आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थॉ:‘उपरे विश्व’ आपले व्हावे...

सुलक्षणा महाजनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

18 डिसेंबर हा जागतिक स्थलांतर दिन... याच पार्श्वभूमीवर मानवी स्थलांतर या सर्वव्यापी विषयाचा वेध घेणारे शेखर देशमुखलिखित 'उपरे विश्व' हे संशोधनपर पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. ‘मनोविकास’ तर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकास ज्येष्ठ नगरनियोजन तज्ज्ञ आणि लेखिका सुलक्षणा महाजन यांची प्रस्तावना लाभली आहे. त्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

स्थलांतर ही आपली सर्व प्रकारच्या चल-सजीवांची किती सहज प्रवृत्ती आहे. तळपत्या उन्हात सावली, बर्फाळ प्रदेशात उबदार आसरा, पाउस-वार्‍यात बंदिस्त जागा शोधत हिंडण्यासाठी प्रत्येक प्राणी हालचाल करीत असतो. दुष्काळात सुपीक प्रदेश आणि संकटकाळात सुरक्षित प्रदेश शोधत आपण सर्व मानवांनी हिंडत-हिंडत आजवरचा प्रवास केला आहे. जीव जगवण्या-वाचविण्याचा प्राणीमात्रांचा सर्वांत महत्त्वाचा पर्याय म्हणजे स्थलांतर.

अशा स्थलांतराचे पैलू तरी किती असावेत? अगणित, गुंतागुंतीचे, भूतकाळातले, वर्तमान आणि भविष्य काळात होणारे, होऊ शकणारे, स्वेच्छेचे आणि अनिच्छेने केलेले; प्राण्यांचे, पक्ष्यांचे, जलचरांचे, कीडा-मुंग्यांचे, अगदी सूक्ष्म पातळीवरील जंतूंचे आणि पेशींमधील गुणसूत्रांचेही. नियोजनपूर्वक स्थलांतर आणि अचानक स्थलांतर. स्थलांतराबरोबर येते स्पर्धा आणि सहकार्य, असूया आणि मैत्री, जगणे आणि जगवणे, मरणे आणि मारणे. समृद्धी आणि दारिद्य्र. संस्कृती आणि विकृतीही. एकंदरीत, स्थलांतराचा विषय गंभीर आणि गुंतागुंतीचा.

ह्या स्थलांतराचा अनेकप्रकारे, अनेक विद्या शाखांच्या माध्यमातून तसेच आंतरशाखीय पद्धतीने विचार होतो आहे; नव्हे, करणे भागही पडत आहे. ह्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, आज मानवप्राण्याची जगाच्या पाठीवर वाढलेली संख्या आणि कानाकोपर्‍यांत पसरलेली असूनही जोडले जाण्याची जाणीव; तसेच त्याबरोबर हरवून जाण्याची भीती. स्थलांतर हा आता मानवप्राण्याच्या जगण्या-मरण्याशी निगडित असा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. त्याचे पडसाद साहित्यात, कलाविश्‍वात, भाषेत उमटले आहेत; तसेच ते धर्मांत, तत्त्वज्ञानांत, अध्यात्मात आणि विज्ञानात उमटत आहेत.

