आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:एकदाचे करून टाका "बेटिंग' अधिकृत...!

विनायक दळवीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोढा समिती, विधी आयोग, खासदार शशी थरूर आणि केंद्रिय वित्त मंत्री अनुराग ठाकूर... एकापाठोपाठ एक अशा या सगळ्यांनी क्रिकेट बेटिंगला अधिकृत करण्याची मागणी केली आहे. जगभरात अनेक खेळांसाठी बेटिंग अधिकृत आहे, भारतात अद्याप त्यावर बंदी असली तरी ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या स्वरूपात बेटिंग अगदी राजरोसपणे सुरू आहे, त्यात कोट्यवधींची अनधिकृत उलाढाल होत आहे. कायद्याने त्यावर बंदी आणणे अगदीच अशक्य असल्याने बेटिंगलाच कायद्याच्या कक्षेत आणणे आणि सरकारला महसूल मिळवून देणे हाच यावरचा उपाय दिसतो आहे.

२०१६ साली क्रिकेटमधील सट्टेबाजीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीने आपल्या अहवालात क्रिकेटमधील सट्टेबाजी अधिकृत करा, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयालकडे केली होती. त्यानंतर पुढे २०१८ साली क्रिकेटसह अन्य खेळांमध्ये सट्टेबाजी आणि जुगारास कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस विधी आयोगाने केली. सट्टेबाजी अधिकृत करून त्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांच्या कक्षेत आणावे, असेही विधी आयोगाने म्हटले. क्रिकेट तसेच अन्य खेळांवरील सट्टेबाजी आणि जुगार पूर्णपणे रोखणे ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळेच त्याला कायद्याच्या कक्षेत आणणे हाच एकमेव पर्याय उरतो, असे विधी आयोगाने आपल्या २७६व्या अहवालात स्पष्टपणे म्हटले होते. पुढे काही महिन्यांपूर्वी कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पोर्ट्स बेटिंग अर्थात सट्टेबाजीला अधिकृत मान्यता देण्याचा सल्ला दिला. यात अंडरवर्ल्डचा पैसा लागतो, सट्टेबाजीवर सध्या माफिया लोकांचे नियंत्रण आहे. तेच लोक पैसा लावतात, मॅच फिक्स करतात. जर सट्टेबाजी कायदेशीर केली तर त्यामुळे सरकारचे उत्पन्न वाढू शकेल याबाबत जनतेला शिक्षित करण्याची गरज असल्याचे त्यांचे शशी थरूर यांचे म्हणणे होते. आणि आता अगदी गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि हिमाचल क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी अशाचप्रकारच्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली. ते म्हणाले की, मॅचफिक्सिंगची जी समस्या आहे त्याचाही ट्रेण्ड पाहिला तर सट्टेबाजीमधूनही याची माहिती मिळते की, मॅच फिक्सिंग कुठे होत तर नाही ना. फिक्सिंग रोखण्यासाठी सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळणं हा योग्य उपाय ठरु शकतो. आपल्याला याच्या शक्यतांवरही विचार करावा लागेल. सट्टेबाजी ही व्यवस्थित पद्धतीने होते. या यंत्रणेची मदत फिक्सिंगमध्ये सामील लोकांवर नजर ठेवण्यात होऊ शकते.

एकंदरीतच सट्टेबाजी (बेटिंग) अधिकृत करण्याची मागणी जोर पकडत आहे. मात्र भारतात सट्‌टेबाजीवर निर्बंध आहेत असे सांगूनही खरे वाटणार नाही. कागदावर क्रिकेट किंवा अन्य खेळांची सट्‌टेबाजी अधिकृत नाही पण ऑनलाईन बेटिंगला कुणीही रोखू शकत नाही. किमान भारताचे सध्याचे कायदे तरी तसे दर्शवित आहेत. अलिकडेच इंडियन सुपरलिगमधील मोहन बगान आणि मुंबई या दोन संघांना चक्क बेटिंग कंपन्यांनी पुरस्कृत केले आहे. फिलिपाईन्सची “दाफा न्यूज” ही त्यांच्या देशातील सर्वात मोठ्या बेटिंग कंपनीशी “दाफा बेट”शी थेट संबंधित आहे. मोहन बगानला पुरस्कृत करणाऱ्या “एस बो टॉप बेट”ने तर क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांमधील बेटिंगची संधीच निर्माण केली आहे.

हे झाले फुटबॉलचे... क्रिकेटमध्ये तर सध्या बेटिंग संकेत स्थळांचा महापूर आला आहे. अनेक सटोडियांनी स्वत:च्याच बेटिंग साईटस् सुरू केल्या आहेत. काही बुकीज-सट्‌टेबाजांनी त्यापुढे जात अनेक ट्वेन्टी-२० लिगमध्ये संघच विकत घेतले आहेत. स्वत:चे नाव पुढे न करता वेगळा चेहरा घेऊन त्यांचे हे काळे धंदे राजरोसपणे सुरू आहेत. एवढेच कशाला, भारताची प्रमुख क्रिकेट लिग असलेल्या आयपीएलचे टायटल पुरस्कर्ते आहेत “ड्रिम इलेव्हन”, जे बेटिंगचा पुरस्कार करतात.

भारतातील या संदर्भातील कायदे फारच तोकडे, अपुरे आहेत. भारतातील जनतेमार्फत होणाऱ्या या अवैध सट्‌टेबाजीला कुणीच रोखू शकत नाही, हे विदारक सत्य आहे. भारतातील हे ऑनलाईन बेटिंग मार्केट जगातील काही देशांच्या आर्थिक बजेटपेक्षा मोठे आहे. सुमारे ७५ हजार अब्ज डॉलर्सच्या घरात ही रक्कम जाईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे आणि या ऑनलाईन बेटिंगसाठी भारतातील इंटरनेट सुविधांचा वापर तब्बल ४० कोटी पेक्षा अधिक लोक करतात हेही विदारक सत्य आहे. सरकार हतबल आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून अनुराग ठाकूर यांचा प्रयत्न केविलवाणा आहे. प्रत्यक्षात सरकार किंवा अन्य संबंधित यापैकी कुणालाही बेटिंग किंवा सट्‌टेबाजी भारतात अधिकृत करायची नाही. त्यामुळे अनेकांचे स्वत:चे आर्थिक नुकसान होणार आहे. म्हणूनच कायदा अस्तित्वात नसल्याचे निमित्त करून सारेजण मोकाट सुटले आहेत. या पळवाटाही याच संबंधितांनी सट्‌टेबाजांना दिल्या आहेत. त्यामुळे बेटिंग घेणारे आणि पैसा लावणारे या दोघांनाही सुरक्षा कवच आपोआप मिळाले आहे.

“गेम ऑफ स्कील” आणि “गेम ऑफ चान्स” या भारताच्या दोन कायद्यातील पळवाटांनी बेटिंगचा हा राजमार्ग खुला झाला आहे. “गेम ऑफ स्कील”ला भारतात कायद्याने मान्यता आहे. त्यामुळेच “फॅन्टसी स्पोर्टस्” बेटिंग कायद्यात बसते. याच फॅन्टसी स्पोर्टस््मध्ये तुमचा प्रतिस्पर्धी देखील मनुष्य असतो. त्यामुळे सध्या कुणा तरी खेळाडू किंवा क्रिकेटपटूला हाताशी धरून या फॅन्टसी स्पोर्टस् बेटिंगचा सुळसुळाट झाला आहे. कारण तुम्ही मनुष्याशी, त्याच्या बुद्धीशी स्पर्धा करता व त्यावर आपले बुद्धिकौशल्य वापरत असता. त्यासाठी देण्यात येणारी बक्षीसे देखील वस्तूंच्या स्वरूपात देण्याची चलाखीही काहींनी केली आहे. आयपीएल टायटल स्पॉन्सर “ड्रिम इलेव्हन” जाहिरात कशी करते पाहा, “दिमाग से धोनी.” गांगुली काय म्हणतो, तुम्हाला क्रिकेट अधिक कळते तर मला हरवून दाखवा. याशिवाय पारंपारिक सटोडियांच्या मार्फत, बुकी-पंटर्स यांच्यामार्फत चालणारे, पारंपरिक बेटिंगचे जाळे प्रचंड आहे. भारतातील १३० कोटी जनता आणि या संख्येच्या किमान पावपट संख्येत असलेले जगभरातील विविध देशातील भारतीय आणि आशियाई देशांचे नागरिक यांनी या पारंपरिक बेटिंगचा पाया महाकाय बनविला आहे.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या आघाडीच्या प्रगत देशात बेटिंग अधिकृत आहे. त्यांनी जाहीर केलेले फुटबॉल बेटिंगचे आकडेही डोळे चक्रावणारे आहेत. ‘फिफा’ने २०१८च्या विश्वचषकात १३६ अब्ज डॉलर्सची उलाढाल बेटिंगमध्ये झाल्याचे म्हटले आहे. भारतात क्रिकेट खेळावरील बेटिंगचे प्रमाण ८० टक्के आहे. इतर खेळ (टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल आदी) उर्वरित २० टक्क्यांमध्ये येतात. जगातील अधिकृत व अनधिकृत बेटिंगमध्ये अनधिकृत बेटिंगची टक्केवारी तीन चर्थुथांश इतकी आहे. याचाच अर्थ अनधिकृत बेटिंगमुळे अनेक देशांचे आर्थिक उत्पन्न बुजले आहे. याचाच दुसरा अर्थ असा की “अंडरगाऊंड बेटिंग मार्केट” अतिविशाल आहे. भारत हा त्या महाकाय अवैध उद्योगाचा पाया आहे. किमान क्रिकेट या खेळाच्या अवैध सट्‌टेबाजीबाबत तरी हे बोलता येईल. भारतात अधिकृत सट्‌टेबाजीतील नफ्यावर सरसकट ३० टक्के कर सध्या आकारला जातो. मात्र अधिकृत बेटिंगचा हा अंकुश फक्त घोड्यांच्या शर्यती व कॅसिनोवरच आहे. त्यामुळे क्रिकेटवर सट्‌टा लावणाऱ्यांकडून कर घेतला गेला तर ती रक्कम प्रचंड असेल. ज्याचा वापर अन्य देशांप्रमाणे समाजोपयोगी योजनांकरीता करता येऊ शकेल. अनधिकृत आकडा सांगतो की क्रिकेट व अन्य खेळातील सट्‌टा खेळणाऱ्यांची संख्या ६० कोटीच्यावर पोहोचली आहे. ऑनलाईन बेटिंगबाबत आपल्या येथे कायदा बनला नाही. भारताबाहेरच्या अनेक कंपन्यांनी बाहेर राहूनच भारताच्या जुगारी लोकांवर सट्‌टेबाजीचे जाळे टाकले आहे. आपला कायदाही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाहीत. त्यामुळेच सरकारला बेटिंग अधिकृत करून त्यायोगे मिळणारा महसूल गोळा करावा असे वाटणे साहजिकच आहे. प्रत्येक लिग, स्पर्धा, मालिकांमधील सतत चर्चेत येणारे सट्‌टेबाजीचे आकडे जर पाहिले तर सरकारला सट्‌टेबाजीपासून मिळणारा महसूल कित्येक हजार कोटींच्या घरात असेल. कदाचित तो महसूलाचा आकडा सरकारच्या काही अधिकृत महसूलाच्या मिळकतीच्या आकड्यांपेक्षा प्रचंड असेल. अनुराग ठाकूर यांना मिळणाऱ्या त्या महसूलापेक्षाही, त्या योगे सट्‌टेबाजीच्या व्यवसायावर सरकारला नियंत्रण मिळविता येईल ही गोष्ट अधिक महत्त्वाची वाटते.

कबड्‌डीपासून, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धांपर्यंत आणि क्रिकेटपासून, बॅडमिंटन, टेबलटेनिस आदी खेळांपर्यंत सट्‌टेबाजीशी संबंधित पुरस्कर्ते दिसू लागले आहेत. टेलिव्हिजनवर दिसणारी प्रत्येक थेट प्रक्षेपण असणारी स्पर्धा बेटिंग उद्योगधंद्याचे आकर्षण बनले आहे. एवढेच नव्हे तर काही देशांच्या खेळांच्या लिग स्पर्धा तर चक्क “ट्यूब चॅनल्स”वर थेट (लाईव्ह) दिसायला लागल्या आहेत. त्यापाठी त्या त्या खेळाचे प्रेम हा हेतू निश्चितच नाही. सट्‌टेबाजीसाठीचे ते एक अमिष आहे. भारताबाहेरून, ऑनलाईन सट्‌टेबाजीच्या आशा अनेक कंपन्या, वेबसाईट (संकेतस्थळे) चालवित आहेत. ऑनलाईन बेटिंगसाठी तुम्हाला अधिकृत अकाऊंट उघडून दिले जात आहे. तुम्ही त्यांच्या यादीतील कोणत्याही कंपनीसोबत तुमची बेट लावू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा युझर आय-डी आणि पासवर्ड दिला जातो. तुमच्या खात्यात जमा असलेल्या रक्कमेइतका सट्‌टा तुम्ही खेळू शकता. प्रत्येक वेबसाईटवर अनेक खेळांवर सट्‌टा लावता येतो. प्रत्येक खेळाच्या जगातील सर्व स्पर्धा, लिग, मालिका यांची यादी दिलेली असते. त्यापैकी तुम्हाला जेथे बेट लावायची तेथे क्लीक केले की तुम्ही थेट त्या साईटवरच पोहोचता. क्रिकेटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास टॉस पासून निकालापर्यंत आणि ‘टाय’पासून गोलंदाजीच्या व फलंदाजाच्या संभाव्य कामगिरीवर बेट लावता येते. म्हणजे आता क्रिकेटची सट्‌टेबाजी ही केवळ निकालापुरतीच मर्यादित राहीलेली नाही.

अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की, एवढा सरळसोपा कारभार असताना सरकार अधिकृत दर्जा का देत नाही? इथेच तर खरी ग्यानबाची मेख आहे. क्रिकेट सट्‌टेबाजीच्या या मेनूतील प्रत्येक ‘बेट’च्या व्यवहाराचा समतोल साधण्याचा त्या त्या कंपन्या प्रयत्न करीत असतात. जेव्हा त्यांच्या उत्पन्नाचा समतोल बिघडतोय असे त्यांना वाटू लागते, तेव्हा काही चमत्कारीक गोष्टी घडायला लागतात. अशा प्रवृत्तींना सट्‌टेबाजी अधिकृत केल्यानंतर आवर घालता येणे सरकारला शक्य आहे का? सध्याचा या कंपन्यांचा व्यवहार हा करमुक्तच म्हणावा लागेल. जेव्हा त्यांना अधिकृत करून सट्‌टा घ्यायची परवानगी दिली जाईल, त्यावेळी सरकारला भरावयाचा महसूल कर, ‘टॅक्स’ भरण्यासाठी याच कंपन्या उत्सुक नसतील. अशावेळी सरकार काय करणार हा यक्षप्रश्न आहे.

सध्याही भारतात कॅसिनो, गेमिंग, घोड्यांच्या शर्यती यासाठी काही राज्यांमध्ये कायदे आहेत. त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. फक्त देशांतर्गत सट्‌टेबाजी वर नियंत्रण आणणे पुरेसे नाही. परदेशी चलन कायद्यात बदल करावा लागेल. परकीय गेमिंग, गॅम्बलिंग, बेटिंग कंपन्यांना भारतात त्याबाबतची गुंतवणूक करण्यासाठीच्या कायद्याचे निकषही निश्चित करावे लागतील. माहिती तंत्रज्ञान कायद्यातही बदल करावा लागेल. अधिकृत आणि अनधिकृत बेटिंग, गॅम्बलिंग याबाबत माहिती प्रसारित करताना अधिकृतांना वाट करून देणे आणि अनधिकृतांना रोखणे हे मोठ्या जिकरीचे काम ठरणार आहे. २०११ च्या राष्ट्रीय क्रीडाधोरणाच्या आचारसंहितेत बदल करावा लागेल. आत्तापर्यंत खेळांवर सट्‌टेबाजी करता येत नव्हती. त्या नियमालाही अपवाद निर्माण करावे लागतील. सट्‌टेबाजीपेक्षाही गहन आणि गुन्हेगारी स्वरुपाचा प्रश्न आहे सामना निकाल निश्चितीततेचा. त्याबाबत सरकारला निकालनिश्चिती व खेळातील भ्रष्टाचार यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करणे गरजेचे ठरणार आहे. मात्र त्यासाठी सर्वप्रथम कठोर कायदा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण बीसीसीआयने स्वत:चे अॅन्टी करप्शन युनिट निर्माण करूनही त्यांना कोणत्याही दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे आजही गुन्हेगार बिनदिक्कतपणे गुन्हे करूनही राजरोसपणे फिरत आहेत. म्हणून सरकारला बीसीसीआयला मदतीचा हात द्यावा लागेल. सट्‌टेबाजी अधिकृत केल्यास सरकारला महसूल निश्चितच मिळेल. मात्र या अवैध व्यवसायाला अधिकृत स्वरूप आल्यास भारतात सट्‌टेबाजीचा हा भस्मासूर अनेक संसार बेचिराख करू शकतो. जी गोष्ट काही राज्यांच्या बाबतीत लॉटरी संदर्भात झाली, तोच प्रकार क्रिकेट बेटिंगच्या बाबतीतही घेऊ शकतो.

vinayakdalvi41@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser