आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:तेजस्वी : मॅन ऑफ दि मॅच

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वच चाचण्यांतून राष्ट्रीय जनता दलाचे तरुण नेतृत्व तेजस्वी यादव धडाक्यात बाजी मारणार, असे निष्कर्ष होते. तसे झाले नाही, पण एक गोष्ट स्पष्ट झाली. एक केंद्रातले सत्ताधारी आणि दुसरे बिहारचे मुख्यमंत्री अशा अतिशय मुरब्बी, ताकदवान आणि साम-दाम-दंड-भेद या सगळ्याच बाबतीत सरस असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरुद्ध अननुभवी तरुण नेतृत्व तेजस्वी यादव असा हा रंगतदार सामना होता. जबरदस्त सत्ताधाऱ्यांना ज्या तडफेने तेजस्वींनी तोंड दिले, लोकांचे समर्थन मिळवले ते पाहता बिहार विधानसभा निवडणूक सामन्यातला ‘मॅन ऑफ दि मॅच’ म्हणजे तेजस्वी यादव हे निर्विवाद सिद्ध झाले. लालूप्रसाद यादव तुरुंगात असताना लालू का लालने अतिशय खंबीरपणे व हिकमतीने सत्ताधाऱ्यांविरुद्ध फळी उभी केली. काँग्रेस, डाव्यांना त्यांच्याबरोबर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. या सर्वांना बरोबर घेत अतिशय जोमदार टक्कर तेजस्वींनी दिली. या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारच्या राजकीय आखाड्यात तेजस्वींच्या रूपाने एक तरुण नेतृत्व लोकांसमोर आले. बिहारमधल्या तरुणांनीही त्याला चांगली साथ दिली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राष्ट्रीय जनता दलाची आघाडी यांच्या मतांच्या टक्केवारींमध्ये फारसा फरक नाही. दोघांनाही जवळपास समान मते मिळाली. पाशवी बहुमताच्या जोरावर कोणी बिहारवर राज्य करेल, अशी स्थिती राहिली नाही. हे एक वेगळेच वैशिष्ट्य यंदा दिसले. अतिशय समजून व जागरुकतेने लोकांनी मतदान केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट यंदा घडली. आघाडीत सर्वात मोठ्या भावाचा मान भाजपला मिळाला. आजवर असे कधी झाले नव्हते. स्वत:ची ताकद ज्या राज्यात नाही तेथे स्थानिक पक्षाला, नेत्यांना धरून राजकारण करायचे. निवडणुका लढवायच्या. पुढे वेळ आणि संधी मिळाली, की त्यांच्याच डोक्यावर उभे राहायचे, ही भाजपची महाराष्ट्रासारखी चाल बिहारमध्ये यशस्वी झाली. चिराग पासवान यांना फारसे समर्थन मिळाले नाही. पण नितीशकुमारना अडचणीत आणण्याची कामगिरी त्यांनी केली. कम्युनिस्ट पक्षांना मिळालेले समर्थन हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अशा अनेक अंगांनी बिहारची निवडणूक ही भाजप विरोधकांसाठी भविष्याच्या दृष्टीने दिशादर्शक आहे.

बातम्या आणखी आहेत...