आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभाव्य:काेराेना विषाणूनंतरचे विश्व...

Aurangabadएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दाेन बाबींची निवड : महत्वाची सर्व्हिलन्स राज की नागरिक सशक्तीकरण, राष्ट्रवादी फुटीरता की वैश्विक ऐक्य ?

युवाल नोआ हरारी

काेविड-19 ही महामारी सरकारी देखरेखीच्या अनुषंगाने मैलाचा दगड सिद्ध हाेईल. या देखरेखीचे स्वरूप ‘अाेव्हर द स्किन’ पासून ‘अंडर द स्किन’ पर्यंत बदलेल. सरकारे लोकांच्या भूमिकाही जाणून घेऊ लागतील.

मानव समुदायासमाेरील हे एक मोठे संकट आहे. वादळ संपल्यानंतर आपण कोणत्या जगात असू? आपल्यापैकी बरेच लोक जिवंत असतील, परंतु बदललेल्या जगात. आपत्कालीन परिस्थितीत उचललेली बरीच पावले आयुष्याचा भाग बनतील. सध्या आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. त्यामुळे ऐतिहासिक प्रक्रियेचा वेग वाढला आहे. असे काही निर्णय असतात ज्यांच्यावर वर्षांनुवर्षे चर्चा करुन ते घेतले जायचे, पण आता काही तासातच घेतले जातात. अशा वेळी सर्व देशांचे नागरिक हे मोठ्या सामाजिक प्रयोगांचे मार्गदर्शक म्हणून काम करतात. म्हणजेच सर्वजण काम करतील आणि दुरूनच संवाद साधतील. काय होईल जेव्हा सर्व शाळा आणि कॉलेज हे ऑनलाइन होतील?

एरव्ही सरकार, व्यापारी, संस्था या अशा प्रयोगांसाठी सहमती दर्शवणार नाहीत पण ही वेळ सामान्य नाहीये. आपल्याला दोन गोष्टी निवडाव्या लागतील. पहिल्यांदा आपल्याला सर्व अधिकारांसह समग्र पाळत ठेवण्याची व्यवस्था आणि नागरिक सशक्तीकरण यापैकी एकाची निवड करावी लागेल आणि दुसरी निवड म्हणजे विभाजीत राष्ट्रवाद की जागतिक एकता. महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमांचे पालन आपल्याला करावेच लागेल. यासाठी सरकारने लोकांवर पाळत ठेवली पाहिजे आणि जे नियमांचे भंग करतील त्यांच्याकडून दंड वसूल करावा. आज मानवी इतिहासात पहिल्यांदा तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांवर पाळत ठेवणे सहज शक्य होत आहे. आता पाळत ठेवण्यासाठी माणसांची गरज नाहीये त्याऐवजी सेंसर, एल्गोरिदम, कॅमेऱ्याचा वापर सरकार करु शकते. याबाबत चीनच्या कार्यपद्धतीकडे पाहणे गरजेचं आहे. लोकांच्या स्मार्ट फोनचे निरीक्षण करून, कोट्यावधी कॅमेऱ्यांद्वारे चेहऱ्यांची ओळख पटवून तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या शरीराचे तापमान आणि वैद्यकीय स्थिती जाणून चीनने काेराेना बाधित व्यक्तींना ओळखले. इस्राईलने संक्रमण रोखण्यासाठी पाळत ठेवण्याच्या अशा गोष्टींच्या वापराची परवानगी दिली आहे जी आतंकवाद विरोधात लढण्यासाठी वापरली जाते. अलिकडच्या काळात सरकार आणि अनेक मोठ्या कंपन्या लोकांचे निरीक्षण, देखरेख ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत. आतापर्यंत असे घडत होते की, जेव्हा आपली बोटं स्मार्टफोनवर क्लिक करतात, तेव्हा सरकारला जाणून घ्यायचं होतं की तुम्ही काय बघता आणि वाचता. पण, कोरोना विषाणूनंतर, इंटरनेटचा फोकस बदलला जाईल. आता सरकारला आपल्या बोटाचे तपमान आणि त्वचेखालील रक्तदाब देखील माहित असेल.

समजा एखाद्या सरकारने आपल्या नागरिकांना असे सांगितले की सर्व लोकांना बायोमेट्रिक ब्रेसलेट घालणे बंधनकारक असेल, जे शरीराचे तापमान आणि हृदयाच्या ठोक्यांचे निरीक्षण करेल. हा डेटा सरकारी अल्गोरिदममध्ये जाईल आणि त्याचे विश्लेषण केले जाईल. हे तुम्हाला माहिती होण्यापूर्वी सरकारला कळेल की तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही कुठं गेलात आणि कुणाला भेटलात हे देखील त्यांना समजेल. यामुळे संक्रमणाची साखळी तुटेल. ही पद्धत काही दिवसांतच महामारी थांबवण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे सगळं ऐकायला बर वाटतंय ना? पण यामागचे धोके समजून घ्या. म्हणजे पाळत ठेवण्याच्या यंत्रणेला वैधता मिळेल. उदाहरणार्थ, जर कुणाला माहित असेल मी फॉक्स न्यूज ऐवजी सीएनएनवर क्लिक केलयं तर सरकार माझे राजकीय विचार तसेच माझे व्यक्तीमत्व काय आहे हे समजून घेेईल. 

समजा व्हिडिओ क्लिप पाहताना माझे तापमान, रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांचे निरीक्षण केल्यामुळे तुम्हाला कळू शकते की मला कधी राग आलाय, कधी  हसू आलं  किंवा का रडू आलं.  क्रोध, आनंद,  प्रेम यासारख्या ताप आणि खोकला या जैविक प्रक्रिया आहे. खोकला ओळखू शकणारे तंत्र, हसणं देखील ओळखू शकेल. जर सरकार आणि मोठ्या कंपन्यांनी आपला डेटा संकलित करायची सुरवात केली तर ते केवळ आमच्या भावनांचे आकलन करू शकणार नाहीत, तर आपल्यापेक्षा आपल्याला तेच चांगले ओळखतील. इतकचं नसून ते उत्पादक किंवा राजकारणी असतील तर आपल्याला प्रभावित करून त्यांना हव्या त्या वस्तूंची विक्रीही करू शकतील. बायोमेट्रिक देखरेखीनंतर केंब्रिज डेटा हॅकिंग हे जुन्या काळातील तंत्रज्ञान आहे असं वाटेल. कल्पना करा की, उत्तर कोरिया या देशात २०३० मध्ये २४ तास बायोमेट्रीक ब्रेसलेट घालणे बंधनकारक ठरले तर त्या महान नेत्याचे भाषण ऐकताना कुणाला राग आला तर त्यांना संपवले जाईल.

बायोमेट्रिक पाळत ठेवणे ही आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी एक तात्पुरती यंत्रणा आहे असं म्हणता येईल. पण तात्पुरत्या यंत्रणांची एक वाईट सवय आहे की आपत्कालीन परिस्थितीनंतरही त्या टिकून राहतात. १९४८ च्या स्वातंत्र्य युद्धाच्यावेळी इस्राईलमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती, त्या अंतर्गत प्रेस सेन्सॉरशिपपासून ते पुडिंग्ज करण्यासाठी लोकांची जमीन जप्त करण्यापर्यंत अनेक तात्पुरती व्यवस्था केली गेली होती.स्वातंत्र्याची लढाई कधीच जिंकली पण इस्रलाईलने कधीच आणीबाणी संपली अशी घोषणाच केली नाही. २०११ नंतर पुडिंग बनवण्यासाठी जमीनी काढून घेण्याचा कायदा बंद करण्यात आला.

कोरोना संसर्ग पूर्णपणे नष्ट झाला तरी, तरीही डेटा जमा करण्याची भूक कधीच कमी होणार नाही. यासाठी अनेक कारण दिली जातील यामध्ये आफ्रिकेत इबोलाच्या प्रसार होतोय किंवा कोरोनाच्या दुसऱ्या प्रकाराचा संसर्ग होऊ शकतो किंवा होण्याची भीती आहे अशी कारणं देऊन बायोमेट्रिक पाळत कायम ठेवली जाऊ शकते. आपण समजून घेणं गरजेचं आहे. अनेक वर्षांपासून आपल्या गोपनीयतेबद्दल एक भयंकर लढा सुरू झाला आहे. कोरोना संसर्ग हा एक महत्वाचा टप्पा असू शकतो, जेव्हा लोकांना गोपनीयता आणि आरोग्यापैकी एखादा पर्याय निवडायचा असेल तेव्हा ते निश्चितपणे आरोग्य निवडतील. वास्तविक, आरोग्य आणि गोपनीयता यापैकी एक निवडण्यास सांगणे हेच समस्येचे मूळ आहे. कारण, ते योग्य नाही. आम्हाला गोपनीयता आणि आरोग्य दोन्ही मिळू शकतात. यासाठी नागरिकांचे सशक्तीकरण करून कोरोना विषाणूचा फैलाव रोखू शकतो, सर्वसमावेशक पाळत ठेवणारी यंत्रणा राबवून नाही.  दक्षिण कोरिया, तैवान आणि सिंगापूर यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चांगली यंत्रणा राबवली आहे. या देशांनी मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या आहेत, प्रामाणिकपणे माहिती दिली आहे,  लोकांनीही त्यांना सहकार्य केले होते. जेव्हा लोकांना वैज्ञानिक तथ्य सांगितले जातात, तेव्हा लोक विश्वास ठेवतात आणि अधिकारी सत्य बोलतात त्यावेळी लोकही सहकार्य करतात. याचे उदाहरण म्हणजे लोक साबणाने हात धुतात याचे कारण म्हणजे पोलिसांची भीती नाही तर लोकांना तथ्य समजले आहे. 

पाळत ठेवण्याच्या नियमाऐवजी विज्ञान, सरकारी संस्था आणि माध्यमांवरील जनतेचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी काम केले पाहिजे. आपण निश्चितच नवीन तंत्रज्ञान वापरले पाहिजे, परंतु यामुळे नागरिकांना बळ मिळावे. मी माझ्या शरीराचे तापमान आणि रक्तदाब मोजण्याच्या बाजूने आहे, परंतु त्या डेटाचा उपयोग सरकारला सर्वशक्तिमान करण्यासाठी केला जाऊ नये.

आता दुसरी महत्त्वाची निवड म्हणजे आपल्याला राष्ट्रवादाचे विभाजन आणि जागतिक एकता यामध्ये करावी लागेल. ही महामारी आणि त्याच्या अर्थव्यवस्थांवर होणारा परिणाम हे जागतिक संकट आहे. सर्व प्रथम, जगातील देशांनी विषाणूचा सामना करण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे. अमेरिकेचा कोरोना व्हायरस आणि चीनचा कोरोना व्हायरस लोकांच्या शरीरात कसा जाणार आहे हे एकमेकांना सांगणार नाही. पण चीन अमेरिकेला काही उपयुक्त गोष्टी सांगू शकेल. इटलीमध्ये, डॉक्टर सकाळी शोध घेतात, ती संध्याकाळपर्यंत तेहरानमध्ये लोकांचे प्राण वाचवू शकतात. परंतु हे करण्यासाठी जागतिक सहकार्याची आणि विश्वासाची भावना असणे आवश्यक आहे. नम्रपणे सल्ला विचारला पाहिजे. आपल्या स्वत: च्या देशात उपकरणे तयार करण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी समन्वयाने केलेले जागतिक प्रयत्न अधिक प्रभावी ठरतील. लढाईच्या वेळी जगातील देश आपल्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करतात त्याप्रमाणे कोरोनाबरोबर झालेल्या मानवी लढाईच्यावेळी जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीचेही मानवीयीकरण केले पाहिजे.

असं वाटतयं की मानवतेच्या भवितव्यापेक्षा अमेरिकेला त्याच्या महासत्तेबद्दल अधिक चिंता आहे. अमेरिकन प्रशासनानेही आपल्या जवळच्या भागीदारांना वगळून टाकलयं. सध्याचे अमेरिकन प्रशासन जागतिक कृती आराखडा घेऊन पुढे आला तर बरे होईल. पण अमेरिकेने सोडल्यामुळे रिक्त झालेली जागा जर कोणत्या दुस-या देशांनी घेतली नाही तर हे संकट अतिशय भयानक होईल शिवाय यानंतर आतंरराष्ट्रीय संबध हे अधिक विषारी होतील. आपल्याला विभाजन की जागतिक एकता यापैकी एकाची निवड करावी लागेल. जर आपण विभाजनाची निवड केली तर हे संकटांला अधिक तीव्र करेल व भविष्यात अजून भयंकर संकटांचा सामना करावा लागेल. जर आपण जागतिक एकतेची निवड केली तर कोरोनाच्या विरोधातील लढाईत आपला विजय असेल, शिवाय भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला बळ मिळेल. अशी संकटे २१व्या शतकात मानवाचे अस्तित्व नष्ट करु शकतात.  Copyright © Yuval Noah Harari 2020

बातम्या आणखी आहेत...