आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे. हा दिवस फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीप्रीत्यर्थ साजरा केला जातो. नर्सिंगला सन्माननीय व्यवसाय बनवण्याचे श्रेय फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना जाते.
नाइटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी फ्लॉरेन्स, इटली येथे झाला. प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेल्या, फ्लॉरेन्स यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मुलीला परिचारिका होण्यास मान्यता दिली नाही, कारण त्यावेळी नर्सिंग हा सन्माननीय व्यवसाय मानला जात नव्हता. अखेरीस, फ्लॉरेन्सच्या आग्रहापुढे कुटुंबाला नमते घ्यावे लागले आणि त्यांना नर्सिंग प्रशिक्षणासाठी जर्मनीला जाण्याची परवानगी देण्यात आली.
1851 मध्ये त्या जर्मनीला गेल्या आणि 1853 मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय उघडले. त्याच वर्षी क्रिमियन युद्ध सुरू झाले. फ्लॉरेन्स यांनी तुर्कीतील लष्करी रुग्णालयात सैनिकांची सेवा करण्यासाठी 38 नर्सेस घेतल्या.
हॉस्पिटलमध्ये फ्लॉरेन्स यांना घाणीचा डोंगर दिसला. त्यांनी सर्वप्रथम आपले लक्ष स्वच्छतेवर केंद्रित केले. जखमी आणि आजारी सैनिकांच्या काळजीत त्यांनी अहोरात्र एक केली. रात्रीही त्या सैनिकांच्या सेवेत व्यग्र असत. यादरम्यान त्या हातात कंदील घेऊन रुग्णांना पाहायला जात असत, त्यामुळे सैनिक त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' म्हणू लागले. युद्धानंतर फ्लोरेन्स परत आल्या तेव्हा त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. आजही संपूर्ण जग त्यांना याच नावाने ओळखते.
2008 : चीनच्या सिचुआनमध्ये तीव्र भूकंप
या दिवशी 2008 मध्ये चीनमध्ये झालेल्या भीषण भूकंपाने हजारो लोकांची झोप उडवली होती. सिचुआन प्रांतात झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.9 इतकी होती. भूकंपाचे केंद्र दुजियांगयान शहराजवळ होते. भारतीय-ऑस्ट्रेलियन आणि युरेशियन प्लेट्स जमिनीत आदळल्याने हा भूकंप झाल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. या धडकेमुळे तिबेट पठारात खळबळ उडाली आणि ते पूर्वेकडे सरकले. भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज यावरून लावता येतो की, जमिनीत अनेक ठिकाणी 9 मीटरपर्यंत खोल खड्डे तयार झाले होते.
चीनच्या या भागातील जवळपास प्रत्येक चौथी इमारत भूकंपाने उद्ध्वस्त केली होती. शाळा, रुग्णालयांसह सर्व इमारती जमिनीत गाडल्या गेल्या. भूकंपानंतर हजारो लोक बेपत्ता झाले. चिनी सरकारने मृतांची संख्या जवळपास 90 हजारांवर सांगितली असून त्यात 5 हजारांहून अधिक मुलांचा समावेश आहे. मृत पावलेल्या मुलांपैकी बहुतेक शाळकरी मुले होती जी भूकंप झाला तेव्हा शाळेत होती. सुमारे साडेचार लाख लोक जखमी झाले. भूकंपानंतर झालेल्या भूस्खलनात बचाव कार्यात गुंतलेले सुमारे 200 मदत कर्मचारीही ठार झाले. या भूकंपामुळे चीनचे 86 अब्ज अमेरिकन डॉलरचे आर्थिक नुकसान झाले होते.
1965: सोव्हिएत स्पेसशिप लुना-5 चंद्रावर उतरण्यापूर्वी क्रॅश
चंद्राविषयी माहिती गोळा करण्यासाठी सोव्हिएत युनियनने 1959 मध्ये लुना मोहीम सुरू केली. हे अभियान 1976 पर्यंत चालले. यादरम्यान चंद्रावर एकूण 24 यान पाठवण्यात आले. 2 जानेवारी 1959 रोजी या मोहिमेतील पहिले अंतराळ यान लुना-1 प्रक्षेपित करण्यात आले. सोव्हिएत युनियनचे हे मिशन यशस्वी मानले जाते.
9 मे 1965 रोजी या मोहिमेअंतर्गत लुना-5 लाँच करण्यात आले. सोव्हिएत युनियनची योजना चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग बनवण्याची होती. असे झाले असते तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे लुना-5 हे पहिले स्पेसशिप ठरले असते, परंतु प्रक्षेपणाच्या दुसऱ्याच दिवसापासून स्पेसशिपला अडचणी येऊ लागल्या आणि स्पेसशिपशी संपर्क तुटला. ते त्याच्या अक्षावर फिरू लागले आणि लँडिंग साइटपासून दूर जाऊ लागले.
लुना-5 ला नियंत्रित करण्याचे शास्त्रज्ञांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि शेवटी 12 मे रोजी ते लँडिंग साइटपासून सुमारे 700 किमी अंतरावर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यानंतर क्रॅश झाले. नुकतेच रशियाने लुना मोहिमेतील पुढील अंतराळयान लुना-25 लाँच करण्याची घोषणा केली आहे.
1926: उत्तर ध्रुवावरून पहिले उड्डाण
1926 मध्ये या दिवशी बर्फाच्या जाड आवरणाने झाकलेल्या उत्तर ध्रुवावरून पहिले उड्डाण केले गेले. हे उड्डाण नॉर्गे नावाच्या विमानाने केले होते, जे वैमानिक अभियंता उम्बर्टो नोबिल यांनी डिझाइन केले होते. या विमानात एकूण 16 जण होते, याचे नेतृत्व रोआल्ड अमुंडसेन यांनी केले. उत्तर ध्रुवावरील पहिले उड्डाण त्यांच्या नावावर मानले जाते. स्पेट्सबर्ग येथून उड्डाण सुरू झाले आणि अलास्कामध्ये संपले. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 3 तास लागले.
उत्तर ध्रुवावरून पहिल्या यशस्वी उड्डाणाबद्दल अनेक लोकांचे वेगवेगळे दावे असले तरी रोआल्ड अमुंडसेनचे उड्डाण पहिले यशस्वी उड्डाण मानले जाते.
1899 : जगातील पहिल्या अभारतीय योगगुरू, यूजीन पीटरसन यांचा जन्म
युजीन पीटरसन यांचा जन्म 1899 या दिवशी रशियामध्ये झाला. त्यांना जगातील पहिल्या परदेशी योगगुरू मानले जाते. योगामुळे त्या इतक्या प्रभावित झाल्या की 1927 मध्ये त्या रशिया सोडून भारतात आल्या होत्या. भारतात आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून इंदिरा देवी ठेवले आणि प्रसिद्ध योगगुरू कृष्णमाचार्य यांच्या शिष्या बनल्या. जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी योगाचे शिक्षण दिले. यूजीन यांची योगाबद्दलची आवड पाहून 1987 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय योग महासंघाच्या अध्यक्षा बनवण्यात आले. 2002 मध्ये त्यांचे निधन झाले.
12 मे या दिवशीच्या इतिहासातील इतर महत्त्वाच्या घटना
2019 : मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा एका धावेने पराभव करून आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
2017: अहमदाबादमध्ये पहिली हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली सुरू करण्यात आली.
2010: लिबियातील त्रिपोली आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान कोसळले, त्यात 103 जणांचा मृत्यू झाला.
2002: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाच दिवसांच्या क्युबा दौऱ्यावर आले. कॅस्ट्रो यांच्या 1959च्या क्रांतीनंतर क्यूबाला भेट देणारे कार्टर हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
1965: इस्रायल आणि पश्चिम जर्मनीने राजनैतिक संबंध सुरू करण्यासाठी पत्रांची देवाणघेवाण केली.
1941: Z3, जगातील पहिला पूर्णपणे स्वयंचलित डिजिटल संगणक, बर्लिनमध्ये प्रथमच शास्त्रज्ञांसाठी लाँच करण्यात आला. Z3 ची रचना जर्मन स्थापत्य अभियंता कोनार्ड ज्यूसे यांनी केली होती.
1666 : पुरंदरच्या तहानुसार आग्र्याला पोहोचलेले छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटले.
1459: राव जोधा यांनी जोधपूरची स्थापना केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.