आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:प्रदीर्घ योगदानाचा उचित सन्मान

विश्वास पाटीलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लोककलांमध्ये ज्या कलाप्रकाराला मानाचं पान दिलं जातं, त्या तमाशा क्षेत्रातील प्रदीर्घ आणि लक्षणीय योगदानाचा सन्मान म्हणून ज्येष्ठ तमाशा कलावती गुलाबबाई संगमनेरकर यांना राज्य शासनाचा ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर सन्मान’ जाहीर झाला आहे. कलाप्रेमी आस्वादकांसाठी आणि गुलाबबाईंच्या कलेच्या असंख्य चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. या सन्मानाच्या निमित्तानं गुलाबबाई संगमनेरकरांच्या कलासाधनेविषयी आणि कलाविष्काराविषयी काही हितगुज वाचकांसोबत मांडावं, असं वाटतं. गेल्या २० - २२ वर्षांत त्यांचा जो जिव्हाळा, आपुलकी मला लाभली, त्याविषयीदेखिल काही गोष्टी वाचकांना रसपूर्ण वाटतील आणि युवा वाचकांनाही आजच्या ‘इन्स्टंट’च्या काळात, साठ-सत्तर वर्षांची कलासाधना काय असते, याचे दर्शन या निमित्तानं घडेल.

गुलाबबाई संगमनेरकरांचं वर्णन एका शब्दांत करायचं झालं, तर त्या ‘ऑलराऊंडर’ आहेत, असं मी म्हणेन. तमाशा कलेची मुख्य मानली जाणारी त्रिसूत्री म्हणजे, उत्तम गायन, उत्तम अदाकारी आणि उत्तम पदन्यास... गुलाबबाई या त्रिसूत्रीमध्ये महाप्रवीण आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ढोलकी फडाचा तमाशा, संगीत पार्टी अशा सर्व प्रकारच्या माध्यमांचा अनुभव घेतला आणि त्यानंतर स्वत:ची पार्टी सुरू केली आणि ती यशस्वीपणे चालवली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अर्थातच सोपा, सरळ अजिबात नव्हता. ही वाट संघर्षाची, कष्टांची, अपेष्टांची होती. पण ‘अंतरीचा ज्ञानदिवा "तमाशा कलेचा’ होता, तो अखंड तेवत राहिला, आजही देवतो आहे. 

गुलाबबाईंनी लहानपणापासून तमाशा अंगिकारला. त्यांच्या रक्तांधून तमाशाच वाहात होता. लावण्या सादर करण्याची त्यांची स्वत:ची शैली होती. त्यांच्या अदाकारीला तोड नव्हती. जोडीनं डौलदार पदन्यास, चाळांचा झनझनाट आणि गळा तयारीचा.. त्यामुळं त्यांच्या तमाशाची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. ठिकठिकाणी त्यांना तमाशासाठी बोलावणी यायची, असे मी ऐकले आहे. बाईंचा प्रत्यक्ष परिचय झाला तो एका अप्रतिम लावणीच्या निमित्तानं. ‘रात चैताची जातिया सुनी गं, माज्या राजाला कळवा कुणी गं..असे बोल होते. ग. दि. मडगूळकर यांची लावणी होती आणि वसंत पवार यांनी संगीत केलं होतं. ही फर्मास लावणी गुलाबबाईंनी अशी ढंगदार पद्धतीनं रंगवली होती, काही विचारता सोय नाही. त्यांची अदाकारी, पदन्यास आणि गायन यांचा समसमा संयोग जमून आला होता. एक ‘माहौल’ तयार झाला होता. ती लावणी एकदम उंचीवर पोचली होती. मला आठवतंय, लता मंगेशकरांनी जेव्हा माझी आजोळची गाणी, या कॅसेट ध्वनिमुद्रित केल्या, तेव्हा गुलाबबाईंना अदाकारीसाठी आमंत्रित केले होते. विशेषत: ‘राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हाविण बाई...ही रचना बाईंनी अशी सादर केली होती, की प्रेक्षकांनी त्यांची स्तुती केली होती. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री असताना, तमाशा - लावणी अन्य मंडळींना पाहता यावे, यासाठी गुलाबबाईंनाच निमंत्रित केले होते. 

