आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:वादळ घोंघावते आहे

दिव्य मराठी2 वर्षांपूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कमनशिबी दिसते. राष्ट्रवादीत झालेली फूट, उद्धव यांच्या आमदारकीचा प्रश्न, राजभवनाची खप्पामर्जी, केंद्राकडे अडकेले पैसे, राज्याचे घटलेले उत्पन्न, कोरोनाचे संकट, मजुरांचे पलायन आणि आता चक्रीवादळचा तडाखा… हे सरकार सत्तेत आल्यापासून अशा अनेक आव्हानांना तोंड देते आहे. चक्रीवादळाने दिशा बदलली अन् मुंबई वाचली. पण, त्याचा राज्याच्या १४ जिल्ह्यांना तडाखा बसला. त्यात रायगडची मोठी हानी झाली आहे. मुंबईत १२९ वर्षापूर्वी असे वादळ धडकले हाेते. त्यामुळे ‘निसर्ग’ला तोंड देण्यास मुंबईकरांकडे कोणतेही नियोजन नव्हते. अननुभवी मुख्यमंत्री असा उद्धव यांच्यावर शिक्का आहे. मात्र, ते ज्या पद्धतीने संकटांना तोंड देत आहेत, त्याची इतिहास नक्कीच दखल घेईल. वादळाच्या दुसऱ्या दिवशी रायगडात जावून शंभर कोटीची घोषणा करणे आणि मोबाईलचे फोटो नुकसानीच्या पंचनाम्यात ग्राह्य धरण्याच्या त्यांच्या सूचना कौतुकास पात्र आहेत. वादळाच्या तडाख्यात लाख वृक्ष पडले आहेत. शेतीची, बागांची अतोनात हानी झाली आहे. विजेचे खांब कोसळल्याने शेकडो गावे अंधारात आहेत. मोबाईल टाॅवर बंद असल्याने कोणाचा कोणाशी संपर्क नाही. रुग्णवाहिका पोचण्यात अडचणी आहेत. ६३ हजार नागरिकांनी राहती घरे सोडली आहेत. इतकी हानी होऊनही रायगडची आदळाआपट नाही की काही मागणे नाही. तिकडे मावळातील शेतकऱ्यांचे असेच नुकसान झाले आहे. सलग दोन शेतकरी कर्जमाफी, जीएसटी, लाॅकडाऊन अन् कोरोनाचे उपचार यामुळे राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. केंद्र आहे ते पैसे देत नाही आणि दुसरीकडे राज्याचे उत्पन्नाचे स्त्रोत ठप्प आहेत. त्यात हे आघाडीचे सरकार. सर्वांचा एक समान कार्यक्रम असला, तरी प्रत्येकाचा स्वतःचा असा छुपा अजेंडा आहेच. त्यामुळे उद्धव सरकारची वाट बिकट आहे. कोरोनाचा संसर्ग, चक्रीवादळ शमेल, पण आर्थिक अरिष्टाचे काय ? राज्यासमोरील आर्थिक संकटावर उपाययोजना सुचवण्यासाठी सरकारने मध्यंतरी माजी अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. तिने अहवाल सुपूर्द केला. पण, इगो दुखावलेल्या विद्यमान बाबूंनी तो दाबून ठेवला. एकूणच आर्थिक वादळाला ताेंड देण्यासाठी सरकारकडे ठोस नियोजन नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. म्हणून ‘निसर्ग’ शमले असले, तरी आर्थिक अरिष्टाचे वादळ घोंघावते आहे. त्याच्याशी उद्धव ठाकरे यांचे सरकार कसे दोन हात करते, यावरच महाराष्ट्राची पुढची वाटचाल अवलंबून असेल.

बातम्या आणखी आहेत...