स्थलांतर ह्या महत्त्वाच्या विषयाच्या गुंत्यामध्ये त्याबद्दलच्या अनेकविध अभ्यासकांच्या अवजड सिध्दांतांचे संदर्भ आहेत. ह्या विषयाची खोल जाणीव ठेवून, डोळस आणि चिकित्सकपणे अनुभव घेत केलेले लिखाण म्हणजे, शेखर देशमुख ह्यांचे बहुढंगी ‘उपरे विश्‍व’. व्यवसायाने पत्रकार असलेल्या देशमुख यांचे हे पुस्तक हा वाचकांसाठी वेगवेगळ्या अनुभवांचा खजिना आहे. ह्या पुस्तकातले लेख वाचल्यावर प्रत्येक वाचकाच्या मनाचे आणि विचारांचे विश्‍व विस्तारणार आहे. आजच्या संकुचित वृत्तीकडे झुकलेल्या भारतामध्ये ते आवश्यक आहे. आपण सर्व जण वेळोवेळी आणि अनेक कारणांनी स्थलांतर करीत असतो. श्‍वास घेण्यासारखीच ती सहज नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूक लागल्यावर पाय आपोआप अन्न शोधत निघतात आणि तहान लागली की पाण्याचे स्त्रोत. मग ते घरातले असोत, गावातले, शहरातले, प्रदेशातले. अशा स्थलांतर प्रक्रिया आणि त्यांच्या प्रेरणा नैसर्गिक असतात. सुरक्षितता आणि जगण्याची, अधिक चांगले जगण्याची धडपड हीच त्या मागची प्रेरणा. ह्या प्रक्रियेत काही लोक यश मिळवतात, तर काही अपयशाचे धनी होतात. स्थलांतर करायला प्रेरणा लागते; तसेच, उद्देश आणि धाडसही लागते. यश-अपयश कशाची खात्री देता येतेच असे नाही.

गेल्या पाचशे वर्षांत मानवप्राणी पृथ्वीवरचा सर्वांत वेगाने स्थलांतर करणारा प्राणी झाला आहे. आज मी हे लिहिते आहे, ते भारतामधून अमेरिकेतील, कॅलिफोर्नियामधील सिलीकॉन व्हॅलीमध्ये स्थलांतरित झालेल्या मित्राच्या घरी बसून. केवळ चोवीस तासांत अर्धी पृथ्वी प्रदक्षिणा करून मी येथे येऊ शकले. संध्याकाळी पाय मोकळे करायला बाहेर पडले, तेव्हा परिसर अमेरिकेचा आणि फिरायला बाहेर पडलेले जवळजवळ सर्व लोक भारतीय असे चित्र बघायला मिळाले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकात उभे राहिल्यावर विविध प्रदेशातले भारतीय लोक दिसतात तसे. उलट, गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमधील ग्रँड रेल्वे स्थानकाच्या विशाल कक्षात उभी होते, तेव्हा इतक्या रंगांचे, देशांचे, वंशांचे, उंच, बुटके, जाडे, बारीक, चालणारे, पळणारे लोक बघून ते विश्‍वाच्या कोणत्या प्रदेशातून आले असावेत ह्याचाही पत्ताही लागत नव्हता. न्यूयॉर्क ही जगाची आर्थिक राजधानी आहे ह्याचे भान तेथील लोकांची विविधता बघून सहज येत होते.

जगातील प्रत्येक लहान-मोठ्या देशात आज एकमेकांशी संबंध ठेवून असलेल्या आर्थिक राजधान्या निर्माण झाल्या आहेत. त्यातही लंडन, टोकियो, सिंगापूर, शांघाय, अशी महानगरे सर्वांत आघाडीवर आहेत. बहुतेक शहरांमध्ये मुंबईप्रमाणे बहुसंख्या दिसते ती स्थानिक लोकांची. न्यूयॉर्क आणि लंडन त्याला अपवाद आहेत. काही शतकांपूर्वी तेथे गोर्‍या, युरोपीय वंशाच्या लोकांची बहुसंख्या होती. पण आता ते चित्र संपूर्णपणे बदलले आहे. तेथे आज कोणत्याही एका वंशाच्या लोकांचे वर्चस्व राहिलेले नाही. कदाचित इतर जागतिक महानगरांचे सामाजिक स्वरूपही पुढील काळात असेच बदललेले दिसेल. न्यूयॉर्क शहराच्या दक्षिण टोकाला एलीस बेट आहे. तेथे स्थलांतर विषयाला वाहिलेले एक मोठे म्यूझियम आहे. तेथे एक जगाचा मोठा नकाशा आहे आणि कोणत्याही देशाच्या नकाशावर बोट दाबले की तेथून स्थलांतर करून अमेरिकेत आलेल्या लोकाची संख्या आपल्याला दिसते. ह्या मोठ्या नकाशाभोवती असंख्य लोक बटने दाबून ती माहिती मिळवत होते. इतकेच नाही तर कोणत्या वर्षी कोणत्या देशातून किती लोक स्थलांतरित होऊन अमेरिकेत आले आणि त्यांचे प्रमाण आणि संख्या कशी बदलत गेली ह्याचीही माहिती मिळत होती. नकाशातील जाड-बारीक बाण-चिन्हांच्या माध्यमातून जगभरातून अमेरिकेमध्ये मानवी स्थलांतर कसे कसे झाले आहे, ह्याचाही अंदाज करता येत होता. हे स्थलांतर केवळ गेल्या पाचशे वर्षांच्या अमेरिकेच्या शोधानंतर झालेले आहे.

आदिमानवाच्या काळापासून सर्वप्रथम आफ्रिकेच्या जंगलात जन्मलेल्या मानव जातीचे लाखो वर्षांत झालेले स्थलांतर हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. मात्र गेल्या पन्नास हजार वर्षांच्या काळात आणि त्याहीपेक्षा जास्त वेगाने गेल्या दहा हजार वर्षांच्या कालखंडात मानवाने पृथ्वीवरील कानाकोपर्‍यांत वस्ती करून तगून राहण्याची, जगण्याची आणि उत्क्रांत होण्याची केलेली किमया विस्मयकारी आहे. ह्या प्रक्रियेत अनेक मानवी वस्त्या निर्माण झाल्या-अनेक नष्टही झाल्या. निसर्गाच्या आणि मानवाच्या ह्या दीर्घ काळ चाललेल्या झगड्यात, स्पर्धेत, मानव जात टिकून राहिली त्याचे एक कारण म्हणजे मानवाने विविध नैसर्गिक परिसरात अवलंबिलेले लवचीक धोरण. त्यात कधी निसर्गाशी झगडा होता; त्याचबरोबर निसर्गातील घटनांमुळे झालेला विनाशही होता. त्याचप्रमाणे इतर मानवी वस्त्यांबरोबर अनेक वेळा झालेला संघर्ष आणि त्यातून झालेला विनाशही होता. विनाशापाठोपाठ प्रत्येक वेळी नव्याने स्थलान्तर होत होते आणि नव्याने मानवी वसाहती तयार होत राहिल्या होत्या. मात्र गेल्या दहा हजार वर्षांच्या शेतीक्रांती आणि तिचा जगभर फैलाव होण्याच्या काळात मानव अधिकाधिक स्थिरावत गेला आणि स्वत:चा वंश वाढवत राहिला.

स्थैर्य आणि भटकंती...

भटकणे हा मानवाचा मूळ स्वभाव आणि जगण्यासाठी आवश्यक अशी नैसर्गिक कृती. स्थिरावणे, वाढणे आणि समृद्ध होणे हा मानवाच्या दीर्घकाळ चालू असलेल्या उत्क्रांतीप्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा. भटकणे आणि स्थिरावणे ह्या दोन्ही प्रक्रिया माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. सतत भटकणार्‍या माणसांना स्थैर्याची ओढ असते, तर स्थिर झाल्यावर भटकण्याची ओढ वाढते. ह्या दोन विरोधी स्वभाववैशिष्ट्यांच्या परिणामी एकीकडे मानवी वस्त्या वाढल्या आहेत आणि दुसरीकडे त्याची भटकंतीही वाढली आहे. जगातील बहुतेक समाज आणि त्यातील भटकणारी माणसे आज मोठ्या प्रमाणात स्थिर झालेली असली, तरी अजूनही सतत भटकत राहणार्‍या काही मानवी टोळ्या जगभर शिल्लक आहेत. भारतामध्येही त्यांचे प्रमाण काही कमी नाही. मात्र काही वर्षांपासून ह्या दोन्ही प्रक्रियांनी वेग घेतला असून त्यातून एक प्रकारचा ताण जगभर निर्माण झाला आहे. गेल्या पाचशे वर्षांत पृथ्वीच्या पाठीवर नाना प्रकारच्या भौगोलिक प्रदेशांत विखरून पसरलेल्या आणि एकमेकांपासून तुटलेल्या मानवी वस्त्या विविध प्रकारे संपर्कात येऊन जोडल्या जात आहेत. पुन्हा एकत्र येण्याची, जागतिकीकरणाची प्रक्रिया अतिशय वेगवान झाली आहे.

