आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:ट्रम्प नव्हे, अमेरिकेचा पराभव!

संजय आवटे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा जानेवारीला अमेरिकेत जे घडले, त्यामुळे फक्त अमेरिकी लोकशाहीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेलेली नाहीत. तर, कोणत्या भयंकराच्या वेशीवर जग उभे आहे, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. "ग्लोबलायझेशन ते गोबेल्सायझेशन' असा हा प्रवास जगाला हादरवून टाकणारा आहे.

डोनाल्ड ट्रम्प अद्यापही अमेरिकेचे अध्यक्ष आहेत आणि "कमांडर-इन-चिफ'सुद्धा. त्यांना परवापर्यंत खात्री होती की आपण "उठाव' करू शकतो आणि सत्ता पुन्हा मिळवू शकतो. मात्र, त्यांचा उठाव फसला आणि अमेरिकेत लोकशाहीची लाज राखली गेली. ट्रम्प यांच्यासोबत लष्कर आले नाही हे तर खरेच, पण त्यांचा पक्षही त्यांच्यासोबत उभा राहिला नाही. ट्रम्प यांना मुळात जिंकण्याची खात्री होती. मात्र, हरलो तरीही आपण सत्ता ताब्यात घेऊ, अशी उद्दाम तयारीही त्यांची होती. २० जानेवारीला नवे अध्यक्ष सत्तारूढ होतात, त्यापूर्वी सहा जानेवारीला कॉँग्रेसच्या संयुक्त सभागृहात निकालावर शिक्कामोर्तब होत असते. उपाध्यक्ष या प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी असतात. घटनेची ही औपचारिकता असली, तरीही ती कमी महत्त्वाची नसते. आपले उपाध्यक्ष माइक पेन्स हे ज्यो बायडन यांना विजयी घोषित करणारच नाहीत, याची ट्रम्प यांना खात्री असावी. मात्र, उपाध्यक्षांनीही आपल्या 'बॉस'ला जुमानले नाही.

दुसरे म्हणजे, अमेरिकेची "फेडरल' व्यवस्था राज्यांना प्राधान्य देणारी आहे. "आपली' राज्ये मतांची हवी तशी मोडतोड करतील, अशी अपेक्षा ट्रम्प यांची होती. मात्र, जॉर्जियासारख्या राज्यातील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनीही ट्रम्प यांना जुमानले नाही. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाचे न्यायाधीश नियुक्त केले ते ट्रम्प यांनीच. पण, त्यांनीही ट्रम्प यांची पाठराखण केली नाही. त्यामुळे व्हायचे तेच झाले आणि हा उठाव फसला.

पण, मुळात ही वेळ आली कशामुळे, हा मुद्दा उरतोच.

अमेरिका हा काही भारतासारखा प्राचीन देश नाही. पंधराव्या शतकात कोलंबसाने अमेरिका नावाचे प्रकरण जगाला दाखवले. पुढे १७७६ मध्ये हा देश स्वतंत्र झाला आणि लोकशाही व्यवस्था स्वीकारत पुढे निघाला. त्यामुळे लोकशाहीचा विचार करता, अमेरिका भारतापेक्षाही प्राचीन. पण, खरा पेच वेगळाच होता.

एक प्रसंग सांगायला हवा.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये जेव्हा सर्वप्रथम भारतात आले, तेव्हा त्यांनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना एक पुस्तक भेट म्हणून दिले. त्यावर ओबामांनी लिहिलं, ‘फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी, टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी.’ म्हणजे, अमेरिकेसारख्या सर्वात जुन्या लोकशाहीकडून भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. कॉम्रेड सीताराम येच्युरी यावेळी तिथे होते. ते हसत हसत ओबामांना म्हणाले, ‘मिस्टर ओबामा, यु आर नायदर ओल्डेस्ट, नॉर लार्जेस्ट.’ ओबामा एकदम चमकलेच! त्यांना या विधानाचा अर्थ समजेना. त्यावर येच्युरी म्हणाले, "४ जुलै १७७६ रोजी तुम्ही स्वतंत्र झालात, हे खरे. पण १९६५ पर्यंत तुमच्या देशात सर्वांना मताधिकार नव्हता. गोरे नसलेल्यांना आणि महिलांनाही दीर्घ काळ मताधिकार नव्हता. त्यासाठी त्यांना मोठा झगडा उभा करावा लागला. म्हणजे, १९६५ ला तुम्ही खऱ्या अर्थाने लोकशाहीत आलात. याउलट आम्ही एका झटक्यात १९५० मध्ये सर्व प्रौढांना मताधिकार दिला.'