काही वर्षांपूर्वी ‘रज्जो’ चित्रपटाच्या निमित्ताने गुलाबबाईंसह काम करण्याचा योग आला. या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली. सगळ्या यूनिटशी त्यांचं छान ट्यूनिंग जमलं होतं. अतिशय बोलका चेहरा, टपोरे डोळे आणि मुद्राभिनय ही त्यांची खासियत चित्रपटाच्या निमित्ताने सगळ्यांना जाणवली. भूमिका छोटी असली, तरी बाईंनी त्यातही ठसा उमटवला. मनपासून काम केले. कुणाच्याही ‘स्टारडम’चे दडपण, दबाव न बाळगता, कुठलाही न्यूनगंड न बाळगता त्यांनी सहज भूमिका साकारली.  त्यांनी काही वगनाट्यांतूनही काम केलं. गावोगावच्या जत्रा, उत्सव, मेळे, उरुस..सगळीकडे त्यांना मागणी होती. नारायणगाव परिसरात तर त्यांच्या सादरीकरणासाठी ‘बोली’ लावली जात असे, इतकी त्यांची लोकप्रियता होती. मुंबईत हनुमान थिएटर, पुण्यात आर्यभूषण थिएटर इथे त्यांनी सातत्याने सादरीकरण केले. मुख्य म्हणजे गुलाबबाईंनी आपल्या तमाशा कलेचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला. त्यांच्या कन्या वर्षाताई तसेच नाती स्वप्ना आणि पियूषा याही उत्तम तमाशा कलावंत आहेत. नव्या पिढीकडे त्यांनी कला सोपवली तर आहेच, पण युवा पिढीविषयी त्या सकारात्मक आहेत. अनेक विद्यार्थिनींना त्यांनी घडवले आहे.

कोणत्याही कलावंताच्या बाबतीत परंपरा जशी महत्त्वाची मानली जाते, तसेच महत्त्व प्रयोगशीलतेलाही असते. गुलाबबाईंनीही आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विविधता आणि प्रयोगशीलता जपली. तमाशाप्रमाणेच लोकनाट्य, वगनाट्यात काम केले. काही लोकनाट्यांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शनही केले. पारंपरिक लावण्यांसोबत आधुनिक काळातील रचनाही सादर केल्या. वयोमानानुसार, नृत्यावर काही मर्यादा आल्यावर त्यांनी बैठकीची लावणी आणि अदाकारीचे दर्शन घडवले. त्यांचा रसिकवर्ग फक्त खेड्यापाड्यातून नव्हे तर शहरी भागांतही मोठ्या संख्येने आहे. किरण संगीत लोकनाट्य तामाशा मंडळ, ज्येष्ठ कलावंत तुकाराम खेडकर, ढोलकीफड मालक आनंदराव महाजन जळगावकर यांच्याबरोबर तंबूत काम केले. प्रकाश इनामदार यांच्यासोबत ‘गाढवाचं लग्न’ या लोकनाट्यात काम केले. आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांतून कला सादर केली. एचएमव्हीच्या ध्वनिमुद्रिकाही केल्या. अगदी सुरवातीला त्या राधाबाई बुधगावकर पार्टीत होत्या. बबुताई शिर्डीकर,  सुगंधाबाई सिन्नरकर, महादू नगरकर..अशांकडून शिक्षण मिळ‌ले. चौदाव्या वर्षी स्वत:ची संगीत पार्टी चालू केली. ती आजही सुरू आहे.

कलाक्षेत्रातील अनेक नामवंत त्यांचे चाहते होते. भालजी पेंढारकर, अनंत माने, अरुण सरनाईक, जयश्री गडकर, यशवंत दत्त. अशा अनेक कलावंतांनी त्यांचा गौरव केला. १९६८-६९ मध्ये एमएमव्हीतर्फे प्रकाशित झालेल्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका विविध आकाशवाणी केंद्रांच्या माध्यमातून सातत्याने श्रोत्यांपर्यंत पोचत आल्या आहेत. दूरदर्शनवरूनही त्यांनी कलेचे सादरीकरण केले आहे. सुषमा देशपांडे यांच्या ‘तिच्या आईची गोष्ट’ या नाटकाचे नृत्यदिग्दर्शनही बाईंनी केले. मराठी तमाशा परिषद, लावणी विकास मंच अशा कलासंस्थांच्या मानद अध्यक्षपदी त्यांनी काम केले आहे. आता नव्वदीच्या आसपास पोचलेल्या गुलाबबाईंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या कुणाविषयी तक्रारीचा सूर काढत नाहीत. संघर्ष, प्रतिकूलता, कौटुंबिक आघात, संकटे..या साऱ्याचा फटका त्यांनीही सोसला आहे. मात्र ‘चित्ती असो द्यावे समाधान’ ही वृत्ती कायम आहे. नव्या पिढीविषयी त्या आशावादी आहेत. नाराजीचा आणि पराभवाचा कुठलाही भाव त्या मनात ठेवत नाहीत. तमाशा कलेविषयीचे त्यांचे प्रगाढ ज्ञान, त्यांचा अधिकार, प्रतिभा आणि कौशल्य त्या आजही नव्या पिढीला समजाऊन देण्यास तयार असतात. मार्गदर्शनासाठी नेहमीच उपलब्ध असतात. त्यांच्या समग्र कलाविष्काराचा गौरव या सन्मानाच्या रूपाने शासनाने केला, ही आनंदाची गोष्ट आहे.

authorvishwaspatil@gmail.com

बातम्या आणखी आहेत...