आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opinion
  • Vijay Buva Article : The Story Of Eknath Khadse's Defection Was Written In Delhi!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बात पते की...:खडसेंच्या पक्षांतराचे कथानक दिल्लीतच लिहिले गेले!

विजय बुवा | फीचर एडिटर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले! भाजपशी असलेली ४० वर्षांपासूनची नाळ त्यांनी तोडून टाकली आहे. नाथाभाऊंनी पक्षात प्रवेश करताना काहीही मागितलं नाही, असं पवारांनीच स्पष्ट केल्याने राष्ट्रवादीतील अनेकांचा जीव तर भांड्यात पडला असेलच, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि तो स्वाभाविकही आहे. कारण खडसेंनी पक्षात राहावे, अशी शीर्ष नेतृत्वाचीच इच्छा नसल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रदेश स्तरावरील नेत्यांनाही त्यांच्यापासून ‘दोन हात अंतर’ ठेवायला सुरुवात केली होती. नाथाभाऊंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यावर तर त्यांच्या जाण्याने पक्षाचे नुकसान होईल, विरोधी पक्ष प्रबळ होईल, अशी काळजी वाटण्यापेक्षा अनेक जण रिलॅक्स दिसत होते. प्रवेश सोहळ्यात नाथाभाऊ जेव्हा म्हणाले, की आज डोक्यावरचं ओझं गेल्यासारखं वाटतंय.. तेव्हा भाजपच्या प्रदेश कार्यालयातील टीव्हीवर हा सोहळा लाइव्ह पाहणाऱ्या निदान काहींच्या मनात तरी, ‘आम्हालाही तसंच वाटतंय..’ असं नक्कीच आलं असेल...

खडसेंच्या जाण्याने राष्ट्रवादीला फारसा फायदा होणार नाही, याविषयी ते निश्चिंत असावेत. खडसेंच्या राष्ट्रवादीतील ‘प्रवेशा’चे भाजपने लिहिलेले पूर्वसूत्रही त्यांना माहीत असावे. कारण त्याबाबतचे सूचक विधान नाथाभाऊंनीच जाता जाता (राष्ट्रवादीत येता येता) केले. ते म्हणाले, की मला दिल्लीतील आमच्या (भाजपच्या) ज्येष्ठ नेत्यानीच सांगितलं, की तुम्हाला आता पक्षात संधी नाही. त्यामुळं तुम्ही दुसऱ्या पक्षात जा. त्यांना कुठं जाऊ, असं विचारल्यावर त्यांनी ‘राष्ट्रवादीत जा,’ असं सुचवलं. ही बाब आपण पवारसाहेबांच्याही कानावर घातल्याचे सांगत खडसेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही क्षणभर घाम आणला. कारण भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेच आपल्याला राष्ट्रवादीचा पर्याय सुचवल्याचे सांगणारे खडसे, ‘वरच्या फिक्सिंग’चा आपल्याला अंदाज असल्याचेच सूचित करत होते...

राष्ट्रवादीमुळे खडसेंना काय फायदा होणार आणि खडसेंचा राष्ट्रवादीला किती उपयोग होणार, याची उत्तरे येणारा काळ देईल. पण, किमान आज तरी याच प्रश्नाचा अन्वयार्थ लावावा लागेल, की खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे कथानक आधीच तयार होते का? तसे असेल तर ते कुणी लिहिले होते? आणि जर ते दिल्लीतून लिहिले गेले असेल, तर त्यामागे दोन पक्षांच्या शीर्ष नेतृत्वांचे ‘परस्पर सामंजस्य’ तर नाही ना? कारण राजकारणात कुणीच कुठली गोष्ट विनाकारण करत नाही. खडसेंच्या या पक्षबदलामागे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात परस्परांवर कुरघोडी केल्याचा, मात दिल्याचा आविर्भाव, राजकीय ईर्ष्या, शह-काटशह यांपेक्षाही गूढ आनंदाची भावना दाटल्याचे दिसते आहे. भाजपमध्ये काही गमावल्याचा भाव नाही अन् राष्ट्रवादीत युद्ध जिंकल्याचा आव नाही. ४० वर्षे पक्ष मोठा करणारा नेते गेला म्हणून इकडे शोकाचे वातावरण नाही की एवढा मोठा नेता छावणीत आला म्हणून तिकडे दिवाळी साजरी होत नाही. ‘आम्ही तुमचं काम करतो, तुम्ही आमचं करा..’ असा प्रचलित राजकारणातील अलिखित सामंजस्य करार खडसे प्रकरणात झाला गेला नसेल, तर भविष्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांवर तुटून पडताना दिसतील. पण, तो झाला असेल, तर राष्ट्रवादीला त्याचा नक्की ‘लाभ’ होईल, खडसे काही वतनांचे धनी होतील आणि भाजपची मात्र पाचही बोटे तुपात असतील. आणि सध्या तरी दोन्हीकडील गूढ स्मितांच्या भाषांतरातून ही दुसरी शक्यताच अधोरेखित होतेय...

नाथाभाऊंनी पक्ष सोडताना फडणवीसांवर हल्ला चढवला. अर्थात हे अपेक्षित होतेच. त्यामुळेच तर फडणवीस म्हणाले, की अशावेळी कुणीतरी ‘व्हिलन’ लागतो, आज त्यांनी तो मला केले आहे. भाजपच्या सत्ताकाळात खडसेंच्या बाबतीत ज्या गोष्टी झाल्या, त्याबद्दल त्यांनी फडणवीसांना जबाबदार धरणे स्वाभाविक होते. पण, त्यापेक्षाही फडणवीसांवरच खापर फोडणे त्यांच्यासाठी जास्त सोयीचेही होते. ‘नाथाभाऊ अर्धसत्य सांगताहेत,’ असे सांगणारे फडणवीस योग्य वेळी आपण त्यावर बोलू म्हणत असले, तरी जेव्हा केव्हा जे सांगतील ते ‘पूर्णसत्य’ असेलच असे नाही. माझं काय चुकलं ते सांगा, असं आपण भाजप नेत्यांना वारंवार विचारल्याचं खडसे कितीही सांगत असले, तरी आपण पक्षात का राहू शकत नाही, याचे खरे उत्तर त्यांना माहीत नसेलच, असे नाही. फडणवीस म्हणाले त्या ‘अर्धसत्या’तील हा भाग नसेलही, पण तो कदाचित दोघांच्याही ‘पूर्णसत्य’ कथनात कधी येणार नाही, हेही तितकेच ‘सत्य’ आहे! किंबहुना खडसे आणि फडणवीसांनी यापुढे किती भांडावे, एकमेकांची किती उणीदुणी काढावी, एकमेकांना किती टार्गेट करावे, हे त्यांच्याही हातात कितपत असेल, याबाबतही शंका आहे...

राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे. तो खेळणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांचे ‘आंतर’संबंध चांगले असतील, तर ते हरवण्यापेक्षा एकमेकांना सोयीच्या चाली खेळण्याला प्राधान्य देतात. अशावेळी पटावरचा एखादा मोहरा दोघांसाठीही सोयीचा ठरू शकतो. सामान्यांना वरकरणी हा खेळ समजत नसल्याने त्यातील चालीही कळत नाहीत. ते आपल्या आवडीच्या खेळाडूचे गोडवे गात राहतात.. त्यांना प्रोत्साहनाचे नारे देत राहतात.. दोन्ही खेळाडू एकमेकांकडे पाहून हलकं स्मितहास्य करतात.. होय.. अगदी ‘तेच’ गूढ स्मित..!

बातम्या आणखी आहेत...