या पाचशे वर्षांमध्ये स्थलांतराला वेग देण्यात आणि जगभरातील समाजांना जोडण्यात, त्यांच्यात संपर्क निर्माण करण्यात चार प्रकारच्या मानवी समूहांनी मोठी भूमिका बजावली आहे. नयन चंदा ह्या भारतीयाने लिहिलेले ‘बाउंड टुगेदर’ हे त्या विषयीचे, मला आवडलेले एक महत्त्वाचे पुस्तक. व्यापारी, धर्मगुरू, धाडसी वृत्तीचे लोक आणि लढवय्ये अशा चार प्रकारच्या लोकांनी मानवाला जोडण्याची प्रक्रिया दीर्घकाळ केली आहे, असे ते मांडतात. पृथ्वीवर संचार करण्यासाठी तसेच समाजांना एकत्र जोडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या, मानवी संस्कृतीचा विस्तार करणार्‍या या चार प्रेरणा मूलभूत आहेत. या चार प्रकारच्या लोकांच्या भटकंतीचे उद्देश संपूर्णपणे वेगळे आहेत. भटकंतीसाठी वापरलेली वाहतूक साधने, त्यासाठी केलेली हिंसा आणि अहिंसा, प्रेम तसेच फसवणूक अशा अनेक प्रकारे त्यांनी जगातील माणसांचे समूह जवळ आणले आहेत. त्याचे अनेकविध परिणाम जगावर आणि जगाच्या इतिहासावर झाले आहेत. असे असूनही त्यांनी कळत-नकळतपणे जगातील स्थिरावलेल्या असंख्य मानवी वस्त्या जोडण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नफ्याच्या आशेने निसर्गातील उपयुक्त वस्तू, अन्नपदार्थ, उपयुक्त उत्पादने आणि माणसांचीही देवाण-घेवाण करणारे आणि समाजांना जोडणारे लोक म्हणजे व्यापारी. राजाच्या आदेशाने नवनवीन प्रदेश बळकावण्यासाठी स्थलांतर करणारे लोक म्हणजे सैनिक. धर्मगुरू हे आपला धर्म आणि आपले ज्ञान-तत्त्वज्ञान, संस्कृतीची धुरा घेऊन भटकणारे; तर धाडसी लोक केवळ स्वत:चे कुतूहल शमविण्यासाठी, वेळप्रसंगी जीव धोक्यात घालूनही विविध धाडसे करीत जग भटकणारे. तसे बघितले तर ह्या चारही प्रकारच्या प्रेरणा घेऊन भटकणार्‍या लोकांनी एकमेकांना अनेकदा सहकार्य केले आहे आणि एकमेकांशी लढायाही केल्या आहेत. अनेक शतकांपासून आशिया-युरोपमध्ये देवाण-घेवाण करणारे अरब, चिनी, भारतीय व्यापारी, चौदाव्या शतकातील लढाया करून प्रदेश जिंकणारा मंगोलियाचा चेंगीज खान, तर बुद्धधर्माचा प्रसार करीत भारतामधून पार चीनपर्यंत गेलेले धर्मगुरू, तसेच ख्रिश्‍चन मिशनरी आणि पृथ्वी गोल आहे हे सिद्ध करण्यासाठी स्पेनमधून निघालेला दर्यावर्दी कोलंबस, पोर्तुगालमधून आलेला वास्को-द-गामा ही प्रातिनिधिक आणि प्रसिद्ध उदाहरणे. व्यापार्‍यांनी सिल्क मार्गाने आणि समुद्र मार्गाने व्यापार करत आफ्रिका, युरोप आणि आशियातील समाज एकमेकांना जोडले. त्यांच्या संगतीने धर्मगुरूही जात-येत राहिले. सर्वांत शेवटी धाडसी दर्यावर्दी लोकांनी अमेरिका वसवली. पुढे ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिक आणि आर्क्टिक खंडांचा शोध धाडसी लोकांनी घेतला. अशा धाडसांमागे मानवी कुतूहल जसे होते तसेच इतिहासामध्ये नाव कोरले जाण्याची प्रेरणाही कमी महत्त्वाची नव्हती. काहीना त्यात यश मिळाले, असंख्य लोक धडासापायी प्राणाला मुकले, पण त्यांच्यामुळे जग एकत्र येण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहिली.

