आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:‘न्याया’चा आसूड

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऱ्या विश्वाला दया, करुणा, प्रेम आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा जगभरात साजरा झाला. त्याने दाखवलेल्या वाटेवर चालण्यासाठी आत्मिक बळ मिळावे, अशी प्रार्थनाही आपण केली. परंतु, येशूच्या जन्मापासून सुरू झालेल्या कालगणनेची तब्बल २०२० वर्षे संपत आली, तरी त्याच्या शिकवणीला मात्र अजूनही मनोमन अंगीकारलं नाही, त्याच्या संदेशाला अस्तित्वाचा मंत्र बनवलं नाही. माणूस म्हणून प्राणिमात्रांवर, अवघ्या जगावर अधिराज्य गाजवलं, पण ‘माणूस’ झालो नाही. तसे झाले असते, तर जगात दु:ख, दैन्य, द्वेष आणि हीनता उरली नसती. त्यांची जागा सुख, समृद्धी, प्रेम आणि समतेने घेतली असती. आपल्या भवतालातील सगळ्या दु:खाचं मूळ विषमतेत आहे आणि आपण मात्र तीच शतकानुशतके जोपासत आलो. वर्ण, वर्ग, वंशद्वेषाची, उच्च-नीचत्वाच्या कुप्रथेची जोखडं वागवत राहिलो. परवा मद्रास उच्च न्यायालयाने दीन-दलितांना, वनवासी- आदिवासींना दिल्या जाणाऱ्या हीन वागणुकीवर कोरडे ओढले. आजही या बांधवांना सन्मानाने वागवले जात नाही, त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत, यासाठी आपली मान शरमेने खाली गेली पाहिजे, अशा शब्दांत फटकारले. तामिळना़डूच्या मेलूर तालुक्यातील मुरुथूरमध्ये राहणाऱ्या एका दलित कुटुंबाबाबत हा प्रकार घडला. रस्ता नसल्याने त्यांना नातलगाच्या अंत्यविधीसाठी एका शेतातून जावे लागले. त्यामुळे या कुटुंबावर परिसरातील लोकांचा रोष ओढवला. या भयग्रस्त कुटुंबाची आपबीती वृत्तपत्रांत वाचल्यानंतर न्यायालयाने त्या बातमीलाच जनहित याचिका मानून सुनावणी सुरू केली आणि राज्याच्या मुख्य सचिवांसह संबंधित विभागांच्या सचिवांना प्रतिवादी केले. राज्यात अनुसूचित जातीच्या वस्त्या किती? तेथे स्वच्छ पाणी, शौचालये, रस्ते, पथदिवे या सुविधा आहेत का? आणि नसतील तर कधीपर्यंत मिळतील, अशी विचारणा न्यायालयाने त्यांच्याकडे केली आहे. डोळे उघडे असलेले आपण सारे जे दिसत असूनही नाकारत आलो, ते विषमतेचे दाहक वास्तव डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेने दाखवले आहे. आपल्या मन, मेंदू आणि मनगटावर स्वार झालेल्या वर्णव्यवस्थेने एका वर्गातील माणसांचे ‘माणूस’पण अमान्य करत त्यांच्यावर इतकी वर्षे शब्दश: जे कोरडे ओढले, आसूडाचे फटके दिले, त्याचा हा ‘न्याय’ मानायला हवा.

बातम्या आणखी आहेत...