आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:शिक्षणाचा बदलता चेहरा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतानाच या परीक्षेचे महत्त्व कमी करणारे नवे शिक्षण धोरण केंद्र सरकारने जाहीर केलेे. त्या माध्यमातून देशातील शिक्षण व्यवस्थेत करण्यात आलेला बदल इतका आमूलाग्र आहे की, संबंधित मंत्रालयाचे नावही बदलण्यात आले आहे. मंत्रालयाच्या नावात शिक्षण हा शब्द आणल्यामुळे आता ते शिक्षणावर लक्ष केंिद्रत करू शकेल, असे धोरणकर्त्यांना वाटते आहे. जुने नाव असतानाच या मंत्रालयाने संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलणारे हे नवे शैक्षणिक धोरण तयार केले आहे, हे विशेष. आपली शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनवते, ही आतापर्यंतची ओरड राहिली आहे. पदवी मिळवणारा तरुणही रोजगारक्षम होत नाही, हा अनुभव तर सातत्याने येत राहतो. त्या पार्श्वभूमीवर नव्या धोरणाकडे पाहिले तर अशी ओरड करणाऱ्यांना नक्कीच आनंद होईल. कारण सहावीनंतरच्या शालेय शिक्षणातच व्यावसायिक कौशल्य विकसित करणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय स्तरावर होणारी परीक्षा केवळ पाठांतराची राहू नये, ती विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि क्षमतांची चाचणी असावी, ही अपेक्षाही नव्या धोरणात पूर्ण करण्यात आली आहे. तसा बदल परीक्षा मंडळांना त्यांच्या परीक्षा आणि मूल्यांकन पद्धतीत करावा लागणार आहे. १०+२+३ हा शिक्षण आराखडा बदलून तो आता ५+३+३+४ असा करण्यात आल्यामुळे परिस्थितीनुसार इयत्ता पाचवी किंवा आठवीच्या स्तरावर शिक्षण सोडणाऱ्यांचीही काही एक पात्रता मोजली जाईल. दर्जेदार विद्यापीठांच्या नावाने जगभरातल्या विद्यापीठांना त्यांच्या शाखा भारतात सुरू करायला पायघड्याही हे धोरण घालते आहे. भारतातील विद्यापीठांचा दर्जा वाढावा, यासाठी मात्र पाऊल उचलल्याचे निदान मंत्री प्रकाश जावडेकरांच्या बोलण्यात तरी आले नाही. खासगी आणि सरकारी शाळेतील शिकवण्याचा दर्जा सारखा राहावा, यासाठी तरतूद करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी शिक्षकांकरिता राष्ट्रीय प्रमाणीकरण व्यवस्था करण्यात येणार आहे. ती होईल आणि सरकारी मानसिकतेचे शिक्षक स्वत:मध्ये बदल करून, प्रमाणित होऊन येईपर्यंत किती वर्षे जातील, हे सांगता येत नाही. शेवटी ३४ वर्षांनंतर शिक्षण व्यवस्थेत झालेले बदल आकार घ्यायला वेळ तर लागेलच. तोपर्यंत वाट पाहूया.