अशा अनेकविध मानवी प्रेरणांना पूरक अशी जमीन, पाणी, आकाश आणि अवकाशभ्रमणाला मदत करणारी तंत्रे विकसित झाली. विसाव्या शतकाच्या मध्यानंतर स्थलांतर प्रक्रिया अधिकच वेगवान झाली. आधुनिक काळातील औद्योगिकीकरण, विज्ञान-तंत्रज्ञान, वेगाने वाढलेली लोकसंख्या, नागरीकरण आणि अलीकडच्या चाळीस वर्षांतील माहिती-करमणूक-संगणक-अवकाश संपर्क क्रांती यांनी मानवी स्थलांतराला वेगळीच परिमाणे बहाल केली आहेत. त्यातूनच एकीकडे न्यूयॉर्कसारखी बहुआयामी, बहुरंगी, बहुवंशीय जागतिक महानगरे संख्येने, आकाराने आणि लोकसंख्येने वाढत आहेत; तर दुसरीकडे भारत, चीन, युरोप येथील अंतर्गत अल्पकालीन स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. शेखर देशमुख यांच्या ह्या पुस्तकातील राजस्थानमधील पुष्कर येथे दरवर्षी भरणारा मेळा हे त्याचे एक ठळक उदाहरण म्हणता येईल. उलट-सुलट, गोलाकार, ऋतुमानानुसार होणारे मानवी स्थलांतर असेही अनेक प्रवाह त्यात आहेत.

घडणे-बिघडणे

पृथ्वीच्या पाठीवर पूर्वापार झालेल्या आणि आजही होत असलेल्या स्थलांतराचे वैश्‍विक स्वरूप आणि त्यामुळे झालेली मानवजातीची उत्क्रांती ही एक सकारात्मक प्रक्रिया मानली जाते. युवाल हरारी यांच्या ‘सेपियन्स’ पुस्तकातील त्यासंबंधीचे भाष्य देशमुखांनी पुस्तकात दिलेले आहे. मात्र आज जगामधील अनेक देशांत, प्रदेशांत आणि शहरांतही वेगवान झालेली ही प्रक्रिया सकारात्मक आहे असे बहुसंख्य लोकांना मात्र वाटत नाही. जेथे स्थलांतरित मोठ्या संख्येने जात आहेत त्या देशांमध्ये आणि शहरांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.

कोलंबसला अमेरिका खंडाचा शोध लागण्याच्या हजारो वर्षांपूर्वी आफ्रिकेतून निघालेला मानव तेथे पोचलेला होता. या स्थलांतरित लोकांच्या अनेक टोळ्या तेथे वाढल्या होत्या आणि त्यांच्या वस्त्या निर्माण झाल्या होत्या. मात्र सोळाव्या शतकात युरोपमधून आलेल्या स्थलांतरितांच्या लाटांनी मूळचे वंश अल्पसंख्य झाले आहेत. जो अमेरिका खंड गेल्या चारशे वर्षांत स्थलांतरित लोकांमुळे घडला आहे, तेथेच आता नवीन स्थलांतरित हे शत्रुवत् झाले आहेत. मेक्सिकोमधून उत्तर अमेरिकेमध्ये होणारे बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष तटबंदी बांधायचा प्रयत्न करीत आहेत. इतर देशांमधून येऊ बघणार्‍या लोकांवर निर्बंध घातले जात आहेत. आशिया-आफ्रिका येथून येणारे स्थलांतरित लोक ही विकसित देशांसाठी समस्या झाली आहे. भारतामध्येही बांगलादेशातून येणारे स्थलांतरित ही समस्या राजकीय झाली आहे.

