आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:माफ करा, बाबासाहेब!

Aurangabadएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • माफ करा, बाबासाहेब!

‘आम्ही भारताचे लोक...’ या तीन शब्दांत भारतीय प्रजासत्ताकाची ऐतिहासिक पायाभरणी करताना, मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने घटना समितीच्या समारोपाच्या भाषणात आपण जिवाच्या आकांताने मांडलेला व्यापक दृष्टिकोन आम्ही सत्तर वर्षे उलटूनही आत्मसात करू शकलो नाही. ‘एक व्यक्ती - एक मत’ ही राजकीय समानता आपण आणली, मात्र सामाजिक आणि आर्थिक जीवनात ‘एक व्यक्ती - एक मूल्य’ हे तत्त्व नाकारून आपण भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठ्या विसंगतीत प्रवेश करतोय ही तुमची खंत आम्ही पूर्णपणे मिटवू शकलो नाही. जात-पात, वर्ग-वर्ण, धर्म, लिंग, प्रांत-सुभे यांच्या चिखलात विखुरलेल्या, विभागलेल्या, दबलेल्या आणि फुशारलेल्या सर्वांना तुम्ही ‘भारतीय नागरिक’ म्हणून एका रांगेत आणले. त्याच वेळी भारतीय लोकशाहीपुढील व्यक्तिपूजेचा धोकाही मांडलात. जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा भारतासारख्या देशात ‘नायकपूजन’ हा सर्वात मोठा धोका ठरू शकतो, ही सत्तर वर्षांपूर्वीची तुमची धास्ती आज खरी ठरते आहे. स्वातंत्र्य कुणा एका थोर नेत्याच्या पायाशी लोळण घालू लागणे किंवा घटनात्मक संस्था मोडीत काढण्याची एकाधिकारशाही त्यास दिली जाणे, या लोकशाहीपुढील आव्हानाचा मसुदा समितीच्या समारोपाच्या त्या ऐतिहासिक भाषणात तुम्ही मांडलेला धोका आज खरा ठरला. स्वातंत्र्य-समता आणि बंधुता हातात हात घालून वावरतील, ही तुमची व्यापक दृष्टी आम्ही पूर्ण करू शकलो नाही, मात्र भारतीय लोकशाहीला व्यक्तिपूजनाच्या आव्हानापाशी घेऊन आम्ही ठेपलो.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी ब्रिटिश सरकारमधील कायदा व मजूरमंत्री म्हणून तुम्ही केलेल्या कायद्यांमुळे आज देशातील तमाम नोकरदार महिलांना प्रसूतीची रजा मिळाली, तुम्ही केलेल्या कायद्यामुळे देशातील कोट्यवधी नोकरदारांना किरकोळ रजा, निवृत्तिवेतन मिळाले. स्वतंत्र भारताचे ऊर्जामंत्री म्हणून तुम्ही केंद्रीय जल आयोग, केंद्रीय वीज प्राधिकरणाची स्थापना केलीत. कोणत्याही आंदोलनांशिवाय देशातील प्रत्येक प्रौढास मतदानाचा अधिकार दिलात. मूलभूत हक्क दिले, राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुरसटलेल्या रूढी-परंपरांना झुगारून एक व्यक्ती म्हणून सन्मानाने व सक्षमपणे जगण्याची आधुनिक संधी दिलीत. तुम्ही मांडलेल्या व्यक्तिवादी समानतेच्या पायावर आम्ही आमच्या विकासाचे इमले उभारले, पण तुम्हाला आपले मानले नाही. तुम्ही मांडलेली दृष्टी, तुम्ही केलेले कायदे याचे फायदे घेणाऱ्या आम्ही तुम्हाला मात्र एका वर्गाचे नेते म्हणून कोतं केलं. नेतेपणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय अस्मितांच्या नावाने पक्षांमध्ये विभागलं आणि तुम्ही नाकारलेली व्यक्तिपूजा विसरून पुतळ्यातच कोंडून टाकले. तुम्ही दिलेल्या व्यापक नागरिकत्वाशी जात-धर्म, प्रांत, वंशाच्या आधारे प्रतारणा केली जात आहे. समतेशिवाय स्वातंत्र्य उपयोगाचे नाही आणि स्वातंत्र्य व समता यापासून बंधुता विलग करता येणार नाही, हा तुमचा संदेश आम्ही साफ विसरलो. माफ करा बाबासाहेब, आजच्या जयंतीनिमित्ताने तुम्हाला अभिवादन करताना माफी मागण्याशिवाय आमच्याकडे काहीही नाही.

बातम्या आणखी आहेत...