आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:घुसखोरीचा विध्वंसक विषाणू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असे आपण नेहमी म्हणतो. ते खरेही आहे. मात्र, तंत्रज्ञानाने आता एवढी प्रगती केली आहे की, कवी कल्पनाही करु शकणार नाही, असे प्रकार त्यातून घडत आहेत. तंत्रज्ञान जसे वरदान आहे, तसेच ते शापही आहे, याचे प्रत्यंतर नुकतेच आले. जगातील दिग्गज मंडळींच्या सोशल मीडियाच्या खात्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली. दिग्गजांच्या खात्यात एकाच वेळी अशी घुसखोरी होण्याचे प्रकार अमेरिकेत प्रथमच घडले. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, अॅमेझॉनचे जेफ बेजोस, माजी अध्यक्ष बराक ओबामा, टेस्लाचे अॅलन मस्क, वॉरेन बफे, माजी उपाध्यक्ष जो बेडेन, सेलिब्रिटी किम कार्दशियन, उद्योगपती माइक ब्लूमबर्ग, गायक कान्ये वेस्ट यांची टि्वटर खाती हॅक करण्यात आली. त्यातून हॅकर्सनी क्रिप्टो करन्सीची मागणी केली. खास इंटरनेटवर चालणारे चलन म्हणजे क्रिप्टो करन्सी. त्यात बिटकॉइन हे सर्वात नेटप्रिय चलन. बिटकॉइन हे फक्त ऑनलाइन चालते. या चलनाला दशकभराचा इतिहास आहे. सुरूवातीला बिटकॉइन हे ऑनलाइन घोटाळे, चोरी व स्कॅमसाठी मोठ्या प्रमाणात वापरले गेले. त्यामुळे गुंतवणूकदार त्यापासून दूर गेले. गेल्या दोन वर्षात शेअर बाजारात बिटकॉइनने चांगले रिटर्न देण्यास सुरूवात केली आहे. एका अहवालानुसार, जुलै २०१० पासून आतापर्यंत बिटकॉइनने ९० लाख टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. मागील वर्षी ९७ टक्के रिटर्न दिले. त्यामुळे याचे ऑनलाइन मूल्य वाढले आहे. तेच हेरून हॅकर्सनी या दिग्ग्जांच्या खात्यात घुसखोरी करत बिटकॉइनचे आमीष दाखवण्याची खेळी खेळली. अर्ध्या तासात जर तुम्ही १००० डॉलर मूल्याचे बिटकॉइन पाठवले, तर आम्ही दुप्पट बिटकॉइन पाठवू, असे मेसेज या खात्यांतून गेले. फॉलोअर्स या जाळ्यात अडकले आणि सुमारे ८७ लाख रुपये मूल्याचे बिटकॉइन त्या खात्यात पाठवण्यात आले. यापूर्वीही टि्वटरच्या सीईओंचेच खाते हॅक करत हॅकर्सनी हातचलाखी दाखवली होती. तांत्रिक घुसखोरीतून आर्थिक दहशतवाद पसरवणारा हा विषाणू अधिक विध्वंसक आहे. तंत्रज्ञानामध्ये जगात दादा असल्याचे मिरवणाऱ्या अमेरिकेला यातून योग्य धडा घेत तो आणखी फोफावणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.