युद्धे आणि लढाया ह्या नेहमीच रक्तरंजित असतात. तसेच क्रांत्याही. लहान-मोठ्या उद्रेकांच्या काळात असंख्य लोक नाइलाजाने स्थलांतर करतात. नैसर्गिक संकटकाळात स्थलांतर वाढते. तसेच एखाद्या ठिकाणाची लोकसंख्या वाढते तेव्हाही जगण्यासाठी-तगण्यासाठी स्थलांतर होते. स्थलांतर प्रक्रियेच्या परिणामी सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थैर्य हरवते, समतोल हरवतो. त्यामुळे मानवी समाज मानसिकदृष्टीनेही अस्थिर बनतो. तोल गमावणे, पडणे म्हणजे विनाश हा आपल्या प्रत्येक माणसाच्या डी.एन.ए.चा अविभाज्य भाग आहे. तोल राखण्यासाठी मानवाला आणि मानवी समाजाला धडपड करावीच लागते. त्यासाठी दोनच पर्याय असतात. कोणत्याही संकटाच्या प्रसंगी पळून दूर जाणे किंवा प्रतिहल्ला करणे हे दोन सहज उत्स्फूर्त पर्याय असतात. तिसरा पर्याय आहे, तो स्थिर राहून, तपशील जाणून, अंदाज घेऊन, खात्री झाल्यावर सुयोग्य उपाय शोधण्याचा. ह्याच पर्यायाचा वापर करून मानव जातीने आजपर्यंत यश मिळविले आहे. अजून एक नैसर्गिक, उत्स्फूर्त कृती मानवामध्ये असते. ती आहे दिङ्मूढ होण्याची, गोठून जाण्याची. कोणतीही कृती न करण्याची. आजही हे सर्व पर्याय आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात बघायला मिळतात.

यापुढेही आपल्याजवळ जे पर्याय आहेत, त्यांतून पर्यायांची निवड करावी लागणार आहे. या पर्यायांच्या निवडीवर मानव जातीचे घडणे किंवा बिघडणे, जगणे किंवा नष्ट होणे निर्भर असणार आहे. म्हणूनच, स्थलांतर हा विषय राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या संदर्भात महत्त्वाचा झाला आहे. या विषयाच्या वैयक्तिक आकलनावर आपले सामूहिक मानस तयार होणार आहे. स्थलांतर प्रक्रियेतून निर्माण होणार्‍या प्रश्‍नांना सामोरे जाणे सामूहिक कृतीवर अवलंबून असणार आहे.

उपरे विश्व आपले व्हावे

जगातील प्रत्येक भागात ‘उपर्‍या’लोकांचे प्रमाण वाढते आहे. अस्थैर्य सार्वत्रिक झाले आहे. ते भय निर्माण करणारे आहे. त्यात क्वचितच आशावाद डोकावतो. शेखर देशमुख यांच्या ‘उपरे विश्‍व’ ह्या पुस्तकातील लेखांच्या शीर्षकांवरून ते लक्षात यावे. स्थलांतराच्या प्रक्रियेबद्दल वेळोवेळी मासिकांत, वर्तमानपत्रांत हे लेख छापून आले आहेत. त्यामुळेच कदाचित फार थोड्या लेखांची शीर्षके स्थलांतराबदल सकारात्मक संदेश देतात. त्यातच देशमुख ह्यांचा या विषयाशी झालेला परिचय हा एड्स ह्या रोगाचा झपाट्याने प्रसार होण्याच्या काळात झालेला आहे. त्या रोगाची दोन भौगोलिक टोके आहेत. एक टोक महानगरात आहे, तर दुसरे ग्रामीण भागांत. त्या दोन भागांत ये-जा करणारे लोक हा एड्स रोगाचे वाहक बनले आणि त्यामुळे अनेक संसार आणि लोकवस्त्या उद्ध्वस्त होत होत्या. त्या काळाचे प्रतिबिंब या पुस्तकातील लेखांत पडलेले आहे.

सुदैवाने, आज ह्या जागतिक रोगाच्या संकटाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. जगातील सर्व देशांनी, त्यांतील विविध विषयांच्या तज्ज्ञांनी, संशोधकांनी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन त्यासाठी खूप प्रयत्न केल्यामुळे घोंगावत आलेले एड्सचे वादळ काहीसे शमले असले, तरी स्थलांतराचा विषय न संपणारा आहे. म्हणूनच हे लिखाण जरी विशिष्ट काळात केलेले असले तरी त्याचे महत्त्व आजही आहे आणि भविष्यातही असणार आहे.

