आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामानव:बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही कोणासाठी?

यशवंत मनोहरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाही या शब्दात ‘लोक’ हे पूर्वपद आहे. लोक या दोन अक्षरांच्या शब्दात भारतातील सर्वच लोकांचा अंतर्भाव आहे. या सर्वच लोकांनी स्वतःला केवळ ‘भारतीय’ म्हणावे अशी बाबासाहेबांच्या ‘लोकशाही’ या संकल्पनेची सुंदर इच्छा आहे. कोणीही कोणाचा मालक नाही आणि कोणीही कोणाचा गुलाम नाही, प्रत्येकाला एकमत आणि प्रत्येक मताला एकमूल्य हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारी जीवन जगण्याची एक सुसभ्य पद्धती म्हणजे लोकशाही. ही पद्धती ज्याच्या विचारातून आणि आचरणातून प्रकट होते त्या समाजाला लोकशाहीसमाज आणि त्याच्या संस्कृतीला ‘लोकशाहीसंस्कृती’ म्हटले जाते.

लोकशाही या शब्दात ‘लोक’ हे पूर्वपद आहे. लोक या दोन अक्षरांच्या शब्दात भारतातील सर्वच लोकांचा अंतर्भाव आहे. या सर्वच लोकांनी स्वतःला केवळ ‘भारतीय’ म्हणावे अशी बाबासाहेबांच्या ‘लोकशाही’ या संकल्पनेची सुंदर इच्छा आहे. कोणीही कोणाचा मालक नाही आणि कोणीही कोणाचा गुलाम नाही, प्रत्येकाला एकमत आणि प्रत्येक मताला एकमूल्य हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारी जीवन जगण्याची एक सुसभ्य पद्धती म्हणजे लोकशाही. ही पद्धती ज्याच्या विचारातून आणि आचरणातून प्रकट होते त्या समाजाला लोकशाहीसमाज आणि त्याच्या संस्कृतीला ‘लोकशाहीसंस्कृती’ म्हटले जाते. ही संस्कृती कोणत्याही धर्माची, जातीची वा पक्षाची संस्कृती नव्हे. ही लोकशाहीसंस्कृती भारतातील एकूणच लोकांच्या समान सन्मानाची, प्रगल्भ सलोख्याची आणि परस्परोपकारक सहजीवनाची संस्कृती आहे. हिलाच आता दुनिया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही मानते.

‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांनी चालवलेली राज्य पद्धती म्हणजे लोकशाही’ या अब्राहम लिंकनच्या उद्गारातील विधायक उजेड बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीतही काठोकाठ भरलेला आहे. भारतीय लोकशाहीला भारतीय गणतंत्र वा लोकतंत्र म्हटले जाते. या ‘गण’मध्ये वा ‘लोक’मध्ये ‘भारतीयत्व’ एकसंध रूपात गृहीत आहे. म्हणून हे सर्व लोक स्वतःला आम्ही भारताचे लोक म्हणतात. या लोकांच्या जीवनशैलीलाच आपण लोकशाही म्हणतो. गण किंवा लोक हेच भारताचे महानायक आहेत. या महानायकांच्या भौतिक आणि नैतिक हिताचे तंत्र किंवा शाही म्हणजे लोकशाही! लोकशाही म्हणजे परलोकशाही नव्हे.

लोकशाहीची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढील वचनावरूनही स्पष्टपणे व्यक्त होते. ते म्हणाले होते - ‘मला शेटजी-भटजींचे राज्य नको असून ऐंशी टक्के लोकांचे राज्य हवे आहे. हे ऐंशी टक्के लोक म्हणजे स्त्रिया, ओबीसी, आदिवासी, भटकेविमुक्त, बौद्ध, शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजगट होत. त्यांच्यात शेतकरी, कामगार, मजूर, यांच्यातलेच अध्यापक आणि पोटासाठी छोटे-मोठे उद्योग करणारे लोक येतात आणि उरलेल्या वीस टक्क्यांमध्ये जमीनदार, उद्योगपती, भांडवलदार, सरजांमदार, हजारो कोटींचे धनी असलेले राजकारणी, देशातील हजारो कोटी घेऊन परदेशात पळणारे डाकू आणि स्विस बँकेत पैशांचे डोंगर नेऊन ठेवणारे भ्रष्टाचारी असतात. हे वीस टक्के लोक म्हणजे मलईदारांचा वर्ग.

बाबासाहेब आंबेडकरांना ऐंशी टक्के लोकांच्यासाठी, ऐंशी टक्के लोकांनी चालवलेले, ऐंशी टक्के लोकांचे राज्य हवे आहे. या ऐंशी टक्के लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना समजावून घेतले तरी भारतात क्रांती होईल. नवा भारत, सेक्युलर आणि समाजवादी भारत जन्माला येईल. या ऐंशी टक्के लोकांचा भारत म्हणजे खरा भारत, त्यांच्यासाठी लोकशाही म्हणजे खरी लोकशाही! बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही ऐंशी टक्के लोकांना आणि वीस टक्के लोकांना सममूल्य देणारी, एका सामाजिक आणि आर्थिक पातळीत आणणारीच लोकशाही आहे. कामगारांचे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे दोन शत्रू आहेत असे बाबासाहेब म्हणाले होते. पण हे दोन शत्रू केवळ कामगारांचेच नाहीत तर संपूर्ण ऐंशी टक्के लोकांचे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्याचे शत्रू आहेत असे म्हटले पाहिजे.

बाबासाहेबांची लोकशाही या ऐंशी टक्के लोकांना देशाचे अधिनायक करू इच्छिते म्हणून त्यांच्या लोकशाहीमध्ये पक्षशाही, सरंजामशाही, हुकूमशाही, भांडवलशाही, उन्मत्तशाही, उन्मादशाही, जातशाही, उच्चवर्णशाही, वंशशाही, अभिजनशाही वा दुकानदारशाही अशी कोणतीही शाही बसत नाही. या सर्व शाह्या ऐंशी टक्के लोकांची हत्या करणाऱ्याच शाह्या आहेत. धर्माची अफू चारून ऐंशी टक्क्यांवर वरील सर्व शाह्या आज लादल्या जात आहेत. या सर्वच शाह्या उद्ध्वस्त करण्याची संपूर्ण बौद्धिक क्षमता बाबासाहेबांच्या लोकशाहीत आहे.

धर्मांप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही कोणत्याही अर्थाने मूलतत्त्ववादी वा पोथीवादी नाही. तिच्यातील साध्यमूल्ये ही तर वैश्विकच आहेत आणि गरजेनुसार साधने बदलून घेण्याची तरतूद ज्यातून ती उगवली आहे त्या संविधानातच आहे. विविधतेत विषमता प्रस्थापित करते तिला संस्कृती हे सुंदर नाव शोभत नाही. विविधतेत एकमयता पाहते तिलाच संस्कृती म्हटले जाते. वर्ण, जातींची विविधता जपणे म्हणजे संस्कृती नव्हे. लोकांचे पेहराव, भाषा, खाद्यपदार्थ यांची विविधता जपण्याला आपण संस्कृती म्हणतो पण धर्मांचे मूलतत्त्ववाद आणि विषमता यांच्या समर्थनाला संस्कृती म्हणता येत नाही. विषमतेच्या ढाच्याला पवित्र मानते ती संस्कृती नसते. प्रवाहित्वाला, सलोख्याला, सममूल्यतेला विरोध करते ती संस्कृती नसते. ते अभिजन वर्णाच्या वा वर्गाच्या हितसंबंधाचे जहर असते आणि या जहराला संस्कृती म्हणता येत नाही. समाजाला विषमततेत जाळणार्‍या वरील सर्वच संस्कृतींच्या निर्मूलनाचा महाप्रकल्प म्हणजे बाबासाहेबांची लोकशाहीसंस्कृती होय असेच म्हटले पाहिजे.

बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही हे सांगते की, ‘पक्षांनी स्वतःच्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानू नये. असे झाले तर लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत होऊ शकते. लोकशाही आपले बाह्यरूप जपत हुकूमशाहीसारखी व्यवहार करू शकेल. प्रचंड बहुमत असले तर ही दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा धोका आहे.’ दुसरे असे की राजकीय लोकशाहीला आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीचे रूप देणे जे राजकारण कटाक्षाने टाळते ते राजकारण लोकशाहीची फक्त फसवणूक करीत असते. ज्या देशात राजकीय सत्ता ही मूठभर लोकांची मक्तेदारी होते आणि बहुतांश लोक केवळ भारवाहक मानले जातात तिथे लोकशाहीची संरचना दिसली तरी ऐंशी टक्क्यांना देशाचे नायक करणारी लोकशाही उरलेलीच नसते. ऐंशी टक्के लोकांच्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी संस्था निर्माण करीत नाही आणि समता, बंधुता प्रस्थापित करीत नाही तिथे बाबासाहेबांची लोकशाही नाकारली गेली असेच म्हटले पाहिजे.

शिवाय ‘कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणावर लोकांनी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये. तसेच त्याच्यावर इतका विश्‍वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकाराचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील’ ही गोष्ट जॉन स्टुअर्ट मिलच्या हवाला देऊन त्यांनी सांगितली. “राजकारणात भक्ती, व्यक्तीपूजा वा विभूतीपूजा हा अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग आहे.” असे बाबासाहेब सांगतात. राज्यकारभार संविधानाच्या नियमांच्यानुसार आणि निःपक्षताती असावा. अल्पसंख्याकांबद्दल राज्यकर्त्यांनी आदर बाळगावा. त्यांना आपली मते मांडण्याची योग्य संधी असावी याच पायावर पार्लमेंटरी लोकशाहीची उभारणी झाली आहे. लोकशाही प्रत्यक्षात येईल असाच राज्यकारभार करण्यासाठी लोकांनी त्यांना अधिकार दिले आहेत. जुन्या घातक प्रवृत्तींवर मात करावी. क्षुद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा देऊ नये. राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा छळ होणार नाही याची खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे असे बाबासाहेबांची लोकशाही सांगते.

आज केंद्रात शासन करणारे लोक बाबासाहेबांच्या लोकशाहीचा अवमान करीत आहेत असे दिसते. धर्मराष्ट्राचे, मुस्लिम आणि बौद्धद्वेषाचे राजकारण होताना दिसते. मुस्लिमांच्या हत्या, बौद्धांच्या हत्या, जाती-धर्म पाहून स्त्रियांवर होणारे बलात्कार, शेतकऱ्यांंच्या आजच्या मोर्चाच्या संदर्भातील क्रौर्य, त्यांना अतिरेकी म्हणणे, महाराष्ट्रातील एक मंत्री मागच्या वेळी ‘शेतकऱ्यांना साले म्हणाले होते. विमानतळे, रेल्वे, मोठे उद्योग, मोठ्या शिक्षणसंस्था, बँका अशी पायाभूत राष्ट्रसंपत्ती भांडवलदारांना विकायचे सर्व प्रयत्न आज सुरू आहेत. हे सर्व होण्याच्या शक्यता बाबासाहेबांनी आधीच मांडून ठेवल्या आहेत. कोरोना काळात मजुरांच्या संदर्भात झालेले वर्तन, मॉबलिंचिंग, लव्हजिहादच्या संदर्भातील पावले, युवावर्गासंबंधीची भूमिका, व्यक्तीपूजा, नोकऱ्यांचा दुष्काळ, स्त्रियांसंबंधीची नेत्यांची असभ्य वक्तव्ये या सर्व गोष्टी बाबासाहेबांची ऐंशी टक्क्यांच्या सममूल्यतेची संकल्पना नाकारणाऱ्याच आहेत. याचा अर्थ असा की ही लोकशाही ज्या स्त्रियांना, ओबीसींना, आदिवासींना, भटकेविमुक्तांना इतर आणि सर्वच अल्पसंख्याकांना आपले महानायक म्हणणारा भारत जन्माला घालू इच्छिते तिच्या विरोधातच आहे.

वीस टक्के अभिजन या ऐंशी टक्के लोकांनाच हाताशी धरून त्यांच्याकडूनच त्यांना उद्ध्वस्त करण्याचा अमानुष खेळ आज खेळत आहेत, वीस टक्के नवभांडवलदार, नवसरंजामदार आणि धर्मांध शक्ती ऐंशी टक्के लोकांकडूनच ऐंशी टक्के लोकांना राजकीय, आर्थिक आणि राजकीय परिघाबाहेर ढकलत आहेत. त्यासाठी शुद्ध हरवणारे धर्माचे इंजेक्शन दिले जात आहे. या ऐंशी टक्के लोकांनी बाबासाहेबांची लोकशाही मस्तकांत घेतली नाही तर त्यांना बाबासाहेबांनी जाळलेल्या मनुस्मृतीमधील नवे दास स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र पुन्हा ठरवले जाईल. आज हे सुरू आहे. हे होऊ नये यासाठीच म्हणजे ऐंशी टक्के लोकांसाठीच बाबासाहेबांची लोकशाही आहे.

yashwantmanohar2012@gmail.com

(यशवंत मनोहर हे मराठी कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहेत.)

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser