आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत घोटाळ्यात सक्रिय असल्याचा ईडीचा दावा:112 कोटी मिळाले; यापैकी 1.06 कोटींची मालमत्ता तर इतर पैशांत परदेशवारी

आशीष राय13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रा चाळ पुनर्विकास आणि 1,039 कोटी 79 लाख रुपयांच्या FSI घोटाळ्यात अटक करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत हे 4 ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत राहणार आहेत. ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोप पत्रात ते या घोटाळ्याचे सक्रिय सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घोटाळ्यात आधीच अटक करण्यात आलेल्या प्रवीण राऊत यांना संजय राऊत यांना 'फ्रंटमन' म्हणून संबोधीत केले आहे. आज प्रवीण आणि संजय राऊत यांची समोरासमोर बसून चौकशी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने प्रवीण यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (MHADA) आवश्यक मान्यता मिळाली. ईडीचा असा दावा आहे की, आतापर्यंतच्या तपासात मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रवीण यांना बेकायदेशीररीत्या मिळालेल्या 112 कोटी रुपयांपैकी 1 कोटी 6 लाख रुपये थेट संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला देण्यात आल्याचे समोर आले आहे. ही रक्कम यापेक्षा जास्त असू शकते, असा दावाही ईडीने केला आहे.

ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड अर्जानुसार, संजय राऊत यांच्या कुटुंबीयांनी देश-विदेशात घालवलेल्या सुट्ट्यांचा संपूर्ण खर्च प्रवीण राऊत यांनी अनेकदा उचलला होता. मात्र, संजय राऊत यांनी आपल्यावरील ही कारवाई निव्वळ राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. ईडीकडून न्यायालयात 8 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती जी फेटाळून न्यायालयाकडून राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

प्रवीण यांच्या कंपनीने 16 बिल्डरांना जमीन विकली

म्हाडाच्या जमिनीचा FSI अनधिकृत पद्धतीने घेतल्यानंतर गुरु आशिष कंपनीने तत्काळ ती अन्य 16 बिल्डरांना विकल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. प्रवीण राऊत हे या कंपनीत संचालक होते. यामुळे गुरु आशिष कंपनीला मोठा आर्थिक नफा झाला. मात्र, आतापर्यंत या प्रकल्पाचे केवळ 10 टक्केच काम पूर्ण झाले असून हे काम पूर्ण करण्यासाठी गुरु आशिष कंपनीला मोठ्या रकमेची गरज आहे, परंतु ती कंपनीच आता दिवाळखोर म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.

बेकायदेशीररीत्या जमीन विकल्याच्या बदल्यात मिळाले 112 कोटी

ईडीच्या दाव्यानुसार, पत्रा चाळमधील रहिवाशांनी म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत तिहेरी करार केला होता. या करारात गुरु आशिष कंपनीचे संचालक प्रवीण राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती. गुरु आशिष कंपनी म्हाडाची कोणतीही जमीन कोणत्याही तिसऱ्या खरेदीदाराला विकू शकत नाही, असे मूळ करारात नमूद करण्यात आले आहे. मात्र तरीही जमीन फसवणूक करून विकण्यात आली. या बदल्यात प्रवीण राऊत यांना HDILकडून 112 कोटी रुपये मिळाले.

संजय राऊत यांना सोबत घेत रचला कट

ईडीने पुढे दावा केला आहे की, PMLA प्रकरणाच्या तपासादरम्यान संजय राऊत, प्रवीण राऊत, राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांनी मिळून कट रचल्याचे समोर आले आहे. या चौघांनी प्रकल्प पूर्ण न करता 672 कुटुंबांचे भवितव्य धोक्यात आणले आणि पैश्यांचा भ्रष्टाचार केला. संजय राऊत व्यतिरिक्त ईडीने इतर तिघांना यापूर्वीच अटक केली आहे.

प्रवीण राऊत यांना एकही पैसा न गुंतवता 112 कोटी मिळाले

ईडीच्या दाव्यानुसार, बेकायदेशीरपणे पैसे घेतल्यानंतर पत्रा चाळ प्रकल्पात गुंतवणूक करण्याऐवजी, मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडने पैसे काढून घेतले. प्रवीण राऊत या कंपनीच्या संचालकांपैकी एक असूनही त्यांनी प्रकल्पात एकही पैसा गुंतवला नाही. शिवाय 2010-2011 मध्ये त्यांना HDIL कडून सुमारे 112 कोटी रुपये मिळाल्याचे मनी ट्रेल तपासात उघड झाले आहे.

पैसे वळवण्यावरून 11 कोटींची मालमत्ता जप्त

ईडीच्या दाव्यानुसार, 112 कोटी वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. यातील काही रकमेतून त्यांनी अनेक मालमत्ता खरेदी केल्या. या प्रकरणात 5 एप्रिल 2022 रोजी प्रवीण राऊत, वर्षा राऊत (संजय राऊत यांच्या पत्नी), स्वप्ना पाटकर यांच्या नावावर असलेली 11 कोटी 51 लाख 56 हजार 573 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या सर्वांनी भाडेकरू, म्हाडा आणि बिल्डर्सची (ज्यांनी FSI घेतला होता) फसवणूक केली.

राऊत आणि त्यांच्या पत्नीला एक कोटींहून अधिक रक्कम मिळाली

ईडीने तपासाच्या आधारे न्यायालयाला सांगितले की, 112 कोटी रुपयांपैकी आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 44 हजार 375 रुपये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे. त्याचा तपशील खालील छायाचित्रात दिल्या प्रमाणे ...

ईडीच्या दाव्यानुसार, संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदी करण्यासाठी हे पैसे वापरले.
ईडीच्या दाव्यानुसार, संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदी करण्यासाठी हे पैसे वापरले.

संजय यांचे निकटवर्तीय असल्यामुळे प्रवीण यांना मिळाल्या सर्व परवानग्या

प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे जवळचे विश्वासू आणि सहकारी असल्याचेही तपासात समोर आले आहे. फ्रंटमॅन असल्याने त्यांनी संजय राऊत यांच्याशी जवळीक साधून म्हाडाची परवानगी व अन्य लाभ मिळवून दिल्याचे साक्षीदारांच्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे.

संजय राऊत यांच्या पत्नीची प्रवीण यांच्या पत्नीशी ओळख

ईडीच्या म्हणण्यानुसार, संजय राऊत यांनी PMLAच्या कलम 50 अंतर्गत नोंदवलेल्या त्यांच्या जबाबात प्रवीण राऊतांचा चाळ घोटाळा प्रकरणात सहभाग नसल्याचे सांगितले. 2012-13 मध्ये प्रवीणच्या संपर्कात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची पत्नी आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नी एकमेकांना ओळखत होत्या. त्यांच्यामुळेच प्रवीण राऊत यांची भेट झाली.

ईडीने पुढे सांगितले की, संजय राऊत यांनी पत्नीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर होण्याची त्यांनी अधिकृत माहिती दिली नाही. याशिवाय मालमत्तेच्या खरेदी व्यवहाराशी संबंधित कोणतीही कागदपत्रेही त्यांना सादर करता आली नाहीत.

संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावावर 10 जमिनींची खरेदी

रिमांड कॉपीनुसार, पत्रा चाळच्या पुनर्विकास प्रकल्पादरम्यान संजय राऊत यांच्या पत्नींच्या अवनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने 2010-11 मध्ये अलिबागमधील किहीम बीच येथे 8 करारांतर्गत 10 जमीनी खरेदी केल्याचेही तपासात उघड झाले आहे. स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत यांच्या नावावर हे करार झाले आहेत. या जमिनी विकत घेण्याच्या बदल्यात विक्रेत्यांना रोखीने मोबदला देण्यात आला असून या रोख रकमेचा स्रोत प्रवीण राऊत असल्याचे पाटकर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

'अवनी इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीची स्थापना झाली तेव्हा संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या शिक्षिका होत्या आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत या गृहिणी होत्या. वर्षा राऊत यांना 'अवनी इन्फ्रास्ट्रक्चर'मध्ये 5625 रुपयांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात 13 लाख 95 हजार 611 रुपये मिळाले.

राऊतांना प्रवीण दर महिन्याला दोन लाख रुपये देत असे

प्रवीण राऊत संजय राऊत यांना प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये रोख देत असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी विक्रेत्यांना अलिबागमधील किहीम बीच येथील जमीन विकण्याची धमकी दिली होती. याशिवाय ईडीसमोर साक्ष देणाऱ्यांनाही त्याने धमकी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...