येणार्‍या काळात तंत्रज्ञानाची घोडदौड, स्थलांतर आणि नागरीकरण ह्या तीन प्रक्रिया वेगाने घडणार आहेत. त्यामुळे मानवी जगाचे चित्र बदलून जाणार आहे. एकविसाव्या शतकाखेर 80 टक्के नागरी आणि 20 टक्के लोकसंख्या ग्रामीण असेल. अर्थात, हा अंदाज आहे. भविष्यात नक्की काय घडेल हे आज सांगणे अवघड आहे. याचे कारण म्हणजे, वेगाने बदलत असलेले नैसर्गिक पर्यावरण. नैसर्गिक प्रक्रियेच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांमुळे पर्यावरण सतत बदलत असते. परंतु आता ते बदलायला गेल्या पाचशे वर्षांतील मानवजातीच्या कृत्यांनी मोठा हातभार लावला आहे. एक प्रकारे मानवजातीने स्वत:वरच संकट ओढवून घेतले आहे. स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेण्याची ही मानवी कृती काही पहिल्यांदाच घडलेली नाही. लहान-मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी विखरून उभ्या राहिलेल्या मानवी वस्त्यांनी ते स्वतंत्रपणे अनुभवले आहे. सर्व मानवजात एकाच वेळी नैसर्गिक आणि स्वनिर्मित संकटात सापडण्याचा धोका पहिल्यांदाच निर्माण झाला आहे.

अशा ह्या अतिशय अस्थिरतेच्या काळात माणसांचे स्थलांतर कोठून कसे, किती आणि कोणत्या प्रकारे होईल ह्याचा अंदाज करणे, त्याबद्दल भाकीत करणे अशक्य आहे. ह्या काळात आपण मानवजात म्हणून पृथ्वीवर उपरे, अनावश्यक ठरण्याचा धोका मोठा आहे. पृथ्वीच्या पाठीवरील सर्वांत अलीकडे उत्क्रांत झालेली, मेंदू आणि बुद्धीच्या जोरावर प्रबळ झालेली सजीवाची एक जात गत युगातील डाइनसॉर किंवा इतर अवाढव्य प्राण्यांच्या प्रमाणे नाहीसे होण्याचा धोका आहे. अशा वेळी नैसर्गिक विश्‍वालाच उपरे मानून, शत्रू समजून कृती करण्याचा धोकाही मोठा आहे. आजचे आपले विश्‍व उपरेही आहे आणि आपलेही आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच, मौजेचे आणि मानवी बुद्धीच्या मूलभूत ज्ञानाची प्रेरणा पूर्ण करणारेही आहे. ह्या वैश्‍विक पार्श्‍वभूमीवर वाचकांनी शेखर देशमुख ह्यांचे ‘उपरे विश्‍व’ वाचायला हवे आणि त्याच्या संदर्भात स्थलांतर, स्थलांतरित आणि त्यामुळे होत असलेले स्थानिक आणि वैश्‍विक परिणाम समजून घ्यायला हवेत. भारतामध्ये आज खूप मोठ्या संख्येने आणि प्रमाणात स्थलांतर होत असूनही त्याबाबत होणारी चर्चा, संशोधन आणि लिखाण खूप मर्यादित आहे. शेखर देशमुख यांनी ह्या विषयाकडे लक्ष वेधून सुरुवात केली आहे. त्यापासून स्फूर्ती घेऊन अधिक सखोल आणि व्यापक मांडणी करणारं लिखाण भविष्यात होईल, अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर देशमुख यांचे प्रयत्न सार्थकी लागतील.

पुस्तकाचे नाव- उपरे विश्वः वेध मानवी स्थलांतराचा

लेखक-शेखर देशमुख

प्रकाशक-मनोविकास प्रकाशन, पुणे

पृष्ठ संख्या-267, मूल्य –रुपये 299.

sulakshana.mahajan@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser