित्र वा मैत्रिणी नाहीत, आहेत, ते सारे व्यवहारापुरते आहे.

अशा या निर्दयी बॉलिवूडमध्ये कमकूवत, अतिहळव्या मनाच्या सुशांतसिंग राजपूतने कोणत्या का कारणांनी का होईना, आत्महत्या करावी, यात नवल ते नाही. यापूर्वीही अशा आत्महत्या बॉलिवूडमध्ये घडल्या आहेत, पात्रता असलेले पण नशिबाची साथ न मिळालेले असंख्य कलावंत-तंत्रज्ञ जीवंत पार्थीव बनून आयुष्य काढत आलेत. पण आता, बदलत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीने, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे बॉलिवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. यात घराणेशाहीचे वर्चस्व मान्य करणारी हिंदी चित्रपटसृष्टी संशयित नव्हे, तर थेट आरोपी आहेच. परंतु, बॉलिवूडमधल्या छळवादी घराण्यांवर आरोप ठेवणारे कोण आहेत, त्याचा फैसला काय असावा, हे ठरवणारे कोण आहेत, आणि शिक्षेचं स्वरुप काय असावे, हे सांगणारे कोण आहेत, यावरून प्रकरणाचा शेवट (निदान मीडियातला तरी) अवलंबून असणार आहे. धोका या टप्प्यावरही आहे.

जसे व्यापारी-उद्योगपती आपल्या नफेखोरीसाठी त्या त्या काळातल्या सत्ताधारी व्यवस्थेला धरून राहिले आहेत, लांगुलचालन करत आलेत, तसेच बॉलिवूडमधले अनेक कलावंत-तंत्रज्ञ सोयी-सवलती-सूट, पुरस्कार आणि एकूणच वरदहस्त कायम राहावा, यासाठी सत्ताधाऱ्यांची पालखी वाहात आले आहेत. २०१४ नंतरचे म्हणजे, भारतीय राजकारणातले तथाकथित ‘विकास पर्व’ सुरु झाल्यानंतरचे चित्र जर आपण पाहिले तर, बॉलिवूडमधल्या अनेक बड्या नट-नट्या-तंत्रज्ञांचे विद्यमान सत्ताधाऱ्यांशी उघड संबंध असल्याचे, ते संबंध टीव्ही सिरियल्स आणि सिनेमांतून थेट प्रतिबिंबित होत असल्याचे लपून राहिलेले. नाही. याच काळात सत्तासमर्थक आणि सत्ताविरोधक अशी उभी फुटही बॉलिवूडने अनुभवली आहे. म्हणजे, अशोक पंडित, खुद्द कंगना राणावत, सुनील अग्निहोत्री, अनुपम खेर, परेश रावल आदी कलावंत रस्त्यावरच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या त्वेषाने आणि भाषेने राजकीय मैदानात उतरत असल्याचे काश्मिर कलम ३७०, सीएए-एनआरसी, शाहीन बाग इत्यादी प्रकरणांत दिसले आहे. मात्र, सत्तासमर्थक ट्रोलांकरवी सततचे वैयक्तिक हल्ले होऊनही किती तरी नव्या-जुन्या पिढीतले कलावंत आपली सेक्युलर, प्रोग्रेसिव्ह बाजू लावून धरताना दिसताहेत. पण परिवारवादाशी संबंधित घडवून आणल्या गेलेल्या वादंगात घडतेय, असे की, कंगना राणावत, अशोक पंडितसारखे लोक चित्रपटसृष्टीतल्या परिवारवादी गब्दुलांना टार्गेट करता करता, सत्ताविरोधक अशी ओळख असलेल्या आउटसायडर अर्थात उपरे असलेल्या स्वरा भास्कर, तापसी पन्नू, झिशान अयूब, अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा आदींना झाश्यात घेताहेत. सगळ्यात मोठा धोका हा इथे आहे.

पण मुळात, हा काय प्रकार आहे? ही म्हटली तर एक सूत्रबद्ध योजना आहे, बॉलिवूडमध्ये दुफळी माजवून, विरोधी विचारांच्या कलावंत-तंत्रज्ञांना अडचणीत आणून सत्तेचा खुंटा अधिक बळकट करण्याची. सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या हे केवळ एक निमित्तमात्र आहे. अशात, ही ध्यानात घेण्यासारखी बाब आहे, बॉलिवूडवर बाहेरून नियंत्रण राखू पाहणाऱ्या शक्तींनी आपली बंदूक कंगना राणावतसारख्या ‘आग लगा दुंगी…’ ‘जला दुंगी’ टाइपच्या फिदायीन प्रवृत्ती असलेल्या नटीच्या खांद्यावर ठेवलेली आहे. यात बॉलिवूडमधल्या बोकाळलेल्या परिवारवादाला सुरुंग लागणार हा निव्वळ भ्रम आहे. न पेक्षा, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचे पुढे जावून काहीही होवो, विद्यमान सत्ताधारी हे निमित्त साधून बॉलिवूडचा ताबा अधिक मजबुतीने मिळवण्याचा प्रयत्न करत राहणार, हे यातले नजरेआड करता न येणारे वास्तव आहे. ताज्या घडामोडींनुसार कंगनाच्या खांद्यावरून आता बंदूक नितीशकुमार आणि भाजप आघाडीची सत्ता असलेल्या बिहार सरकारच्या खांद्यावर ठेवली गेलीय. मुंबई पोलिसांचे पर्यायाने महाआघाडी सरकारचे अपयश अधोरेखित करण्यासाठी नवा डाव मांडला गेला आहे. त्या अर्थाने, हेही प्रकरण राजकारणाच्या आखाड्यात अधिकृतरित्या गेले आहे.

म्हणजेच, परंपरावादी व्यवस्थेचा छुपा हेतू भलताच असल्यामुळे यहाँ इक खिलौना हे, इन्सां की हस्ती, यह बस्ती है, मुर्दा परस्तों की बस्ती…यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हैं …(साहिर लुधियानवी) असे म्हणणारा ‘प्यासा’ मधला पराभूत गुरुदत्त यापुढेदेखील पुनःपुन्हा नव्या रुपात आपल्यापुढ्यात येत राहणार आहे. पुढचा मोठा धोका हा इथे आहे…

(ताजा कलम-प्रस्तुत लेख लिहून झाला. त्यानंतर ब्रेकिंग न्यूज झळकली. त्यानुसार सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी, त्याची सीबीआय चौकशीची गृहमंत्र्यांकडे मागणी करणारी मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरोधातच फसवणूक, चोरी आणि विश्वासघात या आरोपाखाली पाटणा पोलिसात गुन्हा दाखल केला. आत्महत्या प्रकरणाला अचानक नवे वळण मिळाले. म्हणजेच, काहींनी समस्त देशाची दिशाभूल करत भलत्याच मुद्यावर हल्लतकल्लोळ माजवून वाचक-प्रेक्षकांना मूर्ख बनवले.)

deshmukhshekhar101@gmail.com

(पत्रकार, लेखक आणि ग्रंथ-संपादक आहेत.)

बातम्या आणखी आहेत...