अमेरिकेने लोकशाही स्वीकारली हे खरे, पण त्यानंतर तिथे यादवी युद्ध झाले. १८६१ ते १८६५ असे हे युद्ध चालले. गोरे आणि काळे यांच्यातली रेषा अधिकच ठळक होत गेली. व्हाइट, ब्लॅक आणि ब्राउन यांच्यातला संघर्ष तीव्र होत गेला. "व्हाइट हाऊस'मध्ये ब्लॅक प्रेसिडेंट यायला २००९ उजाडले, पण तो सगळा संघर्ष खडतर होता. यादवी युद्ध संपल्यानंतर शंभर वर्षांनी तत्कालीन अध्यक्षांनी जे सर्वेक्षण केला, त्याचा अहवालाच असा होता- 'अमेरिका म्हणजे दोन समाज आहेत. एक गोरा आणि दुसरा कृष्णवर्णीय. दोन्ही समाज वेगळे आणि विषम. आणि, हेच या देशाचे प्राक्तन आहे.' २०२१ मध्ये ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत जो धुमाकूळ घातला, तेव्हा त्यांच्या खांद्यांवरचे झेंडे यादवी युद्धाचे ओझे वाहात होते.

ओबामांनी अमेरिकेची जी गोष्ट सांगितली, त्यापेक्षा ही गोष्ट वेगळी होती. याचीच चिंता ओबामांना होती. त्यांचं "द प्रॉमिस लॅंड' हे जे ताजं आत्मचरित्र आलं आहे, त्यात अगदी सुरूवातीला त्यांनी हा उल्लेख केला आहे. अध्यक्षपदानंतरचे दिवस अवघड होते, असे ओबामा म्हणतात. कारण, अमेरिकेच्या ज्या विकृत कल्पनेला आम्ही विरोध केला, ती कल्पना पुढे नेणारा अध्यक्ष अमेरिकेला मिळाला, याची सल ओबामा व्यक्त करतात.

सर्व घटकांना आवाज मिळाला की लोकशाहीतील ताण वाढतात. अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन, आशियाई-अमेरिकन असे सगळे घटक प्रभावी झाले. एक काळ होता की, अमेरिका ही 'लॅंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज' होती, पण तिथे तो खुलेपणा नव्हता. कालांतराने सर्व घटक बोलू लागले. त्यांना आवाज मिळाला. हा संघर्ष किती कठीण होता, यासाठी कमला हॅरिस यांचे आत्मचरित्र 'द ट्रूथ्स, वी होल्ड' वाचायला हवे. संपूर्ण व्यवस्था गोऱ्यांच्या हातात असताना, कृष्णवर्णीयांचा संघर्ष कठीण होता. मात्र, समतेच्या दिशेने पावले पडत होती. बराक ओबामांचे अध्यक्षपद हा त्याचाच पुरावा मानायला हवा. ओबामा हे कोणत्याही अर्थाने विद्रोही नेते नव्हते. समन्वय, सामंजस्य, सहिष्णुता आणि संवाद या आधारावर उभे राहिलेल्या ओबामांनी अमेरिकेचे हे दुभंगलपेण दूर करण्याचा प्रयत्न कसोशीने केला. त्यांनी अमेरिकेची खरी कल्पना जगाला सांगितली आणि खुद्द अमेरिकेलाही. जगावर राज्य करणारा देश म्हणजे अमेरिका नाही. गोरे आणि काळे असा दुभंग देश म्हणजे अमेरिका नाही, हे ओबामांनी अधोरेखित केले. साहित्य, कला, विज्ञान, तत्त्वज्ञान, क्रीडा अशा सर्वंकष पद्धतीने जगण्याला भिडणारा आणि अवघ्या जगाला संधींसाठी खुणावणारा देश ही अमेरिकेची ओळख ठळक करण्याचा प्रयत्न ओबामांनी केला. अमेरिका सावकाशपणे पण सातत्यशीलतेने बदलत होती. समतेच्या लढाईत काळे आणि गोरे दोघेही उतरत होते. मानवी हक्कांसाठीची लढाई सुरू झाली होती. मार्टिन ल्यूथर किंगने 'आय हॅव अ ड्रीम' म्हणावे आणि ओबामानी बॅटन हातात घेऊन "येस, वी कॅन' हे साधार सिद्ध करावे, अशी शोधयात्रा सुरू होती. नव्या अमेरिकेच्या दिशेने पावले पडत होती.

मात्र, ब्लॅक ओबामांनी "व्हाइट हाउस'मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रस्थापितांना असुरक्षित वाटू लागले. हा तोच काळ होता, जेव्हा जागतिकीकरणाचे दुसरे पर्व सुरू झाले होते. खुलेपणाचा अवकाश वापरून संकुचितपणाने ती जागा व्यापून टाकली होती. "ॲनस्थेशिया'प्रमाणे माध्यमांचे वर्तन होते आणि त्यांची पार्टनरशिप विखारी राजकारणाशी होती, धनदांडग्या-बेमुर्वतखोर उद्योजकांशी होती. त्यातून वेगळेच जग आकाराला येत होते. हे फक्त अमेरिकेत नव्हे, जगभर घडत होते. अमेरिकेची नेपथ्यरचनाच अशी होती की तिथे हे घडणे अगदीच स्वाभाविक होते.

ट्रम्प विजयी झाले, त्याची हीच कारणे होती. विजयी झाल्यानंतर ट्रम्प यांनी हा विभाजनवादी अजेंडा अंमलात आणायला सुरूवात केली. आणि, त्यासाठी त्यांच्या मदतीला होता तो मीडिया. त्यातही सोशल मीडिया. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचे 'स्टार कॅम्पेनर' होते मार्क झुकेरबर्ग. फेसबुकच्या या पक्षपातीपणाबद्दल त्यांच्यावर कमी टीका झाली नाही. पण, तरीही त्यांनी या वाह्यातपणाला आवर घातला नाही. उलटपक्षी ट्रम्प यांना बळ दिले. आता, ट्रम्प यांचे फेसबुक आणि ट्विटर अकाउंट्स बंद झाले खरे, पण हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सहा जानेवारीच्या हिंसाचारासाठी ट्रम्प जाहीरपणे चिथावणी देत असताना सोशल मीडियाचे सर्वेसर्वा काय करत होते? ट्रम्प यांच्या जगभरातल्या विविध आवृत्त्यांसोबत फेसबुक वा ट्विटरची पार्टनरशिप होती. आजही आहे. "वॉल स्ट्रीट जर्नल'ने फेसबुकच्या भारतातील हस्तक्षेपांबद्दलही "रिपोर्ट' प्रसिद्ध केला आणि "द रिअल फेस ऑफ फेसबुक इन इंडिया' हे पुस्तकही त्यासाठी पुरेसे आहे. मुळात, झुकेरबर्ग यांच्या मालकीचे फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सॲप आहे. एवढी साधने एकवटल्यावर झुकेरबर्गांची ताकद किती वाढते, ते वेगळे सांगायला नको. अमेरिकेत गेल्यावर याच झुकेरबर्गांना मोदी त्यांची जगप्रसिद्ध मिठी का मारतात, हे मार्क करायलाच हवे!

सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातला मीडिया यांनी विखारी संवादाचे मॉडेल तयार केले आहे. त्यातून ट्रोलिंग वाढते. विखारी अपप्रचार होतो. द्वेष निर्माण केला जातो. फेक न्यूज पेरल्या जातात. अमेरिकेत "ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर' हे आंदोलन आक्रमक झाले आणि दुसरीकडे प्रस्थापित कडवे झाले. ओबामांच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीमुळे ट्रम्प आले हे एका अर्थाने खरेच आणि ज्यो बायडन यांच्यासोबत कमला हॅरिस दिसल्याने प्रस्थापित आणखी चवताळले. आपली सगळी सत्ता आता "हे लोक'' घेऊ लागले आहेत, या समजातून येणारी असुरक्षितता फक्त अमेरिकेत असते, असे नाही. आपल्या सभोवतालीही दिसते. अमेरिकेत आजही सगळ्या संधी गोऱ्यांच्याच हाती एकवटल्या आहेत, हे सांगणारी आकडेवारी आहे. पण, आपल्या हातातील काहीच सोडायचे नाही, या भयगंडाने पछाडलेल्या समाजात न्यूनगंडाचे राजकारण केले जाते. "आपण विरुद्ध ते' असे नॅरेटिव्ह एकदा तयार झाले की असे राजकारण करणे सोपे जाते. ट्रम्प यांनी ते शिताफीने केले.

हिटलरचे "ग्लोबेल्सायझेशन' मग ग्लोबलायझेशन'ला पायदळी तुडवते आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली खोटारडेपणाचे विखारी महानाट्य रंगू लागते. (अर्णबायझेशन ही त्याची भारतीय आवृत्ती!) त्याचे खरे लाभार्थी झुकेरबर्ग आणि ट्रम्प यांच्यासारखे लोक असतात. आपण मात्र माध्यमांच्या लोकशाहीकरणाच्या वगैरे गप्पा मारत असतो. ट्रम्प पराभूत झालेच, पण जाता-जाता त्यांनी अमेरिकेलाही पराभूत केले! "कोरोना'च्या महामारीनंतर तर जग आणखी बदलत जाणार आहे. आणखी आभासी होत जाणार आहे.

कोणत्याही ट्रम्प वा झुकेरबर्गांसाठी यासारखी संधी असणार नाही.

अमेरिका नावाच्या "मेल्टिंग पॉट'ला जाणारे तडे तिथल्या निवडणुकीच्या आणि निकालाच्या निमित्ताने आपण पाहिले.. पण, सहा जानेवारीला तिथे जे घडले, त्यामुळे फक्त अमेरिकी लोकशाहीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेलेली नाहीत. तर, कोणत्या भयंकराच्या वेशीवर जग उभे आहे, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

sanjay.awate@dbcorp.in

(लेखक "दिव्य मराठी'चे राज्य संपादक आहेत)

बातम्या आणखी आहेत...