आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:चिंता दुसऱ्या लाटेची...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दुसऱ्या संसर्गाच्या वाढत्या धोक्याच्या टप्प्यावर जग उभे आहे. संपत्ती, समृद्धी अधिक असलेले युरोपातील देश दुसऱ्या लाटेच्या विळख्यात अडकले आहेत. तेथील लागण व मृत्युदर पहिल्यापेक्षाही जास्त आहे. भारतातही दुसऱ्या लाटेची सुरुवात दिल्लीपासून झाली. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. चिंता वाटावी अशा गतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या गर्दीच्या शहरांतून संसर्ग वाढतोय. सणांच्या दिवसात, विशेषत: दिवाळीला लोक इतक्या बेफामपणे घराबाहेर पडले की, बाजारपेठेतील गर्दी भीतीदायक वाटावी. बाजार गर्दीत विषाणू मेल्याची अजित पवारांची टिप्पणी मार्मिक होती. पंतप्रधान माेदींनी देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी आज बोलताना लोकांच्या बेदरकारीकडे लक्ष वेधले. दुसऱ्या लाटेच्या संकटाबद्दल गाफील न राहता लोकांना अतिशय सावध, जागरूक करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन आहे. काळजी घेतली नाही तर दुसरी लाट अधिक चिंताजनक ठरू शकते. जिथे लोकसंख्या कमी, पण आरोग्य सुविधांचा दर्जा चांगला, अशा ब्रिटनमध्ये दुसऱ्या लाटेने स्थिती आवाक्याबाहेर जाते आहे. ब्रिटनच्या तुलनेत लोकसंख्या व आरोग्य सुविधांच्या बाबतीत कमालीची उलटी स्थिती असलेल्या भारतात दुसऱ्या लाटेला रोखणे अधिक कठीण आहे. युरोपातील दुसऱ्या संसर्गात महत्त्वाची गोष्ट समोर आली. तिथे तरुणांच्या बेफिकिरीमुळे २१ ते ४१ वयोगटात लागण प्रमाण जास्त आहे. ‘तुम्हाला लक्षणे असोत वा नसोत, घरातील ज्येष्ठांपर्यंत तुम्ही संसर्ग पोहोचवू शकता,’ हे भारतातील तरुणांना समजावले पाहिजे. दुसऱ्या लाटेला रोखण्याचे नियोजन करताना अगोदरच्या चुकांचे विस्मरण होऊ नये. स्थलांतरितांचा प्रश्न हाताळण्यात केंद्र व सर्व राज्यांनी मोठी चूक केली. ज्यामुळे लोकांना भयंकर हालअपेष्टा व सरकारांना प्रचंड आर्थिक ताण सोसावा लागला. आता ते होऊ नये. रेल्वे वाहतूक थांबवायची नाही, हे केंद्रानेच ठरवले आहे. मार्चमध्ये लॉकडाऊनच्या घोषणेनंतर ते सरकारला व लोकांना पाळायला अतिशय अवघड झाले. देशाच्या, राज्यांच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली. कारखाने बंद पडले. रोजगार गेले. कोरोनापेक्षाही भयंकर वाटावे असे हे संकट होते. आता लॉकडाऊनची वेळ आलीच तर निर्णय घेताना केवळ सरकारी बाबूंवर अवलंबून न राहता उद्योजकांच्या सल्ल्याने तो केला पाहिजे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser